सुदिनीं रघुसिंह निघे माराया त्या दशाननगजातें;
प्रभुचा क्षम होय चुरुनि कर द्याया दुर्दशा न नग ज्यातें. ॥१॥
तो उत्तराब्धि जाणों जातो त्या दक्षिणाब्धिवरि, त्यातें
जिंकाया, दुष्टातें आश्रय देवुनि कुकीर्तिवरित्यातें. ॥२॥
स्वप्नांत सिंधु सांगे, ‘ नळवानर विश्वकर्मसुत, राया !
रामा ! तो सेतु रचू, हा कीर्तिप्रद उपाय उतराया. ’ ॥३॥
प्रभुच्या आज्ञेनें नळ सेतूतें, धरुनि अनळसत्व, रची;
तो सिद्ध होय जगदघराशींचा मूर्त अनळ सत्वर चि. ॥४॥
तेथ बिभीशण राक्षस नमुनि म्हणे, ‘ बा ! पराघ वाराया
तूं चि सुतीर्थ नता मज; तूं माता बाप राघवा ! राया ! ’ ॥५॥
शरणागत अरिबंधु हि रामें प्रेमें चि घेतला पदरीं’;
खळदत्तीं अमृफळीं न प्रभुरुचि, बहु सदर्पितीं बदरीं. ॥६॥
‘ सुग्रीव पांचवा, बा ! गुणरंजितसर्वसत्सभा ! सावा,
तूं बंधु, न कोण्ही ही दीन सुधी सुरभिवत्स भासावा. ’ ॥७॥
ऐसें पूजुनि त्यातें प्रभु लंकाराज्य दे, न वेदा ते
गुण वर्णवती, ज्यांहीं लाजविले बहु जुने नवे दाते. ॥८॥
शतयोजन आयत दशयोजन विस्तीर्ण सेतु शंकेतें
दे, गेला बुडवाया कोपाकुळ भूमिबाहु लंकेतें. ॥९॥
किंवा तो कपिकटकोत्तरसिंधूद्गत बुभुक्षु कालाही
दूर पसरला खाया रात्रिचरां क्षुद्र बेडकांला ही. ॥१०॥
सेतु न तो यत्पतिनें स्वसुता नेली, जसी वृकें एणी,
त्या लंकेची श्रीभूदेवीनें ओढिली असे वेणी. ॥११॥
रामजयश्रीलग्नीं लंका घाली सुनीळ पाटवें,
सेनावर्हाडणींला पायघडी कां असें न वाटावें ? ॥१२॥
बहुधा तुच्छ जलधितृण चाटायाचा धरूनियां वीट,
गेला प्रभुप्रतापासितपथ रक्षोटवीकडे नीट. ॥१३॥
कीं पतित पति त्यागुनि विश्वशरण्याकडे रडत वाटे
आली जी लंकाश्री तीचा तो सांजनाश्रु पथ वाटे. ॥१४॥
कीं चिरलें स्वापयशें शोकानळदग्ध सागरोर चि तें,
सूचविले तर्क असे त्या सेतुवरें महासुधीरचितें. ॥१५॥
प्रभु सेतुपथें उतरुनि शत्रुकदे वाळिसूनुला धाडी,
कीं कोण्हीं न म्हणावें ‘ न कळत जावूनि घातली धाडी. ’ ॥१६॥
जावुनि सभेंत अंगद दशकंठातें म्हणे, “ अगा राया !
आलों अखिलप्रभुवररामाज्ञेस्तव तुझ्या अगारा या. ॥१७॥
श्रीमद्रामप्रभुची आज्ञा आहे असी, परिस तेतें,
‘ हरिति यशोर्थ पराच्या श्रीतें, न स्पर्शती परि सतीतें. ॥१८॥
येणें क्षयपात्र अमृतकर हि, कुदशदेह देव मघवा ही,
आपण चि भारवाही बुडतो, बुडवी कुळा हि अघवाही. ॥१९॥
दीपकलिकेसि द्याया आलिंगन जो करी पतंग जवा,
तो वा तूं ? सिंहीला लातेनें हाणिता मतंगज वा. ॥२०॥
होउनि तूं व्याघ्रव्रतपर चरचर न बहु मानवां चावें,
कुलजें धरूनि चितीं नयलयभय सबहुमान वांचावें. ॥२१॥
न कुरीतीतें हृदयीं ठेवीं, टाकूनियां सुरीतीतें,
ईतें चि सुधाधारा बुध म्हणती, रावणा ! सुरी तीतें. ॥२२॥
भक्षिसि नरमांसातें, हा पापा ! प्राशिसी सुरेतें कीं !
हा ! रे ! भ्रष्टा ! घडलें तुज जन्म महर्षिच्या सुरेतें कीं ! ॥२३॥
धरिली असेल असती जी रीति, तसी च जी सुरी तीतें
त्यज, तुज बहु सुख व्हाया देतों मीं आपुल्या सुरीतीतें. ॥२४॥
सीतेपरीस हि मला र्पीति असे फार साधुरीतीची,
ती देतों चि तुज, पहा आधीं सेवूनि माधुरी तीची. ॥२५॥
नाहीं च तरि हठें तूं देणार प्राण, मद्यपा ! हूं, दे;
त्वद्दुर्दशा पहाया बहु इच्छिति, त्यांसि सद्य पाहूं दे. ’ ” ॥२६॥
खळ ‘ मारावें चि ’ म्हणे, कथितां चि सुखावहा निरोपातें;
हतभाग्य कां म्हणेना हो सुरतरुच्या हि हानि रोपातें ? ॥२७॥
मधुपांसि बहु प्रिय जो आत्मप्राणव्रजासम स्तबक,
सकळरसिकप्रिया त्य न ढुकोन हि पाहती समस्त बक. ॥२८॥
झोंबति राक्षस चौघे त्यतें काळाहि जेंवि खगपातें,
त्यांतें उडोनि झाडी, झाले ते चूर्ण जेंवि नगपातें. ॥२९॥
तें ऐकतां चि राम स्वसहायांतें म्हणे, ‘ उठा, राहो
नाम चि शेष खळांचें, विस्मय भार्गवसखा कुठारा हो. ’ ॥३०॥
कपि एकदा चि ‘ जयति श्रीरामो जयति लक्ष्मणो ’ म्हणती,
रनतीव्रयत्न ते त्या लंकवरणासि लाविती खणती. ॥३१॥
टंकघनाधिक त्यांचे खग कूर्पर दंत नखर गुडघे ते
तन्न्यून चि, दुष्काळीं जे राशीचा लुटोनि गुड घेते. ॥३२॥
लंकेवरि कपिसेना, सेतावरि टोळधाडसी, पडली.
मधु प्यावया पिपीलिकपृतना कीं स्वर्णभाजनीं जडली. ॥३३॥
वाटे पिपीलिकावृतभोगा ती होय आकुळा व्याली,
न पुरी न कटककोपें उग्रा गरळाग्निच्या कुळा व्याली. ॥३४॥
क्षोभे साखिलखलबल रावण सभुजगसमूह तक्षकसा,
हृतदार गरुडसा प्रभु होय न तद्दर्पभंगदक्ष कसा ? ॥३५॥
दशकंठ म्हणे, ‘ झाले गज मर्कटनखरभग्नकट कटकीं,
नर वानर तुच्छ म्हणत होतों, परि माजली च कटकट कीं. ॥३६॥
मद्भटलक्ष हि वारूं न शके एका हि माकडा, गमला
मद्विक्रम तुच्छ नरा, शिवला हा जेंवि काक डाग मला. ’ ॥३७॥
चिंतुनि ऐसें उठवी घटकर्णालागि तो उपाय शतें,
सांगुनि वृत्त म्हणे, ‘ बा ! रक्षावें त्वां चि यातुपा ! यश तें. ’ ॥३८॥
घटकर्ण म्हणे, ‘ चिंता न करावी गा ! समस्तयातुपते !
नर वानर जे आले, उद्दीपक या धनंजया तुप ते. ॥३९॥
म्हणसी, एक चि गेला जाळुनि लंकापुरास माकड बा !
निजलासि तूं हि ? हूं ! कपिकोटि हि मज सिंधुरासमा कडवा. ॥४०॥
वाटे नवल, व्याघ्र हि भ्याला निजकाननांत ओतूंतें,
जावूं, प्रदीप्त होवूं, कपिबळघृत आननांत ओतूं तें. ’ ॥४१॥
आज्ञा घेउनि निघतां, भसे तो प्रलयकाळपावकसा,
कपि म्हणति, ‘ दयामेघा ! श्रीरामा ! शीघ्र वर्ष, पाव कसा. ’ ॥४२॥
त्यातें वेष्टुनि ताडिति कपिकोटी जेधवां अगनगानीं.
तैं कोटिहोम होतो ऐसें क्षण भाविलें गगनगानीं. ॥४३॥
शतशः प्लवंग गटगट गिळितां न म्हणे, ‘ नको ’ पलाशमन;
त्या पापिकुंभकर्णापरि केव्हां ही न कोपला शमन. ॥४४॥
ते मृतिभीत पळाले कपि ज्या घटकर्णनासिकेवाटे
ती प्राणावनधर्मा प्राणविहितवर्णना सिके वाटे. ॥४५॥
भयकंचुकासि, धरिताम घटकर्णें प्लवगराय कपि ल्याला,
सोडवि लक्ष्मण, मारुनि हरिसि जसा पक्षिनायक पिल्याला. ॥४६॥
मग रामलक्ष्मणांवरि ये रावणपुत्र जो अविप्रहित,
व्याघ्रांवरि मत्त जसा, मतीं तत्स्वामिनें अवि प्रहित. ॥४७॥
तो इन्द्रजिन्महाबळ मायावी, जेंवि दुष्ट राहु, निघे;
प्रभुपुष्पवत्प्रभेतें कपटें गगनांत गुप्त राहुनि घे. ॥४८॥
श्रीरामलक्ष्मण प्रभु त्या इंद्रजितें शरव्रजें खिळिले,
अद्भुत, मोहाजगरें जे होते दिग्गजेंद्रसे गिळिले. ॥४९॥
केले बिभीषणें प्रभु मंत्रौषधिनें विशल्य ते, ज्यांचें
नाम चि करि पाण्याहुनि पातळ यश भास्करादितेज्यांचें. ॥५०॥
श्रीराम दिव्यदृष्टिप्रद धनदप्रेषितांबुनें नयनें
प्रक्षाळी अनुज्याचीं मग जीं दिव्यांबुजप्रभाजयनें. ॥५१॥
मग सुग्रीवहनूमज्जांबवदंगदमुख स्वनेत्रास
तें दिव्य तोय लावुनि, देति खळांला जयस्वनें त्रास. ॥५२॥
प्रभुला बिभीषण म्हणे, ‘ पावेल जया न रावणि कदापी,
निजकपटज्ञा पाणी जोडी, भोळ्या नरा वणिक दापी. ’ ॥५३॥
कळवुनि पित्यासि निजजय येतां पाहून मेघनादा त्या
कपिबळ नाचे वेष्टुनि, नटतें शिखिकुळ गमे घना दात्या. ॥५४॥
क्षुब्ध असें ही पाहुनि आसादी तर्तुकाम रावणि ज्या
तो श्रीलक्ष्मण बुडवी त्यासि जसा सिंधु पामरा वणिजा. ॥५५॥
सौमित्रिनें, त्रिनेत्रें स्मरसा, सुत नामशेष केला, हें
परिसुनि दशवदन म्हणे, ‘ तूं हि मरण भूमिकन्यके ! लाहें. ’ ॥५६॥
खङ्गासि म्हणे, ‘ त्वदधिक कोण्ही ही प्रिय मला असेना च.
चाल, प्राशुनि सीतागलगलदसृगासवा असे ! नाच. ’ ॥५७॥
सीतेवरि जातां तो दे लाज पिसाळल्या हि कुत्त्यातें,
‘ मेल्या ! रांड तुझी हो ’ ऐसें शापी हळू च कु त्त्यातें. ॥५८॥
साधु अविंध्य निशाचर त्यासि म्हणे, ‘ वात कायसी तेला
हरितां ? करितां पतिचा मारीना घात काय सीतेला ? ॥५९॥
शक्रा ! त्वद्बाहूची जेंवि हरीची इभा गमे लीला,
मारूं पाहसि काय प्रभु तो तूं भूरिभाग मेलीला ? ’ ॥६०॥
आलें मनास तें, मग पाप परतला, न जाणतां महिम्या,
वाटे मत्ताख्यु म्हणे, ‘ खवा स्वकुळासि भक्षिता अहि म्या. ’ ॥६१॥
मत्तेभरद म्हणे हित जैसा बालिश सपाम, रामरण
हित मानी रावण; कीं, पाडी भ्रांतींत पामरा मरण. ॥६२॥
गांठिति त्या कपिकटका खळसेना, जेंवि वह्निच्या पुंजा
गुंजा, तो हि खळमणि प्रभुला, श्रीनृहरिला जसा मुंजा. ॥६३॥
बैसुनि शक्ररथीं करि विजयश्रीकेलिकुंज राम रण.
तद्दैव हि अनुमोदन दे, द्याया यातुकुंजरा मरण. ॥६४॥
करि कपटशत, असो तें, दंडहताहीस न क्षमा यावी,
बहुसंख्य रामलक्ष्मण निर्मी तो मोहदक्ष मारावी. ॥६५॥
श्रीरामरावणसमर होय श्रीरामरावणसमरसा,
ते वृष्टि जसी न करिति तसि शुचि सशकाररावण समरसा. ॥६६॥
गाईंस गोपसे, कपिसेनांसि दशास्यसायक वळीती,
जाणों न वानरचमू मिटक्या देवूनि साय कवळी ती. ॥६७॥
जिंकील न आत्मगुणें गिळुनि सितायुक्त साय काक पिकां,
खळ निजयशा तसा, हें समजुनि भीतील सायका कपि कां ? ॥६८॥
प्रबळदशवदनखरशरनिकरें सुग्रीवकटक वितुळे, तें
कथितां योजिल दृष्टानिलबलभिन्नाभ्रघट कवि तुळेतें. ॥६९॥
त्या प्रभुपुढें समर्थें झालीं न स्वावनीं चमूकवचें,
तीं हास्यफळें चि जसीं देवगुर्समक्ष नीचमूकवचें. ॥७०॥
उपदेशांहीं खंडी उग्रा मोहासि जेंवि कपिलास्य,
तेंवि प्रभु धनुइषुहीं अरिला, तैं करिति हृष्ट कपि लास्य. ॥७१॥
त्यास श्रीराम म्हणे, ‘ रे मंदा ! सर्वरक्तपापसदा !
बाप सदाचारी त्वां लाजविला कीं करूनि पाप सदा. ॥७२॥
प्राण तुझे स्वपराहित पळ ही रक्षोधमा ! न वांचावे;
चाविसि जसा खळा तूं, खळ हि अहि तसा न मानवां चावे. ॥७३॥
कामरता ! मर, पामर सामरसामरसदाप्तलोकातें
मानुनि अहित अहितसा क्षोभे, कीं पावणार शोकातें. ” ॥७४॥
ऐएं वदोनि, वधिला तो ब्रह्मास्त्राभिमंत्रितें रोपें,
सोपें पडलें, बहुधा केलें प्रभुसाह्य जानकीकोपें. ॥७५॥
वैद्युतवह्निविमर्दित विटपिवर तसा खचे महाकाय,
सुर म्हणति, ‘ अहा ! झाली दोषें याची हि गति पहा काय ? ’ ॥७६॥
सर्वांहीं गणिला तो जयकाळ श्रावण प्रसूनगणीं;
क्षणभरि फल्गुन न असें स्वसुनांसह रावणप्रसू न गणी. ॥७७॥
करिती रावणतनुला आलिंगुनियां विलाप बहु विधवा;
ते सकळ एकविध वा सुश्रोते हो ! असोत बहुविध वा; ॥७८॥
विस्तरभय नसतें तरि वर्णाया काय सुकविला परवा ?
प्रभुच्या हि वर्णिति श्रीवाल्मीकिव्यासशुक विलापरवा. ॥७९॥
ज्या पापें सुरवानरकृतघनजयरव मुहूर्त लोपविला,
खळदारविलापरवा कां वर्णिल कविमयूर कोपविला ? ॥८०॥
लंका बिभीषणकरीं देवुनि, द्यायास तीस सुख, निरवी,
जसि अंधकार नाशुनि सुनृपकारीं दे सुरत्नसुखनि रवी. ॥८१॥
जीच्या सुव्रततेजें कंपित व्हावें सदा सदूरूनीं,
त्या जानकीस विनवी सदमात्य अविंध्य दास दुरूनीं - ॥८२॥
‘ रक्षुनि सुगळ बिभीषण जेणें स्वयशें सलज्ज शिबि केला,
माते ! त्या स्वपतिकडे चाल अधिष्ठूनि शुद्ध शिबिकेला. ’ ॥८३॥
वत्सला सुरभीसी जी निजदासासि पावणारी, तें
अनुमोदी, मग नेउनि कळवी तो साधु रावणारीतें. ॥८४॥
जनसंग्रहार्थ तो श्रीराम प्रभु कपटमानव सतीस
बोले, “ विलोकितों तुज जरि तूं परमंदिरीं न वसतीस. ॥८५॥
रिपु मारुति सोडविलें कीर्त्यर्थ चि तुज, न देवि ! भोगाया,
कीं नमुनि ईश्वराला ‘ यश चि ’ म्हणति सुजन ‘ दे विभो ! गाया. ’ ॥८६॥
परकरग स्वकलत्र स्पर्शें चि महायशासि वाहवितें;
कोण प्राज्ञ म्हणेल, श्वा सिवला ज्या तशा सिवा हवितें ? ॥८७॥
जा स्वैर, म्हण स्त्रीच्या, ‘ सुखदे ! हो सुप्रसन्न, ’ मोकळिके;
जी चुंबिली भुजंगें मधुप म्हणेल चि तिला ‘ नमो कळिके ! ’ ” ॥८८॥
असि अप्रियोक्ति कर्णीं, भूपृष्ठीं ती हि एकदा चि पडे,
प्रभुला पाहों न शकति कपि डोळे जेंवि भानुला चिपडे. ॥८९॥
चित्तीं म्हणे प्रभु, ‘ अहा ! पडली सहसा गरांत मज्जाया.
वदलों असें कसें भूलोकांसह सागरांत मज्जाया ? ॥९०॥
सावध होवूनि करिल जरि लोकप्रत्ययार्थ हे शपथ
प्राणप्रियेसह सुखें आतां चि धरीन मीं स्वदेशपथ. ’ ॥९१॥
सुर म्हणति, ‘ सती मोहें मुखिं भरिली आपल्या पहा रे ! तें. ’
विधि शिव म्हणती, ‘ अजगर गिळिल कसा तापल्या पहारेतें ? ’ ॥९२॥
जेंवि व्यसनीं त्रिजगन्नाथस्मतिचा धरी करीश पथ,
ती तेंवि सत्य धर्मस्मरणपरा जानकी करी शपथ. ॥९३॥
‘ चुकयें असेन तिळभरि तरि शापावें मला सतीव्रातें.
भुजगीतें कीं तुमच्या भुजभुजगातें शिवेन तीव्रातें. ॥९४॥
स्वप्नीं हि तुम्हांहुनि पर पुरुषीं गेलें असेल हें मन, हो !
तरि युष्मच्चरणरजःस्पर्शें मद्देहलोह हेम न हो. ॥९५॥
मळलें असेल हृदय स्वसतीव्रतनियमलेशभंगोहें
प्रभुजी ! तरि मन्मस्तक आतां चि तुम्हांसमक्ष भंगो हें. ’ ॥९६॥
करितां शपथशत असें वाय्वग्निप्रमुख देवता म्हणती,
‘ श्रीरामा ! सीतेतें करिति, करितिल हि महासती प्रणती. ’ ॥९७॥
विधिहि म्हणे, ‘ असि कुलजा अर्पुनि वपु तुजअशाहि कुलतिलकीं
परतेल काय ? ऐकुनि हें साध्वींचीं उरें चि उरतिल कीं. ’ ॥९८॥
तों दिव्यविमानस्थित दशरथ हि म्हणे दशाननारीतें,
“ वत्सा ! सतीव्रतबळें ग्रासी कष्टा दशा न नारीतें. ॥९९॥
सीता महासती हे म्हणुन चि तरलासि तूं हि सदरींतें,
जें सर्वव्यसनौषध सद्व्रत आहे इच्या चि पदरीं तें. ॥१००॥
सुर मज म्हणति ‘ सदा निजसद्गतिदव्रतपरा सुनेला गा, ’
कोण न यमदूतांहीं शोकें होतां परासु नेला गा ! ? ॥१०१॥
बा ! हे जर्हि खळरुद्धा शुद्धा चि सदा सती, अगा ! ईतें
त्याच्या म्हणसि तरि यवनकृतरोधें त्यजिति कां न गाईतें ? ॥१०२॥
रामा ! बा ! माज्या, हे साध्वी साध्वीड्यसद्गुणा सुहिता,
मेघें शंपासी त्वां अंकीं घ्यावी नृपर्षिची दुहिता. ॥१०३॥
भरत रिपुघ्न प्रियसख सचिव सकळ भृत्य पौर गौरवुनीं,
पाडीं गुणें उणें, जें छत्र सुधास्रावि चंद्रगौर उनीं. ॥१०४॥
होवूं न दिलें सत्यभ्रष्ट तुवा स्त्रीजितास मज साधो !
साधोरणा गजीसी, त्वद्युक्ता श्री असो, सुयश साधो. ॥१०५॥
सीता चि न त्रिलोकी हर्षविली त्वां दशाननवधानें,
या त्वच्चरितश्रवणीं न टिकावें क्षण अघें अनवधानें. ” ॥१०६॥
गुरुदेववाक्य मान्य श्रीराम करी, सतीस घे अंकीं,
अंकीं गण्य न तें सुख, ये बहु मालिन्य इंदुच्या अंकीं. ॥१०७॥
वृत्रारि अमृतसेकें उठवी विगतासुकीशकटकातें,
दे देव देवराया यश, दुर्घट काय विश्वघटका तें ? ॥१०८॥
श्रीमार्कंडेय म्हणे, ‘ कपि उठले ब्रह्मदेववरदानें,
हो ! त्यासि दिलें यश त्या प्रभुनें सब्रह्मदेववरदानें. ’ ॥१०९॥
राम म्हणे, ‘ त्वां चि दिली त्रिजटे ! म्हणतों तुला चि वशुधा मीं;
तव उपकार फिटेसें धनदाच्या ही नसेल वसु धामीं. ॥११०॥
फेडील कोण भाग्यें या सीतादानसूपकारातें ?
केलें सुधाप्रदें जें न घडे चि नळा हि सूपकारा तें. ’ ॥१११॥
ऐसें चि अविंध्यास हि पूजी, कीं नित्य त्या चि दोघांहीं
व्यसनीं वांचविले प्रियदार, जसे जीव मुच्चिदोघांहीं. ॥११२॥
सीता म्हणे, ‘ हनूमन् ! त्वद्गत सेतुत्व हें न मज्जनकीं
घडतें चि, भेटतासि न तरि मज विपदर्णवांत मज्जन कीं. ॥११३॥
तूं धन्य महाभागा ! बा ! गा ! भागा तुझ्या चि यश आलें,
झालें होतें मद्वपु दशवदनीं घस्मरीं जसें आलें. ॥११४॥
यांच्या कीर्तिसुधासरिदुदरीं स्वानंदमत्त मासा हो;
त्वद्विरहातें क्षण हि न सिद्धहृदय साधुसत्तमा ! साहो. ॥११५॥
भजतील मत्प्रसादें सर्व हि तुज दिव्य भोग संतत रे !
त्वद्भक्तिनें तरो जन, हरिहरभजनें जसा चि संत तरे. ’ ॥११६॥
श्रीसीतावासल्यें त्यजिली च असेल अंजना भानें,
सीता ही लाजविली बहुधा नररूपकंजनाभानें. ॥११७॥
सुग्रीवप्रमुखांसह बैसे श्रीराम पुष्पकविमानीं,
त्यासि सकुलालिवरसमधिष्ठित दिव्यद्रुपुष्प कवि मानी. ॥११८॥
राम म्हणे, ‘ पावाया शुचिसुकृतनिवासमानसे ! तूतें,
तरलों व्यसनीं या अवलंबूनि शिवासमान सेतूतें. ॥११९॥
त्वत्पुण्यें टिकला सति ! येणें सिंधूंत पळ हि न तगावें,
शतगावें कीं हो हा, विश्वें होवूनि यासि नत गावें. ॥१२०॥
पाहुनि यासि न वदलों कीं कैसा भेततो खळप हा ! हा !
जेणें सेतु विरचिला नमितो तुज देवि ! तो नळ पहा ! हा ! ॥१२१॥
सुगळादि राबले बहु, न दुकाळीं तेंवि रंक राबेल,
अर्पिति नळा नग, जसे बुध शिवरात्रींत शंकरा बेल. ’ ॥१२२॥
ऐसें मनःप्रियेसीं बोले विरहोत्थमानसाधीतें,
कळवुनि साधावें जें तत्प्रिय देवूनि मान साधी तें. ॥१२३॥
प्रभु बोळवी चमूंतें बहु पूजुनि, पितर जेंवि कन्यांतें,
दृष्टांत एकदेशी, ठावें तत्प्रेमें काय अन्यां तें ? ॥१२४॥
मग किष्किंधेंत म्हणे, स्वकरें स्पर्शोनि अंग, दासा हें,
‘ हा यौवराज्यभर या सुग्रीवसुखार्थ अंगदा ! साहें. ’ ॥१२५॥
धन दे, परि तात न दे बहु आवडत्या हि अंग दायादा;
ततुल्य कसा प्रभु, जो साक्षादम्रुताब्धि अंगदा यादा ? ॥१२६॥
त्या श्रीकर तीर्थपद प्रभुचा दे भाग्य आयतें पाणी,
जें पंककारण अधोगति ज्या देईल काय तें पाणी ? ॥१२७॥
पुत्रासि म्हणे, “ म्हणत्ये मज सीता, ‘ चाल, सिद्ध हो, तारे ! ’
परि लाजे मन, वदल्यें बहु कटु, जैं नाथ विद्ध होता रे ! ” ॥१२८॥
अंगद म्हणे, ‘ सदरिलां करितो सोडूनि भल्ल भस्म रणीं,
नमितां, न रत अघांच्या, हा सीताप्राणवल्लभ, स्मरणीं. ॥१२९॥
लोकीं धन्यत्वप्रद या प्रभुचे पाय हे तुम्हा तारे !
यांपरि न सुखद होती पति अथवा कायहेतु म्हातारें. ’ ॥१३०॥
‘ बा ! हूं, चाल, शिरोब्जें वाहूं रामप्रसूपदीं, राहूं,
पाहूं अभिषेकोत्सव, लाहूं सुख, सवतिला हि दे बाहूं. ’ ॥१३१॥
सीतेसवें विमानीं बसतां मानी पुरास दव तारा,
न निवे, न भुले कोण, प्रेक्षुनि त्या कापुरा सदवतारा ? ॥१३२॥
चढली अजा गजशिरीं, फळली सदमृतफळें चि कटुंतुंबी,
तें हें चि, जें कवि म्हणति ऐसें विधुला पिपीलिका चुंबी. ॥१३३॥
दावी प्रियेसि अग नग गगनग खग रथ वनें नद नद्या या,
बहुवर्णनीं अनुज्ञा भरतस्मृति मज न दे वदन द्याया. ॥१३४॥
श्रीराम म्हणे, ‘ वत्सा ! अक्षारे ! शीघ्र धाव, बापा ! हूं;
करितोसि कसें व्यसनीं रक्षुनि भरतासि नांव बा ! पाहूं. ॥१३५॥
आलों म्हण, भरताचें वपु पावो सुमहिमा नव पुन्हा तें,
होय रुचिर न कसें जें अमृघनें दह्यमान वपु न्हातें ? ॥१३६॥
मागें पित्यासि सांडी जर्हि त्यासि असे सदा सवे गमनीं,
आपुलिया चि बसे तो पंडीत जाणो तदा सवेग मनीं. ’ ॥१३७॥
श्रीराम चंद्र, त्याचा कर तो कपि सर्व ताप वाराया
धावुनि भेटे व्यसनीं भरतशिशुचकोर तूर्ण ताराया. ॥१३८॥
‘ आला सदार सानुज कुशली श्रीराम जो स्वजन - कवच, ’
ऐसें वदे पवनसुत, वाटे भरतासि तें स्वजन - वच. ॥१३९॥
प्रेमें भुलला नसता भरत कपि हि रामपदरजप्रवण
तरि राज्यपारितोषिक देतां घेतां हि वारिता कवण ? ॥१४०॥
‘ आला श्रीराम ? ’ असें भरत पुसे पांचसातदा साचें;
उत्तर हि तसें चि करी आवृत्ती पांचसात दासाचें. ॥१४१॥
जाणों निववायास्तव तो चातक होय दाससा मोरा,
बोधुनि घेउनि गेला सांभाळुनि तोयदास सामोरा. ॥१४२॥
प्रभुकारुण्य चि धांवे होउनि पुष्पकविमान भरभर तें,
कीं व्हावें न व्याकुळ वाहुनि दुर्वाह्य राज्यभर भरतें. ॥१४३॥
भेटि प्रभुभरतांची स्मरतां चि श्रोतृकोटिला निववी,
जिववी मृताम सुधा जी तीस इचें यश इच्या पदा शिववी. ॥१४४॥
जो पीडिला रडविला देउनि माथां स्वराज्यभर तातें,
तदधिक कसा नव्हे प्रभु, जो दे सुख, हरुनि भार भरतातें ? ॥१४५॥
मज वर्णवेल तें सुख अथवा वदवेल काय हो यश तें ?
कीं जें अपार तेथें गुरुशेषांच्या हि काय होय शतें ? ॥१४६॥
जसि अब्जिनी प्रमुदिता उदितार्कातें विलोकितां होती,
तसि हर्षली अयोध्या पाहुनि रघुवंशभूषणा हो ! ती. ॥१४७॥
पावे चंद्रें हि तसें कुमुद न, अर्कें हि तोख राजीव,
मज हें कळे कळेवर वरपुर तें, राम तो खरा जीव. ॥१४८॥
जाणों केलें येणें शुष्कसरोमीनसन्निध नदानें,
धनदानें सुखवाया कीं केवळ निर्धनांसि धनदानें. ॥१४९॥
न पुरी प्रकाशिली, भू प्रभुरविनें हरुनि अंधकारा ती;
आला जाणों दीनोद्धारोत्धुर सांब अंधकाराती. ॥१५०॥
कर्दमशेषसरीं जों व्हावें व्यसु शुष्ककाय यादानीं
तों जाणों घन वर्षे, पुण्य यश स्वल्प काय या दानीं ? ॥१५१॥
जें सीतेचें कैचें तें स्वर्गींच्या सुभाग्य वल्लीला ?
प्रभुला हि लाजल्या हो ! शतकोटिवदान्यभाग्यवल्लीला. ॥१५२॥
प्रेमाश्रुवृष्टि करितां लाजे घनकोटि दृष्टिला ज्यांच्या,
त्या पौरवधूंच्या किति कविजन वर्णील वृष्टि लाज्यांच्या ? ॥१५३॥
बहु हर्षे पाहुनि वनवासनिवृत्त स्वकायज्या माता;
सुखविल सासूसि तसें यमगेहागत हि काय ज्यामाता ? ॥१५४॥
कैकेयीस नमी रघुसिंह, पळे तों तदीय तापससा;
सुखधन द्याया धनद चि जर्हि वरि वेषेंकरूनि तापससा. ॥१५५॥
हर्षविली जी भ्याली संकोचा जेंवि अंधकारा ती,
अन्वर्थ रामचंद्र, ध्यातो यास्तव चि अंधकाराती. ॥१५६॥
त्या मंथरेस हि म्हणे, “ वेड्ये ! त्वां सर्वथा न लाजावें,
हें सद्यश जोडाया मद्बुद्धि हि न म्हणती मला ‘ जावें. ’ ॥१५७॥
भरता ! तरि राज्य करिन, जरि तूं म्हणसिल ‘ न ईस भाजीन; ’
कीर्ति करी कैकेयी, हे पुण्याची नई सभाजीन. ” ॥१५८॥
तो साधु म्हणे, ‘ अमृताहुनि आर्यनिदेश गोड कळला, हो !
जरि हा सुगुरु, तदपि जन यासि वहातां न मोडकळ लाहो. ’ ॥१५९॥
राज्याभिषेकउत्सव सुमुहूर्तीं होय हो ! यथाविधि, तें
कल्याणपर्व भुलवी गिरिशासह हंसवररथा विधितें. ॥१६०॥
सिंहासनीं जिहीं प्रभु सीतेसह देखिला, तिहीं प्राज्य
वरिलें धन्यत्व, तसें न सुरांचें द्यावया शके राज्य. ॥१६१॥
तेव्हां गंधर्वमुखीं जिकडे तिकडे हि तनननं तननं,
मुनि म्हणति, ‘ वानराणामपि न नराणां सुमंगलं जननं. ॥१६२॥
परशब्द न साकेतीं स्वर्गीं ही आयकों न दे वाद्य;
या गजरें चि निवे चि, न ‘ तप तप ’ हें आयकोन देवाद्य. ॥१६३॥
ईश हि नाचे, पावे वृद्धीतें प्रीति, देहभा, नाचें
किति अप्सरा ? न पांडे गौरीचित्तीं हि देहभानाचें. ॥१६४॥
शतलक्षकोटि खंडी कल्पतरूंचीं फुलें उडविलीं, हो !
तीं सुरभोग्यें कपिनीं पौरानीं पुरपथीं तुडविलीं, हो ! ॥१६५॥
कविकोटिला न वदवे लव हि श्रीरामदेवराज्याचा
रस, कामधेनुच्या ही रसिकासि वदों न दे वराज्याचा. ॥१६६॥
वेडावले महाकवि वर्णूं जातां धरूनि आवांके,
तेथें मयूरमति किति, जी प्रेमभरें करूनि आ वांके ? ॥१६७॥
ऐसें चरित्र सांगुनि मार्कंडेयें सबंधु तो धर्म
विज्वर केला, कोण न पावे प्रभुचरित सेवितां शर्म ? ॥१६८॥