( अनुष्टुभवृत्त )
पांडुरंगा ! दयासिंधो ! जसा पतितपावनीं
त्वत्कीर्तनीं सर्व तसा नव्हे अतितपा वनीं. १
गृहींच स्वस्थ असती, न जाती संत कानना;
न पाहती तुझ्या नामस्मरणें अंतकानना. २
लागे सोसावया कांहीं न वर्ष, न हिमातप.
विठ्ठला ! तव नामाचा न पावे महिमा तप. ३
स्थापिसी वदनीं ज्याच्या निज नाम, हतारि तें
त्या देवूनि, न जातांही विजना, मह तारितें. ४
जसी त्वत्कीर्ति, न जना नर्मदा शर्म-दा तसी.
तुझ्या यश:पटाची बा ! एक भागीरथी दसी. ५
माराया तुज देवा ! जी सविष स्तन्य दे बकी,
केली तव प्रसादानें ती जसी धन्य देवकी. ६
तुला खोटा म्हणे, भांडे तुजसीं मूढ तोतया,
योगिदुर्लभ जो देवा ! त्वां दिला मोक्ष तो तया. ७
नारायन म्हणे पुत्रा जो, त्या गति अजामिळा
दिली त्वां; म्हणसी, ‘ नामें सुखें मज अजा मिळा. ’ ८
मानितोसि तया बंधुसम बाळसमान वा;
नामोच्चारीं कीर्तनीं ज्या नसे आळस मानवा. ९
देसी जडाहि तूं जैसा सत्वराशि शुका-मना
पुरवाया सदा माता सत्वरा शिशुकामना. १०
धृतव्रत त्यागिसील तूं जो परम तो कसें ?
जें भक्तसत्व तुज तें, वृद्धा चरम तोकसें. ११
एकार्णवीं बुडाली ती स्थापिली महि मागती
विठ्ठला ! तव भक्तीतें आत्मारामहि मागती. १२
कंसादि तारिले होते जे धरूनि असत्पथा.
गातें तुझेंचि साधूंचें सद या सदया कथा. १३
वृषकेश्यघ जे भस्म करिते अरि ते जगा
म्हणसी, ‘ लोक हो ! गेल्या तापदा आपदा, जगा. ’ १४
ज्यांहीं वराव्या, जावूनि निरया, चिर यातना,
त्यांवरि, त्वत्कथा पीतां, यम भी दंडपातना. १५
कथा निवविती जैसी तुजी पदनदी नता.
त्वकीर्ति गात्या न जना दावी वदनदीनता. १६
वासराधिप राजीवा, वासरा जननींस्तन,
बा सरा ! भक्तयादांच्या, आसरा तूं दयाघन. १७
तारिले ते तवां, वैरें आणिते क्रोध जे तुला.
असा तूंचि प्रभो ! केला करावा शोध जेतुला. १८
नवनीताहुनि तुझें प्रभो ! हृदय कोवळें;
स्वप्नांतही न दोषातें स्पर्शे अत्यंत सोवळें. १९
वियोगदानें काठिन्य स्थापावें कां न गोवळें ?
कोंवळें परि अत्यंत अन्याचें मन पोवळें. २०
श्रीचीहि नाहीं परवा, पर वामा व्रजीं तशा
भक्ता तुवां रंजविल्या, गातात मुनि या यशा. २१
गेलासि तूं सुदाम्यातें पायीं धांवुनि आडवा.
पाडवा दसरा काय ? भुललासचि वाडवा. २२
वदलासि मुनींद्रातें, ‘ घ्या महा पाहुणेर हा.
श्रुतदेव मदात्मा, या; न तुम्ही पाहुणे रहा. ’ २३
तृप्त झालासि कृष्णेच्या शाकपत्रें. न कां कण्या --
विदुराच्या सुधा व्हाव्या तुज ? स्वाश्रितझांकण्या ! २४
व्रजीं भृंगमिषे देवा ! विरहीं निंदि राधिका,
आत्मारामा भक्त्यधीना तुला ती इंदिराधिका. २५
कुब्जेची तींस्थळीं होती जी लज्जाहेत बांकुडी,
अंगरागार्पणें केली सुरम्या ते तुवां कुडी. २६
त्वां सुखार्थ व्रजीं रूपयश प्रकटिलें नवें.
तुज्या विश्वामनोवृत्ति मुरली मुरलीरवें. २७
म्हणे देवर्षि, ‘ न्हाणीन व्रजधूळींत अंग मी;
असी पुण्यार्धि तों गंगायमुनांच्या न संगमीं ’ २८
गुरुवत्सल बा ! तूंचि; गुरुला मृत नंदन
देता झालासि, करुनि प्रेमें साष्टांग वंदन. २९
युद्धीं झालासि करिता तूं पृथनंदनावना.
तुला सोडूनि भजती कां वृथा नंदना वना ? ३०