चिंतित होता विपिनीं तो धर्म सबंधु विप्रभव्यास,
तों त्यासि भेटि देवुनि धन्य करी शशिरविप्रभ व्यस. ॥१॥
व्यास म्हणे, ‘ वत्सा ! मीं झालों द्विजतर्पणें प्रहर्षित रे !
स्वल्प हि अन्न सुपात्रीं देवुनि सकुटुंब मुद्गलर्षि तरे. ॥२॥
जोडी सात्मजदार द्रोणमित व्रीहि पंधरा दिवसीं,
विधिवत् सेवी करवुनि पेज कण्या भत पानगे दिवसीं. ॥३॥
समयीं सर्व हि भक्षी दुर्वासा नाम विप्र सादा तें,
सत्वासि न टळतां तो भगवान् बहु दाखवि प्रसादातें. ॥४॥
सत्वासि न चुकले ते तरले, तरशील तूं हि, बारा या
सरल्या चि समा यापरि तेरावी ही सरेल, बा ! राया ! ॥५॥
व्यसनांत शीलवश जन तरला नळवश जळांत पाथरसा.
सोडी सत्वासि न शुचिगुण, तप्त हि जेंवि शुद्ध पाथ रसा. ’ ॥६॥
शिष्यायुतयुत भगवान् दुर्वासा गजपुरासि ये राहे,
सत्संगति सत्फळदा, सुज्ञासि पचे, पचे न येरा हे; ॥७॥
चित्र, छळ सोसुनि खळ मुनिभजनीं सर्वकाळ राबे, तें,
न विटे सत्सेवेतें जेंवि पिपीलिकसमूह राबेतें. ॥८॥
दास्यें प्रसन्न होउनि ‘ माग ’ म्हणे तो तपोनिधी राज्या,
जो देणार तशा ही सिद्धि, असुलभा तपोनि धीरा ज्या. ॥९॥
खळ त्यासि म्हणे, ‘ येथें जैसा झालासि अतिथि, सुतपा ! हें
शिष्यकटक घेउनि बा ! तो हि कुरूत्तंस पांडुसुत पाहें. ॥१०॥
परि सुकुमारी कृष्णा जेवूं द्यावी, जपोनि धेनु सती
दोहावी जाणा हें, सत्वमयी ती तपोनिधे ! नुसती. ’ ॥११॥
श्रोत्यांच्या व्हावें बहु तप्त प्राशूनि ज्या वरा कानें,
मागीतला तसा वर सद्गुरुपाशीं हि त्या वराकानें. ॥१२॥
तो मुनि ‘ अवस्य ’ ऐसें बोलोनि निघे, असाधुजन नाचे;
त्यातें पूजिति ते प्रियसख त्या यदुवंशविहितजननाचे. ॥१३॥
प्रार्थुनि धर्में मुनि तो स्नानासि सशिष्यकटक पाठविला,
त्या संकटीं सतीनें श्रितकल्पद्रुम मुकुंद आठविला. ॥१४॥
स्वमनिं म्हणे ती कृष्णा, “ श्रीकृष्णा ! धाव, पाव, नाश तदा
ह्रीचा होवूं न दिला, स्मरतें मज तें चि पावना ! शतदा. ॥१५॥
सत्य असो जें म्हणती कवि भवसिंधूंत नाव नामा तें,
संप्रति चुडे भरावे त्वां करुनि श्रितजनावना मातें. ॥१६॥
नेसविता झालासि प्रेमें तूं करुनियां दया लुगडीं,
आतां चुडे भरीं बा ! आश्रय मज एक तूं दयालु गडी. ॥१७॥
तुजहुनि इतरें कोणें वारावा क्षिप्र अंतराय महा ?
दंडील चि, साहेल न, देवा ! स्वल्पा हि अंतरा यम हा. ॥१८॥
मग मत्स्वरूप काय ? ब्राह्मण आले दुरूनि जेवाया,
त्यासि तुझी भगिनी हे, बा ! नमुनि जरि न म्हणेल, ‘ जेवा, या. ’ ॥१९॥
या मुनिकोपासि जसा लागे न पयाचिया उता वेळ,
श्रीकृष्णाजी ! तुम्हीं मजवरि करुनि दया चि या उतावेळ. ” ॥२०॥
स्मरतां चि ये प्रभु. दया सत्य सुरभि, भक्तवत्स लागावें
कासेसि याचिया चि, त्यजुनि सकळ, या चि वत्सला गावें. ॥२१॥
ते काय, जे न केवळ भक्तवश पुरंदरादि सुर भितरे ?
ती ही काय, न आपण ही जी व्यसनार्णवांत सुरभि तरे ? ॥२२॥
येतां चि दीनबंधुप्रति कळवी ती नमूनि आधींतें,
भगवान् म्हणे ‘ भुकेलों; सखि ! वाढ मला असो चि, आधीं तें. ’ ॥२३॥
कृष्णा म्हणे, ‘ अहा ! बा ! वाढावें काय ? गा ! पहा, हातें
क्षाळूनि घातलेंसे आतां कीं पालथें अहाहा ! तें. ॥२४॥
अन्न मदशनावधि रविदत्तस्थालींत, मग नसे लव ही.
त्वद्दृष्टि सर्व जाणे, यमधर्माची असी नसेल वही. ’ ॥२५॥
कृष्ण म्हणे, ‘ नर्म पुरे; तर्पाया योग्य सर्व थालीला;
मीं च नव्हें काय ? इची सखि ! सुरभिसखी च सर्वथा लीला. ॥२६॥
आण बरें, पाहों दे, ’ ऐसा आग्रह करूनि आणविली,
कृष्णेसि सत्सभेसि स्थालीस हि बहु दया चि जाणविली. ॥२७॥
त्या पात्राच्या कंठीं स्वल्प चि शाकान्न लागलें होतें;
सत्परिचयें चि जड ही समयीं सत्वासि जागलें हो ! तें. ॥२८॥
तो यज्ञभुक् तशा ही त्या शाकान्नासि वोडवी पाणी,
कृष्णेकरवीं आपण सांगुनि संकल्प सोडवी पाणी. ॥२९॥
प्राशुनि म्हणे प्रकट हरि, ‘ विश्वात्मा देव तुष्ट हो येणें; ’
हळुचि म्हणे, ‘ हे मुनि किति ? घेवुनि शतकोटि दुष्ट हो ! येणें. ’ ॥३०॥
कृष्णेसि म्हणे, ‘ बाई ! बाहुनि आणीव विप्रकटकातें. ’
ती सहदेवासि म्हणे, ‘ जा, जी ! क्षुधित मुनिवृंद हटका तें. ’ ॥३१॥
अधमर्षणीं च तो मुनि झाला आकंठ तृप्त सहसा, जे
शिष्य अयुतमित होते, गार्भिण्यापरि तयां हि सह साजे. ॥३२॥
जो तो हि पूर्ण चाळी विप्र यथापूर्व न वपु, ढेंकर वी.
तृप्ति, प्रतिपदिं ‘ सोडूं छळ ’ हा संकल्प नव पुढें करवी. ॥३३॥
हरिला स्वजन प्राणाधिक, तैसें वित्त ही न लोभ्याला.
चिंतूनि अंबरीषच्छळपरिणाम हि मुनींद्र तो भ्याला. ॥३४॥
ते शिष्य म्हणति, ‘ गुरुजी ! न सुचे, कर्तव्य काय तें कळवा. ’
गुरु त्यांसि म्हणे, ‘ मळवा यश, परि सत्वर पळा, मला पळवा. ॥३५॥
म्यां आजिपासुनि शपथ करुनि नमस्कार सच्छला केला,
दृग्घित न विशशलाका, टाकुनि कर्पूरसच्छलाकेला. ॥३६॥
झालों गुरूदर जशा अत्यासन्नप्रसूति गरवारी,
सच्छळकर्म स्वल्प हि सद्यःक्षयहेतु जेंवि गर - वारी. ॥३७॥
अस्मदुदरें सदन्नें न कळत अघमर्षणीं च कीं भरिलीं;
विश्वंभरें सुरद्रुमचिंतामणिकामधुग्यशें हरिलीं. ॥३८॥
काय गिळावें आतां ? मज एक हि तुहिनपर्वताभ सित;
मीं किति ? करील कृष्णाकोपानळ तुहिनपर्वता भसित. ॥३९॥
त्या श्रीमदंबरीषाहुनि धर्म तपोबळें नसे ऊन,
हा ! मीं मंद चि केवळ, सच्छळगरळा जळेण सेऊन. ॥४०॥
त्या पांडुसुतांमध्यें भीम महात्मा उदार बळसत्वें;
चारील मुष्ठिमोदक, आतिथ्यासि न चुकेल अळसत्वें. ’ ॥४१॥
ऐसेम म्हणत चि पळतां प्रबळ भय चि होय बळद दुर्वास्या;
भासे लंबोदरसा तो, गळत्या तज्जटा हि दूर्वास्या. ॥४२॥
बंधुकथित तीर्थतटगविप्रश्रुततत्पलायनोदंत
मोही धर्मा; अहिचा शिरला हृदयांत काय तो दंत ? ॥४३॥
धर्म म्हणे, ‘ येईल स्पष्ट निशीथीं छळार्थ दुर्वासा,
त्या दावाग्निपुढें या स्त्रीतनुसह मूर्ति शुष्क दूर्वा सा. ॥४४॥
त्वद्दास होय हा जन, बा ! शुद्धदयासुधानदा ! साचा,
सेवासादर असतां, छळ योग्य तुला बुधा ! न दासाचा. ’ ॥४५॥
झाला होता सानुज तो राजा धर्म चित्रसा साधी;
सुयश, निशीथीं भेटुनि भक्ताम पद्मांसि मित्रसा, साधी. ॥४६॥
देव म्हणे, ‘ मीं आलों कृष्णेपासीं मघाम चि, मज्जन हो !
चिंततसें कीं, स्वप्नव्यसनीं हि क्षण तुम्हां न मज्जन हो. ॥४७॥
कृष्णाचिंतेनें हें संकट मज कळविलें, अगा राया !
आलों संरक्षाया धांवत मीं आपुल्या अगारा या. ॥४८॥
जरि तेजस्वितपस्विप्रवर छळशील दुःसह त्रिजगा
भ्याला त्वत्तेजाला, धर्मा ! गेला पळोनि अत्रिज गा !. ॥४९॥
अनळसमीहित साधी राया ! वारा महीवरा ! कामा,
अनळस मीं हि, तसा धीरा ! यावा राम ही वराका मा. ’ ॥५०॥
ऐसें बोलोनि करी स्वजनघनश्रीद यान दीपकसा,
भक्तांसि उपेक्षील व्यसनीं तो श्रीदयानदीप कसा ? ॥५१॥
कीर्ति न देता, देता जरि म्हणता श्रीमदत्रिज ‘ गदा द्या. ’
सोसे स्वच्छळ, न सुहृच्छाळकतपःश्रीमद त्रिजगदाद्या. ॥५२॥
धर्म म्हणे, ‘ मतिमति ! सति ! संसारामाजि अन्य कुणगा तों
केवळ अनिष्ट, परि हा बहु धन्य तुझा म्हणोनि गुण गातों. ॥५३॥
तुजविण न दीपिके ! सति ! कृष्णे ! तरतों नयज्ञ हि तमातें;
करितों जर्हि, तर्हि गमती कृष्णेतर तों न यज्ञ हित मातें. ॥५४॥
देव तुझा कैवारी, शुद्धें प्रेमें तुझ्या चि वळला गे !
दे धेनु दुग्ध धावुनि वत्सा, इतरा तदर्थ बळ लागे. ’ ॥५५॥