भक्तवत्सलता - अभंग ४६ ते ५०

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


४६.
गगनीं ध्रुव तुवां अढळ पैं केला । तो बाळ धाकुला न ह्मणसी ॥१॥
अजामेळाचें तुवां चुकविलें संकट । ब्राह्मण तो नष्ट न ह्मणसी ॥२॥
प्रर्‍हादाचा तुवां केला कैवारु । वैर्‍याचा कुमरु न म्हणसी ॥३॥
गजेमद्रपशू सोडविला पानडिये । मृगखोडी ऐसिये न ह्मणसी ॥४॥
रुक्मांगदाची तुवं उद्धरिली नगरी । विषयीं मुरारी न ह्मणसी तया ॥५॥
ऐसे अपराधी न ह्मणसी देवा । नामा तो केशवा विनवीतसे ॥६॥

४७.
खगावरी स्वारी करूनियां देवा । धांवसी केशवा भक्तांसाठीं ॥१॥
रामा परशुरामा  कृष्णा नारायणा । हरी संकर्षणा भक्तांसाठी ॥२॥
बिभीषण तारी रावणासी मारी । दावी भाव हरी भक्तांसाठीं ॥३॥
नामा ह्मणे भक्तांकारणेम गोविंदा । घेवोनियां गदा उभा ठायी ॥४॥

४८.
कौस्तुभ सोज्वळ कंठीं शोभताहे । भक्तांसाठीं बाहे उभारिली ॥१॥
आन हितासाठीं करिसी धांवण्या । विदुराच्या कण्या गोड करी ॥२॥
ब्रह्मचारी साक्ष सत्यत्वें करिसी । पुढें तूं धांवसी आवडीनें ॥३॥
वचना अंतर पडो नेदी सत्य । नामा ह्मणे भृत्य होसी देवा ॥४॥

४९.
दर्दुराचें पिलूं ह्मणे रामकृष्ण । नाहीं उदक उष्ण झालें तेथें ॥१॥
कढईमध्यें बाळ करी तळमळ । गोविंद गोपाळ पावे वेगीं ॥२॥
तये काळीं आज्ञा केली पावकासी । झणीं तापविसी तयालगीं ॥३॥
ऐसा तो कृपाळु आपुलिया दासा । आमुचा कोंवसा नामा ह्मणे ॥४॥

५०.
देवा पांडुरंगा वासुदेवा हरी । गोविंद मुरारी नारा-यणा ॥१॥
नारायणा कृष्णा कमळलोचना । माधवा प्रद्युम्ना रावणारी ॥२॥
रावणारि होसी जानकी टाकुनी । हिंडसी अंगणीं अर्जुनाच्या ॥३॥
अर्जुनाच्या घरीं अंगें घोदे धुसी । लज्जा द्रोप-दीची राखियेली ॥४॥
राखशील द्वार भक्ति बळिवंता । नामा ह्मणे आतां काय सांगूं ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP