स्फुट श्लोक - श्लोक २६ ते ३०

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


२६
अचेतनीं सचेतनीं । समस्तही जनीं वनीम । अखंड तो पुरातनु । निसंग तो निरंजनु ॥१॥
२७
पाहा कितेक निर्मळें । भुतें भुतांसि वर्मिलें । अनेक रूप रंग हो । प्रकुर्ती पाववी मोहो ॥१॥
२८
विचार सार शोधितां । प्रबोध बोध बोधितां । अखंड खंडता नसे । स्वयें प्रचीत वीलसे ॥१॥
बरी विवंचितां तनु । दिसे प्रभंजनु मनु । परंतु येक रूप हो । जनास पाववी मोहो ॥२॥
बहुत वात मातला । जनीं समस्त रातला । अनेक सृष्टि चाळकु । अनंत जीवपाळकु ॥३॥
मनांत जाणती कळा । चळे अखंड चंचळा । जनासि पाळितो सदा । सतत हेत सर्वदा ॥४॥
सहेत वात येक रे । पुढें मिळे अनेक रे । परंतु सार तो चि तो । भला जनीं बुझेल तो ॥५॥
चळेल तो चि चाळकु । पळेल तो चि पाळकु । करील तो विकारला । विकारवंत हारला ॥६॥
अखंड देव निर्मळु । तयास काय रे मळु । अचंचळासि चंचळु । म्हणेल कोण तो खळु ॥७॥
गुणारहि त निर्गुणा । चुकोन सांगती खुणा । बळें चि गुण लविती । सगुण ब्रह्म भाविती ॥८॥
समस्त कार्य मूळ हें । विकारलें समूह हें । अनंत निर्विकार तो । नव्हे चि रे विकार तो ॥९॥
अखंड येत जातसे । अख्मड होत जातसे । अख्मड जे विकारली । नये कदापि थारली ॥१०॥
अतर्क तर्क वेचिना । अलक्ष लक्ष वेचिना । अनंत तो अनंत रे । प्रपंच अंतवंत रे ॥११॥
चळेचिना चि तो चळे । निरोपिताति आंधळे । उगेंचि शब्द वाउगे । वदोनि मूर्ख तें फुगे ॥१२॥
कदा न येचि प्रत्ययो । तयास काय तो जयो । पतीत तो चि पातकी । विनाप्रचीत घातकी ॥१३॥
नसे प्रचीत तें सुणें । उगोंचि काय भुंकणें । स्वयें प्रतीत तो वरु । उगाचि सिंतरु खरु ॥१४॥
निरंजना म्हणे करी । बळें चि गुण थावरी । अलीप्त त्यास भावना । करी म्हणेल तो उणा ॥१५॥
प्रचीत पुसतां कळे । चुकोन वेर्थ चावळे । मनु चहुंकडे पळे । कितेक लोक आंधळे ॥१६॥
उदास दास राहातो । प्रतीत सत्य पाहातो । कळेल त्या सुखें कळो । वळेल त्या सुखें वळो ॥१७॥
२९
देश काळ वर्तमान । सर्व ही अवेवधान । कोणतें विधी विधान । सावधान सावधान ॥१॥
मनास लागली सवे । विधी विधान तें नव्हे । चुकोन हेत जातसे । जनांस घात होतसे ॥२॥
उदंड धंड दंडिलें । उगेंचि मुंड मुंडिलें । अनेक मत्त वेष हो । रिपूसि ही न हो न हो ॥३॥
शरीरवेष पालटे । परोपरीं नटे नटे । परंतु काय साधिलें । अगम्य कोण शोधिलें ॥४॥
उदंड हो नका नका । समस्त ही पडे चुका । ग्रहेंचि पाहातां वरी । परंतु कोण अंतरीं ॥५॥
बहु गृहांतरीं गृहें । शरीर नाम निग्रहें । परंतु कोण निगृही । उदंड मत्त अगृही ॥६॥
तया प्रभुसि नेणता । उगेचि वेर्थ सीणता । प्रसंग मान जाणिजे । तरी खुणेसि बाणिजे ॥७॥
शरीर मात्र तें भलें । तयांत कोण शोभलें । न जाणतां नव्हे भलें । सिणोन काय उगलें ॥८॥
समस्त देहधारकु । समस्त सौख्यकारकु । बहु तनूंत येकला । परोपरीं विभागला ॥९॥
कितेक ते भले भले । तयामधेंच गुंतलें । विचा र सार जागवा । तुम्ही तुम्हास उगवा ॥१०॥
कितेक दृश्य जुळलें । विचारितां वितुळलें । अलक्ष लक्षितां नये । अनन्यता मनोजये ॥११॥
समस्त मान मानिसी । तरी जनास मानसी । अलीकडे पलीकडे । विभक्त भक्त नावडे ॥१२॥
३०
विना प्रचीत मर्गळा । तयास वेद अगळा । स्वयेंचि जो भुपाळ कां । तयास द्वारपाळ कां ॥१॥
कितेक लोक आळिले । कितेक द्बार पाळिले । तयास ही नका नका । उठेल काय सेवका ॥२॥
भ्रमें भुलेल चोर तो । तथा हारामखोर तो । तयास हाल हाल रे । झडेल बाल बाल रे ॥३॥
अनेक  भास नावरी । मदार ठेविला सिरीं । घबाड अर्थ जातसे । भलास भूस खातसे ॥४॥
आभास भूस भासलें । विचारितां विनासलें । विशेष मानवा रसु । भुसास खाय तो भुसु ॥५॥
अनेक देश हिंडतां । अनेक भास धुंडितां । सुशब्द तो अनेक रे । परंतु अर्थ येक रे ॥६॥
विचारितां विवंचना । विधी शरीर भावना । विचार पाहातां नसे । देहे विदेह नीरसे ॥७॥
निरास पंचभूतिकां । प्रप्मच हा दिसे फिका । तयांत सर्व आटलें । परंतु दृश्य लोटलें ॥८॥
विधी विधान वर्ततां । जनामधें प्रवर्ततां । विचार सार अंतरीं । विधी नसे तदंतरीं ॥९॥
विधी विधान तो गुणा । घडेल कोण निर्गुणा । गुणांत गोविला गळ । विवेक पंथ मोकळा ॥१०॥


References : N/A
Last Updated : April 02, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP