प्रसंग पहिला - ‘न’ कार

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.



‘न’ अक्षरीं नवलाव जाणा । पातलों सरस्‍वतीच्या स्‍तवना । चित्त द्यावें किंकराच्या वचना । लडिवाळ म्‍हणवूनियां ॥११॥
नवलाव धरूनियां ज्ञानी । नमिली मूळ माया विरोचिनी । विज्ञानसिंधूची मांडणी । रचिती जाली ॥१२॥
नमिली ती पवित्र कृपा शक्ति । जी करी ईश्र्वराची प्रेमभक्ति । सोऽहं प्रेम लावी निगुती । बोधी बोधाचें पैं ॥१३॥
नमिली अवो कृपे साजणी । नित्‍य तुवां वसावें माझ्या वदनीं । मग मी प्रवततेंन अनुसंधानीं । स्‍वानुभवालागी ॥१४॥
नमिली अवो कृपे वेल्‍हाळे । मज द्यावे अमृताचे गराळे । मग शब्‍द उमटती सोंवळे । शुद्ध ब्रह्मानंदे ॥१५॥
नरासुरांची प्रसवणी । तरी तूं आदिशक्ति भवानी । अखंड ईश्र्वराचें ध्यानीं । प्रकाश असें तुझा ॥१६॥
नाम रूप ठसा तुजपासुनी । जैसे वडवानळें द्रवलें पाणी । नाहीं तरी निराकार निरशुन्यीं । ईश्र्वर होता ॥१७॥
नमन करितां रसाळ वैखरी । नाना परी उमटे हेरी । तों तों कृपा प्रतिपाळ करी । धृति पान्हा घाली ॥१८॥
न कळे म्‍हणवूनि सरस्‍वति । नमस्‍कारुनि मागतो मति । मग ते बोलिली विशाळ शक्ति । ते परियेसा पैं ॥१९॥
नवल बोलियली कृपा वचनीं । तुज मी प्रसन्न मुळापासूनी । एकविध होऊनियां विज्ञानीं । स्‍तवी सद्‌गुरु ॥२०॥
राहिलो मागें ‘ॐ’कार ‘न’कार । पुढें आरंभिला तो ‘म’ कार । सद्‌गुरु वर्णावयाचा विचार । परिसा संत हो ॥२१॥
सद्‌गुरु नाम गुणातीत । ‘रु’ म्‍हणिजे रूपाविरहित । म्‍हणोनि शेख महंमद मात । वर्णिते जाले ॥२२॥

टीपः

१२. ‘ना’ - (ब).
१३. ‘स वो’ - (वा, ब).
१४. ‘सत्‍य’ - (ब).
१५. ‘शुच’ - (वा).
१६. ‘द्रवें’ - (वा).
१७. ‘निरसुनी’ - (ब)
१८. ‘लहरी’ - (वा).
१९. ‘नमस्‍कार करुनी’ - (वा).



Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP