भक्तवत्सलता - अभंग ५१ ते ५५

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


५१.
भरतें त्यागिली जननी । ख्याति झाली त्रिभुवनी ॥१॥
ऐसी भक्ति तुझी हरी । जनीं करंटा न करी ॥२॥
बंधु अवज्ञा बिभिषणा । प्रगट झाला रामराणा ॥३॥
प्रर्‍हाद पितृआज्ञा न करी । स्तंभीं प्रगटला नरहरी ॥४॥
पति अवज्ञा ऋषिपत्न्यांसी । कृष्ण दर्शन पूर्ण त्यांसी ॥५॥
नाना ह्मणे भक्ता अवरोधीं पाही । त्यासी त्यजिल्या दोष नाहीं ॥६॥

५२.
पंढरिचा देव बहुत कोंवळा । सगुण सांवळा सारथि हा ॥१॥
सारथि सर्वांच्या साक्षिभूत असे । संकटीं सायासें गजेंद्रासी ॥२॥
गजें-द्रासी रक्षी गणिका उद्धरी । भिल्लीणीचे करीं फळें भक्षी ॥३॥
भक्षी सुदाम्याचे पोहे मुष्टिभरी । नामा ह्मणे हरि गोड मानी ॥४॥

५३.
पंढरीचा देव पाहतां सगुण । प्रर्‍हादाकारणें सिद्ध झाला ॥१॥
पंढरीचा देव पतित पावन । उभा नारायण विटेवरी ॥२॥
पंढरीचा देव प्रत्यक्ष उदार । बाळ्या भोळ्या पार दावीतसे ॥३॥
नामा ह्मणे देवा कीर्ति वानूं काय । आह्यांसाठीं सोय लावीं बापा ॥४॥

५४.
सगुण तें ब्रह्म विटेवरी नीट । कोण्या प्राणीं कष्ट होऊम नेदी ॥१॥
देऊनियां क्षेम देहू पालटिसी । वृद्ध रूप होसी कर्णसाठीं ॥२॥
भजन भक्तांचें मानिसी वचन । नाम नारायणा ह्मणे कांरे ॥३॥
उफराटी वदवी वाल्मिका नामाचा । शतकोटी संख्या प्रविस्तार ॥४॥
नामा ह्मणे देवा भक्तिचें पैं पिसें । त्यालागीं हव्यासें होसी जाण ॥५॥

५५.
शिशुपाळादिकां कोठें शुद्ध भाव । उद्धरी केशव उंच नीच ॥१॥
काय कामा पुत्रा कोण आले जाणा । सेखीं त्या रावणा कैवल्यदानीं ॥२॥
महादुष्ट शंखासुरें नेले वेद । शेवटीं गोविंदें सोडविलें ॥३॥
पित्याचिये हातीं पुत्र वध करी । कृपाळु बा हरीं नामा ह्मणे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP