पुरुषैर्बहुभिर्गुप्तसमर्चितं परमार्द्धिमत् । वार्यमाणो नृभिः कृष्णः प्रसह्य धनुराददे ॥१६॥

महावीर शूर सुभट । जे कंसाचे राजभट । रक्षणा बैसले उद्भट । शस्त्रें तिखट परजुनी ॥९॥
दाविती बळप्रतापप्रौढी । बिरुदें मस्तकीं भुजादंडीं । युद्धप्रताप वदती तोंडीं । घालिती मुरडी श्मश्रूतें ॥११०॥
तोडर रुळिया रुळती पायीं । कीर्तिमुखें दोहीं बाहीं । शस्त्रास्त्र मल्लविद्या पाहीं । तेणें देहीं तमतमिती ॥११॥
ऐसे अपार वीरवाट । धनुरक्षणीं बैसले थाट । उभे बिरुदें पढती भाट । कडकडाट वीररसें ॥१२॥
वायूसी प्रवेश जेथ न घडे । दुर्गम कृतांतवदनायेवढें । तेथ आखंडलशस्त्रापाडें । चंड कोदंड मांडिलें ॥१३॥
वज्रतुल्य कठोर कोटी । विगतप्रत्यंच भूतटीं । गगनगर्भीं मध्यमुष्टि । कमठपृष्टीसम कठिन ॥१४॥
रक्तपीतहरितरंगीं । रत्नखचित मुष्टिभागीं । महाभयंकर भुजगभोगी । मखप्रसंगीं प्रतिष्ठिलें ॥११५॥
रुक्मबंदी किंकिणी घंटा । कर्कशरणरंगीं वाजटा दिठीं देखता वीरवाटां । थरके कांटा सर्वांगीं ॥१६॥
उभयभागीं इषुधि पूर्ण । तक्षकभक्षक अक्षयबाण । विद्युद्भासुर खड्ग तीक्ष्ण । कोशवर्जित द्विभागीं ॥१७॥
तदुभयपार्श्वीं द्वय खेटकें । ज्यांवरी कनकोदकाचे टिबके । मुष्टिग्रहणीं शंकु निके । वज्रमणीचे दृढतर ॥१८॥
तोमर मुद्गर परशांकुश । कुंत यमदंष्ट्र पट्टिश । गदा त्रिशूळ वरुणपाश । वज्रें चक्रें भृशुंडी ॥१९॥
ऐसी अनेक नग्न शस्त्रें । प्रतिष्ठिलीं जें पिशाचमंत्रें । पुढें विस्तीर्ण कनकपात्रें । सोपस्करें स्थापिलीं ॥१२०॥
अविकां बस्तांचे मस्तक । वनलुलाय पोत्री शशक । रोहें चितळें कुरंगप्रमुख । पिशितें अनेक विहगादि ॥२१॥
रत्नपात्रीं विविधें रुधिरें । तरुजें योगजें मद्यें अपारें । संस्कृत अन्नें बहुत प्रकारें । घृतपाचितें बहुपरीचीं ॥२२॥
अनेक पुष्पें माळा दळें । नरीकेळादि समस्तफळें । इक्षुकदळीस्तंभ सरळ । वरी कोंवळे फळघोंस ॥२३॥
धूप दीप रंगावळी । नैवेद्य तांबूल स्थळोस्थळीं । रंगदेवता विराजली । मखमंडपीं घवघवीत ॥२४॥
एवं स्वर्चित परमर्द्धिमत् । ये श्लोकपदींचा कथिला अर्थ । ऐसिये धनुर्मखशाळे आंत । बळें अच्युत निघाला ॥१२५॥
कोटि करटीं माजी सिंह । कीं खगेंद्र न गणी कोटि द्विजह्व । तैसे प्रतापें बळकेशव । पावले ठाव धनुष्याचा ॥२६॥
त्यांतें वारिती राजभट । शस्त्रें उचलोनि क्रोधिष्ठ । कृष्णें मानूनि ते फलकट । हठो बलिष्ठ प्रवेशला ॥२७॥
कराळ धनुरक्षकांच्या पंक्ति । अवघे सकोप दटाविती । त्यांतें न गणोनि कोदंड हातीं । कोणे रीतीं हरि कर्षी ॥२८॥

करेण वामेन सलीलमुद्धृतं सज्यं च कृत्वा निमिषेण पश्यताम् ।
नृणां विकृष्य प्रबभंज मध्यतो यथेक्षुदंडं मदकर्युरुक्रमः ॥१७॥

मत्तवारण इक्षुदंड । ओढी पसरूनि शुंडादंड । तेंवि पसरोनि वामदंड । चंड कोदंड आंसुडिलें ॥२९॥
मत्तकुंजर अनावर । वारितां बळेंचि घालूनि कर । इक्षुदंड ओढी शीघ्र । तेंवि घे श्रीधर कोदंड ॥१३०॥
वामकरें उचलोनि चाप । वीरां प्रकटी स्वप्रताप । लीलामात्रें दमूनि स्वल्प । गुण साटोप वाइला ॥३१॥
चाप सूदिलें वाममुष्टि । मौर्वी मर्दूनि दक्षिणांगुष्ठीं । ठकारें कर्षितां जगजेठीं । कडकडाटीं भंगलें ॥३२॥
निमेषमात्रें घेऊनि धनु । लीलेंकरूनि वाईला गुण । ओढूनि मोडिलें कडकडून । रक्षकगण पाहत पाहतां ॥३३॥
निमिषामाजी ब्रह्मांडकोटि । ज्याची स्वलीला योगभृकुटी । इच्छामात्रें घटी विघटी । तो जगजेठी ऊरुक्रम ॥३४॥
धनुष्य भंगितां कडकडाटें । भयानक शब्द उठिला नेटें । गगन भूमि दिशा दरकुटें । त्या भोभाटें कोंदलें ॥१३५॥

धनुषो भज्यमानस्य शब्दः खं रोदसी दिशः । पूरयामास यं श्रुत्वा कंसस्त्रासमुपागमत् ॥१८॥

नाद भरला सर्वांकर्णी । ऐकोनि कंसें अंतःकरणीं । मृत्युभयाची कणाणी । घेतली कानीं दचकोनी ॥३६॥
धनुश्य भंगितां राजभट । क्षोभें उठावले उद्भट । कृष्णावरी एकदाट । कडकडाट धांविले ॥३७॥

तद्गक्षिणः सानुचराः कुपिता आततायिनः । ग्रहीतुकामा आवव्रुर्गृह्यतां बध्यतामिति ॥१९॥

मुख्य मुख्य ससेवक । क्रोधें खवळले रक्षक । आततायी जे निःशंक । जे पातक न गणिती ॥३८॥
अग्नि लावितां गृहाप्रति । निरपराध जंतु जळती । त्यांची दया नुपजे चित्तीं । ते निश्चिती आततायी ॥३९॥
विष घालूनि अन्नपानीं । विश्वासें जे वधिती प्राणी । निर्घृण निष्ठुर अंतःकरणीं । ते दुर्गुणी आततायी ॥१४०॥
शस्त्रघातें घेऊनि प्राण । बलात्कारें धनापहरण । आतव्तायी ते दुर्जन । करुणाहीन कठोर ॥४१॥
पतिव्रतेचा व्रतभंग । बलात्कारें करिती संग । निर्दय निरपत्रप निलाग । कीं वृत्तिविभाग अपहर्ते ॥४२॥
ऐसे आततायी निर्घृण । तिहीं प्रतपएं वेष्टिला कृष्ण । शुकें आततायिपदें कथन । केलें नैर्घृण्यप्रशंसने ॥४३॥
रामकृष्ण कोमल बाळ । राजस सुकुमार वेल्हाळ । लावण्यलक्ष्मी सुतेजाळ । लीला रसाळ स्मेरास्य ॥४४॥
ज्याच्या लावण्यें सुरनरवनिता । खेचर भूचर जलचर सरिता । वेधूनि झालिया स्मरमोहिता । त्यांचिया घाता न सिणती जे ॥१४५॥
दया नाहींच ज्यांचे हृदयीं । ऐसे निष्ठुर आततायी । घ्या घ्या म्हणूनि उठिले पाहीं । कठोर घाईं मिसळले ॥४६॥
रामकृष्ण धरावे जित । हा सर्वांचा मुख्य हेत । एक म्हणती करा घात । हातोहात पळतील ॥४७॥
एक म्हणती धरा बांधा । एक म्हणती सवेग वधा । ऐसे बोलती सक्रोध शब्दा । रामगोविंदा वेष्टूनी ॥४८॥
यानंतरें रामकेशव । लक्षूनि दुष्ट दुरभिप्राव । सक्रोध साधूनियां आव । कैसे स्वमेव उठावले ॥४९॥

अथ तान्दुरभिप्रायान्विलोक्य बलकेशवौ । क्रुद्धौ धन्वन आदाय शकले तांश्च जघ्नतुः ॥२०॥

क्रोधावेश उठतां चित्तीं । धनुष्यखंडें दोघांहातीं । तिहीं ताडितां रक्षकांप्रति । केली समाप्ति सर्वांची ॥१५०॥
कोटिकरटी कंठीरव । मर्दी तेवीं बळकेशव । आततायी मर्दूनि सर्व । विजयोत्सवें विराजले ॥५१॥
तेणें झाला हाहाकार । भ्म्गला रक्षकांचा परिवार । धाकें पळाले किंकर । भग्नशिरःकरपदपृष्ठ ॥५२॥
कंसा म्हणती पाहें दृष्टि । बळें मोडूनि धनुष्ययष्टि । तिहीं झोडिले वीर जेठी । दाटोदांटीं पातले ॥५३॥
राया सत्वर सावध होई । मारीत आले वीर विजयी । झोडिती कोदंडखंडघायीं । सत्वर देईं जीवदान ॥५४॥
भयें वोथरूनि पाहती मागें । म्हणती राया लपवीं वेगें । थरथरां कांपती सर्वांगें । म्हणती लागें पातले ॥१५५॥
हें ऐकूनि दचकला कंस । तेणें पडला मुकुटावतंस । कोरडी पडली आननास । धैर्यें निःशेष सांडवला ॥५६॥
मग भ्रूसंकेतें हस्तखुणा । क्म्स प्रेरी पार्षदगणां। म्हणे धांवा रे धांवण्या । धरूनि आणा रिपु दोघे ॥५७॥
ऐसी नृपाची संकेतवाणी । ऐकोनि धांवल्या वीरश्रेणी । धनुष्यागारीं चक्रपाणि । चहूंकडूनि वेष्टिती ॥५८॥
एक विंधिती तिखट बाण । दुरूनि एक टाकिती पाषाण । एक म्हणती चक्रेंकरून । शिर छेदून पाडा रे ॥५९॥
कोणी परजूनि ओडणें खंडें । अपर शूळेंसीं होती पुढें । एक म्हणती धरूं रोकडे । कंसापुढें जित नेऊं ॥१६०॥
रामकृष्ण हे जीत धरा । दुसरे म्हणती जिवेंचि मारा । तिसरे म्हणती सेंबडियां पोरा । दमनीं दरारा कायसा ॥६१॥
एक झुगारिती तोमर । कोण्ही टाकिती महामुद्गर । अपर करिती परिघमार । अन्य कुठार टाकिती ॥६२॥
पहा हो कैसे आपुले पायीं । कालें आणिले मरणालयीं । मृत्यु होणार जिये भुईं । ते ते ठायीं तनु त्यजिती ॥६३॥
बापुडीं होतीं मोकळे रानीं । कर्में सिरकलीं काळवदनीं । आतां सोडवूं न शके कोण्ही । कंसापासूनि लेंकुरें ॥६४॥
एक कंसा सांगों गेले । रामकृष्ण धनुष्यशाळे । वीरीं कोंडूनि जित धरिले । भले सांपडले अडचणीं ॥१६५॥
ऐसा कंसासि समाचार । जाणविती जंव किंकर । तंव ते बलरामश्रीधर । उठिले तीव्र आवेशें ॥६६॥
दोघे कोदंडखंडायुध । मारित उठिले पैं प्रसिद्ध । शालामुखीं करूनि रोध । केला वध सर्वांचा ॥६७॥
धनुष्यशकलांचेनि प्रहारें । झोडिती वीरांचीं शरीरें । तुटोनि गेलीं पदकरशिरें । लोंढे रुधिरें तुंबळले ॥६८॥

N/A

References : N/A
Last Updated : May 07, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP