गेल्या पथें चि होउनि रक्षःस्कंधाधिरूढ ते आले,
हिमगिरिवरप्रदेशीं वसतां यामुननगीं सुखी झाले. ॥१॥
तेथें भीमासि धरी बळवान् नगकुहरगत महाजगर;
भयविकळ तद्वपु गमे, दवदहनें जेंवि वेष्टिलें नगर. ॥२॥
भीम तयासि पुसे, ‘ तूं कोण बळी ? करिसि काय हा कबळ ?
मद्गति हे, अन्याचें येथें मारील काय हाक बळ ? ’ ॥३॥
सर्प म्हणे, “ भीमा ! म्यां बहुधा स्वयशें सलज्ज शिबि केला;
परि वाहविता झालों विप्राकरवीं बळें स्वशिबिकेला. ॥४॥
गमलें मज उद्धतपण सुखद, जरि विषापरीस अहिम हि तें.
आलों अगस्त्यमुनिच्या शापें होवूनि उग्र अहि, महितें. ॥५॥
भीमा ! त्वत्पूर्वज मीं झालों होतों महेंद्र, परि मोटे
मारक न पर, अनुभवें जाणे हा नहुष, बहु षडरि खोटे. ॥६॥
म्या पोसावा खावुनि सुगुण सुरसमान लेंकरूं काय,
बापा ! कर्म असें हें दैवाला मानलें करूं काय ? ॥७॥
‘ त्वत्प्रश्नाचें उत्तर देता ज्ञाता करील तुज मुक्त, ’
हें त्या श्रीमन्मुनिचें म्यां जतन मनांत ठेविलें उक्त. ” ॥८॥
भीम म्हणे, ‘ बा सर्पा ! लेश हि नाहीं च मृत्युभी मातें.
बंधु मरतील बहुधा झाला ऐकोनि मृत्यु भीमातें. ॥९॥
शोकें मरेल माता, मरतां न करूनि भीम भीमरण,
दे वीरसूसि अपयश पुत्राचें तसि न भीम भी मरण. ’ ॥१०॥
पाहुनि उत्पात पुसे आधीं भीमासि, धर्म तो भ्याला,
याची च त्यासि चिंता, जेंवि धनाची च फार लोभ्याला. ॥११॥
कृष्णा म्हणे, ‘ किती मीं ? बहु रमवितसे तयां अरण्यानी;
म्यां सांभाळावें किति ? सांभाळावें तुम्हीं शरण्यानीं. ’ ॥१२॥
‘ वत्सा धनंजया ! त्वां पांचाळी आत्मकीर्ति लक्षावी,
दक्षा वीरवरा ! हे माझ्या आज्ञेपरीस रक्षावी. ॥१३॥
धर्म ॠशींस म्हणे, ‘ श्रितरक्षण आंगें कराल, करवाल
तुमचा आशीर्वाद प्रत्यूहांतक कराल करवाल. ॥१४॥
यम हे माझे डोळे, जपतों यां तेंवि यां न डोळ्यांतें;
त्यजुनि विमानें ज्ञाता वरुनि करिल केंवि यान डोळ्यांतें ? ॥१५॥
या डोळ्यांचें रक्षण तुमच्या व्रत होय पादपात्यांचें.
जे श्रित, असे चि करणें इष्ट सकळ देवपादपा, त्यांचें. ’ ॥१६॥
जावुनि सधौम्य धर्में द्रुत अहिकुहरासमीप मागानें,
भीम निरखिला, जैसा नंदें धरिला स्वसूनु नागानें. ॥१७॥
धर्म म्हणे, ‘ रे वत्सा ! केला कुरुवंशघात सापानें,
त्वद्व्यसनदर्शनें बहु ताप, न विषवह्निच्या तसा पानें. ॥१८॥
विपरीत चि हें, गिळिला नागानें गरुड कीं, अगा धात्या !
या शोषाया केला हा, जैसा घटजकर अगाधा त्या. ’ ॥१९॥
भीम म्हणे, “ आर्या ! हा म्हणतो ‘ मीं नहुष, ’ बळ नवल याचें,
दुर्मोच्य काळपाशासम याच्या होय वळन वलयाचें. ” ॥२०॥
धर्म म्हणे, ‘ मत्पूर्वज नहुष तुम्हीं काय ? जी ! वदा नातें;
घ्या मजपासुनि दुसरें भोजन, द्या यासि जीवदानातें. ’ ॥२१॥
सर्प म्हणे, ‘ उगळावा स्वनियतिनें भरविला न सुग्रास,
खाइन उद्यां तुज हि, जा, बहु विनवातें तुवां न उग्रास. ॥२२॥
मत्प्रश्नांचें उत्तर देसिल तरि मात्र यासि सोडीन,
मी शाप मुक्त होउनि, तुज निजकुळजासि हात जोडीन. ’ ॥२३॥
राज म्हणे, ‘ पुसा, मीं जोडितसें हात हे तुम्हां, तारा,
कोण्हा हि कुळांत नसो निजबाळकघातहेतु म्हातारा. ’ ॥२४॥
सर्प म्हणे, ‘ ब्राह्मण तो कोण ? कसा ? वेद्य काय ? वद, राया !
मिळतां साधूक्तामृतफळ मीं सेवूं कशास बदरा या ? ’ ॥२५॥
धर्म म्हणे, ‘ कथितों चि, स्ववचाला जरि हि तूं न जपसील,
तो चि ब्राह्मण, जेथें क्षांति दया दान सत्य तप शील. ॥२६॥
वेद्य तरि परब्रह्म चि, न स्पर्शे जेथ मृतिजननशोचि,
ज्यातें पावोनि पुन्हा संवर्तशतीं हि कृतिजन न शोची. ’ ॥२७॥
एवंविध अन्योन्यप्रश्नोत्तर होय अमृतवर्ष तसें,
‘ सच्छ्रोतृवक्तृसंगमसम ’ घन न म्हणेल ‘ अमृत वर्षतसें. ’ ॥२८॥
सद्भाषणें चि पावे शापापासूनि नहुष सुटकेला.
साधु चि अमृतकर, सदा यास चि कविनीं स्वपाणिपुट केला. ॥२९॥
ठेवी यशोर्थ कंठीं, उरवी लोकीं न, जेंवि अज गरता,
सत्संग जयग्रंथीं दावी, नहुषीं न तेंवि अजगरता. ॥३०॥
नहुष जसा स्वर्गाला गेला पावोनियां स्वभावाला;
धर्म हि निजाश्रमाला पावोनि तसा चि त्या स्व - भावाला. ॥३१॥
ॠषि म्हणती, ‘ बा भीमा ! ऐसें साहस नको करूं, दे हें.
तुजवीण आमुचीं हीं निर्जीवेंसीं च भासती देहें. ’ ॥३२॥
तेथूनि काम्यकीं जों आला तो समुनिजन अजातारी,
तों प्रभु भेटाया ये, पडतां मोहांत जो अजा तारी. ॥३३॥
पांडव म्हणेन चातक; परि, घन हरि, वीज सत्यभामा ती
न म्हणेन, त्यांपुढें घनशंपांची होय सत्य भा माती. ॥३४॥
अंकें जैसीं शून्यें सद्यःकर्यक्षमें, न तीं अन्यें.
केलीं पांडवदेहें त्या आद्यें सगुणविग्रहें धन्यें. ॥३५॥
ब्रह्मादि साधु योगी ज्याच्या पदभक्तिच्या पथीं शिरतो,
धर्माच्या भीमाच्या ठेवी पायांवरि स्वयें शिर तो. ॥३६॥
आलिंगिला प्रभूच्या भुजभुजगानीं किरीटिपाटीर,
बहु कांपविता झाला जाणों त्याचा वियोग हा टीर. ॥३७॥
ऐसे धन्य पृथेचे मात्र न, सुत वंदिते हि माद्रीचे
गंगाधरप्रियसख हि झाले, केवळ न ते हिमाद्रीचे. ॥३८॥
गंगाह्रदें करावें मरणोत्तर सुरसमानवपु न्हाते
जे हरिन्तिरसमुदित न म्हणति सुधा सुरस मानव पुन्हा ते. ॥३९॥
भामा कृष्णा, गंगायमुनाश्या भेटल्या अनादिसत्या,
साक्षाल्लक्ष्मी गौरी ऐश्या झाल्या चि त्या जना दिसत्या. ॥४०॥
कुशळप्रश्नें निववुनि देव म्हणे, “ हा चि धन्य वासर, हो !
सद्दर्शन सुसर, न पर, मानस वा, थोर अन्य वा सर हो. ॥४१॥
अंतर्बाह्य निवालों तुमचीं अवलोकितां चि पंच मुखें,
वाटे मनासि दर्शन दिधलें मज काम्यकांत पंचमुखें. ॥४२॥
प्रथम चि तुझी तुळा शतजन्में हि सुदुर्लभा परा सुकृतें;
संप्रति तव कर्में परकर्में जीवत्कृतें परासुकृतें. ॥४३॥
फिरलासि उद्धराया तीर्थांतें, तूं न मज्जन कराया;
सच्चरण म्हणति ‘ आधीं पुण्यार्द्धी हो ! नमज्जनकरा या. ’ ॥४४॥
आतां पुण्यश्लोका ! काय तुजपुढें टिकेल खळबळ तें ?
त्वद्भुजघटजस्मरणें अरिसिंध्वंतर उदंड खळबळतें. ॥४५॥
खद्योत व्योमपथीं भानुपुढें काय देखिले टिकले ?
त्रिनयनभालेंदुपुढें सरतिल सित रक्त रेखिले टिकले ? ॥४६॥
नगरी मज शंभूची इषुधि गमे, जींत सिद्ध यादव ती;
सिंधूंच्या पुरतील न वृष्ण्युत्साहा लिहावया दवती. ॥४७॥
संपत्ति शक्ति विद्या सत्साहित्यें चि होय अनपार्था
यास्तव वृष्णि बहूत्सुक, जोडूं दे भव्य कीर्तिधन पार्था. ” ॥४८॥
धर्म म्हणे, ‘ श्रीकृष्णा ! भुललों सेवूनि बोल कानाहीं,
बा ! तुज वेद हि लाजे, ज्यासम कोठें चि बोलका नाहीं. ॥४९॥
स्तुति न दिल्या त्वां आशीराशी, श्रितसर्वलोककल्पतरो !
प्रभुजी ! तुझ्या प्रसादें व्यसनीं हा दास तोककल्प तरो. ” ॥५०॥
कृष्णेला कृष्ण म्हणे, ‘ सखि बरि आहेसि कीं, असें नातें
‘ पुस ’ न पुस हि ’ मज म्हणतें, काय करूं ? क्षण उगें असेना तें. ॥५१॥
मूर्त बैश्चर असुसे प्रतिविंध्यादि त्वदीय सुत सा जे
त्यांहीं, देवि ! सुभद्रागृह षण्मुखमातृसदनसम साजे. ॥५२॥
प्रद्युम्नें शस्त्रास्त्रीं पटु केले, शिकति नित्य त्याजवळ,
आवडलें हें चि तयां बहु, तैसें देवि ! तें न आजवळ. ’ ॥५३॥
सांत्वन कृष्ण करी, तों ये मार्कंडेय मुनि पहायास,
तितुक्यां नारद हि ये, ज्याच्या स्मरणें सरे महायास. ॥५४॥
तो ब्राह्मणमाहात्म्य क्षत्रियमाहात्म्य त्यांसि आयकवी,
वर्णी पतिव्रतेचें माहात्म्य हि सर्वयोगिराय कवी. ॥५५॥
धर्मव्याधस्कंदप्रभवादिकथा उदंड तो बोले;
श्रवणें धर्म ब्राह्मणगण नारद देवदेव ही डोले. ॥५६॥
सत्या कृष्णेसि म्हणे, ‘ वदत्यें तें तूं खरें च मान सये !
लोक म्हणोत, परि पळ हि माझ्या हातीं न कांतमानस ये. ॥५७॥
त्वां हे पांच पति कसे वश केले ? भजति सर्व एकीतें ?
थोडें याहुनि पाहुनि नटती कादंबिनीस केकी तें. ॥५८॥
सांग वशीकरण कसें केलें ? त्वां देवि ! कोणत्या मंत्रें ?
कीं दिव्यौषधिमूळें किंवा वात्स्यायनोदितें यंत्रें ? ’ ॥५९॥
कृष्णा हांसोनि म्हणे, ‘ भामे ! मोहावयासि पतिला जे
मंत्राद्युपाय करणें या श्रवणें बहु मदीयमति लाजे. ॥६०॥
प्रेमें पतिचरणासि न देवुनि दे हात तायिताला जे
ते स्त्री न रुचे पतिला, कीं, तीतें आततायिता लाजे. ॥६१॥
पतिपरमेश्वरचरणा जी तत्सेवार्थ न नवशी करणें,
ती मुग्धा कैसी गे ! वळवील स्वाभिमन वशीकरणें ? ॥६२॥
जाणें वशीकरण हें करित्यें जेणें कधीं न कोपति तें.
सखि ! तूं हि असें चि करीं, मद मत्सर दाखवूं नको पतितें. ॥६३॥
पतिचे प्रसाद देती ज्या सद्गतितें न योग सव तीतें’
वाहे पहा शिरीं शिवदेहार्धगता शिवा स्वसवतीतें. ’ ॥६४॥
श्रुतिला कविधीसी ती मानवली फार शुद्ध वदलीला,
न पतींस चि कर्णांस हि सत्य सती होति उद्धवदलीला. ॥६५॥
जें सासुरां मुली पितृगमनिं करिति ते हि काननौके तें,
कळविति जवळि तिमिंगिळ दिसतां भटवर हि कां न नौकेतें ? ॥६६॥
देव म्हणे, “ जरि होते वनवासें कृश मदीय असु, खमतें,
असुख मतें माझ्या हें, जें दृक्प्रिय मुख, नसो चि असुषम तें. ॥६७॥
कृष्णे ! करिल चि म्हणसिल जरि ‘ या भूमंडळा नभा उखळ, ’
तुजक्रितां सखि ! अखिल हि असु वसु वेचील हा, न भाउ खळ. ॥६८॥
सखि ! सोसिजेल लंघुनि काय खगोत्तमगरुद्रवा टोळें ?
कां दृगुपद्रवदमशकततिचें न करील रुद्र वाटोळें ? ” ॥६९॥
करुनि समाधान असें, गेला तीचा निरोप घेऊन.
श्रितताप हरि हरि, न पर, तापहर हि आतपत्र घे ऊन. ॥७०॥