‘ दुष्टानीं नागविला कपटद्यूतांत धर्म, ’ हे वार्ता
जातां झाल्या यादवपांचाळमती महाधिनें आर्ता. ॥१॥
यादवपांचाळ वनीं आले भेटावयासि धर्मातें,
निंदिति धृतराष्ट्राच्या तत्तनयांच्या हि दुष्ट कर्मातें. ॥२॥
पाहोनि पांडवांचीं रूपें तो विश्वभावन वनीं तीं,
पावे त्या भावातें जो तापें होय भाव नवनीतीं. ॥३॥
कृष्ण म्हणे, ‘ वा साधो ! स्वकृतकुकृत आठवूनि रडतील.
छळ करिते छळक रिते धनें यशें जीवनें हि पडतील. ॥४॥
दुर्योधनदुःशासनकर्णशकुनिरक्त भूमि सेवील,
गृध्रशिवासंघ सुखें तन्मांसांतें यथेष्ट जेवील. ॥५॥
धर्मन्यायीं त्वत्सम पूर्वाभ्यासी रते, नवा न रते;
खळ आकारें दिसती, परि नर न, विवेकहीन वानर ते. ॥६॥
कां गेला विदुर पुन्हां ? म्हणतो त्या आंधळ्यासि कां ‘ जी ’ ‘ जी ’
ती प्यावी अमृतांधें काय, त्यजिली वमूनि कांजी जी ? ॥७॥
खळ हो ! बळें तुम्हीं च व्यसनीं बुडवावया असु सका रे !
सोडाल आठवूनि स्वकृतदुरित दीर्घ उष्ण सुसकारे. ॥८॥
सत्तापद हो ! खदिरांगारानीं न्हाल, व्हाल पापडसे,
साप डसे एकास चि, सद्वेष्ट्याच्या कुळासि पाप डसे. ’ ॥९॥
जिष्णु म्हणे, ‘ कृष्णा तूं भगवान् विश्वेश विष्णु मज कळलें;
तत्त्व व्यासें कथिलें, कीं हें सद्भाग्य सत्फळीं फळलें. ॥१०॥
सत्य तुझा संकल्प प्रभुजी ! जें कार्य तें चि करिसील.
स्वपदाश्रितजनतापत्रयतम तूं तरणि तूर्ण हरिशील. ’ ॥११॥
कृष्ण म्हणे, ‘ त्वत्प्रिय ते मत्प्रिय, भवदहित ते चि मदहित रे !
तुज मज जो न अनुसरे तो न भवाब्धींत एक पद हि तरे. ’ ॥१२॥
श्रीकृष्णा श्रीकृष्णा दाउनि खळपाणिकृष्टकेश वदे,
उक्तिकडे मन दे, परि नयन तदास्याकडे न केशव दे. ॥१३॥
‘ हे केश धरुनि वोढुनि नेलें दुःशासनें सभेंत, सख्या !
तेव्हां मज आठवली त्वत्पदयुगली सखी, न अन्य सख्या. ॥१४॥
ईणें चि राखिली बा ! लज्जा, उघडी पडों दिली न सती;
यदुकुरुकीर्ति न उरती, जरि मज हे ठावुकी किली नसती. ॥१५॥
होते समीप पांच हि पति, अतिमति हे, मनें उदासीनें;
म्यां व्यसन साहिलें तें न असेल विलोकिलें कुदासीनें; ॥१६॥
सोडी पुनःपुन्हा खळ, न धरुनि लज्जा भया दया, लुगड्या,
उघडें पडतें वपु तरि तूं अंतरतासि गा ! दयालु गड्या ! ॥१७॥
जे पाप, गरद, अग्निद, सर्वस्वहर, स्वदारवस्त्रहर,
तदुपेक्षा करिति कसी ? हे साक्षादेकमुख सशस्त्र हर. ॥१८॥
गुरु तात बंधु पति सुत कोण्हीं च मला नसे; जिला असती
तीस घडेल असें कां ? हसतील सतीजनव्रता असती. ॥१९॥
स्त्रीलंघन करित्यातें प्राकृत हि न साहती, पहा, लावा.
हा ! लावावा कर मज ? वातें हि न, पदर ही न हालावा. ॥२०॥
यांचीं शस्त्रें अस्त्रें दोर्दंडबळें खळें वृथा केलीं,
धिक्कष्टम् ! सर्व यशें सुज्ञानें एकदा लया गेलीं. ’ ॥२१॥
ऐसें वदोनि रडतां कृष्ण म्हणे, ‘ अंब ! तूं नको चि रडों,
कळवळतें मन्मन सखि ! या शोकाचळभरें नको चिरडों. ॥२२॥
सखि ! अखिलसतीपूज्ये ! मद्धैर्य तवाश्रुबिंदुसह गळतें,
केवळ तुझें चि न वदन, अमृतद्युतिगौर मद्यश हि मळतें. ॥२३॥
तुज गांजिलें जिहीं त्यां ज्यांत यशोनाश अंगनाश तशा
वरितील दशा, त्यांच्या शोकें रडतील अंगना शतशा. ॥२४॥
अससी असी च धर्मीं चित्तीं माझा धरूनि बोल टिकें,
झालें कधीं च न मृषा, होईल मदुक्त काय हो ! लटिकें ? ॥२५॥
होइल मद्वच न मृषा, केव्हां तरि वारिराशि आटेल,
ग्रहगण गळेल, हिमगिरिराज खचेल, क्षिती हि फाटेल, ’ ॥२६॥
ऐसें ऐकुनि साध्वी मध्यमपतिच्या मुखाकडे पाहे;
जिष्णु म्हणे, ‘ या प्रभुच्या वचनीं विश्वास आमुचा आहे. ’ ॥२७॥
धृष्टद्युम्न म्हणे, ‘ कुरुगुरु भीष्मप्रभु जसा तसा द्रोण;
खळकाळ कां न झाले ? पाहेल कुकर्म सभ्य तें कोण ? ॥२८॥
वारावे मारावे खल, तें केलें न कर्म दोघानीं,
नय सोडुनि, अघ जोडुनि, वद वांचावें कशास मोघानीं ? ॥२९॥
द्रोणासि मीं, शिखंडी भीष्मासि वधील, काय हें खोटें ?
मोटें यश यांत भगिनि ! कां तूं कर्णांत घालीसी बोटें ? ॥३०॥
मारावा दुर्योधन भीमें, पार्थें हि कर्ण, हा नियम
न चुकेल, जसा न चुके निमिष हि करितां प्रजासुहानि यम. ’ ॥३१॥
कृष्ण म्हणे, ‘ शिशुपाळप्रियसख यदुशत्रु शाल्व माराया
जरि गुंतलों न असतों, न श्रम हा पावतासि गा ! राया ! ॥३२॥
समयीं धावत येतों, द्यूतातें कथुनि दोष राहवितों,
जरि न वळते विशृखळ खळ, खळखळ रक्तपूर वाहवितों. ॥३३॥
पाहोनि राजसूयक्रतु जातां, शाल्वसंकटीं शिरलों;
तें शमलें, तों द्यूतव्यसन परिसतां तसा चि मीं फिरलों. ॥३४॥
आतां काय उपाय ? व्यसन न तुमच्या हि हें गळां पडलें
आम्हां सुहृदांच्या ही; बा ! मत्पुर सर्व खळखळां रडलें. ॥३५॥
सरतील क्षणलवसे लघु, केले अवधि अब्द तेरा जे;
त्वत्सम साधु न लागों देती स्वयशासि शब्द ते राजे. ’ ॥३६॥
सांत्वन करूनि जातां प्रभु भिजवी स्वाश्रुनीं स्वसेला हो !
ने स्वरथीं वाहुनि कीं ताप न अभिमन्युला स्वसेला हो. ॥३७॥
धृष्टद्युम्नें नेले प्रतिविंध्यप्रमुख जे सकळ भाचे;
अतितुच्छ ज्यांपुढें दिग्द्विरदाच्या गतिविलास कळभाचे. ॥३८॥
नकुळसहदीवभार्या माहेराला स्वबंधुनीं नेल्या.
जो इंद्रसेन सेवक धात्री दासी हि हरिकडे गेल्या. ॥३९॥
द्वैतवनाप्रति धौम्यद्रुपदसुतायुक्त पांडव हि गेले,
तेथें मार्कंडेयें दर्शन देवूनि धन्य ते केले. ॥४०॥
तो मुनि म्हणे, ‘ विलोकुनि तुज झालें स्मरण रामराज्याचें,
आनंदभरित चरित त्वरित करितसे सुपामरा ज्याचें. ’ ॥४१॥
द्वैतवनीं द्रुपदसुता पतिला होवूनि तप्ततनु गांजी,
वदली लेश हि न कधीं श्रुतिकटु अपराधियां हि अनुगां जी. ॥४२॥
द्यूत महाव्यसन असें नाइकिलें काय नरवरा ! कानीं ?
सर्वस्व हरुनि सहसा केलासि अरण्यचर वरकानीं. ॥४३॥
श्रोतृश्रुतिहर कीं तूं वदता सुविचारखनि कथा पिकसा,
व्यसनांत बुडालास भ्रात्यांसह सुज्ञ जर्हि तथापि कसा ? ॥४४॥
प्रासादीं नगरीं जे वसले ते तरुतळीं दव - स्थानीं,
झाले विच्छवि रवि - कवि - परिधरसे बंधु असदवस्थानीं. ॥४५॥
यांसि पहातां कैसें व्याकुळ मानस तुझें नव्हे राया ?
तुज काय दया यांची ? प्राणांस हि सिद्ध तूं अव्हेराया. ॥४६॥
व्यसनप्रसंग तुज ही तेजस्विवरासि अंक हा रविला,
झालासि दीन, वाटे द्यूतीं तो हि प्रताप हारवला. ॥४७॥
या दुष्टाप्रति आलें सोडुनि मेल्या दशानना शील;
ती कोणा धीराच्या धृतिला माझी दशा न नाशील ? ॥४८॥
ती स्पर्शली नसेल चि कोणा हि सभेंत दुर्दशा स्त्रीतें,
योग्य पहाया काय द्रोण, नदीसुत, तुम्हीं हि शास्त्री तें ? ॥४९॥
सर्वत्र क्रोध जसा तैसी सर्वत्र न क्षमा साजे,
ते कैसे न वधावे, तोडिति परघातदक्ष मासा जे ? ॥५०॥
येऊं द्या कोप मनीं, एकिकडे संप्रति क्षमा राहो;
कां गोष्पदांत बुडतां ? यश रक्षा, खळ विपक्ष मारा हो ! ॥५१॥
क्रोध असावा समयीं, केवळ वश चित्त न क्षमेला हो !
कोप त्यजितां जरि जमदग्नि धनुर्वेददक्ष, मेला हो ! ’ ॥५२॥
धर्म म्हणे, “ मतिमति ! सति ! यतिपतिगति अतिसमर्थ जो हरि तो
म्हणतो, ‘ क्षमा चि बरवी, ’ परवीरयशें स्वसद्गुणें हरितो. ॥५३॥
व्यास द्रोण विद्रु कृप भीष्म श्रीकृष्णनाथ हे सुकवी
म्हणति, ‘ क्षमा शिवतरुप्रति पोषी, क्रोध सर्वथा सुकवी. ’ ॥५४॥
व्याघ्र व्याळ क्रूर, क्रूरतर क्रोध, बोधरोधक हा,
क्रोधवशासि विलोकुनि बहु म्हणति स्वहिततत्त्वशोधक ‘ हा ! ’ ॥५५॥
वरिली सुयोधनें ती, म्यां ही भावुकपद क्षमा, तींत
रत जे इला न सेविति, दवडिति हित ते अदक्ष मातींत. ॥५६॥
त्यजुनि तिला बहु तरले, एक हि न इला त्यजूनि तरला गे !
कृष्णे ! क्षमा सुधारस, रसिका रस गोड कां इतर लागे ? ॥५७॥
श्रितहित करिती, हरिती सर्वव्यसन क्षमाभवानी हो !
आराधावी आम्हीं खळमहिषापहृतवैभवानीं हो. ” ॥५८॥
भीम म्हणे, ‘ देवा ! त्वां जन्मापासूनि सेविला धर्म ’
त्याचें हें फळ, नाहीं धन, मान, स्थान, यश, नसे शर्म. ॥५९॥
ज्यांसीं जैसें त्यांसीं तैसें जरि वर्ततासि, तरि अरि ते
हरिते कां सर्वस्व ? व्यसनीं आम्हांसि मग्न कां करिते ? ॥६०॥
न क्षत्रिय तूं, साधु ब्राह्मण आम्नाय पढविता, पढता,
मानधन क्षत्रिय या व्यसनें, ज्वलनें कटाहसा, कढता, ॥६१॥
राज्योपद्रव गेला, झाला अभिलषित लाभ अजिनाचा,
परमोत्सवीं उगे कां ? आजि ! गा, उडवा स्ववल्क, अजि ! नाचा. ॥६२॥
काय म्हणों तुज आर्या ! ब्राह्मणवृत्तीस काय अनुसरसी ?
त्यजुनि जळधिवसति कसी तिमिंगिळें सेविजेल तनु सरसी ? ॥६३॥
श्रेयस्कर स्वधर्म त्यागुनि घ्यावी न विप्रता पदरीं;
प्रकटी यशोर्थ, बुडवी न कधीं त्वत्समकवि प्रताप दरीं. ॥६४॥
हे आर्या ! हे भार्या, हे आम्हीं, योग्य काय वनवासा ?
वल्काजिनधर वससि, स्वस्थ कसा या वनांत न नवासा ? ॥६५॥
देतील राज्य न सुखें, धरिजे कितवोक्तिचा न विश्वास,
काळाचा हि भरवसा नाहीं, जो नित्य खाय विश्वास. ॥६६॥
द्वादश वर्षें गहनीं, स्वजनीं अज्ञात वर्ष तेरावें
लोटावें केंवि बरें ? दूरविचारें करूनि हेरावें. ॥६७॥
वसवेल कथंकथमपि आम्हां तप एक साजणां रानीं,
न कळत कसें वसावें तेजें विश्वांत साजणारानीं ? ॥६८॥
रविवरि अभ्रें तैसीं वस्त्रें तव विग्रहाउपरि मळकीं,
गुप्ता हि मृगमदातें प्रकट करितसे स्वयें सुपरिमळ कीं. ॥६९॥
अज्ञातवास करितां जरि आम्हीं अरिचरासि आढळलों,
स्वपदचरमसोपानापासुनि देवा ! न काय गा ! ढळलों ? ॥७०॥
चरमदिनीं हि उमगतां व्हावें वनवासनिष्ठ पुनरपि कीं ?
तो न द्रवेल सुजनीं, कल्पुनि काकत्व जेंवि कुनर पिकीं. ॥७१॥
मरती वनांत पडतां बा ! जेंवि न पावतां नदा यादें,
आम्हीं तसें मरावें, करिजेल न राज्यदान दायादें. ॥७२॥
सोडील कसा तीतें, जी देती नित्य लाभ नव धारणी ?
वध्य चि खळ, धर्म चि हा, चोराचा, दोषहेतु न, वध रणीं. ॥७३॥
भणगापरि न वस वनीं, म्हण गा ! बापा ! मनुष्यदेवा ! ‘ हूं ’
दे बाहूंस यश रणीं खळखळ खळरक्तपुर दे वाहूं. ॥७४॥
पुरुषाच्या शोभेला जें बळ खळविजय दे न नग दे तें,
हित सत्य, असें म्हणतां देवा ! किति मीं म्हणों ‘ न न ’ गदेतें. ॥७५॥
धर्म म्हणे, “ भीमा ! बा ! दुर्व्यसनी मीं च हेतु तापातें,
दुःखीं साश्रित हि बुडे, करितो जो मीलिताक्ष पापातें. ॥७६॥
तेव्हा चि क्षण निष्ठुर होवुनि हे मूर्तिमंत पाप कर
त्वां जरि केले असते भस्म, न होते तुम्हांसि तापकर. ॥७७॥
द्यूताला युद्धाला जावें चि बलाविल्या, प्रतिज्ञा ती
रक्षूं जातां, कपटें हरिता झाला पदाप्रति ज्ञाती. ॥७८॥
पूज्या मर्यादा, परि भ्याला कांहीं हि न शकुनी तीतें;
तो नावरे चि घातक दुर्जन जो होय वश कुनीतीतें. ॥७९॥
हे कृष्णा तरि झाली, तरलों त्या दुस्तरा हि आवर्ता,
बुडतों चि, या सतीचा महिमा जरि काय हात आवर्ता. ॥८०॥
दाटूणि अनुद्यूतीं आणुनि पण करविला पुनरपि, तया
लंघूं कैसें ? पाडी नरकीं जो अनृत तो कुनर पितया. ॥८१॥
प्राणांस तुम्हांस हि मीं त्यजिन, न धर्मासि पळ हि सोडीन,
हें व्रत धर्म चि रक्षू, बापा ! न कदापि अयश जोडीन. ॥८२॥
बा ! गा ! धर्माच्या तों कोण्हीं सोडूं नये चि कासेतें,
निष्फळ होती मेघें त्यजिलीं आलीं हि जींविका सेतें. ॥८३॥
अंभोदासि पहाती जैसीं पसरूनि नित्य ‘ आ ’ शेतें,
धर्मासि तसीं भूतें; करि पूर्ण समर्थ हा चि आशेतें. ॥८४॥
निजहितकरधर्माचें कुशळें विटवूं नये चि मन कांहीं,
यापरि पोषणपालनलालन करिजे न अन्यजनकाहीं. ॥८५॥
साधु म्हणति, ‘ जो न करी धर्मासीं नीतिसीं विरोधा, त्या
रक्षीं व्यसनीं, तदितर जन उदकीं लोष्टसा विरो, धात्या ! ’ ॥८६॥
म्हणवूनि अनुसरावें सुज्ञें न क्रोधलोभकाम - मता,
पतनार्थ कां अहंता पोषावी, गा ! तसीच कां ममता ? ॥८७॥
तुमचे प्रताप जे जे दिग्विजयीं प्रकटले न ते लटिके,
कुरुगुरुपुढें परि न गुरु, यज्ञांत घृतापुढें न तेल टिके. ॥८८॥
भक्षुनि अन्न न समयीं अंतर देती भले नयज्ञाते,
द्रोणकृप युद्धयज्ञा वरितील, तसे परा न यज्ञा ते. ॥८९॥
आम्हीं नियम त्यजितां, न चुकेल नदीज ही उगाराया,
त्या सर्वज्ञ प्रभुला बा ! कोण म्हणेल, ‘ गा ! उगा, राया ! ’ ॥९०॥
हे सर्व असोत, जया वीरप्रवरा सुयोध नत सारे,
एक चि कर्ण पुरे तो; कार्यपति जसा, सुयोधन तसा रे ! ॥९१॥
यांसीं कलि करणें हें न म्हणेल कधीं सुधी नर विहित रे !
धर्मन्याय त्यजितां तेजस्वी ही तमीं न रवि हि तरे. ” ॥९२॥
भीम उगा चि बसे, तों ये भगवान् व्यास सुप्रसन्नमनें,
जाणों साक्षाद्धर्म चि तो, ते झाले कृतार्थ तन्नमनें. ॥९३॥
दिव्यास्त्रलाभकारण सद्विद्या तो दयांबुराशि कवी
एकांतीं राज्ययशःकामा त्या श्रीयुधिष्ठिरा शिकवी. ॥९४॥
धर्म हि, मुनि गेल्यावरि, त्याच्या आज्ञेवरूनि जिष्णूतें
सद्विद्या उपदेशी, जैसा कश्यपमहर्षि विष्णूतें. ॥९५॥
ती काम्यकीं प्रतिस्मृति विद्या उपदेशिली तया विधिनें,
जी आपणासि जैसी दिधली द्वैपायनें दयानिधिनें. ॥९६॥
धर्म असें वदला कीं, “ जिष्णो ! सुतपें समस्त ताप सरे,
हो यास्तव आम्हां या व्यसनीं तारावयासि तापस रे ! ॥९७॥
या विद्यासामर्थ्यें तप करिताम सर्व विघ्न पळवील.
तुज दिव्यास्त्रें द्याया शक्रादिकलोकपाळ वळतील. ॥९८॥
ज्याचें भाषण सोडुनि बाळपणीं सुस्वरीं किमपि न रतूं,
त्या व्यासें कथिलें कीं, ‘ नारायणसख पुराणऋषि नर तूं. ’ ॥९९॥
करिशील महत्कर्में तूं नारायणसहाय शुभशील,
त्वद्यश म्हणेल, ‘ किति सुरधेनूधा ! सद्रसासि दुभशील ? ’ ॥१००॥
हो सिद्ध, शीघ्र ये, बा ! हे बाहु तुझे असोत जयशाली,
हो वृष्टि तपोभ्राची, बहु हृत्क्षेत्रीं पिकोत नयशाली. ” ॥१०१॥
भ्रात्यांतें भार्येतें जिष्णु म्हणे, ‘ जें अभीष्ट सत्वर तें
होईल सिद्ध, न चिरव्यसनीं बुडिजे कधीं हि सत्वरतें. ॥१०२॥
धौम्याच्या धर्माच्या क्षण हि चुकावें तुम्हीं न सेवेला,
गुरुचरणा यश जैसें स्वर्गींच्या हे तसें नसे वेला. ’ ॥१०३॥
मग जाय तप कराया गुरुपद वंदूनि इंद्रकीलनगा,
तद्विरहितां दिसे तम दिवसा, नसतां हि नेत्रमीलन गा ! ॥१०४॥
‘ येथें चि रहा ’ ऐसें गगन म्हणे त्या पुरातना ऋषितें,
प्राशी तपस्विवेष स्वर्नाथ तयासि दृग्द्वयें तृषितें. ॥१०५॥
शक्र म्हणे, ‘ कां धरिलें जें शस्त्र विरुद्ध तापसत्वा तें ?
शांतें येथ तपावें, लेश हि द्यावा न ताप सत्वातें. ॥१०६॥
क्षत्रिय कीं ब्राह्मण तूं शस्त्रपरिग्रह किमर्थ ? सांग मला,
त्वच्चित्ताला तापसविरुद्ध हा वेष योग्य कां गमला ? ’ ॥१०७॥
पार्थाचा दृढ निश्चय कळतां, दर्शन तयासि वासव दे,
खेदानंदाश्रुभंरें भिजवुनियां उत्तरीयवास वदे : - ॥१०८॥
‘ पुत्रा ! वर माग, तुला द्यावें म्यां काय गा ! यशोधीतें ?
जाणसि, जें प्रेम, मुखें वत्साचा काय गाय शोधी, तें. ’ ॥१०९॥
पार्थ म्हणे, ‘ दिव्यास्त्रें जीं वर मजलागि हा चि शोभन द्या;
तृषितासि यथाभिलषित जळ देती, न धरिती च लोभ नद्या. ’ ॥११०॥
इंद्र म्हणे, ‘ पुत्रा ! हें काशाला ? दिव्य भोग माग मला;
तुज जो अनर्थ केवळ अर्थ कसा पंडितोत्तमा ! गमला ? ’ ॥१११॥
पार्थ म्हणे, ‘ दिव्य हि जे सुखभोग नको चि, बा ! दयाभ्रा ! ते.
केंवि वनीं टाकावे ? वांछिति माझ्या हितोदया भ्राते. ॥११२॥
मज दिव्य भोग रोग चि, तें सुख जें काय दुःख शुद्धरणीं.
तो शव चि बंधुहृद्गतशल्याच्या जो न योग्य उद्धरणीं. ’ ॥११३॥
शक म्हणे, ‘ बा ! तुजसम तूं चि भला विश्वमहिततरशील;
व्यसनातें बंधूंसह निर्दाळुनि सर्व अहित तरशील. ॥११४॥
शंभुप्रति आराधीं, आधीं साधीं प्रसाद या अगमीं,
येईन लोकपाळांसह सत्कारावया तुला मग मीं. ’ ॥११५॥
ऐसें धनंजयाला उपदेशुनि गुप्त होय मघवा हो !
शिवभक्तियशःश्रवणें प्रेमाश्रुभरासमेत अघ वाहो. ॥११६॥