भक्तवत्सलता - अभंग ६६ ते ७०
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.
६६.
तडक फुटला अंबरीं । आला प्रर्हाद कैवारी ॥१॥
आला आला हाक देतु । सिंहनादें रे गर्जतु ॥२॥
दैत्यां दचकु नर- हरी । नामया स्वामि नरकेसरी ॥३॥
६७.
कायरे गडगडित दुमदुमीत । ब्रह्मकटाह उलथूं पहात ॥१॥
तो देव आला रे नरहरी । आतां कवण सांवरी ॥२॥
प्रर्हा-दासी दिधलें जैत्य । हर्षें नामा गुढी उभारीत ॥३॥
६८.
पहाहो कडकडिलें गगनीं । भेणें कोपते मेदिनी ॥१॥
तो देव दैत्यां अंतकु । होय भक्तांसी नायकु ॥२॥
भोजें प्रर्हाद नाचतु । नामया स्वामि रे अनंतु ॥३॥
६९.
वैकुंठिहूनि धांवत आला । खांबा आड उभा ठेला ॥१॥
खांब गडगडिला गडगडिला । वीर नरसिंह पावला ॥२॥
पावला नामया स्वामि । जग उद्धरिलें याचे नामीं ॥३॥
७०.
अंबऋषि रुक्मांगद । नारद महामुनि प्रर्हाद ॥१॥
मिळोनि सनकादिका भारू । पांडुरंगीं हरि जागरु ॥२॥
शंख भेरी नादाकार । नादें गर्जत अंबर ॥३॥
योगनिद्रेसी पहुडला । आदिपुरुष उपवर झाला ॥४॥
देवी उतरोनी विमानीं । आदि क्षीरसागर भुवनीं ॥५॥
सुरवर वोळंगती जगन्निवास । गातो नामा विष्णुदास ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : December 22, 2014
TOP