एवं स्त्रिया याच्यमानः कृष्णो रामस्य पश्यतः । मुखं वीक्ष्यानु गोपानां प्रहसंस्तामुवाच ह ॥११॥

ऐसी संप्रार्थितां वनिता । हास्यवदनें मन्मथजनिता । साग्रज सखे पहात असतां । काय करिता जाहला ॥८१॥
अवलोकूनि साग्रज सखे । कुब्जा खुणावूनि उन्मेखे । हास्य करूनि बोले मुखें । तें तूं ऐकें कुरुवर्या ॥८२॥

एष्यामि ते गृहं सुभ्रूः पुंसामाधिविकर्शनम् । साधितार्थोऽगृहाणां नः पांथानां त्वं परायणम् ॥१२॥

अवो सुभ्रू लावण्यसरिते । अभीष्टार्थ साधूनि पुरते । मग मी येईन तव गृहातें । तूं पांथातें विश्रांति ॥८३॥
अभीष्टार्थ ते म्हणाल कोण । तरी जें समल्लकंसहनन । उग्रसेनादिविमोचन । आणि सांत्वन पितरांचें ॥८४॥
ऐसा कृतार्थ होऊनियां । सदना जातां अक्रूराचिया । तैं मी गृहा येईन तुझिया । दृढनिश्चया मानावें ॥८५॥
गृहिणी नाहीं जयांप्रति । तूं त्या अपरिग्रहां विश्रांति । मार्गस्थांची मनोजआर्ति । तूं शमविसी निजयोगें ॥८६॥
दारपरिग्रह ज्यांस नाहीं । मनोभवआधि जो त्यांच्या देहीं । तो तूं शमवूनि आनंदडोहीं । निमग्न करिसी भो सुभ्रू ॥८७॥

विसृज्य माध्व्या वाण्या तां व्रजन्मार्गे वणिक्पथैः । नानोपायनताम्बूलस्रग्गंधैः साग्रजोऽर्चितः ॥१३॥

इत्यादि चटुला मधुरोत्तरी । विसर्जूनियां सैरंध्री । पुढें र्वाधुषरथ्यांतरीं । वयस्यभारी चालिला ॥८८॥
वणिकमार्गीं प्रतिदुकानीं । माळातांबूलानुलेपनीं । पूजाद्रव्यें पात्रें भरूनी । येती वाणी सामोरे ॥८९॥
साग्रज सानुचर श्रीपति । सर्वोपचारें सर्व यजिती । नाना उपायनें अर्पिती । नमस्कारिती साष्टांगीं ॥९०॥
स्तुति प्रणति प्रदक्षिणा । भावें करिती जनार्दना । तेथ दाटल्या नागरजनां । पाहतां नयनां अनिमेष ॥९१॥
ते ते ठायीं तज्जनवनिता । सादर पाहती मन्मथजनिता । हरिलावण्यें हरितां चित्ता । जाल्या मोहिता तें ऐक ॥९२॥

तद्दर्शनस्मरक्षोभादात्मानं नाविदन्स्त्रियः । विस्रस्तवासःकबरवलयालेख्यमूर्तयः ॥१४॥

पण्यश्रेणीप्रासादशिखरीं । खणोखणीं दामोदरीं । द्वारीं वप्रीं गवाक्षछिद्रीं । रथ्यांतरीं वधूदाटी ॥९३॥
नेणती पदर कोणीकडे । अवयव न म्हणती झांकले उघडे । अलंकार वेडेवांकुडे । न जनांकडे त्या पाहती ॥९४॥
सभाग्य अच्युत अर्चिती सांग । ललना लक्षिती लावण्य चांग । सबाह्य रुचलिया श्रीरंग । मनीं अनंग प्रकटला ॥९५॥
तेणें गळालीं नेसलीं वसनें । विस्रस्त केश विगलित सुमनें । श्लथ कंकणें सर्वाभरणें । द्रवलीं चिह्नें स्मरक्षोभें ॥९६॥
विलीन चेष्टा उपरमवृत्ति । सबाह्य कृष्णीं रंगल्या प्रीती । भासती लिखितचित्राकृति । कीं लेप्यमूर्ति अनिमेषा ॥९७॥
अनेक देशिकेंद्र प्रबुद्ध । वैधदीक्षेचा करिती बोध । नैसर्गिक लावण्यवेध । लाधल्या वधू हरिविरहें ॥९८॥
वारंवार हरिस्मरकथा । वधूसंबंधीं न मनी वृथा । श्रवणें मननें दुर्लभ व्यथा । छेदी सर्वथा रंगलिया ॥९९॥
उत्तमवसनीं सुवर्णतार । कीं भोजनीं साज्य पंचधार । सभाग्य घालिती वारंवार । तेंवि हरिस्मर ये ठायीं ॥१००॥
भगवद्रूपीं वेध घडे । ऐसें ज्याचीं दैव उघडें । त्याच्या सम्रणें दुष्कृत झडे । पडतां तोंडें हरिप्राप्ति ॥१॥
विषयासक्त सकाम नर । प्रेमें पढतां वारंवार । हरिगुणवस्तुमहिमा अपार । निर्विकारकारक त्यां ॥२॥
पण्यमार्गें ठाय़ीं ठायीं । साग्रज स्वर्चित शेषशायी । जातां वनितारूपनवायी । पाहतां देहीं ताटस्थ्य ॥३॥
असो यानंतरें हरि । पुढें जातां मथुरापुरीं । पौरजनांतें विचारी । कोणे मंदिरीं धनुर्मख ॥४॥

ततः पौरान्पृच्छमानो धनुषः स्थानमच्युतः । तस्मिन्प्रविष्टो ददृशे धनुरैन्द्रमिवाद्भुतम् ॥१५॥

स्वयें सर्वज्ञ षड्गुणवंत । प्राकृतांपरी पौरां पुसत । कोणे स्थानीं धनु स्वर्चित । दावा त्वरित म्हणतसे ॥१०५॥
एक दाविती भ्रूसंकेतें । एक दाविती उजव्या हातें । एकें स्वयें चालोनि पंथें । धनुःस्थानातें दाखविती ॥६॥
तेणें पथें कैटभारि । प्रवेशे धनुर्मखागारीं । शक्रकार्मुक गगनावरी । देखे त्यापरी अद्भुत पैं ॥७॥
जरी तें अद्भुत म्हणसी कैसें । तेंही कथिजेल समासें । सावध होवोनि राया परिसें । आदिपुरुषें जें दमिलें ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : May 07, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP