तरली चांडाली हि न भावें वाहोनि शंकरा बेल,
हें जाणता बुध न कां त्याच्या भजनीं विशंक राबेल ? ॥१॥
जिष्णूग्रतपें भ्याले सर्व तपश्रीविलाससदन मुने,
कैलासाप्रति जावुनि कथिति श्रीशंकरासि पद नमुनीं. ॥२॥
भगवान् म्हणे, ‘ न भ्यावें, त्याचा संकल्प शुद्ध, मीं जाणें;
स्वस्थमनें स्वस्थानाप्रति, टाकुनि भीतिला, तुम्हीं जाणें. ’ ॥३॥
मुनि जातां चि, किरातत्वाच्छादन मूर्तिसंपदेवरि घे,
जेथें पार्थ तप करी, त्या चि वनीं सानुकंप देव रिघे. ॥४॥
आला किरातरूपी शिव जिष्णुसमीप, तों चि हननाश
दानव वराहरूपी मूक हि करि जो पस्विजननाश. ॥५॥
दुष्टासि एकदा चि प्रेक्षिति ते वीर पार्थ भव दोघे,
म्हणती “ शरप्रहारा, तापसजन ‘ हाय हाय ! ॥६॥
खरतर नरहरशर परजीवन एकक्षणीं च संहरिती,
सम देव भक्त, ऐसें जाणों कळवावाया असें करिती. ॥७॥
अर्जुन म्हणे, ‘ किराता ! त्वां मृगयाधर्म लंघिला दर्पें,
स्वांतार्थ मजपुढें अघ केलें, खगपतिपुढें जसें सर्पें. ॥८॥
हा प्रथम मत्परिग्रह असतां, त्वां ताडिलें कसें किरितें ?
पाथरवटें स्वटंकें भेदावें वज्रपाणिसह गिरितें ! ’ ॥९॥
त्यासि किरात म्हणे, ‘ रे ! मद्वन हें, प्रथम म्यां चि हा पिटिला,
म्यां वधिला अस्तां, तूं कोण शरें हाणणार या किटिला ? ॥१०॥
खद्योतत्व सम असो, रवि कीं तिमिरासि काजवा खाणी ?
नवल रविपुढें कीट स्वकृततमोनाशकाज वाखाणी. ॥११॥
मिरविसि सुज्ञत्व वृथा अन्याला स्वकृत पाप लावूनीं.
काय न दगड तपस्वी, भिजला वृष्टींत तापला वूनीं ? ॥१२॥
जोडुनि पुण्यवनीं तप, बुडसी त्याच्या भरें चि गर्वतमीं;
तूं मजपुढें किती रे ! कोण हरिपुढें म्हणेल पर्वत ‘ मीं ’ ? ॥१३॥
हो सिद्ध, जरि असेल स्वतपोबळगर्व, सज्ज्य चाप करीं,
होसील विमद, पडला गरुडाच्या जेंवि मत्त साप करीं. ’ ॥१४॥
तें वाक्य अर्जुनाला गरळ जसें यामुनाह्रदा कढवी,
पढवी जो चापश्रुति रामासि, तयावरि स्वधनु चढवी. ॥१५॥
शर ते जाणों वाहे एक निमेषांत एक लाखोली,
प्रभुची जाणेल कसा बाहुबळें तो चि एकला खोली ? ॥१६॥
स्वरवें गिळों न देते कवळ हि सिंहा विद रितेभा ते,
सरले शर, दोन्ही ही झाले सहसा तदा रिते भाते. ॥१७॥
भ्याले, परि धैर्य धरुनि, ताडी त्या ईश्वरासि कोदंडें,
देता विश्व कवळित्या उग्रा काळासि कंप जो दंडें. ॥१८॥
जें युद्धांत म्हणे, ‘ हो ! भास्करजी ! न करजाळ विकिरा ’ तें
गांडीव धनु हि हरिलें कामाद्यरिमदतमोरवि - किरातें. ॥१९॥
ज्याचा पाद म्हणे, ‘ रे ! भक्तभवा ! स्वकुदशा न कर, वाळ, ’
त्यापरि धनंजयाचा भंगे, पावे यशा न, करवाळ. ॥२०॥
प्रभुला जिंकूं पाहे भुजयुद्धीं, जेंवि काजवा सवित्या,
परि तोषवी स्वधर्में आराधुनि भक्तराज वासवि त्या. ॥२१॥
‘ मृत्युभयासि तराया न जडसुधेचें धरा चिबुक, ’ लीला
ज्याच्या असें सुरांस हि म्हणती तो प्रभु बरा चि बुकलीला. ॥२२॥
शोणित वमला, श्रमला, भ्रमला, गमला नुटेलसा पडतां;
परि उठला, मोह कसा राहेल दयाकटाक्ष सांपडतां ? ॥२३॥
न पहाते झाले हो ! पूर्वीं कौतुक कदापि नाकी तें,
विजयार्थ शरण गेला नर नतकामदपदा पिनाकीतें. ॥२४॥
वाहे पार्थिवलिंगीं भावें जें माल्य तो प्रतापार्थ,
पाहे तें चि पुरस्थःस्वमदघ्नकिरातमस्तकीं पार्थ. ॥२५॥
प्रभुला प्रभुप्रसादें त्या माल्येंकरुनि ओळखे दास;
तो पात्र होय, गरुडातिक्रमकर जेंवि टोळ, खेदास. ॥२६॥
पाय धरुनि पार्थ म्हणे, ‘ ब्रह्मांडीं अघ न माय बा ! पाहें
तूं चि हरीं पंक, हरिल अमृताचा घन न मायबापा ! हें. ॥२७॥
प्रभुजि ! क्षमा करा, जी मागतसें पसरुनि स्वदपरा मीं;
या दासीं हि करो हें पदयुग, जैसें करी स्वपद रामीं. ’ ॥२८॥
त्यजुनि विचार, कराया इच्छीत होता बळें परिभवातें,
लंघन असह्य गुरुला, स्वसभाजन वाटलें परि भवा तें. ॥२९॥
नमुनि ‘ क्षमस्व ’ म्हणतां, प्रकट करुनि रूप बाहुनीं कवळी,
अधराप्रति स्मितानेम स्वयशानें त्रिभुवनास ही धवळी. ॥३०॥
तो दीनबंधु उजरी देउनियां अभय पाशुपत नातें;
बोले असें, हरी जो स्वपद स्मरतां चि आशु पतनातें. ॥३१॥
‘ सर्वत्र रणीं विजयी तूं नारायणसखा नरा ! हो रे !
स्वप्नीं हि अयश तुझिया अवलंबुनि पदनखा न राहो रे ! ’ ॥३२॥
न कळत हि नाम घेतां पाप्यास हि जो म्हणोनि ‘ ओ ’ तारी,
गेला, संकल्पें चि ब्रह्मांडें निर्मिणार ओतारी. ॥३३॥
मग वरुण धनद पितृपति सुरपति हे लोकपाळवर आले,
इंद्रेतर सर्व अहि ते स्वस्त्रें पार्थासि अर्पिते झाले. ॥३४॥
शक्र म्हणे, ‘ स्वर्गीं ये, रथ तुज आणावयासि धाडीन,
अस्त्रें देउनि पुत्रा ! तुजकरवीं स्वाहितांसि नाडीन. ’ ॥३५॥
ते लोकपाळ गेले मग रथ घेऊनि मातळी आला,
नमुनि म्हणे, ‘ अर्जुनजी ! तात बहातो, वसा रथीं, चाला. ’ ॥३६॥
शुचि होउनि मातलिला दिव्यरथीं बैसवूनि मग चढला.
सदतिक्रम करिल कसा जो धर्मन्याय गुरुमुखें पढला ? ॥३७॥
निघतां गिरिसि म्हणे, ‘ बा ! म्यां व्हावें आजि काय उतराई ?
भवदुपकाराद्रिपुढें हा केवल होय पांडुसुत राई. ’ ॥३८॥
अमरावतीस जावुनि गहिवरवी तो गुणाढ्य मघव्याला.
व्याला न साधुला जो, लाजो तो बाप मूर्त अघ व्याला. ॥३९॥
जातां चि पार्थ मोही स्वगुणें तत्काळ त्या सुरसभेला,
न पिपीलिकसेनेस हि सुसितेचा ही तसा सुरस भेला. ॥४०॥
बसवुनि निजासनीं हरि करि पुत्रस्नेह जें जसें करवी,
शिर हुंगी, आलिंगी, फिरवी तनुवरि सुधेसि जो कर वी. ॥४१॥
देवांकरवीं बरवी करवी नरवीरसूनुची अर्चा,
शोभे जसा स्वतेजें देवेंद्र तसा चि तो महावर्चा. ॥४२॥
प्रेमें वज्राद्यस्त्रें हरि देता जाहला स्वतनयातें,
पात्र चि पितृसर्वस्वाप्रति जो जाणे भला सुत नयातें. ॥४३॥
मग पार्थ चित्रसेनापासुनि अत्यंत आदरें सकळ,
इंद्राज्ञेनें शिकला निरुपमवादित्रनृत्यगीतकळा. ॥४४॥
जर्हि पार्थ पांच वर्षें वसला स्वर्गीं पित्याचिया भवनीं,
भ्रात्यांला न विसरला, खिन्न चि होता तसा तदा, न वनीं. ॥४५॥
एकांतीं इंद्र म्हणे त्या गंधर्वेद्रचित्रसेनातें,
‘ स्वर्गीं हि खिन्न सुत जरि हें वैभव काय ? काय हें नातें ? ॥४६॥
गुणवत्कलत्रविरहज्वरिता सुखहेतु शुचिरतापचिती,
स्पष्ट तदन्या जी जी पूजा देणार सुचिर ताप चि ती. ॥४७॥
स्पर्शो शृंगारसुधानिधिची धृतमूर्ती उर्वशी लहरी,
सुतविकळत्व हरो, जसि सत्संगति सर्व उर्वशील हरी. ’ ॥४८॥
देखत होता सादर सुत, जैं स्मितपूर्व साभिनय नाचे,
प्रकटी विलास नटतां बहु ती गंभीरनाभि नयनाचे. ॥४९॥
तो तीस म्हणे, ‘ सुंदरि ! जो तुज मागोनि दत्त सुख नेतो,
माझ्या वदनें कांहीं प्रार्थितसे सुगुणरत्नसुखने ! तो. ॥५०॥
या स्वर्गीं मूर्तीमती तूं चि सुधा, जी प्रसिद्ध असुधा ती;
न तिच्या पानें जैसे त्वदधरपानें क्षणांत असु धाती. ॥५१॥
यास्तव या स्वर्गीं हा पुरुषोत्तम पार्थ पात्र सुरसा, हो !
परि तृप्त येथ येउनि सेवुनियां या चि मात्र सुरसा हो. ’ ॥५२॥
देवी स्मित करुनि म्हणे, ‘ गंधर्वपते ! उदंड आजवर
प्रभुनें काम पुरविले, परि मज दिधला अनर्घ्य आज वर. ॥५३॥
येवूं देईल मुखीं कां प्रवरप्रेमकाम मन्मथ न ?
कोपें करील सोडुनि पांचा हि शिलीमुखांसि मन्मथन. ॥५४॥
गंधर्वपते ! जा तूं, हा जन बहु आजि सुखविला साचा,
भेटेन त्या प्रिया मीं पाहुनियां समय सुखविलासाचा. ’ ॥५५॥
जीच्या सुरस वपुपुढें खालें वदनासि अमृतसर घाली,
ती जाय त्याकडे, जसि सुमधुकडे वेग करुनि सरघाली. ॥५६॥
शृंगारमानसींच्या पाहुनि तो पार्थ त्या मरालीला
उठला, तसीच पूज्या ती स्त्री शतमखमुखामरालीला. ॥५७॥
स्वकरें आसन देवुनि नमुनि करी पार्थ तत्सभाजन हो !
‘ मज आज्ञा काय ? ’ म्हणे, परिसा साधुत्व सत्सभाजन हो ! ॥५८॥
ती उर्वशी म्हणे, ‘ गा ! कीर्तिश्रीच्या नृमूर्तिकरवीरा !
शक्रोक्तें स्वरसें ही आल्यें, मत्कामपूर्ति कर वीरा ! ॥५९॥
करितां नृत्य मजकडे पाहत होतासि, त्या पहाण्यानें
सूचविलें त्वदभिलषित हरिला मजला हि त्या शहाण्यानें. ॥६०॥
जाणोनि त्वद्गुरुचें प्रिय हें त्वन्मित्रचित्रसेनमुखें
अनुसरल्यें तुज, सुजना ! नीरजनयना ! करीं विलास सुखें. ’ ॥६१॥
कर्णावरि कर ठेवुनि ‘ शिव ! शिव ! ’ ‘ हर ! हर ! ’ असें म्हणे नर तो,
‘ माते ! हा पुत्र रतो भजनीं, परि ह्मणसि तूं तसें न रतो. ॥६२॥
माद्री पृथा शची तूं मज तुल्या, योग्य हें नसे तूतें,
परि रक्षिति प्रयत्नें गुरुजन तों भंगिती न सेतूतें. ॥६३॥
ऐसें पाहत होतों कीं, हे नारायणोरुजा आर्या
पूर्वज पुरूरव्याची, श्रीपतिची श्रीजसी, तसी भार्या. ’ ॥६४॥
हांसोनि म्हणे देवी, ‘ आम्हां देवींस अघ असेना तें;
जाणत नव्हते रमले पौरव ते काय तुजअसे नातें ? ॥६५॥
लावूं नये चि सुज्ञें भुक्तोच्छिष्टत्वअघ नव सुधेतें,
स्वजनकभुक्ता माता ह्मणुनि त्यजिती सुधी न वसुधेतें. ॥६६॥
सांगों काय करिति जें आर्जव लोकेश सुर तसे जे तें ?
घालिति आलितिरस्कृत ही, इच्छुनि लेशसुरत, सेजेतें. ॥६७॥
आल्यें स्वयें तुजकडे कामार्ता स्त्री, म्हणोन कोमळ हो;
मद्भोगासि ‘ सुकृतफळ ’ म्हणति सकळ, तूं म्हणो नको मळ हो ! ॥६८॥
पावे न शुकापासुनि , कर जोडुनि शरण जाय परि, रंभा,
तद्वन्नारायणसखमुनिपासुनि उर्वशी हि परिरंभा. ॥६९॥
पार्थ म्हणे, ‘ तूं माता, मी सुत, धर्मज्ञ नर, न वानर कीं
पडतां गळां हि गुरुनीं द्यावा जाया न वर नवा नरकीं. ॥७०॥
हा सुप्रसन्नमति, हा जननि ! जन निज न निमग्न नरकीं हो.
अमर नव्हें, पशु हि नव्हें, मीं त्वदुदरजान्वयोत्थ नर कीं हो. ’ ॥७१॥
क्षोभे, प्रसन्न व्हावें, परि मन कामासि जें वश स्त्रीचें;
‘ हो क्लीब ’ असें शापी, उग्रत्व तिचें तसें न शस्त्रीचें. ॥७२॥
शक्र म्हणे, ‘ बा साधो ! करिता तूं एक शुद्ध तप शुकसा,
तूं चि नर, इतर वानर; इंद्रियविषैकनिष्ठ न पशु कसा ? ॥७३॥
दिव्य विषयार्णवीं तूं बोधनळस्पृष्ट साधु पर्वत रे !
छायाग्रहासि कपिसा, या विषया विरळ जन, न सर्व, तरे. ॥७४॥
अज्ञातवासकाळीं हा बहु येईल शाप कामाला,
मातेचा अस्नेह हि होय यशोहेतु साधुरामाला. ’ ॥७५॥
लोमशमुनि पार्थातें हरिच्या अर्धासनीं स्वयें पाहे,
शक्रासि पुसे, ‘ याचें सुकृत असें सांग कोणतें आहे ? ’ ॥७६॥
देवेंद्र म्हणे, “ साक्षान्नारायणसख पुराणऋषि नर हा,
अवतरला भरतकुळीं भूभारातें म्हणावया ‘ न रहा. ’ ॥७७॥
आला दिव्यास्त्रार्थ, प्रेमें झाला प्रसन्न भवचरणीं;
मरणार याचिपासुनि वरदर्पित खळ निवातकवच रणीं. ॥७८॥
सिकला दिव्यास्त्रें हा शीघ्र चि साधूनि देवकार्यातें,
येईल सांग ऐसें धर्मातें साधुसेवकार्यातें. ॥७९॥
जा, त्यासि तीर्थयात्रा सांग घडेसें स्वयें चि तूं कर गा !
पुण्याविणें जयश्री होईल कसी मुनीश्वरा ! करगा ! ” ॥८०॥
हें स्वर्गींचें वृत्त व्यास स्वसुतासि सर्व आयकवी,
तो ममतेला, आपण करुणेला वश, करील काय कवी ? ॥८१॥
जिष्णूत्कर्षश्रवणें व्याकुळ मति होय अंधराज्याची,
दुर्मोच्यमोहपाशें आळपिली घट्ट कंधरा ज्याची. ॥८२॥
नृप संजयाप्रति म्हणे, “ जिष्णूचा शंभुसीं समागम तो
प्रेमें स्वविजयसा चि स्पष्ट मला तत्पित्यासमा गमतो. ॥८३॥
पाशुपताद्यस्त्रांचा लाभ, स्वर्गीं वरासनाचा, हो,
हें बहु, म्हणे हरि, ‘ अहो उर्वशि ! सुखवा वरास, नाचा हो ! ’ ॥८४॥
झाला प्रसन्न ज्यावरि भगवान् कल्पांतकाळनट कळहें,
त्यासीं विरुद्ध मत्सुत, दिसतें, मज कर्म फार फटकळ हें. ” ॥८५॥
संजय म्हणे, ‘ धरावें हितकर मत हें च, ‘ हा ! न च वदावें;
भ्यावें न बा ! न व्हावें तें वर्षअराज्यदान चवदावें. ’ ॥८६॥
वदला धर्म हरिप्रति ‘ मज द्या हें, येउ अब्द चवदावा;
पद न दिलें, तरि उरु कुरुगुरुरक्तांची शरांसि चव दावा. ’ ॥८७॥