अध्याय ४२ वा - श्लोक २१ ते २५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
बलं च कंसप्रहितं हत्वा शालामुखात्ततः । निष्क्रम्य चेरतुहृर्ष्टौ निरीक्ष्य पुरसम्पदः ॥२१॥
ऐसें कंसप्रहित बळ । मर्दूनियां केशवबळ । विचार करूनियां तत्काळ । शाळामुखींहुनी निघाले ॥६९॥
म्हणसी विचार केला कैसा । तो तूं ऐकें कुरुनरेशा । आजिची रात्रि आयुष्य कंसा । उद्यां प्रवेशा पुढें करूं ॥१७०॥
आजी परतावें येथून उदैक प्रवेशों रंगस्थान । ऐसें करूनि संकेतकथन । शाळामुखींहून निघाले ॥७१॥
वयस्यपार्षदगणवेष्टित । आंगीं विजयश्री मंडित । मथुरालक्ष्मी अवलोकित । जाती मिरवत बळ कृष्ण ॥७२॥
ठायीं ठायीं ठाकती उभे । पुरश्रीलावण्य लक्षिती लोभें । वीरवृत्तीच्या न वचती क्षोभें । निर्भय दंभें सांडवले ॥७३॥
ऐसी करूनि मारामारी । हर्षनिर्भर विचरती नगरीं । लोकचर्चा परस्परीं । ते तूं अवधारीं कुरुकुघ्रा ॥७४॥
तयोस्तदद्भुतं वीर्यंनिशम्य पुरवासिनः । तेजः प्रागल्भ्यं रूपं च मेनिरे विबुधोत्तमौ ॥२२॥
त्यांचें अद्भुतकर्माचरण । देखोनि ऐकोनि म्हणती जन । आदिपुरुष रामकृष्ण । सुरभूषण अवतरले ॥१७५॥
अगाध यांची प्रतापगरिमा । ऊर्जितप्रभावा न लगे सीमा । प्रबुद्धि म्हणती प्रागल्भ्यनामा । अगाध धार्ष्ट्य पैं यांचें ॥७६॥
कोटिमदनांचें लावण्य । कुरवंडिजे उभयांवरून । सुरवरवंद्या शिरोरत्न । ऐसे पुरजन अनुमिती ॥७७॥
ऐसे वेष्टित वयस्यभारीं । निःशंक प्रवेशले मधुपुरीं । रूपें मोहिल्या नगरनारी । निर्विकारीं स्मरच्छद्मीं ॥७८॥
दुर्मदरजकाचें मर्दन । वायकमाल्यकां सनाथ करून । सैरंध्रीचें त्रिवक्रपण । निरसूनि लावण्य ओपिलें ॥७९॥
लीलकरूनि धनुर्मख । पहावयाचें करूनि मिख । वज्रप्राय जें भयानक । तें बळें कार्मुक खंडिलें ॥१८०॥
रक्षक उठिले मारामारी । कार्मुकखंडांचिया प्रहारीं । करूनि सर्वांची बोहरी । निःशंक नगरीं विचरती ॥८१॥
कंसें प्रेरिलें प्रबळ बळ । त्यासी हे दोघेचि झाले काळ । पाहतां दिसती कोमळ बाळ । परि सुरपाळ केवळ हे ॥८२॥
आणि पूतनावधादि करणी । ऐकिली होती कर्णोकर्णीं । आजिचें कर्म पाहोनि नयनीं । निश्चय मनीं दृढ झाला ॥८३॥
गगनवाणी लटिकी नोहे । कंसा वधिती हे निःसंदेह । ऐसे जनांचे समुदाय । मोहस्नेहें झळंवती ॥८४॥
तयोर्विचरतोः स्वैरमादित्योऽस्तमुपेयिवान् । कृष्णरामौ वृतौ गोपैः पुराच्छकटमीयतुः ॥२३॥
असो नगरजनाची वार्ता । रामकृष्ण पुरीं विचरतां । कोणी नाहीं पुरे म्हणतां । स्वेच्छा स्वसत्ता क्रीडती ॥१८५॥
ठायीं ठायीं उभे ठाती । गोपवेष्टित रामश्रीपती । स्वनगरींचें लावण्य xxx । जनपदगतिसमवेत ॥८६॥
कोठें सविनोद हांसती । कोठें सुरस्वर आलापिती । कोठें छंद प्रबंध गाती । कोठें पाहती पुरललना ॥८७॥
रामकृष्णवयस्यमांदी । येती जे जे राजबिदीं । तेथ नरनारीजनवृंदीं । कोंदाकोंदी दाटणी ॥८८॥
ऐसे स्वेच्छा विचरतां पुरीं । कोणी पुरे हे सूचना न करी । तंव अस्ता गेला शार्वरारि । जाली शर्वरी रतिरुचिरा ॥८९॥
आविसाळिया परतले पक्षी । शब्दविरामें बैसले वृक्षीं । मिथा गोवत्सांचा लक्षीं । ध्वनि गोउक्षीं सकाम ॥१९०॥
द्यावाभूमी रविभाववस्त्र । फेडूनि नेसली तमसांबर । रूपानुलब्धि दरिद्र । क्रमिती नेत्र दीपाश्रयें ॥९१॥
दोहना उदित बल्लवगण । दुग्धलाभातें लक्षून । बिडाळें चरणाभंवतें भ्रमण । करिती घर्षण स्वमौळें ॥९२॥
मार्तंडमंडलविरहातुरा । पद्मिनी अवगल्या निम्लोचमुद्रा । जोत्स्ना समुदित देखोनि चंद्रा । फुल्लारवक्त्रा कुमुदिनी ॥९३॥
रजनीमुखीं युवयुवती । आनंदनिर्भर होय दंपती । वरवियोगें विरहज्योति । करपे चित्तीं पतिव्रता ॥९४॥
शुकसारिका निद्राभूत । कौशिक पिंगळे निशि पंडित । साग्निक होमशाळे आंत । करिती त्वरित उद्धरणें ॥१९५॥
संध्यावंदनें करिती विप्र । प्रदोष जाणोनि मौनस्थ छात्र । त्रिषवणी वनस्थ यतीश्वर । व्रती तत्पर स्वकर्मा ॥९६॥
उडुगण प्रकाशले अंबरीं । दीपप्रचुर मथुरापुरी । रामकृष्ण ते अवसरीं । पुरीबाहेरी निघाले ॥९७॥
उडुगणवेष्टीत जैसा चंद्र । कीं सुरवरमंडित जैसा शक्र । किंवा त्रिदशार्चित विधिहरिहर । तेंवीं सानुचर निघाले ॥९८॥
एक साग्रज कृष्ण पथीं । गोप सेविती किंकरवृत्ती । वेत्रपाणि पुढें खोलती । पष्ठीं येती अनुगत्वें ॥९९॥
एक चामरधर देवढे । एक बिरुदें पढती पुढें । एक वर्णिती पवाडे । दिअत्य गोडे वधिले ते ॥२००॥
पूतनेचा धरिला घोंट । चरणघातें भंगिला शकट । तृणावर्ताचा रगडूनि कंथ । वदिला दृष्ट श्रीकृष्णें ॥१॥
उन्मळिले यमलार्जुन । अघबकवत्सासुरभंजन । कृष्णें केलें कालियामर्दन । बळें रिघोन यमुनेंत ॥२॥
कृष्णें प्राशिला पावक । रामें रगडिला धेनुक । ऐसे पवाडे अनेक । झडती निःशंक संवगडे ॥३॥
जेथ लाविले होते शकट । नंदप्रमुख गौळी श्रेष्ठ । तेथ जाते झाले प्रकट । धीर उद्धट प्रतापी ॥४॥
राजसदनीं मारामारी । करूनि आले बिढागारीं । निर्भय निःशंक अंतरीं । राममुरारी प्रतापें ॥२०५॥
लावण्यलक्ष्मीमंडित पूर्ण । श्रीकृष्णाचें सस्मित वदन । सादर पाहता निवाले नयन । आप्त स्वजन हरिखेले ॥६॥
गोप्यो मुकुन्दविगमे विरहात्रा यु आशासताऽशिष ऋता मधुपुर्यभूवन् ।
संपश्यतां पुरुषभूषणगात्रलक्ष्मीं हित्वेतरान्नु भजतश्चेकमेऽयनं श्रीः ॥२४॥
म्हणती मुकुंद व्रजाबाहेरी । निघते समयीं विरहातुरी । आशीर्वादात्मक वैखरी । गोपसुंदरी ज्या वदल्या ॥७॥
म्हणती मधुपुरीमाझारी । सुखतम होती आजिच्या रात्री । अवलोकितां डोळेभरी । चारुगात्री श्रीकृष्णाची ॥८॥
आणि आजिचिया प्रभाता । तेथ होती सुखरूपता । मुकुंदलावण्यलक्ष्मी पाहतां । नेत्रां पुरता ध्रुवलाभ ॥९॥
त्यांचिया दृष्टि सुखतम होती । ऐसी गोपींची भारती । सत्य झाली ऐसें म्हणती । कोणे प्रतीती म्हणाल ॥२१०॥
सकळ पुरुषांचें भूषण । तो हा प्रत्यक्ष श्रीभगवान । ज्याची तनुशोभा पाहून । लक्ष्मी आपण अनुसरली ॥११॥
उपेक्षूनि ब्रह्मादि अमर । ज्याच्या चरणाचा आधार । रमा आश्रयिती झाली सधर । सुखसागर तो कृष्ण ॥१२॥
रमामोहनकरशरीरे । मथुरेमाजी ज्यांचे नेत्र । पहाती ते ते सुखसागर । म्हणोनि धन्यतर होतील ॥१३॥
ऐशा गोपींच्या आशिषोक्ति । आठविल्या पैं स्वजनीं आप्तीं । तंव रामकृष्णादिकीं समस्तीं । केली विश्रांति ते ऐका ॥१४॥
अवनिक्तांघ्रियुगलौ भुक्ता क्षीरोपसेचनम् । ऊषतुस्तां सुखं रात्रिं ज्ञात्वा कंसचिकीर्षितम् ॥२५॥
नाट्यवसनें विसर्जून । स्वच्छ करपद प्रक्षाळून । करिते झाले मग भोजन । दुग्धोदन सपर्पट ॥२१५॥
ऐसे समस्त गोपगडी । जेविले ज्या जैसी आवडी । शेषरात्रीमाजीवडीं । निद्रा केली समस्तीं ॥१६॥
परमानंदें क्रमूनि रजनी । ब्रह्ममुहूर्तीं चेइले शयनीं । कंसमनोगत विवंचूनी । उठिले दोन्ही उल्हासें ॥१७॥
आतां कंसाकडील मातु । त्याचे मनींचा कर्तव्यहेतु । ज्ञानी कृष्णासी झाला विदितु । तो वृत्तांतु अवधारा ॥१८॥
धनुष्यभंगरक्षकघात । ऐकोनि क्षोभला भोजनथ । तेणें रामकृष्णांच्या वधार्थ । बळ अद्भुत पाठविलें ॥१९॥
रामकृष्णांतें वधूनि रणीं । परतोनि येतील वीरश्रेणी । ऐसा कंस अंतःकरणीं । निश्चय म्हणोनि संतुष्ट ॥२२०॥
तंव अकस्मात कुणपें क्षिति । देखता झाला भोजपति । आणि नगरींची वार्ता दूतीं । यथानिगुती निरूपिली ॥२१॥
राया व्रजींचे नंदकुमर । वेष्टित संवगडियांचा भार । प्रवेशले मथुरापुर । तृतीय प्रहर न भरतां ॥२२॥
रूप लावण्य गुण चातुर्य । कळाकौशल्य शौर्य धैर्य । ठाणमाण शब्दमाधुर्य । पुरजन आर्य विलोकिती ॥२३॥
लीलारसिकता देखोनि त्यांची । मनें वेधती वनितांचीं । धनी न पुरे लोचनांची । मानिती जन्माची सफलता ॥२४॥
ऐसा जनासी झाला वेध । तंव पातला वनितावृंद । त्यांचे हृदयींचा परमानंद । कथनीं मंद सरस्वती ॥२२५॥
एक पातल्या भोजनत्यक्ता । एक पातल्या तैलाभ्यक्ता । एक पातल्या वस्त्रविमुक्ता । परमानुरक्ता हरिरूपीं ॥२६॥
एकी बाणल्या विपरीतभूषा । एकी पातल्या विमुक्तकेशा । मनें विस्मिता जनोपहासा । पाहती परेशा पूर्णत्वें ॥२७॥
ऐसिया तटस्थ झाल्या नारी । उभ्या माडिया गोपुरशिखरीं । भित्तिप्रांगणीं बाजारीं । चित्रापरी अचंचळ ॥२८॥
नारीनर नागरजनें । भुलोनि ठेलीं रूपलावण्यें । किंवा कांहीं असे टोणे । कवण्या गुणें हें न कळे ॥२९॥
राजरजक पुरचौबारा । कृष्णें मागतां नेदी चीरा । करें छेदूनि त्याचिया शिरा । वस्त्रसंभारा लूटिलें ॥२३०॥
पुढें आले वायकापाशीं । धाकें तो शरण झाला त्यांसी । वस्त्रें लेववूनि सावकासीं । तेणें सर्वांसी तोषविलें ॥३१॥
सुदामा नामें माळाकार । तेणें अर्पिले सुमनहार । वशवर्ती सर्व नागर । जाले सादर सर्वस्वें ॥३२॥
धन्य धन्य मुखें म्हणती । उपायनें समर्पिती । कोणा हृदयीं न वटे खंती । रजकघाती म्हणोनि ॥३३॥
पुरचौबारा राजवसनें । लुटितां जनपद पाहती नयनें । कोणी न करीच धांवणें । रजकप्राणें वेंचलिया ॥३४॥
ऐसे उत्पथदस्युवृत्ति । पुढें जातां राजपथीं । त्रिवक्रा भेटली अवचिती । तिसी मागती विलेपनें ॥२३५॥
तिनें मान्य करूनि शब्द । भयें वंदिले त्यांचे पद । सर्वां चर्चूनि सुगंध । परमानंद पावविले ॥३६॥
कृपावरदें स्पर्शोनि तिसी । त्रिवक्रा केली लावण्यराशि । पुढें जातां पुरजनासी । धनुर्मखासी पूसती ॥३७॥
बळें रिघोनि धनुष्यागारीं । रक्षकीं वारितां बलात्कारीं । धनुष्य उचलूनि वामकरीं । सज्ज करूनि भंगिलें ॥३८॥
रक्षक उठिले शस्त्रघातीं । धनुष्यखंडें घेऊनि हातीं । रक्षकांची केली शांति । प्रतापशक्ति अद्भुत ॥३९॥
पाहतां दिसती कोमळ बाळ । वीरवृत्तीचे प्रलय काळ । धांवण्या आलें प्रचंड दळ । तेंही तत्काळ संहारिलें ॥२४०॥
मग सांडूनि धनुष्यागार । सवें घेऊनि वयस्यभार । लीलाविनोदें पुरी समग्र । पाहत पाहत निघाले ॥४१॥
नंदादि गोप राहिले जेथें । पुन्हा परतोनि गेले तेथें । दूतीं जाणवितां कंसातें । भयें मूर्च्छेतें पावला ॥४२॥
रक्षकवध धनुष्यभंग । ऐकोनि उतरला होता रंग । दळहननादि वार्ता सांग । ऐकोनि आंग टाकिलें ॥४३॥
N/A
References : N/A
Last Updated : May 07, 2017
TOP