स्त्रीशिक्षा - प्रकरण २ रें

श्री.प.प.वासुदेवानन्दसरस्वती टेंभेस्वामी यांनी स्त्रीयांना अतिशय मार्मिक उपदेश केला आहे.


मुलगी - गुरुजी ! तुम्ही आमचे मायबाप आहांत. तुम्ही केलेला हितोपदेश शिरसा पुष्पवत् मान्य केला. आतां समजून उमजून मी प्रश्न करितें असा कीं, देह तर जड आहे व जीव तर असंग आहे; मग सुखदु:खादि संबंध प्राणाला असावा. प्राण देहाहून निराळा आहे. तो देहामध्यें परिपूर्ण राहून बळ देतो, व इंद्रियाला स्वकार्य करण्याकरितां वळवितो. देहाला हालचाल प्राणामुळेंच आहे; भूक तहान सुद्धां प्राणाचाच धर्म होय; प्राणच देतो घेतो, निजल्यावरही प्राण आपलें शरीर कुत्रे वगैरे खातील म्हणून श्वासोच्छ्वासरूपानें राखत असतो. ज्याचे श्वासोच्छ्वास बंद होतात तो मेला असें समजून तें त्या प्राणानें सोडलेलें अमंगळ व भयंकर प्रेत जाळतात. जोंपर्यंत प्राण आहे, तोंपर्यंत कोणी कोणाला विरुद्ध बोलल्यावर दुसरे संभावित त्याला म्हणतात कीं तूं पतीचा किंवा पायबापाचा अशस्त्र वध केलास व प्राण निधोन गेल्यानंतर तो देह पतीचा, पुत्राचा, पित्याचा, मातेचा, बंधूचा व ब्राह्मणाचाही कां असेना त्याला बांधून मसणांत नेऊन सरणावर ठेवून जाळून राख केली तरी मग तूं भर्तृहत्या, पुत्रहत्या, पितृहत्या, मातृहत्या, बंधुहत्या किंवा ब्रह्महत्या केलीस इत्यादि कोणीही म्हणत नाहीं; तेव्हां प्राणच पती, प्राणच पुत्र, प्राणच पिता, माता सुहृत् ब्राह्मणादि वर्ण, ब्रह्मचर्यादि आश्रम, प्राणच कां न म्हणावा ? प्राणाला चेतनताहि आहे. पहा, अकस्मात् मूर्च्छा आली किंवा सन्निपात झाला तर आवडीचें पोर जवळ रडून कहर करीत असतां किंवा मोठ्यानें आरोळ्या ठोकीत असतां न कळल्या तरीही जर पदर इकडचा तिकडे सरकला तर त्या मूर्च्छेच्या वेळीं किंवा सन्नितापाच्या वेळीं, सांवरून घेतात हें जगांत प्रसिद्ध आहे; तर प्राणाला आत्मा कां न म्हणावा ?
गुरुजी - शाबास, विचार तर बरा केलास. तुझी बुद्धि विवेक करणारी आहे, असें जाणून मला आनंद झाला. पण अजून आत्मा कोण हें तुला कळलें नाहीं. मात्र देहाचा अनात्मत्वें निरास चांगला केलास. पतिपुत्रादिक प्राणच आहे, असा निर्धार करून मेल्यावर हिरण्यगर्भोपासकांप्रमाणें प्राणलोकीं कांहीं काल गति होईल; पण पुनरावृत्ति चुकणार नाहीं. कारण प्राण हा आत्मा नव्हे, तर बाहेरच्या वायूप्रमाणें हाही जड आहे; जरे मूर्च्छेमध्यें पदर सांवरून घेतला तरी तें पूर्वसंस्कारवशात् काकतालीयन्यायानें कार्य घडलें; म्हणून प्राणांला चेतनत्व आलें असें म्हणणें तर दुरापास्तच आहे. बरें, पहा ! प्राण हा चेतन असता तर झोंप लागल्यावर तो जागा असतांही आंगावरील अलंकार चोरानें चोरून नेले तरी त्याला कांहींच कळत नाही. मी भुकेलों, मी तान्हेलों, आतां माझे प्राण व्याकुळ झाले इत्यादि स्पष्ट व्यवहारावरून असें म्हणणारा प्राणावांचून निराळाच असला पाहिजे. तो प्राणाचाही प्राण आहे व बळ देऊन शरीर धारण करणें व वांचविणें हेंही काम केवळ प्राणाचेंच म्हटलें जात नाहीं, तर प्राणाच्याही आंत असणारा अंतर्यामी जो तोच बल देतो व प्राणाला हृदयांत खेळवून खाणेंपिणें करवितो. खाल्लेलें अन्न पचविण्याकरितां -
उर्ध्वमग्नेर्जलं कृत्वा कृत्वाsन्नं च जलोपरि ॥
अग्नेश्चाध: स्वयं प्राण: स्थित्वाsग्निं धमते शनै: ॥
प्राणेनांभासि भूय: पिबति पुनरसावन्नमश्नाति तत्र
तत्पाक्म जाठरोsग्निस्तदुपहितबलो द्राक् शनैर्वा करोति ॥
व्यान: सर्वांगनाडीष्वथ नयति रसं प्राणसंतर्पणार्थ:
नि:सारं पूतिगंधं त्यजति बहिरयं देहतोsपानसंज्ञ: ॥
व्यापारं देहसंस्थ: प्रतिवपुरखिलं पंचवृत्त्यात्मकोsसौ
प्राण: सर्वेंद्रियानामधिपतिरनिशं सत्तया निर्विवादम् ॥
यस्येत्थं चिद्धनस्य स्फुटमिह कुरुते सोsस्ति सर्वस्य साक्षी
प्राणस्य प्राण एषो ह्यखिलतनुभृतां चक्षुषश्चक्षुरेष: ॥
इत्यादि प्रमाणानें व अनुभवानेंही प्राणादिद्वारा अंतर्यामींच आत्मा सर्व करवितो, पण करवून सुद्धां कर्ता, करविता न होतां निर्लेप राहतो; तेव्हां प्राणाप्रमाणें अचेतन ( जड ) हा आत्मा नव्हे. तूं असें पहा, स्वसन्निधानानें सर्व करूनही हा आत्मा नव्हे. तूं असें पहा, स्वसन्निधानानें सर्व करूनही हा आत्मा अकर्ता राहतो. तुम्ही तर सर्वथा पराधीन असून स्वत: डोळ्याची पापणी सुद्धां हालविण्याचें सामर्थ्य नसूनही ( मीं जळतें खापर डोक्यावर घेतल्यामुळेंच हें घर चाललें, मी केलें म्हणूनच हें झालें, माझ्यासारखी कोण शहाणी आहे काय ? असा ) पदोपदी अहंपणा करितां. काय तुमच्या हातांत आहे ? कांहीं नाहीं, तेव्हां असा वारंवार विचार करून कर्तेपणा व करवितेपणा घालवून निर्लेप रहावें. जो अकर्ता निर्लेप राहील त्याचे हातून बरें वाईट कर्म घडलें तरी त्यापासून त्याला बद्धता नाहीं. जशी लोखंडाची बेडी तशीच सोन्याचीहि बेडी बांधण्यास सारखीच आहे. त्याप्रमाणें पाप नरकयातना भोगवितें, तसें संकल्पपूर्वक फलकामना धरून केलेलें पुण्य, स्वप्नसुखाप्रमाणें थोडा काल स्वर्गसुख दाखवून पुन: अध:पात देतें. तो अध:पात दु:सह आहे.
य: प्रेत्यात्मानभिज्ञ: श्रुतिविदपि
तथा कर्मकृत्कर्मणोsस्य ॥
नाश:स्यादल्पभोगात्पुनरवतरणे दु:ख
भोगो महीयान् ॥
असें वचन आहे म्हणूनच तेंच पुण्य ईश्वरप्रीत्यर्थ केलें तर ईश्वरप्रसादानें बुद्धि - सिद्धि - द्वारा ज्ञान होऊन याच जन्मांत मोक्ष मिळतो. तेव्हां पूर्वीं तसें पुण्य केल्यामुळें आज ही तुझी सारासार विचार करणारी बुद्धि होऊन श्रीदत्तात्रेयाच्या प्रसादानें सद्गुरूची गांठ पडून सदुपदेश झाला. असो; हा देहाहून वेगळा प्राण तूं निवडलास तो पांच प्रकारचा, पांच कर्मेंद्रियें, पांच ज्ञानेंद्रियें व मन आणि बुद्धी या सत्रांचा मिळून हा लिंगदेह. पैकीं एक प्राणमय नांवाचा कोश होय. आत्मा तर याहून निराळाच आहे.
मु० - बरें, आपण म्हणतां हें तर सयुक्तिक माझ्या मनांत भरलें. मला असें वाटतें, मी पहात्यें, मी बोलत्यें, मी ऐकत्यें इत्यादि व्यवहारावरून इंद्रियांला चेतनता असावी. तेव्हां आंत असणारीं इंद्रियेंच आत्मा असावा, किंवा त्या इंद्रियांचें चालक मनच आत्मा असावा, कारण :-
मन एव मनुष्याणां कारणं बंधमोक्षयो: ॥
इत्यादि प्रमाण ऐकिवांत आहे. तेव्हां बंधमोक्षव्यवस्थासिद्धीही होते. म्हणून मनाला आत्मा म्हणणें प्रशस्त आहे, व
मन:कृतं कृतं राम न शरीरकृतं कृतम् ॥
येनैवालिंगिता कांता तेनैवालिंगिता सुता ॥
इत्यादि उपपत्ति पाहिल्यावर मनच आत्मा ठरतो. देहादिकांचे ठायीं अहंता व गृहदारादिकांचे ठायीं ममता तर मनच करितें. इंद्रियांपेक्षांही जाणणेपणा हा मनाचाच धर्म आहे. कारण एखादे वेळीं आपलें मन भलतीकडे गेलें म्हणजे पुढ्यांतून वाजत गाजत राजाची स्वारी गेली तरी पत्तासुद्धां लागत नाहीं. कोणी विचारल्यावर हेंच उत्तर मिळतें कीं, माझें मन तिकडे नव्हतें. अतएव माझ्या डोळ्यांना दिसलें नाहीं असा व्यवहार उघड दिसतो; तर मनच आत्मा म्हणण्यास काय हरकत आहे ?
गु० - शाबास, उत्तरोत्तर तुझें पाऊल पुढें पुढेंच आहे. असें आंत आंत चांचपून पाहिलें तर बरेंच होईल. जसें एका राज्यांत अनेक राजे परस्पर विरुद्ध होतील, तसें इंद्रियांना आत्मे म्हटल्यावर होईल; हीं इंद्रियें भौतिक जड करणें आहेत. जसा प्राण हा रजोगुनी भूतविकार आहे, तसें मनही सत्वगुणी भूतविकार आहे. जसें केवळ मातीच्या भांड्यापेक्षां माती गाळून भट्टी लावून केलेल्या कांचेच्या भांड्याला चकाकी येते म्हणून तो मातीचा विकार नव्हें असें म्हणतां येत नाहीं, त्याप्रमाणें अन्नाच्या सूक्ष्म वाफेनें बनलेल्या विकारच आहे, व कामादि अवस्थेनें हें क्षणोक्षणीं भ्रांत होतें व संकल्प विकल्पात्मक असल्यामुळें हें चंचल आहे. आत्मा निश्चल आहे. हें मन विषयांकरितां इंद्रियांला क्षोभविणारें आहे. आत्मा तर नित्य तृप्त आहे; पण हें मन त्रैलोक्यांतील सर्व वैभव मिळालें तरी आशातृष्णारूपीवृत्तीनें कधींही तृप्त होत नाहीं. दुर्वासना धरून पुढें भूतप्रेत विशाचादि भावाला पाववितें. आत्मा सर्वव्यापी असल्यामुळें अपरिच्छिन्न असून मन परिच्छिन्न आहे हें उघड कळतें.
अगमन्मे मनोsन्यत्र सांप्रतं च स्थिरीकृतम् ॥
माझें मन दुसर्‍या ठिकाणीं गेलें होतें तें पुन: परत आलें, आतां त्याला स्थिर केलें असें स्वानुभवानें सर्वांलाही कळतें. हें परिच्छिन्न नसेल तर जाणें येणें कसें घडेल ? व जें कर्म पुढच्या जन्माला फलोन्मुख होतें त्या त्या आकाराचें मन अंतकाळीं होतें; म्हणून त्या त्या जन्माला जावें लागतें. [ जो ज्याला जाणतो तो त्याहून निराळाच असतो ] ह्या न्यायानें आपलें मन गेलें, आलें इत्यादिक ज्याला कळतें तो आत्मा त्या जडमनाहून निराळाच आहे हें जागेपणीं उघड कळतें व स्वप्नामध्यें वाचा आदिकरून सर्व इंद्रियें मनांत लीन होतात, म्हणजे मनाच्या ताब्यांत राहतात, म्हणूनच मन स्वत: आपणच ग्राह्यविषयरूपी होऊन ग्राहक इंद्रियेंही स्वत:च बनून देणें घेणें इत्यादि सर्व व्यापार आत्मसांनिध्यानें बळ पावून करितें, आत्मा तर स्वयंज्योति आहे. ज्यास स्वप्नावस्थेमध्यें कार्यज्योती सूर्य, चंद्र, अग्नि इत्यादिक नसतां व करणज्योते डोले इत्यादि इंद्रियें नसतांही स्वचैतन्यप्रकाशानें मन:कृत सर्व पदार्थाला प्रकाशित करितो, तो आत्मा मन व मनोव्यापार ह्या सर्वांहून निराळा साक्षिभूत निर्विकार आहे. तो मन निश्चल झालें म्हणजे निश्चल कळूं लागेल.
मनोजृंभणराहित्ये यथा साक्षी निराकुल: ॥
इत्यादि प्रमाणानें पांच ज्ञानेंद्रियें, व संकल्पविकल्पात्मक मन मिळून एक मनोमयकोश लिंगदेहापैकीं आत्म्याला उपाधिभूत आहे, तेव्हां तो आत्मा त्या मनउपाधीहून वेगळाच जाणावा. उगीच मनाच्या तादात्म्याध्यासानें मरून आशाभूत होऊं नये. जर मन आवरत नसून रूपलावण्यसौंदर्यादिकांला भुलून हट्टी द्वाड पोराप्रमाणें आवरलें असतांही पुन: पुन: चपळपणानें पळत असेल तर सगुण ईश्वराची सुरेख प्रतिमा करून, आपल्या अधिकाराप्रमाणें प्रतिष्ठा करून, यथाविधि पूजा करून, मोकळ्या वेलीं पायापासून मस्तकापर्यंत ध्यान करून, स्थिरासनावर बसून, हृदयकमळांत ती प्रतिमा सांठवून ठेवावी. पुन: पुन: ध्यान सुटलें तरी तशीच आपादतलमस्तकापर्यंत भरून घ्यावी. जरी महिना, दोन महिने किंवा वर्षपर्यंत मन स्थिर न झालें तरी नाउमेद न होतां खेद सोडून हात धुवून मनाचे पाठीस लागावें म्हणेजे आपोआप स्वाधीन होईल. कितीही उच्छृंखल झालें तरी श्रीगुरुदत्तात्रेयाच्या पादुकांचें चिंतन करितांच मन शांत होईल.
मु० - गुरुजी ! यथार्थ सांगितलेंत. त्याच पादुकांचें आजपर्यंत चिंतन केलें त्याचेंच फळ हें चरणकमल पाहिलें. असो, असें हें मन भौतिक जड आहे व वाचा मनासह मागें फिरतें, पण त्याला आत्म्याचा पत्ताही लागत नाहीं; असेंहि कानावरून गेलें आहे. तेव्हां पुढें रिघून विचार केल्यावर बुद्धि आत्मा म्हणण्यास हरकत नाहीं. मन बुद्धीची वृत्ति आहे. तेव्हां ती जड असली पाहिजे; पण बुद्धि मात्र जड नव्हे, ही मनाची नियंत्री असल्यामुळें स्वतंत्र आहे. बुद्धि करील तें होईल. बुद्धि नसेल तर प्रत्यक्ष, अनुमान, उपमा इत्यादि प्रमाणें तरी कशीं करितां येतील ? येणार नाहींत. बुद्धिवांचून स्मरण, उहापोहज्ञान तरी कसें बरे होईल ? कर्तृत्वसुद्धां बुद्धिलाच आहे, तेव्हां हाच आत्मा असावा.
गु० - आकाश, वायु, तेज, जळ, पृथ्वी ही पंचमहाभूतें ईश्वरानें तप करून केलीं व तीं त्रिगुणात्मक असल्यामुळें प्रत्येकभूताच्या रजोंशांनीं वेगळालीं वाचा, पाणी ( हात, ) पाद, गुद, उपस्थ, ही पांच रजोगुणी कर्मेंद्रियें झाली; व अवशिष्ट सर्व रजोगुणांश एकत्र होऊन प्राण झाला. तो प्राण, अपान, व्यान, उदान, समान अशा वृत्तिभेदानें पांच प्रकारचा झाला, व आकाशादि पंचभूतांच्या सत्वांशीं निरनिराळीं श्रोत्र, त्वचा, चक्षु, जिव्हा, घ्राण अशीं पांच ज्ञानेंद्रियें झालीं; व अवशिष्ट सर्व सत्वांश एकत्र होऊन अंत:करण झालें. तें संकल्पांत्मक मन व निश्चयात्मक बुद्धि अशा वृत्तिभेदानें दोन प्रकारचें जाणावें. जरी प्राधान्यानें बुद्धि सात्विक आहे तरी तिला अंगभूत रजोगुण तमोगुण आहेत म्हणून त्रिगुणात्मिका ही बुद्धि तीन अवस्थांला पावते.
बुद्धेस्त्रिधा वृत्तिरपीह दृश्यते स्वप्नादिभेदेन गुणत्रयात्मन: ॥
बुद्धीला स्वतंत्र कर्तृत्व मानलें तर बोद्धव्याकरितां दुसरी बुद्धि पहावी लागेल तर तसें नाहीं. अग्निसंयोगानें लोहाला जसें दाहकत्व येतें, तसें आत्मसान्निध्यानें बुद्धीला चेतनत्व भासतें. बुद्धि झोंपेंत लीन होते व जागृतींत आपादतलमस्तक व्यापते, तेव्हां बुद्धीला आत्मा म्हटला तर काजव्याप्रमाणें आत्मस्वरूप ठरेल तर तें सदोदित आत्म्याला साजेल काय ? बुद्धीच पुण्यपाप करील तर स्वर्ग नरक बुद्धिलाच मिळेल. मग जीवाकडे काय संबंध राहिला ? एकानें करावें व दुसर्‍यानें भोगावें असें घडेल काय ? नाहीं नाहीं. तेव्हां यावत् बद्धदशा आहे तावत् जीवाला आध्यासिककर्तृत्वादिक शास्त्रानें मानिलें आहे. पांच ज्ञानेंद्रियें व बुद्धि मिळून हा लिंगशरीरापैकीं एक विज्ञानमय कोश आहे. बौद्धांनी हाच आत्मा असें म्हटलें तें अगदीं चुकीचें आहे; तेव्हां बुद्धीचा साक्षी बुद्धीहून पर असणारा जो तो आत्मा बोधृत्वसाक्षीत्व असूनही स्वयें निर्विकार आहे.
मु० - पूर्वीं अहंकार लीन झाला म्हणजे निद्रावस्था असें सांगितलेंत, तर आतां बुद्धि लींन झाली म्हणजे निद्रा व आपादतलमस्तक बुद्धिव्याप्ती झाली म्हणेज जागृति असें सांगतां तर हें कसें?
गु० - कित्येक अंत:करणाचे भेद मन, बुद्धि, चित्त, अहंकार असे चार मानितात; कित्येक दोन मानतात, तेव्हां मनामध्यें चित्ताचा, बुद्दीमध्यें अहंकाराचा अंतर्भाव मानितात म्हणून तसें म्हटलें तरी दोष नाहीं. चार्वाकादिक व पामरजन देहालाच अहंपणा देतात तर तो अहंपणा मिथ्या होय. मीमांसादिक जीवाला ( चिदाभासाला ) अहंपणा देतात, तर तो अहंपणा गौण होय. वेदांतसिद्धांती अकर्ता, अभोक्ता, गमनागमनादिरहित प्रत्यगात्म्याला अहंब्रह्म असें मुख्यत्वें लक्षणावृत्तीनें अहंकारलक्ष्यार्थ कूटस्थचैतन्याचें नित्य, शुद्ध, बुद्ध ब्रह्मांशीं सामानाधिकरण्य करितात. तो अहंकरालक्ष्यार्थ मात्र आत्मा म्हटला जाईल. वाच्यार्थरूपी जड अहंकार तर बुद्धीप्रमाणें दृश्य आहे. हा अहंकार जोंपर्यंत गळला नाहीं तोंपर्यंत ब्रह्मदेवाजवळ जरी वास केला, तरीही पुनरावृत्ति चुकणार नाहीं.

N/A

References : N/A
Last Updated : May 23, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP