अध्याय ४२ वा - आरंभ
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
श्रीपांडुरंगाय नमः ॥
जो गोमतीपैलपरीं । नांदे सर्वदा निर्विकारी । क्रीडे गोमतीमाझारीं । विषमव्यवहारीं अस्पृष्ट ॥१॥
गोप्रवृत्ति जे गोमती । ज्या चैतन्यें प्रवाहवती । तो तूं निरस्छ श्रीगोपति । अलिप्तस्थिति तेथ वससी ॥२॥
क्रीडतां गोमतीमाजी अजस्र । तूं अस्पृष्ट निर्विकार । सागरीं न भिजे जेंवि अंबर । बिंबलें सर्वत्र परि त्यांत ॥३॥
बिंबलें असोनि तिंबलें नसे । तैसा जो कां कूटस्थदशे । वेंठला न झके विश्वाभासें । पूर्णप्रकाशें देदीप्य ॥४॥
गोमतीचें पैलतीर । संकल्पप्रभव कामाकार । विषयात्मक भवसागर । दुःखप्रचुर सुखभ्रांति ॥५॥
ओतप्रोत तयेही ठायीं । अवघी क्रीडा तुझीच पाहीं । तुजवेगळी नुठे देहीं । विषयग्राही अहंता ॥६॥
भ्रांतीस्तवचि जीवदशा । एर्हवीं अभेद तूं परेशा । करावया भ्रांतिनाशा । गौरवासरसा अवतरसी ॥७॥
तव कृपेचा बोधादित्य । ज्यांचें तिमिर विध्वंसित । ते तव चरणां शरणागत । येर प्राकृत ओखटीं ॥८॥
देहबुद्धीच्या ढोलांतरीं । करूनि दिवसा मध्यरात्री । रागद्वेषविषमोत्तरीं । दुष्टस्वरीं घुंघाती ॥९॥
असो तयांची किमर्थ कथा । तूं कैपक्षी शरणागता । कृपेनें तारिसी स्वपादप्रणतां । हा महिमा तत्त्वता श्रुति गाती ॥१०॥
मी तव कृपेचा औरस । मजवरी सर्वस्वें वोरस । यास्तव दिधला कवळ सुरस । करूनि मिष दशमाचें ॥११॥
लावोनि सप्रेम भजनवेध । पदपदार्थीं अर्थावबोध । करूनि भेदाचा निषेध । ग्रंथ विशुद्ध विवरविला ॥१२॥
यावरी एकोत्तरचाळिसा - । माजी करूनि रजकनाशा । आठवा कृष्ण मी आलों ऐसा । भाव कंसा जाणविला ॥१३॥
तंतुवायक माळाकार । यांसि देऊनि अभीष्टवर । ये अध्यायीं जगदीश्वर । कुब्जा सुंदर करील ॥१४॥
लीलेकरूनि धनुष्यभंग । मारूनि धनुरक्षकांचा वर्ग । कंसासि दुर्निमित्तप्रसंग । मल्लरंगप्रारंभ ॥१५॥
ये अध्यायीं कथा इतुकी । नृपा कथील वैयासकि । भाषा वाखाणिजेल निकीं । सप्रेम भाविकीं परिसावी ॥१६॥
N/A
References : N/A
Last Updated : May 07, 2017
TOP