( गीतिवृत्त )
देवर्षि म्हणे, " व्यासा ! श्रीहरिजनसंगतिच निकाम हिमा;
अनुभविला, तुज कथितों, तूं त्यांचा ऐक तो निका महिमा. ॥१॥
ज्यांच्या बुद्धींत सुनय शोभति, मणिदीप जेंवि समयांत;
त्या ब्रह्मज्ञांचा मीं दासीसुत पूर्वकल्पसमयांत. ॥२॥
तेथें चातुर्मास्य श्रीहरिचे भक्त राहिले होते,
मज्जननईस्वामीनीं भगवद्भावेंचि पाहिले हो ! ते. ॥३॥
मातेच्या स्वामीनीं त्यांच्या सेवेसि योजिलों बा ! मीं,
दास्य यथाशक्ति करित होतों अचपळ तयांचिया धामीं. ॥४॥
तद्भाषणास भुललों, सुमधुरगीतध्वनीस हरिण - तसा;
जरि मीं अपक्व, झालों सत्सहवासेंकरूनि परिणत - सा. ॥५॥
मज सदय साधु देती, राहे जें अन्न भक्षितां पात्रीं;
तत्सवनें हळूहळु आली माझ्या पवित्रता गात्रीं. ॥६॥
भागवतधर्मभगवत्कीर्तिश्रवणींच लागली गोडी,
सोदी न मन पळभरिह; वाटे बहु ऐकिली कथा थोडी. ॥७॥
करितां नित्य हरिकथाश्रवण, न वाटेचि अन्य रुचिर मला;
श्रीकृष्णींच मदात्मा, व्यासमुनिवरा ! धरूनि रुचि, रमला. ॥८॥
कृष्णकथांच्या श्रवणें माझी कृष्णीं प्रवर्तली भक्ती,
अत्यद्भुता असीच श्रीकृष्णाच्या सुकीर्तिची शक्ती. ॥९॥
मग भगवदुक्त गुह्य ज्ञान मला त्या द्यालुनीं कथिलें,
जेणें ब्रह्मचि व्हावें, बा ! रजत जसें रसेंकरुनि कथिलें. ॥१०॥
प्रथम महत्सेवा, मग त्या सेवेनें महत्कृपा होती,
मग तद्धर्मीं श्रद्धा, करवी भगवत्कथाश्रवण हो ती; ॥११॥
त्यावरि भगवंतीं रति, त्या रतिनें देहयुगविवेक घडे,
त्या सुविवेकें अंत:करणींचा क्षिप्र सर्व मोह झडे; ॥१२॥
मग होय ज्ञान विमळ, त्या ज्ञानें ईश्वरीं दृढा भक्ती,
मग भगवत्तत्वाच्या ज्ञानाची होतसे अभिव्यक्ती; ॥१३॥
भगवत्कृपेंकरुनि मग सर्वज्ञत्वादि जे अतुळ सारे,
ते भगवंताचे गुण होतात प्रकट मुनिवरा ! बा ! रे ! ॥१४॥
करुनि कृपा मजवरि, मुनि चातुर्मास्य क्रमूनियां गेले.
केले उपदेश तिहीं मच्चित्तीं जागरूक ते ठेले. ॥१५॥
मातेचें प्रेम मला होतें अत्यंत सुदृढ बंधन गा !
त्यास विलंघुनि जाऊं न शकें मीं, जेविं पंगु अंध नगा. ॥१६॥
जातां दोहार्थ पथीं रात्रीं मातेसि उग्र साप डसे;
गेले देहांतुनि असु, गेहांतुनि शीघ्र पुरुष तापड - से. ॥१७॥
मातेचा मृत्यु मना भगवदनुग्रहचि वाटला; गेहा
त्यजुनि, वनीं हरिभजना, आयकिली धरूनि वाट, लागे हा. ॥१८॥
पिप्पळमूळीं बसलों मीं, जावुनि निर्जना अरण्यातें;
ध्याता झालों, झांकुनि नेत्रें, श्रीशा महाशरण्यातें. ॥१९॥
पांचां वर्षांचा मीं दासीसुत काय ! विश्वगुरु काय !
ध्यातां हळुहळु हृदयीं स्फ़ुरला सच्चित्सुखैकमयकाय. ॥२०॥
थोरीं - तसाचि दावी देव दयानिधि अनुग्रह लहानीं,
काय लघूंची क्षेत्रीं न करी, होउनि अनुग्र, हल हानी ? ॥२१॥
आलें फ़ळ तेजें रविकोट्याधिकहि परि अनुग्र हव्यासा
या वर्णूं एक मुखें काय प्रभुचा अनुग्रह ? व्यासा ! ॥२२॥
हृदयीं, होतांचि प्रभुदर्शन, बा ! दास हा परम हर्षे;
झालों धन्य जगीं; या स्वस्तुतिवादा सहा पर महर्षे ! ॥२३॥
जीच्या चरणीं, करुनि व्रत, तीर्थ, सुतीव्र तप, रमा लवली;
श्रीमूर्ति स्फ़ुरली, ती राहों दे ताप न; पर मालवली. ॥२४॥
मोट्ट्या पाप्यासहि दे जीचें उच्चारितांचि नाम गती;
ध्यान धरुनि पाहें, परि हृदयीं मूर्ति स्फ़ुरेचिना मग ती. ॥२५॥
जे सत्कवि, दृष्टांतीं आर्ता योजूनि मत्समा, ते तें
मद्दु:ख वर्णितिल कीं, ‘ चुकला विपिनांत वत्स मातेतें. ’ ॥२६॥
किंवा ताप ग्रीष्मीं गंगाविरहेंकरूनि यादास,
झाला होता तेव्हां हा दृष्टांतांत योग्य या दास. ॥२७॥
लोभी पुरुष तळमळे, होतां सर्वाहि जेंवि हानि धना;
तळमळला तेंवि, म्हणे, ‘ परम हित जिण्यापरीस ‘ हा ’ निधना. ’ ॥२८॥
मी तेंवि, जसा राजा शोक करी, हारवूनि पद, लाजे;
ऐक, अदृश्य दयानिधि तेव्हां बहु मधुर शब्द वदला जे :- ॥२९॥
‘ रे ! वत्सा ! या जन्मीं तूं योग्य नससि पहावयास मज;
मीं त्यां अदृश्य, ज्यांचे दग्ध न कामादि दोष बा ! समज. ॥३०॥
तुज रूप एकदा म्यां दाखविले, मदनुराग वाढाया;
क्षम सर्वां कामांतुनि पुरुषातें हाचि होय काढाया. ॥३१॥
बाळा ! तुज या जन्मीं सत्सेवा थोडकीच जी घडली,
तीणें मद्रूपीं तव मति, मधुपी सारसीं, तसी जडली. ॥३२॥
या निंद्या देहातें सोडुनि, तूं पावसील मज्जनता,
यावरि माझ्या प्राज्यस्मरणामृतसागरांत मज्ज, नता ! ॥३३॥
सर्गीं, प्रलयींही, हे मन्निष्ठामति न खंड पावेल;
बहु वाढेल प्रेमा हा, गेला जेंवि मंडपा वेल. ॥।३४॥
मदनुग्रहेंकरुनि नच विसरसिल कदापि याउपर मातें. ’
व्यासा ! पावे पावन, ऐसें बोलोनियां, उपरमातें. ॥३५॥
त्या दीनबंधुच्या मीं करिता झालों पदा शिरें नमन,
शिरलोंचि, म्हणत होतें जें, ‘ दासजनीं कदा शिरेंन ? ’ मन. ॥३६॥
विमद, विमत्सर, निस्पृह, निस्त्रप, होवूनि बा ! तनानाच,
होतों करीत; गाउनि यश, ये, चुकतांचि यातना, नाच ॥३७॥
प्रभुचीं नामें गात प्रेमभरें, आदरीत नटनातें,
प्रारब्ध सरे तोंवरि होतों क्षितिवरि करीत अटनातें. ॥३८॥
मग देहपात झाला, सरता प्रारब्धकर्म सारेंच;
न अविद्येचा उतरी दुसरा भागवत धर्मसा रेंच. ॥३९॥
दासीसुत होतों, तो पार्षद झालों बरें दयानिधिच्या;
मग कल्पांतीं शिरलों निश्वासासहचि अंतरीं विधिच्या. ॥४०॥
एकार्णवांत बा ! या विश्वातें स्वांतरीं करुनि गुप्त,
नारायणीं प्रवेशुनि, होता ब्रह्मा यथासमय सुप्त. ॥४१॥
उठुनि सहस्त्रयुगांतीं, पुनरपि सर्जन करावया सजला,
जेंवि मरीचिप्रमुखां, विधिपासुनि जन्म जाहलें मजला. ॥४२॥
अव्याहतगति फ़िरतों या तीं लोकांत आंत बाहेर;
अनुकूळ विश्व हें मम मतिस, सुकन्येसि जेंवि माहेर. ॥४३॥
बा ! देवेश्वरदत्त जेंवि सुधा स्वरस मधुर चाखविती,
हे सुस्वर वीणारी वीणा रीती तशाच दाखविती. ॥४४॥
प्रभुनें, अनुग्रह करुनि बहुतचि, हा दास सुखविला साचा;
कीं मजपुढें फ़िका रस बा ! शक्राच्याहि सुखविलासाचा. ॥४५॥
अत्यद्भुत लाभ मला झाला या प्रभुयशाचिया गानीं;
इतरा योगांनीं, गरि द्यावी, तसि परवशाचि यागानीं. " ॥४६॥
उपसंहार
लक्ष्मीचा कांत अमृतधन परम उदार नित्य वर्षतसे,
हा भक्तमयूर करी बहु तांडव, कीं सदैव हर्षतसे. ॥४७॥