भक्तवत्सलता - अभंग १०१ ते १०५

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


१०१.
निर्धन धनातें कीं आंधळे लोचनातें । मयूर धनातें जेंवि भावी ॥१॥
पारधियें पाडस धरियलें वनीं । तें चिंती जननि रत्रंदिवस ॥२॥
तैसा तुझा छंद लागो कां गा देवा । माझिया वा जीवा केशिराजा ॥३॥
सर्पें डखिलें तें स्मरतो गारोडी । पुरीं जातां सांगडी मन चिंती ॥४॥
रोगी वैद्यातें बोलावूं धाडी । पडिले बांद-वडी सुटका इच्छी ॥५॥
बोळविली बाला ते मनीं वाहे कुवसा । कां रसज्ञु जैसा औषध गिवसी ॥६॥
धेनुकारणें व्याकुळ होय वत्स । तें दशदिशेस अवलोकितें ॥७॥
निचेतन देह प्राण असे अलक । धाय-वट उदक स्मरे वनीं ॥८॥
चकोरें मिळोनि चंद्रा जेंवि ध्याती । इंद्रिया निवृत्ति कैं होईल ॥९॥
पक्षिणीचें पिल येऊनि द्बाराजवळें । मुख पसरी कोंवळें आलोहित ॥१०॥
नामा ह्मणे म्यां आन नाहीं जाणितलें । मज पुरे इतुकलें केशिराजा ॥११॥

१०२.
नव जावें तेथें लागे जाणें । न करावें तेंचि लागे करणें । न बोलावें त्यासि लागे बोलणें । पडे मागणें नेदी तया ॥१॥
कृष्णें देवकीये उदरा येणें । कंसा त्यागोनि गोकुळासि जाणें । तेथें नंदा-च्या गाई राखणें । संगतीं असणें गोंवळ्यांच्या ॥२॥
राम वान्नरांची सेवा करी । पांडव कौरवांचे घरीं । हरिश्चंद डोंबाघरीं पायकी करी । हें अपूर्ण परियेसा ॥३॥
रुद्रें अंजनी उदरा येणें । रामाची सेवा वा-न्नरपणें । प्रसंग पडे तैसें वर्तणें । रुसणें नलगे कवणासी ॥४॥
स्वामी-नें सेवकाची सेवा करणें । नुपेक्षी कदन्न भक्षणें । ह्मणवूनि अहंकार न धरणें । विषम संसार अरे जना ॥५॥
अवचट घडविती तुझिया भावा । घोर विस्मय होतो माझिया जीवा । विष्णुदास नामा वि-नवी केशवा । देवा तूं करिसी तें बरवें ॥६॥

१०३.
सर्व पाप पुण्य हींचि दोन्ही भांडीं । विवेक न सांडीं येतां जातां ॥१॥
तुझें नाम तारूं तुझें नाम तारूं । तुझें नाम तारूं श्रीविठ्ठल ॥२॥
विष्णुदास नाम्यानें उभारिली शिडी । ठाकावया पेढी वैकुंठींची ॥३॥

१०४.
पंढरी ज्ञानिया ध्यातां लक्षा नये । आह्मां वाट पहे अनाथांची ॥१॥
जपकांचें जाप्य नानामंत्रमय । आम्हां भक्ति प्रिय भावें सारी ॥२॥
पुंडलिकासाठीं बोललां वोरसें । नेणों काय कैसें प्रेम त्याचें ॥३॥
नामा म्हणे जीवें करूं निंबलोण । झणीं नारायणा दिठावसी ॥४॥

१०५.
नित्य आह्मां सुख तुझ्या पायांपासीं । शरण कोणासी जाऊं आह्मीं ॥१॥
सकाळीं उठोनि ऐकतों कीर्तन । तेणें समाधान मज होय ॥२॥
उभा महाद्वारीं वैष्णव भेटती । सांखळ्या तुटती चौर्‍यांशीच्या ॥३॥
नामा ह्मणे सदा पंढरीं रहिवास । मागुता जन्मास येतो कोण ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP