अमृतातें लाजवितें, साजवितें त्रिभुवना भवद्यश तें.
करितां आ, शुचि आशुचि करितें त्या, मलिन जो अवद्यशतें. २६
काशींत दिलें त्वां जें, न दिलें कोणींहि दक्षदमना ! तें.
भुलविसि तूंचि वदान्यप्र्वर कवींच्या, न लक्षद, मनातें. २७
शंभो ! सत्य जडात्मा, मलिन, सदा पंकहेतु तोयद; या
नाहीं विवेक; याची बा ! सुखदा, दु:खदाहि होय दया. २८
म्हणवी वदान्य आपण हा, पण घन वर्षलाहि ओसरला.
‘ शंभो ! ’ म्हणतांचि, सदा देतीच त्वदभयोक्ति ‘ ओ ’ सरला. २९
हर्षसि सुजडाच्याही केल्या निजकीर्तिवर्णना तुंडें.
एकात्मज जीर्ण जसा वदतां अव्यक्त वर्ण नातुंडें. ३०
युगरतांयागरतांहूनि म्हणे धन्य वेद नामरतां.
ज्यांच्या वदनीं कर्णीं शिव, न शिवे त्यांसि वेदना मरतां. ३१
आपण न भजति तुजला, करिती त्वद्भक्तसाधुकुत्साही,
तदपि तशांच्याही तूं उद्धारीं बा ! सदैव उत्साही. ३२
आप्तही भवप्रवाहीं पर-सा, धनही न दे, वदे ‘ वाहें. ’
तारिसि तूंचि जगत्प्रभु परसाधनहीन देवदेवा ! हे ३३
सर्वस्त नतां देतां, नलगे पुत्रप्रियादिकां पुसणें.
उसणें न देसि; अधिकें फ़ुगणें, न्यूनेंहि बा ! नसे रुसणें. ३४
दु:खित जनीं कृपेचा प्रभुस न येयील कां बरा ऊत ?
चोरत्रस्ता सोडुनि, न भला राहेल लांब राऊत. ३५
नमितां दीनें, टेंकुनि महिवरि उर, पाद, हस्त, शिर, गुडघे,
म्हणसी ‘ घे मोक्ष ’ जसा तात म्हने शिशुसि ‘ जीव चिर; गुड घे. ’ ३६
सिरसी भरीम प्रभु कसातरि वारावास वारणारानीं.
न वळे तो, अरिच्या दे जरि बा ! रावास वारणा रानीं. ३७
भीती, काशीवासिप्राण्यांचें पाहतां वदन, माया.
लागे दूरुनि देवा ! अपराध स्मरुनियां, पद नमाया. ३८
जे झाले माहें, जे होणार, महेश्वरा ! नवे दाते,
त्वच्चरणरेणुसमही गमति तव स्तवरता न वेदा ते. ३९
विश्वेश्वर ! शिव ! शंकर ! भव ! हर ! मृड ! शर्व ! देवदेव ! असें
म्हणति, तयां मोक्षातें देसि, म्हणसि ‘ मी सदा ऋणीच असें. ’ ४०
काशींत, रणांत मरण जो न, तुजपुढें करूनि आ, इछी,
साधुसभाचि न केवळ देवा ! त्यातें म्हणेल आइ, ‘ छी , ’ ४१
सांगे सर्वस्वाची तुज तव दयिता दया लुट कराया.
तूं अद्वितीय; तुजसीं कोणीहि नसे दयालु टकराया. ४२
पात्रापात्रविचार न करितां, पसुलाहि मुक्ति कां देतो ?
सर्वज्ञ ह्मणति, ‘ खातो ज्याची हे काय उक्ति कांदे तो ? ’ ४३
व्हाया स्वख्याति जगीं, ऐसें काशीच करविती कार्य.
‘ वश करुनि पतिस, उडविति सर्वस्व स्त्री ’असें वदति आर्य. ४४
काशी तुज आवडती, न तसी गंगा, न अद्रिची कन्या.
धन्या हेचि त्रिजगीं, कीं त्वां नच सोडिली, दिली अन्या. ४५
यत्न दिवोदास करी, विटपुरुष सतीस जेंवि भोगाया.
सोडवुनि सुयश केलें, रुचलें सुकवींस जें विभो ! गाया. ४६
दतिया बहु विनयवती अंकीं जडली, न मस्तकीं चढलीं.
न कळे, कोणापासुनि विद्या काशीपुरी पुरी पढली. ४७
श्रीकाशी बहुत भली, माथां श्रीचरण सर्वदा वाहे.
त्वत्प्रेम अतुळ असतां, न करि सपत्नींत गर्व, दावा हे. ४८
प्राणी तुज पूर्वभवीं भजतां, काशींत अतितपा मरतो.
लोकांस चरमजन्मीं दिसतो, तनु तोंचि, पतित, पामर तो. ४९
पूर्वभवीं जें घडतें तीर्थ, व्रत, दान, पूजन, स्मरण,
तेणें तव प्रसादें काशींत प्राप्त होतसे मरण. ५०