करबद्ध रम्य दोरक थोर करी भव्य नित्य धरित्याचें;
हरि त्याचें हित साधी सदनंतव्रतसुमार्ग वरित्याचें. ’ २६
साध्वींनीं कथिलें जें, शीला सुव्रत वरी यथाविधि तें,
गेली शरण प्रभुतें बापा ! धर्मा ! नृपा ! कृपानिधितें. २७
विप्राला द्याया ती उघडुनि पाथेय जों नृपा ! पाहे,
तों त्या व्रतप्रभावें अद्भुत दिव्यान्न जाहलें आहे. २८
त्या चित्रांच्या खपल्या दिव्य विभूषा कुरूत्तमा ! झाल्या,
व्रत तीस म्हणे, ‘ तूं या, महिमा व्हाया प्रसिद्ध माझा, ल्या. ’ २९
बा ! त्या दिव्यान्नाचें वाणक विप्रासि आदरें अर्पी,
मग आपणही भक्षी, आधीं तेणें पतीस ती तर्पी. ३०
बैसोनि गोरथवरि, गेली, पावुनि महा, घरा शीला.
देतें पुण्य अनंतव्रत, हें, नाशुनि महाघराशीला. ३१
व्रत झालें तद्रेही गोधनधनधान्यसंपदा रचितें,
बा ! उघडलें म्हणाया श्रीचें दुर्गतिस ‘ संप ’ दारचि तें. ३२
एका समयीं स्वस्त्रीवामकरीं दोरकासि तो पाहे,
वाहे मनांत शंका, दैवें कौंडिन्य न प्रभो ! साहे. ३३
तीस म्हणे, ‘ तुज कुस्त्रीमत हित वश्यप्रयोग कां गमला ?
कोणें दुष्टजनें हा कथिला ? मूढे ! यथार्थ सांग मला ’. ३४
शीला म्हणे ‘ शिवशिव ! स्वामी ! दोरक अनंत हा धरिला,
साध्वींच्या उपदेशें कल्याणप्रद म्हणोनि आदरिला. ३५
हा स्त्रितकल्पतरु प्रभु, दे धनधान्यादिसंपदा साचा;
याचा प्रसाद नुरवी संसारत्रासकंप दासाचा. ’ ३६
ऐकुनि असें विवेक, स्त्रीकरगत दोरकहि, बळें सोडी;
तोडी, दहनीं टाकी; ऐसें दैवें अभद्र तो जोडी. ३७
‘ हा ! हा ! म्हनोनि, शीला, काढुनि, दुग्धांत दोर ती घाली;
झाली खिन्ना, रडली; गेली संपत्ति, आपदा आली. ३८
त्या अपराधें गोधन, धन, धान्य, समस्त पांडवा ! गेलें;
नेलें चोरांहीं बा ! उरलें गृह दग्ध अग्निनें केलें. ३९
बा ! त्या कैंदिन्याची पाठ पुरविली सदैव कलहांनीं;
न लहानीं, थोरींही, स्नेह, उरे; होय देहबलहानी. ४०
कौंडिन्य म्हणे, ‘ झालों दुर्गतितें पात्र, जेंवि कीलेतें;
नुमजे मज, वद, कारण तर्कें जें या दशेसि, शीले ! तें. ’ ४१
शीला म्हणे, ‘ अनंतप्रभुलंघनरूप मंतुचें फ़ळ हें;
होतें दु:ख प्रतिदिन दारिद्र्यें, बंधुजनकृतें कळहें. ४२
होय अनंतप्रभुचा पुनरपि जेणें प्रसाद, तो यत्न
निश्चय करुनि करावा; हारविलें हातिंचें महारत्न ! ’ ४३
धरिलें सत्य्क्त मनीं; सदनीं बहु पोळला, जसा दहनीं,
म्हणत, ‘ अनंत ! अनंत ! ’ चि, बा ! शिरला क्षिप्र विघ्न तो गहनीं, ४४
‘ भेटेल अनंत कधीं ? करिन अनंतासि मीं कधीं नमन ? ’
ऐसें म्हणत, फ़िरे तो, ज्याचें स्मृतिच्या सदा अधीन मन. ४५
निरशन फ़िरे म्हणे, ‘ मीं चुकलोंचि, अनंतदोरका ! पावें;
‘ चुकलों ’ म्हणतां, नमितां, अपराधीही न पोर कांपावें. ’ ४६
अवलोकिला रसाळद्रुम विप्रें काननांत पिकला हो !
ज्याच्या घेति रसातें, न समर्पुनि आननांत, पिक लाहो. ४७
त्यासि पुसे तो, जेणें श्रेष्ठहि तृणतुल्य लेखिला काय,
‘ बा ! चूता ! सांग मला, त्वां देव अनंत देखिला काय ? ’ ४८
माकंद म्हणे, ‘ विप्रा ! मज देव अनंत तो न आढळला. ’
शोध करित जाय वनीं, त्याचा निश्चय न लेश बा ! ढळला. ४९
स्वपय प्राशी ऐसी विप्रें विपिनांत पाहिली गाय;
पाय नमुनि, तीस पुसेस, ‘ त्वां देव अनंत देखिला काय ? ’ ५०