भक्तवत्सलता - अभंग ९६ ते १००

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


९६.
हरि गातां बरवा ऐकतां बरवा । ह्लदयीं ध्यातां बरवा बाइयांनो ॥१॥
केशव पैं देणें केशव पैं घेणें । केंशव करणें धंदा आम्हीं ॥२॥
चंद्रबिंबाची कुरवंडी ओवाळूं श्रीमुखावरी । मदन हा जिव्हारीं लजिन्नला ॥३॥
नामा म्हणे निवविलें सकळ इंद्रियांतें । म्हणोन त्या केशवातें शरण जारे ॥४॥

९७.
केशव पैं मुक्ति केशव पैं भक्ति । केशव विश्रांति पंढरीये ॥१॥
केशव लैकिकीं केशव व्यवहारीं । केशव निर्धारीं नाम तुझें ॥२॥
नामा म्हणे अगा केशव वोळला । भावासि भुलला वाळवंटीं ॥३॥

९८.
वेदासी कानडा श्रुतीसी कानडा । विठ्ठल उघडा पंढरीये ॥१॥
नाम बरवें रूप बरवें । दर्शन बरवें कानडीयाचें ॥२॥
नामा म्हणे तुझें अवघेंचि बरवें । त्याहूनि बरवें प्रेम तुझें ॥३॥

९९.
देवाधिदेवा सर्वत्रांच्या जीवा । ऐकें वासुदेवा दया-निधी ॥१॥
ब्रह्मा आणि इंद्र वंद्य सदाशिवा । ऐकें वासुदेवा दीन-बंधू ॥२॥
चवडा लोकपाळ करिती तुझी सेवा । ऐकें वासुदेवा कृपासिंधू ॥३॥
योगियांचे ध्यानीं नातुडसी देवा । ऐकें वासुदेवा जगद्नुरु ॥४॥
निर्गुण निराकार नाहीं तुज माया । ऐकें कृष्णराया कानडीया ॥५॥
वेडा अविचारी करी मजवर दया । ऐकें कृष्ण-राया शहाणिया ॥६॥
करुणेचा पर्जन्य शिंपी मजवरता या । ऐकें कृष्णराया गोजीरिया ॥७॥
नामा ह्मणे जरी दाविसील पाया । तरी वदावया स्फूर्ति चाले ॥८॥

१००.
तुटोनि आकाश पडेलहि शिरीं । न सोडीं मी हरी पाय तुझे ॥१॥
तुझे पाय गोड तुझे पाय गोड । तुझे पाय गोड सर्व-काळ ॥२॥
डोंगरासांगातें कोण करी वाद । वाउगी उपाद आहे आह्यां ॥३॥
नामा ह्मणे तुझें थोरपण काय । कायसे उपाय सांग आह्मां ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP