मार्कंडेयासि म्हणे धर्म, ‘ बुडालों अगाध शोकांत;
सांगा मत्सम मदधिक जरि दृष्टश्रुत असेल लोकांत. ’ ॥१॥
त्या धर्माला श्रीमद्रामकथा सांग होय परिसविता
भववद्यश - कथिता चि त्रिजगद्वंधु, न तमोघ्न परि सविता. ॥२॥
इक्ष्वाकुकुलज दशरथ राजा, तत्कीर्ति विष्टपीं सुतता,
स्वीकारिली तयाची साक्षातछ्रीप्राणवल्लभें सुतता. ॥३॥
कौसल्यासुत राम प्रभु, कैकेयीज कीर्तिला भरत,
पुत्र सुमित्रेचे ते लक्ष्मण शत्रुघ्न कीर्तिलाभरत. ॥४॥
एक चि देव चतुर्धा यापरि त्या रविकुळांत अवतरला,
‘ यन्नामें विषपानव्यसनीं ’ म्हणती कवींद्र ‘ भव तरला. ’ ॥५॥
मुनिवर पुलस्त्य, तत्सुत वैश्रवण, त्यजुनि त्या दयानिधिला
पद्माला भृंग तसा तो नित्य भजे पितामहा विधिला. ॥६॥
सुत पीडाया देहांतर घे तो ख्यात विश्रवा नावें,
रसिक कवीनीं त्याचें तें हि चरित अमृतमिश्र वानावें. ॥७॥
वरदें विधिनें दिधली वैश्रवणा अमरता कनकलंका,
सख्य हि तेणें देवें नाशी ज्याचें विलोकन कलंका. ॥८॥
तो विश्रवा पिता न क्षोभावा म्हणुनि राक्षसी कन्या
सेवार्थ दे तिघी ज्या, त्या बहु आराधिती तया धन्या. ॥९॥
तो विश्रवा म्हणे ‘ वर मागा ’ ऐसें तिघींस हि, तदा त्या
सुत मागती प्रसन्ना मुनिला जोडूनि हात हितदात्या. ॥१०॥
पुष्पोत्कटेसि दिधले सुत दशमुख कुंभकर्ण या नावें,
साधु बिभीषण मालिन्यात्मज, ज्या त्रिभुवनें हि वानावें. ॥११॥
खर शूर्पणखा झालीं दोन अपत्यें तिज्या हि राकेला,
ज्यांहीं लज्जित दावुनि हृत्काठिन्या निज्या हिरा केला. ॥१२॥
एका काळीं धनपति पाहुनि ते दशमुखादि तळमळले,
साधूत्कर्षासहनत्वें केव्हां कोणते न खळ मळले ? ॥१३॥
शुभकाम बिभीशण, दशमुख कुंभश्रुति कुकाम हे भारी,
तप करितां भय देती विघ्नांसि, जसें वृकां महेभारी. ॥१४॥
खर शूर्पणखा त्यांची सेवा करिती जपोनि, धीरानीं
आराधिला तपें विधि, न तसे तपले तपोनिधीं रानीं. ॥१५॥
एकसहस्राब्दांतीं शिर दशवदनें स्वयें चि कापावें,
तें होमूनि, म्हणावें, ‘ पद्मभवा ! वरदनायका ! पावें. ’ ॥१६॥
भेटे प्रसन्न विधि त्या दशकंथा कापितां चि दशमातें,
वारुनि म्हणे, ‘ म्हणोत न या कर्में निर्दय त्रिदश मातें. ॥१७॥
वर एका अमरत्वावांचुनि देतों समस्त; माग मला,
वत्सा ! वद; हें तप गुरु भार मज त्झ्या गुरूत्तमा गमला. ॥१८॥
येतिल शिरें, विरूप न दिससिल, होसील कामरूपधर;
जेतां रणीं अरींचा, स्थैर्यें जैसा महीध्रभूपधर. ’ ॥१९॥
रावण म्हणे, ‘ प्रभो ! मीं सादर ऐसा तपीं असें देहें,
अमरत्व न देसी जरि तरि मजला मागतों असें दे हें. ॥२०॥
असुर - सुर - यक्ष - राक्षस - किन्नर - गंधर्व - सर्प - भूतगणें
मत्परिभव न करावा, हे माझ्या शासनांत भू तगणें. ’ ॥२१॥
ब्रह्मा म्हणे, ‘ मनुष्यांवांचुनि जे कीर्तिले तुवां सारे,
यांपासूनि नसो भय, परि न नरां वानरांसि हांसा रे ! ’ ॥२२॥
घटकर्ण महानिद्रा मागे जोडूनि हात दात्यातें,
मंदा सुरद्रु झोळी, तैसी दे ती च हा तदा त्यातें. ॥२३॥
‘ परमापदेंत ही मति धर्मीं च रतो, अशिक्षित चि देवा !
ब्रह्मास्त्र हि स्फुरो, हें द्या गुरुजी ! साधुजी घडो सेवा. ’ ॥२४॥
मागे असें बिभीशण, त्यासि म्हणे ब्रह्मदेव, ‘ वत्सा ! हें
घे, अमर हि हो, व्हाया सुयश ब्रह्मण्यदेववत् साहें. ’ ॥२५॥
विधि वर देवुनि जातां, करुनि रणीं कीर्तिहानि धनपतितें,
प्रथम पराभविलें त्या दशकंठें व्हावया निधन पतितें. ॥२६॥
पुष्पकविमान, लंका हरितां, धनपति म्हणे, ‘ कुलकलंका !
त्रासें संप्रति, हर्षें मग, पोषू त्वत्क्षयें पुलक लंका. ॥२७॥
मल्लोचनीं निरखिलें बहु, परि कुतरा चि यागग न यानीं,
योग्य नव्हेसि बसाया, पापा ! तूं तेंवि या गगनयानीं. ॥२८॥
वाहेल तुज न पुष्पक, जो तुज मारील त्यासि वाहेल,
करितोसि गुर्वतिक्रम, परि हरि या दुर्मदा न साहेल. ’ ॥२९॥
शापुनि धनप मनिं म्हणे, ‘ अनयीं हा शक्तिसंपदंध रतो. ’
परिभुवनि अग्रजातें लंकापति होय पंक्तिकंधर तो. ॥३०॥
केवळ विशृंखळ खळ छळबळजळनिधि दशास्य तो यत्नें
आक्रमुनि सुरासुरनरनागवरांतेम हरी धनें रत्नें. ॥३१॥
लोक विनाशकरत्वें ‘ रावण ’ हें नाम पावला खळधी,
पळ धीरवीरहृदया स्वास्थ्य न दे तो कुबुद्धिचा जळधी. ॥३२॥
जावूनि सत्यलोकीं ब्रह्मर्षि सुरर्षि सिद्ध बहुधा त्या
पीडा पावकवदनें कळविति ‘ हा ! हा ’ म्हणोनि बहु धात्या. ॥३३॥
ब्रह्मा म्हणे, ‘ सुरासुर साहेल रणांत त्या न मत्तातें,
तन्नाशार्थ तरणिकुळ केलें जन्मोनि धन्य मत्तातें. ॥३४॥
म्यां विनविला स्वगुरु कीं हो नररूप न म्हणोत तापस ‘ हा ! ’
प्रभु झाला दशरथसुत, करिल सुखी, स्वल्पकाळ त्याप सहा. ’ ॥३५॥
ब्रह्मा शक्रासि म्हणे, ‘ प्रभुला व्हाया सहाय ऋक्षींतें
द्या कामरूपबळ सुत, करिजे जें चंद्रकार्य ऋक्षीं तें. ॥३६॥
अमितबळ सुरसुतांतें क्षिप्र प्रसवोत वानरी, हित मीं
कथितों, प्रभुदास्यरता प्रजा न ज्यां बुडति त्या नरी हि तमीं. ’ ॥३७॥
सुरकार्यसिद्धि व्हाया गंधर्वी दुंदुभी हि आठविली,
युक्ति पढवुनि प्रभुनें कैकेयीच्या समीप पाठविली. ॥३८॥
कामबळ कामरूप त्रिदशांचे वानरर्क्षतनु सुत ते
दुःसह, अलंघ्य सकळां, कल्पांतींचे जसे जलधि उतते. ॥३९॥
निर्मुनि अपत्य, हर्षे सर्व हि शक्रादिदेव तो, कपिसें.
हरिदास्य यल्ललाटीं धन्य चि तें जर्हि असेल तोक पिसें. ॥४०॥
काळीं ढुस्स चरांजननगशिखरेंशीं विवूनि आसविलें,
देवांहीं हिमगिरिला क्षीरधिला स्वयश तुच्छ भासविलें. ॥४१॥
देहें कुब्जा, नामें झाली ती मंथराभिधा, नातें
कैकेयीसीं लावी साधाया कार्यसंविधानातें. ॥४२॥
श्रीगाधिजमुनि द्याया सत्कविवृंदासि सुमहिमा गाया
दशरथमधुपाप्रति ये प्राप्तसुतसुरद्रुसुम हि मागाया. ॥४३॥
‘ दे रामलक्ष्मण मखत्राणार्थ ’ असें तयासि तो याची,
ओपी नृप, जेंवि पितां निजपात्री मरुपथांत तोयाची. ॥४४॥
तो अतिथि तृप्त सुज्ञें अर्पुनियां तें स्वताट केला, हो !
जातां पथीं मुनि म्हणे, ‘ रामा ! सद्गतिद ताटकेला हो. ’ ॥४५॥
तीतें त्या मुनिवचनेम मारी तो, न रघुराज नय शोधी;
कीं, जो गुर्वाज्ञापर सर्व हि होतो खरा जन यशोधि. ॥४६॥
मुनिदत्तास्त्राशीर्धन जोडुनि सिद्धाश्रमासि तो पावे,
मारी मखघ्न राक्षस, कीं, संत खळांपुढें न लोपावे. ॥४७॥
जनकमखाप्रति जातां श्रीराम करूनि वंदन वदान्या
त्या गुरुसि म्हणे, ‘ आम्हां भागाल असें कदापि न वदा, न्या. ’ ॥४८॥
गाधिज रामाकरवीं मार्गीं गौतमसतीसि उद्धरवी,
मानी तत्पादास स्वकरसहस्त्रापरीस शुद्ध रवी. ॥४९॥
मुनि जनकासि म्हणे, ‘ हो ! जें हरितें धन्विगर्व यो धनु तें. ’
आणवितां चि उचलिलें रामें शर्वादिसर्वयोधनुतें. ॥५०॥
गुण जोडूनि सलील प्रभुनें आकर्षितां चि भंगे तें,
तद्रव न मुनिसभेस चि कंपवि विभुमूर्धगा हि गंगेतें. ॥५१॥
होता कठिन पण, पण प्रभु पुरवुनि होय जानकीजानी,
झाले उदश्रु, धरिली होती हृदयांत जानकी ज्यानीं. ॥५२॥
जनकें चवघी कन्या दिधल्या रामासमेत चवघांस,
ते दृष्टिस देति, तसे अमृताचे हि न जिभेसि चव घांस. ॥५३॥
भग्नगुरुधनुर्ध्वानश्रवणें भार्गव धरूनि ये कोपा,
स्वप्नीं हि पराभविला जो न क्षत्रें करूनि येकोपा. ॥५४॥
आला म्हणत असें कीं, ‘ विजयश्रीचा असें चि नवरा मीं; ’
परि त्या चालेल अनवरामाचें तेज काय नवरामीं ? ॥५५॥
श्रीरामाला दशरथ द्यावें युवराजपद असें योजी,
गुरु सचिव म्हणति, ‘ इच्छित होतों कीं हें चि तव मना यो जी ! ’ ॥५६॥
अभिषेकनिश्चय करुनि करवी साहित्य सर्व हि तदा, तें
वाटे न मंथरेच्या चि मना आनंदपर्व हितदातें. ॥५७॥
ती कैकेयीस म्हणे, ‘ दासत्व तुझ्या सुतीं न यो, ध्या हो !
कल्याण कुमाराचें, भवदाज्ञावर्तिनी अयोध्या हो. ॥५८॥
विश्वास काय यांचा ? सुविषम होताति नर सदा सम ही,
गुर्वनुमतें अनुसरण करुनि मग विटेल न रसदास मही. ॥५९॥
दायाददास्यदहनीं वेड्ये ! करिसील आज्य भरतातें,
होसिल विपक्षदासी, देतां रामासि राज्यभव तातें. ’ ॥६०॥
ज्या प्रभुला धन्य म्हणता होत्या कविसाधुसुरसभा, केला
वश तो कैकेयीनें, घेउनि, बोलोनि सुरस, भाकेला. ॥६१॥
‘ वर माग ’ असें म्हणतां, मागे प्रिय काम हा शुभरतातें,
‘ द्या चवदा वर्षें वन रामातें, राज्य आशु भरतातें. ’ ॥६२॥
कैकेयीच्या आलें जों ऐसें दारुणोक्त तोंडास,
त्या दशरथहृदयाचा घे मोहमहाभुजंग तों डास. ॥६३॥
वरदानवृत्त परिसुनि वदला तो यापरि स्वजन - कवच,
‘ हो राजभ्रष्ट तनुज ’ परि सत्यभ्रष्ट न स्वजनकवच. ॥६४॥
संत म्हणति, ‘ संततिहुनि संसारीं प्राज्य सार सत्या गी, ’
ती गुरुची न मळाया राममधुप राज्यसारस त्यागी. ॥६५॥
जनकादिगुरुजनातें वंदुनि रघुवंशपद्मभानु निघे,
वनवासातें परमानुग्रह ऐसें मनांत मानुनि घे. ॥६६॥
लक्ष्मण निघे पदाधिक जाणुनि तत्पादसुपरमाणूस,
त्यजिल गुरुभजन कैसें हें आयकिल्या हि उपर माणूस ? ॥६७॥
श्रीराम म्हणे ‘ मदधिक गुरुचरण त्यजुनि काय निघसी ते ? ’
लक्ष्मण म्हणे, ‘ भजावे गुरुचरण, त्यजुनि काय, निघ सीते ! ’ ॥६८॥
सीता म्हणे, ‘ त्यजावी हे न, न चपळेस ही वनद सोडी,
यद्यपि झडती जड ती, आपण उबगे पटास न, दसोडी. ’ ॥६९॥
जाय प्रसन्नवदन श्रीराघव अकृतकुत्स वनवासा,
कीं मानिला प्रभुमनें तो देसवटा हि उत्सव नवासा. ॥७०॥
भेदूनि काळिजाला गेला लोकापवादशर; थानें
शिशुसा, रामें त्यजितां, त्यजिले स्वप्राण त्या दशरथानें. ॥७१॥
दूत प्रेषुनि मातुळनगराहुनि भरत शीघ्र आणविला,
कैकेयीनें स्वमुखें सर्व हि वृत्तांत त्यास जाणविला. ॥७२॥
भरत म्हणे, ‘ शिव ! शिव ! इह केयमपूर्वेदृशी कुशीला ? हा !
वत्सा ! शत्रुघ्ना ! वद, ही ती, आला जिच्या कुशीला हा ॥७३॥
जा वेड्या ! तसि च दिसो; दुर्वृत्ता राक्षसी च हे तीची
आकृति धरिली बरवी वर, वीरा ! आंत आलि हेतीची. ॥७४॥
गेलां विचार न करुनि केंवि ? अहो ! पुष्कराक्ष ! सीमा या
तुमच्या साधुत्वाची, माय न हे शुष्क राक्षसी माया. ॥७५॥
वरिली कां हे निजकुळसर व्हाया शुष्क राक्षसी तातें ?
जेणें गुरुहानि, करिति का लक्ष्मण पुष्कराक्ष सीता तें ? ॥७६॥
गे ! कौसल्ये ! माते ! दायादत्वें न साच हा रामीं,
घेइन टाकुनि चिंतामणिहार कळोनि काचहारा मीं ? ॥७७॥
आण तव पदाची मज, अवगत नव्हता चि हा विनाशपथ,
त्यागीन प्राणांतें, जरि तुज मच्छुद्धि दाविना शपथ. ’ ॥७८॥
कौसल्या त्यासि म्हणे, ‘ वत्सा ! तुज तों असें न वाटावें,
बा ! ठावें त्वन्मन मज; सर मीनाच्या मतें न आटावें. ॥७९॥
एकात्मे साधु तुम्हीं, ऐसे तों ऐकिले हि न भ्राते;
जे इतर, सहज विषयास्तव बहु घेती करूनि बभ्रा ते. ॥८०॥
कैकेयीच्या मतिचें कृत्य मन्नियतिचें चि ताता ! तें;
बहु दुःख हें, त्यजुनि मज आपण वरिली तुझ्या चिता तातें. ॥८१॥
वत्सा ! भरता ! ज्यांचा मार्दवलेश हि नसे चि नवनीतीं
वत्सांचीं पदपद्में कैसीं भ्रमतील निर्जनवनीं तीं ? ॥८२॥
करुनि क्रिया पित्याची गेला तो श्रितभवाब्धिसेतुकडे,
पौर सचिव हि, अयाचे सच्चुंबकमणिकडे जसे तुकडे. ॥८३॥
धावुनि गळां चि पडली होती जी राज्यभू, तिला भरत
झिडकारूनि निघे, कीं रामपदप्राज्यभूतिलाभरत. ॥८४॥
रामासि चित्रकूटीं, जैसा गाईस तर्णक वनांत
भेटे, निवे तदुटजीं, या ज्यापरि रसिककर्ण कवनांत. ॥८५॥
रामपदीं भरत मिठी घाली क्षतकंटकीं, तदपि त्याचें,
तें माने तन्मतिला, निष्कंटक हि न रुचे पद पित्याचें. ॥८६॥
अंकीं घेउनि रडत्या निजशिशुतें, पुसुनियां वदन, तातें
जें सुख द्यावें, दिधलें श्रीरामें तें चि त्या पदनतातें. ॥८७॥
हे बंधु स्नेहामृतरत सुरसिक, अमृतरत न सुरसिक ते;
न कदापि अर्थशास्त्रें कविगुरुपासूनि असुर सुर सिकते. ॥८८॥
भरत कथी स्वानमनावधि तैलीं तातकाय होता तें.
राम म्हणे, ‘ हा ! त्यजिले मच्छोकें प्राण काय हो ! तातें ? ॥८९॥
हा तात ! हा नृपोत्तम ! हा वत्सळ ! हा प्रभो ! ’ असें चि रडे,
प्रभुचें गुरुशोकभरें हृत्कंज महोपळें तसें चिरडे. ॥९०॥
यच्चरणसरित्तटमृतसुकृतें गीचें हि न करकंज लिही,
तो स्मृतिनें अमृत दिलें ज्या, त्या दे पिंड, तिळ हि अंजलि ही. ॥९१॥
प्रार्थुनि तो भरत म्हणे, ‘ अमृतरस हि मज तुम्हांविना कुचला,
काढा क्षिप्र अयोध्याहृद्गतनिजविरहवज्रशंकु, चला. ॥९२॥
राज्यश्रीस वळविता तूं, जेंवि इभीस अंकुश तसा च,
मृगराज तूं, त्वदाज्ञाकर आम्हीं सर्व रंकुशत साच. ’ ॥९३॥
श्रीराम म्हणे, “ वत्सा ! वेदोक्त तसें गुरूक्त सन्महित,
त्वां म्यां हि चालवावें, या रविवंशीं तरी च जन्महित. ॥९४॥
न मिळे गुरूक्तधनुसीं जो गुण, तो व्यर्थ लाख वावें हो.
वचन करुनि परलोकीं तरि सुख जनित्यासि दाखवावें हो ! ॥९५॥
व्यसनीं बुडों दिलें निजजीवित हि, बुडों दिलें न यश तातें,
वत्सा ! पहा विचारुनि हें चि सुसंमत असे नयशतातें. ॥९६॥
साकेतीं वस, मज हें दे, मीं च वनीं असेन, चवदावें
सरतां चि येइन, उगा, कोण्ही हि ‘ नको ’ असें न च वदावें. ” ॥९७॥
भरत म्हणे, ‘ तरि हें श्रीपदयुग संपादु काम हा, यास
न शिवों देवूत, पदीं बैसुनि या पादुका, महायास. ॥९८॥
तें सिंहासन भूषित या श्रामत्पुण्यपादुकानीं हो;
कीं, यांच्या बहु यश नय तेज सुकृत शिव कृपा दुकानीं, हो ! ’ ॥९९॥
सौवर्णी मणिखचिता भरतकरें प्रभु पळार्ध ज्या ल्याला,
त्या पादुका दिल्या त्या भक्ताला भक्तिनें चि ज्याल्याला. ॥१००॥
सांत्वुनि निजजननीजन सर्व सचिव पौर गुरु सखे दास
प्रेषुनि पुरीप्रति, प्रभु मानी सुख वननिवासखेदास. ॥१०१॥
नंदिग्रामीं, होउनि वल्कजटाधर, वसे, परतला जो,
प्रभुसि न आणुनि तो श्रीमदयोध्येला न कां भरत लाजो ? ॥१०२॥