मु० - देहापासून अहंकारापर्यंत जें त्यांपैकीं एकालाहि आत्मा म्हनतां येत नाहीं व यापुढें आणखी कांहीं नाहीं. अर्थात् बाकी शून्य राहिलें. हाच आत्मा काय ?
गु० - आत्मा तर परमानंदरूप आहे, तो शून्य होईल काय ?
मु० - जागृदावस्थेमध्यें घडलेले सर्व व्यापार स्वप्नावस्थेमध्यें संकोचित होतात, मात्र कित्येक दृष्टश्रुतादि व्यवहार मानसिक कांहीं वेळ भासतात ते सर्वहि निद्रेमध्यें अत्यंत लीन होतात. हें तर पूर्वींच आपण सांगितलें आहे. त्यावेळीं परमानंदही होतो; मग आनंदरूपी शून्यच आत्मा कां न म्हणावा ?
गु० - बुद्धीमध्यें चैतन्याचें प्रतिबिंब पडलें तोच जीव होय. ह्या जीवाला बुद्धिद्वारा स्थूलदेहाचें तादात्म्य घडतें तेव्हां प्राधान्यानें नेत्रांत स्थिति होऊन आपापल्या देवतांनीं अनुग्रह केलेल्या इंद्रियांनीं विषयांचें ग्रहण होतें. ही स्थूलभोगरूपी जागृदवस्था विश्वनामक जीव अनुभवितो, व तोच जीव इंद्रियें मनांत लीन झाल्यावर कंठस्थानीं लिंगदेहाशीं तादात्म्य पावून तोच विश्वनामक जीव तैजससंज्ञक होऊन जागृदवस्थेंत पाहिलेले, ऐकिलेले इत्यादिक जे विषय त्यांचा संस्काररूपी प्रविविक्त भोग अंत:प्रज्ञेनें घेतो, व या नंतर नाडीमार्गानें हृदयवेष्टनरूपी पुरीतन्नामाचे पोकळींत येऊन प्राज्ञनामक होत्साता ब्रह्मरूपीशय्येवर निजून चेतोमुखानें परमानंद भोग घेतो. पण पाण्यांत पडलेल्या पाण्याच्या थेंबाप्रमाणें ब्रह्मस्वरूपीं मिसळूने जात नाहीं. जसा पाण्यानें भरलेला शिसा तोंड घट्ट करून पाण्यांत ठेविला तरी तें पाणी जसें ठेविलेल्या पाण्यांत मिसळत नाहीं, व पुन: शिसा उचलला तर तेंच पाणीं तसेंच असतें; त्याचप्रमाणें अनिर्वचनीय अज्ञानानें आवरलेला जीव झोपेमध्यें ब्रह्मस्वरूपीं मिळाला तरी आपलें प्रारब्ध भोगण्यासाठीं कांहीं निमित्तानें [ ईश्वरेच्छेनें ] तोच जीव त्याच स्वरूपानें पुन: जागा होऊन देहावरे येतो व पूर्वी केलेले व पुढें करण्याचे आपले सर्व उद्योग आठवितो; पण ब्रह्मज्ञानानेंच नष्ट होणारें उपाधिभूत अज्ञान नष्ट झाल्यावांचून निरुपाधिकपणें ब्रह्मस्वरूपांत अत्यंत लीन होणार नाही. हा जो अवस्थावान् जीव व ह्याचे अवस्थाव्यापार जाणणारा, त्या सर्वांहून विलक्षण असून सर्वसाक्षी आहे. तो शून्याहून निराळा, शून्याचाही साक्षी आहे. अन्यथा शून्य तरी कोणास कळलें ? ज्याला शून्य कळों आलें तो तर शून्याहून निराळाच आहे.
मु० - एवढ्या गाढ झोपेंत तो साक्षी कसा असतो व जागेपणीं त्याची ओळख कशी पटावी ?
गु० - ज्याप्रमाणें ग्रहण लागतें त्या वेळीं राहूनें ग्रासलेलें सूर्यमंडळ किंवा चंद्रमंडळ पाहणार्यास स्पष्ट दिसून आलें नाही तरी तेवढ्यानें तीं मंडळें नाहींतच अशीं होत नाहींत. मात्र स्पष्ट भासत नाहींत; पण तसल्या त्या खग्रासाच्या वेळीं खग्रासातिरिक्तपणानें त्या मंडळांचा भास होतोच होतो. त्याप्रमाणें सर्वेंद्रियांत:करणोपरमरूपी निद्रेमध्यें शून्य साक्षीपणानें राहून जीवाला उठल्यावर स्मरण करून तोच देतो, इत्यादि प्रमाण आहे म्हणून झोंपेंतून उठलेला जीव मी इतका वेळ सुखानें निजलों होतों, मीं काहीं जाणलें नाहीं असे उद्गार काढितो. पूर्वीं अनुभविल्यावांचून हें स्मरण तरी कसें व्हावें ? तेव्हां त्या वेळींहि हा अनुभव आहे व दुसरें असें, हा जीव म्हणजे ब्रह्मस्वरूपाहून निराळाच एक पदार्थ आहे असें नाहीं.
ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापर: ।
असें प्रमाणहि आहे. जोंपर्यंत संघाताचा अभिमान धरून मी कर्ता, भोक्ता, मी सुखी, मी दु:खी इत्यादि रूपानें व्यवहार करतो तेव्हां जीव म्हटला जातो. हा जीव स्वत: सच्चिदानंदस्वरूपी असूनही देहादिकांचे ठायीं निमग्न होऊन मायेनें मोहित होत्साता सुखासाठीं तळमळ करून मनाला प्रिय वाटणारे बरेच संबंध करितो.
यावत: कुरुते जंतु: संबंधान्मनस: प्रियान् ॥
तावंतोsस्य निखन्यंते हृदये शोकशंकव: ॥
पण त्यापासून सुख कोठून होईल ? होणारच नाहीं.
सुखमस्यात्मनो रूपं ॥
आपण सुखरूपी आहें असें खरोखर जोंपर्यंत कळलें नाहीं तोंपर्यंत देहाला, प्राणाला, मनाला, बुद्धीला किंवा अधिक पाहिलें तर शून्याला मी आत्मा म्हणून भ्रांतपणें वाद मात्र करण्याचा; पण ह्या शून्याचाहि साक्षी, व धर्माधर्मादिरहित, कार्यकारणभाववर्जित असून, भूतभविष्यवर्तमानकाळानें परिच्छिन्न होत नाहीं. अतएव षड्भावविकार ज्याला नाहींत असा, नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त परमानंदाद्वितीयरूपी आत्मा कळण्याचा कठीण आहे. जागेपणीं ह्याची ओळख पटण्याला अवघड नाहींच नाहीं. सर्व विकल्प दूर करून स्वसंवेद्य आत्मस्वरूप आपणच ओळखावें. जसा वारा आंत घुसल्यानें पाण्यावर पाण्याचा तरंग निराळ्या स्वरूपासाचा भासतो, पण त्याच्या आंत पाणी, पूर्वेकडे व पश्चिमेकडेसही पाणी, व जिकडून आला व जिकडे जातो तें सर्व पाणी, व वायु शांत झाल्यावर तरंग म्हणून कांहीं निराळा पदार्थ आहे काय ? कांहीं नाहीं. त्याप्रमाणेंच भूतभौतिक देव, नर, नारी, पशू, पक्षी, कृमि, कीट, वृक्ष, वल्ली इत्यादि विविधरूप नामकर्मगुणभेदानें बाह्य दृष्टीनें जें जें भासतें, तें तें सर्व एक सच्चिदानंदात्मक स्वरूपच आहे. दुसरें कांहीं नाहीं. जें स्थावर जंगम अणुरेणूपर्यंत दिसतें त्याचें नामरूप सोडून एक सच्चिदानंददृष्टिनेंच सर्व पहावें. मग कोणाचा कोण प्रिय, अप्रिय, मित्र, शत्रु, द्वेष्टा, उदासीन, साधु, असाधु व कोणाचा वियोग, कोणाचा योग ! ही सर्व व्यावहारिक एक काहाणी आहे.
मु० - तुम्हीं म्हणतां तें खरें, पण हें भिन्नपणानें नाम्ररूप आकाराला पावलेलें जगत् ढळढळीत दिसत असतां त्याचा अपलाप करून हें एकच आहे असा निश्चय तरी कसा मनांत भरावा ?
गु० - वर्षोपला यथाsभिन्ना अपि भिन्ना इहांभसि ॥
ब्रह्मणीदं तथा विश्वं ब्रह्माभिन्नं विनिश्चिनु ॥
जशा जळरूपी गारा दगडासारख्या घट्टरूपाच्या जळावर पडल्या तरी जळाहून निराळ्याच दिसतात, पण विलक्षण लोक गार लागणार्या गारा पाणीच आहे अशाच दृष्टीनें पाहतात व क्षणांतरीं त्याच गारा पाणी होतें; ह्या न्यायानें सर्व जगताचें नामरूप सोडून निरंतर सच्चिदानंददृष्टी मात्र विवेकानें ठेवावी हेंच विवेकाचें कार्य होय. दगड मारून घडा फोडल्याप्रमाणें अजिबात नामरूप नाहीसें करावें असें कर्तव्य नाहीं, तें जगत् विवेकानंतर दग्धपटन्यायानें बापुडें राहिना का ? एक वेळ बाधित केल्यावर बाधितानुवृत्तीनें राहिलें तरी त्यापासून मग काय बाधा आहे ? कांहीं नाहीं. यावत् व्यवहारक्षयपर्यंत बापुडें खुशाल राहो. कारण कीं :-
करें निर्मिलें तें मनें तोडवेना, मनें निर्मिलें तें करें मोडवेना
मु० - आपण सांगतां पण अजून निश्चय होईना.
गु० - तुला संशय राहिला असेंल तर अजून प्रश्न कर. मी नि:संशय करतों.
मु० - संशय तर नाहीं. तुम्हीं सांगतां तसा विचार करावा खरा; पण चित्ताची एकाग्रता होत नाहीं, यास काय करावें ?
गु० - तर चिरकाल ध्यान करोन सावधान हो.
मु० - हेंही खरें, पण गांवाची निष्कारण उठाठेव करण्यास वेळ मिळते, परंतु अद्वैत वासना होण्याची मुष्केल पडते.
गु० - ह्यावरून असा निश्चय होतो कीं, अद्यापि तुझ्यावर ईश्वराचा अनुग्रह झाला नाहीं, त्यावांचून श्रवण केलें तरी तें -
नळी फुंकिली सोनारें । इकडून तिकडे गेलें वारें ॥
याप्रमाणें समजावें, किंवा कांहीसें समजलें तरी न उमजल्यामुळें लोकांमध्यें वटवट करण्यास मात्र मिळेल. काय त्याच उपयोग ?
लोकां सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडा पाषाण ॥
मु० - तर असें श्रवण करूं नये काय ?
गु० - बायांनो, तुम्हीं श्रवणास जातां म्हणून बिचार्या पुराणिकबुवाला पोथी सोडण्याचा प्रसंग तरी येतो, नाहीं तर मग ‘ रामकृष्णवासुदेव. ’ तुम्ही पुराण - कीर्तनास जाऊन इकडच्या तिकडच्या गोष्टी करा किंवा माळा फिरवा अथवा वाती पत्रावळी वगैरे करा; पण रोज मूठमूठ धान्य आणि अखेरीस विदायकी, एवढ्याला कांहीं वानवा नाहीं.
मु० - आमची ही मस्करी करतां ?
गु० - आम्ही स्वत:च मस्करी ( संन्यासी ) बनलों, दुसर्याची मस्करी करावयाची ? एका मनानें दोन कामें होत नाहींत. आधी श्रवणाला वेळ थोडाच वांटणीस येणार, तोही व्यर्थ गेला तर मनुष्यजन्माचा काय उपयोग ? ह्याचकरितां असें जाचून बोललेलें अंत:करणास खोंचूनतरी लक्ष्यपूर्वक थोडें श्रवण घडूं द्या; तें व्यर्थ जाणार नाहीं.
मु० - हें तर पत्करलें; पण ज्या योगानें श्रवण केलेलें मनांत ठसून त्याचें मनन, निदिध्यासन ( ध्यान ) घडेल असा ईश्वरानुग्रह कसा व्हावा ?
गु० - सर्व प्राण्यांला आपल्याप्रमाणेंच देहादिक प्रिय आहेत व जसें आपणास दु:ख होतें तसेंच इतरांसही होईल व ‘ देह हें देऊळ आहे व त्यामध्यें राहणारा जीव हा सदाशिव आहे, असा निश्चय करून अहिंसारूप पुष्प त्याला आवडतें तें देऊन निरंतर ‘ सोहं भावानें पूजा करावी. ’ हिंसा म्हणजे प्राणच घेणें असा अर्थ नव्हे, तर कायावाचामनें दुसर्यास पीडा न देणें हा अर्थ समजावा. अतएव निरथक कोणाचें मनसुद्धां दुखवूं नये व कायावाचामनानें केलेलें सर्व कर्म ईश्वरास समर्पण करावें; आपली बुद्धि स्वच्छ राखावी, सरळ वागावें, खोटें बोलूं नये, क्रोधरूपी मांगाचा स्पर्श करूं नये, झाला तर स्नानच करावें. कसें कोणी बोलोत आपण शांति धरावी. दुर्जनपण करूं नये, इद्रियें आपल्या ताब्यांत ठेवावीं, प्रिय भाषण करावें, वाईट कर्माची लाज ठेवावी, हानि झाल्यास खचूं नये, इष्ट वियोग झाला तरी हळहळूं नये, मोठेपणा सोडून द्यावा, बाह्माभ्यंतर शौच ( शुद्धि ) करावें, संगती करणें तर सज्जनाचीच करावी, मिळेल त्यांत संतोष मानावा, घडेल तसतसें श्रवण आदरानें करावें, असें वागल्यास अवश्यमेव ईश्वरानुग्रह होईलच होईल.
मु० - सोहं भावानें पूजा करावी म्हणतां तो सोहंभाव कसा ?
गु० - स: म्हणजे तो परोक्ष दूर असणारा, अहं म्हणजे मी अपरोक्ष स्वयंप्रकाश, हे दोन पदार्थ आहेत. यांनाच जीव - शिव म्हणतात. सोहं हें वाक्य आहे व स: आणि अहं हीं दोन त्याचीं पदें होत. वाच्यार्थ, लक्ष्यार्थ असे दोन अर्थ प्रत्येक पदाचे आहेत. त्यांतून पांच भौतिक, लक्ष्यार्थ असे दोन अर्थ प्रत्येक पदाचे आहेत. त्यांतून पांच भौतिक स्थूलदेह, हा पहिला; पांच ज्ञानेंद्रियें, पांच कर्मेंद्रियें, पांच प्राण, मन व बुद्धि मिळून एक लिंगदेह हा दुसरा अज्ञानकारण देह हा तिसरा, मिळून देहत्रयवेष्टित जें चैतन्य अविद्याप्रतिबिंबित जीव, अविद्याधिष्ठान चैतन्य, हा अहं पदाचा वाच्यार्थ आहे व साक्षी, कूट, प्रत्यगात्मा हा अहंपदाचा लक्ष्यार्थ आहे. सप्तपाताळ लोक पायांपासून कंबरेपर्यंत ज्याचे, व भूरादिलोक नाभीपासून मस्तकापर्यंत ज्याचे, नक्षत्रें - दांत; माया - हास्य; रात्र - दिवस ज्याचे निमेषोन्मेष; सृष्टि - कटाक्ष; समुद्र - कुक्षी; नद्या - नाड्या; वृक्ष - केश; वृष्टि - रेत; अस्थि - पर्वत असा विराट देह ज्याचा स्थूल होय. दिशा कर्ण, वायू - त्वचा, सूर्य - नेत्र, वरुण - जिव्हा, अश्विनी - कुमार - नासिका, अग्नि - वाचा, इंद्र - हात, प्रजापति - लिंग, मृत्यु - गुद, मन - चंद्र, बुद्धि - बृहस्पति, चित्त - विष्णु, अहंकार - रुद्र असा हिरण्यगर्भाख्य लिंगदेह ज्याचा व माया अव्याकृताख्याकारणदेह ज्याचा, ह्या देहात्रयानें वेष्टित जें ब्रह्म चैतन्य ( माया, मायाधिष्ठान, ब्रह्मचैतन्य व मायाप्रतिबिंबित ईश्वर ) हा स: या पदाचा वाच्यार्थ होय. व सत्य ज्ञानानंतपरमानंद लक्ष्यार्थ होय. तेव्हां दोन्ही वाच्यार्थाला विरोध आला तरी वाच्यार्थ सोडून ( देहप्राणेंद्रियमनोबुद्धिअहंकाराहून वेगळा; विश्व, त ऐजस, प्राज्ञ हे तीन देहाचे अभिमानी विकारी याहून निराळा; जाग्रत्स्वप्नसुषुप्तीचा साक्षी, अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय ह्या कोशांहून व्यतिरिक्त जो मी कूटस्थ साक्षी प्रत्यगात्मा तोच हा विराटसूत्रात्मा; अव्याकृतमाया ह्या तीन देहांतून निराळा, व त्याचे अभिमानी वैश्वानर, हिरण्यगर्भ ईश्वर त्याहून वेगळा, व सृष्टिस्थितिप्रलय हे त्यांचे व्यापार जे, त्यांचा साक्षी, सत्य, ज्ञान, अनंत, नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्तस्वभाव परमात्मा आहे. ) असेंच दोन्ही लक्ष्यार्थांचें अखंड तैलधारेप्रमाणें निरंतर चिंतन करावें. हेंच निदिध्यासन [ ध्यान ] होय. जीवशिव एकच आहेत, असें वेदांत ऐकून निर्धार करणें तें श्रवण होय. श्रवणानें संशय नष्ट होतात. अविद्याउपाधीनें जीवाला किंचिज्ञपणा आला व विद्या - ( माया ) - उपाधीनें शिवाला [ ईश्वराला ] सर्वज्ञपणा आला, हे दोन्ही उपाधी सोडल्यावर परस्परांचें एकत्व संभवतें, असें अनुसंधान श्रवणानुसारानें करणें तें मनन होय. मननानें असंभावना नष्ट होते. स्वप्नाप्रमाणें दिसणारें नामरूपात्मक जगत् मृगजळाप्रमाणें किंवा दोरीच्या सर्पाप्रमाणें आहे, व श्रवण - मननानें नि:संशयपणें ठरलेलें जिवाशिवांचें एकत्व मात्र सत्य आहे असें धारणा लावून चित्तानें जीवशिवैक्यध्येयाचें निरंतर चिंतन करणें तें निदिध्यासन होय. ह्या ध्यानानें विपरीत भावना नष्ट होते. मग नामरूप कुलजातिसंबंध सोदून देहाला मी म्हणतात त्याप्रमाणें शिव परमात्मा मी आहें असें दार्ढ्य होऊन झोंपेप्रमाणें सर्व विसरून जाणें हे उपरती [ निर्विकल्पसमाधि ] होय. ह्यानें कृतकृत्यता येते. पुन: जन्म होत नाहीं. ज्ञानसमकालच मुक्ती आहे तरी लोकदृष्टीनें यावत्प्रारब्ध देह राहो, एक वेळ आवरणभंग झाल्यावर पुन: देहादिकांचा तादात्म्याध्यास होत नाहीं, हेंच बोधाचें वैभव. अभ्यासानें बोध दृढ करून मनोभंग, वासनाक्षय ज्यांनीं केला त्यांला ही जीवन्मुक्ती मिळते. विशेष काय सांगावें, एक वेळ आत्मसाक्षात्कार झाला म्हणजे मोह, शोक रागादि नष्ट होतात, संशय फिटतात, हृदयग्रंथी तुटतात, जन्ममरण देणारीं कर्में खुंटतात, सर्व पाश तुटतात. मग तेथें कर्तृत्व, भोक्तृत्व, पापपुण्य पुढें कोठून येणार ? ह्याप्रमाणें ह्याच डोळ्यांनीं जीवन्मुक्तीचा हा सोहळा ज्यांनीं अनुभविला त्यांचें प्रारब्ध संपल्यावर पिकल्या पानाप्रमाणें देह कोठेंहि पडो, प्राणोत्क्रांती होणार नाहीं. तापलेल्या दगडावर टाकलेल्या पाण्याप्रमाणें सर्व कळा स्वरूपांत लीन होतांच पूर्वीं ब्रह्मच असून जीवपणा भ्रमानें आलेला तो ज्याचा गेला असा तो ब्रह्मच होतो. हें सारांशभूत वेदांत - तात्पर्य सांगितलें आहे. आतां ह्यापुढें सांगण्याचें व ऐकण्याचें राहिलें नाहीं. असें म्हणून गुरुजी स्तब्ध राहिले, तें पाहून मुलगी चकित होऊन केलेल्या श्रवणाचें मनन व निदिध्यासन करून चिरकाल समाहित होऊन स्वानुभूतीनें गाते.
पद
मी चमकुन गेल्यें होतां ज्ञान ॥ध्रु०॥ नरनारी नगर विचित्र । स्थावरजंगम जें सर्वत्र । पाहत होते ते हे नेत्र, गेले भुलोन ॥१॥ अहो मी झाल्यें सैरावैरा । आतां कैची येराझारा । अंजुळि दिधली म्यां संसारा, सार घेऊन ॥२॥ देहीं असतां विदेहस्थितिनें । जितेपणीं मी मरून गुरुनें । कथित ज्ञानाग्निज्वाळेनें, मोह जाळून ॥३॥ पूर्वघराला टाळा खोविला । स्वानंदानें खोपा भरिला । अंजुळि दिधली कुळशीळाला, अजिचा सुदीन ॥४॥ आतां नि:संगचि होऊन । जनलज्जेलाही दवडून । परपुरुषाला आलिंगोन, धिंगडा घालीन ॥५॥ कोणी म्हणोत मजला वेडी । परि मी आवृतिसाडी फेडी । भर लोकांमधिं नागडी उघडी, फुगडी घालीन ॥६॥ पूर्णानंदाची घागर । हातीं वेघोनी हुंकार । करि काढोनी उंच स्वर, फुगडी घालून ॥७॥ मीच जगाची उत्पादक । मी सर्वांच्या पूर्वील एक । मी अन्नचि मीं अन्न भक्षक, एक होऊन ॥८॥ इति स्त्रीशिक्षायां तृतीयं प्रकरणं समाप्तं ॥ ग्रंथ संख्या ६०० ॥ श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु ॥