अध्याय ४२ वा - श्लोक ३१ ते ३८
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
वाद्यमानेषु तूर्येषु मत्ततालोत्तरेषु च । मल्लाः स्वलंकृता दृप्ताः सोपाध्यायाः समागताः ॥३६॥
तुरें वाजत असतां ऐसीं । मल्लतालच्छंदासरिसीं । नादें सुचविलें मल्लांसीं । पूर्वसूचनारहस्य ॥३३५॥
तो ऐकतां वाद्यघोष । मल्ला आंगीं महा आवेश । उथळितां तिहीं समरावेश । घेऊनि जाले स्वलंकृत ॥३६॥
दृप्त माजले ठोकिती भुजा । म्हणती कृतांत लोळवूं पैजा । कोण साहे आमुच्या तेजा । कंसकाजा आजी साधूं ॥३७॥
मल्लविद्यापरायण । द्वंद्वयुद्धीं परम निपुण । राजगुरु ते प्रबोधप्रवीण । संगें घेऊनि पातले ॥३८॥
चाणूरो मुष्टिकः कूटः शलस्तोशल एव च । त आसेदुरुपस्थानं वल्गुवाद्यप्रहर्षिताः ॥३७॥
मल्लविद्याप्रबोधकर । तिहींसीं मुष्टिक कूट चाणूर । शलतोशलादि मल्लभार । रंगागार प्रवेशला ॥३९॥
तिहीं पावतां रंगस्थाना । ऐकोनि वाद्यांची गर्जना । आवेशें करिती सिंहस्वना । स्ववल्गना पुरुषार्थें ॥३४०॥
भयंकर देती हाका । आवेशें भुजा ठोकिती देखा । मल्लविद्येचा आवांका । एकमेकां दाविती ॥४१॥
ऐसे पातले रंगस्थाना । नृपा खालाविती माना । लाहोनि भूपाच्या सम्माना । दाविती नाना मल्लविद्या ॥४२॥
ऐसे मल्ल अवाप्तहर्ष । बोलती आपुला विजयोत्कर्ष । तेणें किंचित् कंसा तोष । करी आदेश तो ऐका ॥४३॥
नन्दगोपादयो गोपा भोजराजसमाहुताः । निवेदितोपायनास्ते एकस्मिन्मंच आविशन् ॥३८॥
कंसें श्वाफल्कि खुणाविला । निजानुचरातें प्रेरूनि वहिला । नंदादिका गोपां सकळां । आणिता झाला रंगालया ॥४४॥
नंदादि समस्त पातले गोप । नम्र मस्तकें नमूनि भूप । ठेवूनि उपायनें समीप विगतजल्प तिष्ठती ॥३४५॥
कनिष्ठ मंचा एके प्रांतीं । नृपसंकेतें दाविली दूतीं । तेथ बैसोनि गोपसमस्तीं । निश्चळ पाहती तच्चेष्टा ॥४६॥
अर्पितां रायासी करभार । न करी आदर अनादर । देखोनि संदिग्ध गोपनिकर । चिंतातुर बैसला ॥४७॥
रंगासक्त नृपाचें मन । यास्तव पशुपां नेदी मन । एक म्हणती कोपायमान । रामकृष्णहननार्थ ॥४८॥
एक म्हणती बरवें झालें । रामकृष्ण येथ न आले । एक म्हणती दैवबळें । यथाकाळें सर्व घडे ॥४९॥
बेचाळिसाव्या अध्यायांत । इतुकी कथा अरणीसुत । सांगोनि वक्ष्यमाण संकेत । कथी वृत्तांत तो ऐका ॥३५०॥
त्रेचाळिसाव्या माजी हरि । कुंजर मर्दूनि रंगद्वारीं । प्रवेशला रंगागारीं । घेऊनि करीं गजदंत ॥५१॥
श्रीएकनाथपादोदका । हरिवरदाख्य वाहिनी टीका । श्रवणें सुस्नात होतिया लोकां । अघकळंका प्रक्षाळी ॥५२॥
तयेचा व्याख्यानवोलावा । पूर्णभरितें दयार्णवा । सप्रेम श्रवण सर्वीं सर्वां । कैवल्यठेवा साधतसे ॥५३॥
ऐसी श्रीमद्भागवतीं । व्यासोपदिष्ट शुकभारती । अठरा सहस्र संहितागणती । जे सेविती परमहंस ॥५४॥
तेथील दशमस्कंध अपूर्व । त्यांतील बेचाळिसावा अध्याय । धनुष्यभंगें कंसा भेद । तो हा सर्व निरूपिला ॥३५५॥
श्रीमद्भागवतदशमस्कंध । टीका हरिवरदा अगाध । दयार्णवकृत परम विशुद्ध । अध्याय्प्रसिद्ध बेचाळिसावा ॥५६॥
इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचिताया कुब्जामोहनधनुर्भंजनरक्षकादिकंससेनाहननक्म्सानिष्टदर्शनमल्लरंगादिनिरूपणं नाम द्विचत्वारिंशत्तमोऽध्यायः ॥४२॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥३८॥ टीका ओव्या ॥३५६॥ एवं संख्या ॥३९४॥ ( बेचाळिसावा अध्याय मिळून ओवीसंख्या १९३३३ )
बेचाळिसावा अध्याय समाप्त.
N/A
References : N/A
Last Updated : May 07, 2017
TOP