( गीतिवृत्त )
दत्तात्रेयस्वामी ! नमितों मीं, दीनबांधवा ! देवा !
तुमचें स्तवन कराया किति माझा मंदबुद्धिचा केवा ? १
तूं या संसारवनीं भ्रांतां जीवांसि लाविसी वाटे,
दु:खित दीन पहातां, करुणासिंधो ! तुझा गळा दाटे. २
त्वां तारिले असंख्य प्राणी संसारसागरीं, दत्ता !
लोकत्रयांत नांदे, देवा ! अव्याहता तुझी सत्ता. ३
तूं तीर्थांचें तीर्थ, ज्ञान्यांचें ज्ञान, योग योग्यांचा;
धार्मिक, सदय, चिकित्सक दु:सहसंसाररोगरोग्यांचा. ४
जे जे लोकीं पुत्री, त्यांमध्यें धन्य तव पिता अत्री;
कीं त्वां नित्य उभविली ब्रह्मांडशिरीं स्वकीर्तिसुछत्री. ५
अनसूयेचा कुक्षि क्षीरधिगुनि कोटिगुण गुणें महित,
कीं तज्ज अमृतकर तूं जाड्याकलंकक्षयादिकीं रहित. ६
जें अनसूया पावे सुख, विधिची शंन्जुचीहि न वधू तें,
जननीजनकसुहृन्मन हर्षविलें बा ! तुवांचि अवधूतें. ७
एक गुणग्राहक तूं, सारग्राही दुजा नसेचि कवी,
अगनगखगादिकां गुरु कोण म्हणे ? स्वहित कोण हें शिकवी ? ८
तूं लोकसंग्रहार्थचि योगाचा करिसि नित्य अभ्यास,
तुज अन्य काम कोण स्वलाभपूर्णास भक्तिलभ्यास ? ९
एकांततीर्थभिक्षासेवन जनसंग्रहार्थ करितोस,
चरितें सुकीर्तिभरितें निर्मुनि, बा ! लोकशोक हरितोस. १०
भजला अर्जुन भावें, त्यावरि केली दयासुधावृष्टि,
शरणागतीं अलकीं वत्सीं सुरघेनु होय तव दृष्टी. ११
दिधले बहु वर देव द्रुमदर्पघ्न त्वदंघ्रिकंजरजें
होतां प्रसन्न, होतें शरणागरदीनवज्रपंजर जें. १२
देवा ! दयासमुद्रा ! दत्ता ! दासांसि देसि अपवर्ग,
तुजला भजोनि, जाले कृतकृत्य असंख्य विप्रनृपवर्ग. १३
या विषयवासना विषलिप्ता, तप्ता, सुदु:खदा, जाणो
मन सूया; अनसूयापुत्रा ! वैराग्य चांगलें वाणो. १४
अर्जुनहि भ्रम पावे जेणें, देवूं नकोचि दत्ता ! तें;
कीं त्वत्प्रियजन दूर त्यागिति त्या भाग्यमद्यमत्तातें. १५
सत्कीर्ति पावलाचि स्तुत्य सहस्रार्जुन त्वदीय जन,
सद्रति कसी घडेना, भावें केल्या तुझ्या पदीं यजन ? १६
शरणागतीं अलर्कीं प्रसाद जो, तोचि सज्जना रुचला,
कृतवीर्यनंदनींचा विषयविरक्तांसि भासला कुचला. १७
वैराग्य, योगभाग्य, श्रेष्ठ, प्राज्ञप्रिय, प्रभो ! साचें,
इक्षुक्षेत्र उपेक्षुनि, कोण रसिक वन वरील भोसाचें ? १८
जे वरिति विषयभोगा, योगाभ्यासप्रसंग ज्यां न रुचे,
ते सुरस इक्षुचेहि त्यागुनि सुग्रास, चोखिती बरुचे. १९
दत्ता ! त्वत्पदपद्मच्छाया तापत्रयार्तविश्रांति;
तत्काळ अलर्काची गेली शोकप्रदा भवभ्रांति. २०
दत्ता ! सत्तापघ्ना ! बहु शरणागतजनासि वागविसी;
बोधकरें संसारस्वप्रभ्रमपरवशांसि जागविसी. २१
दत्तात्रेया ! तुमचा नाशाया दीनताप कर वीर,
भेटा मला, हरील क्षणपापिस्पर्शपाप करवीर. २२
पडतांचि दृष्टि तुमची, होइन निष्पापताप; हा लटिका
संसारभ्रम जाया नलगे, त्वच्चरण पाहतां, घटिका. २३
सुविशुद्ध, बुद्ध, मुक्त, क्षणमात्रें तो अलर्क नृप जाला,
तुमचा प्रसाद होतां बोधाच्या क्षण नकोचि उपजाला. २४
भक्त अलर्कार्जुन इत्यादि असंख्य तारिले, दत्ता !
त्वत्पदबळेंचि मुनिनीं संसृतिकृत्येसि मारिली लत्ता. २५