कंसस्तु धनुषो भंगं रक्षिणा स्वबलस्य च । वधं निशम्य गोविन्दरामविक्रीडितं परम् ॥२६॥

रामकृष्णांचें विक्रीडन । ऐकोनि कंसाचें भंगलें मन । ऐसेचि नव्हे प्रताप गहन । बळविध्वंसन ऐकोनी ॥४४॥
धनुष्य भंगोनि रक्षक । सबळ मारिले सैनिक । ऐकोनि कंसा बैसला दचक । धैर्यें निःशेख सांडवला ॥२४५॥
भरली आयुष्याची अवधि । काळ पाहतसे मरणसंधि । तदाकार जाली बुद्धि । दुश्चिह्नऋद्धि उघडली ॥४६॥

दीर्घप्रजागरो भीतो दुर्निमित्तानि दुर्मतिः । बहून्यचेष्टोभयथा मृत्योर्दौत्यकराणि च ॥२७॥

पुढें बोंब मागें धाडी । तेंवि दुर्निमित्तपरवडी । कंसा आंगीं प्रकटली उघडी । श्रोतीं सुघडी ऐकावी ॥४७॥
समीप जाणोनि मृत्युसमय । आपादमस्तक भरलें भय । यास्तव सांडितें झालें धैर्य । यवनालय जेवीं द्विजीं ॥४८॥
मृत्युभयाची काजळी पोटीं । तेणें निद्रेसी पडली तुटी । विवेकविचारीं दिधली पाठी । बुद्धि अव्हाटीं भ्रंशली ॥४९॥
तेव्हां सावध स्मृतीच नाहीं । मन पसरलें दिशा दाही । अहंकार एकला देहीं । भयप्रवाहीं बुडतसें ॥२५०॥
यालागीं भोजेंद्र दुर्मति । द्विविध दुश्चिह्नें तयांप्रति । स्वप्नामाजी आणि जागृती । प्रकट होती तें ऐका ॥५१॥
करिती मृत्यूचें दूतत्व । म्हणोनि दुर्निमित्तें त्यांचें नांव । त्यांच्या दर्शनानंतरें जीव । टाकिती ठाव मृत्यूचा ॥५२॥
अद्यापिही ऐसीं चिह्नें । प्रकट होतां जाणोनि सूचने । प्राणिगणीं भल्यांच्या वचनें । स्वहित करणें लवलाहें ॥५३॥
बहुत दुर्निमित्तें देखिलीं । त्यांमाजी जागृतीमाजी पहिलीं । श्लोकयुग्में निरूपिलीं । तें परिसिलीं पाहिजेत ॥५४॥

अदर्शन स्वशिरसः प्रतिरूपं च सत्यपि । असत्यपि द्वितीये च द्वैरूप्यं ज्योतिषां तथा ॥२८॥

शरीरीं शिर असतां सिद्ध । दिसे प्रतिच्छाया कबंध । द्विधा नसतां ज्योतिर्वृंद । भासे अबद्ध दुश्चिह्न ॥२५५॥
पाहतां एका दीपानळा । दोन्ही ऐसे भासती डोळां । गगनीं पाहतां ग्रहमंडळा । नेत्रकमळां द्वय गमती ॥५६॥

छिद्रप्रतीतिश्छायायां प्राणघोषानुपश्रुतिः । स्वर्णप्रतीतिर्वृक्षेषु स्वपदानामदर्शनम् ॥२९॥

छाया पाहतां जळीं स्थळीं । मस्तकीं अथवा वक्षःस्थळीं । सच्छिद्रता नेत्रकमळीं । दिसों लागलीं दुश्चिह्नें ॥५७॥
बोटें घालितां श्रवणपुटीं । नाद घुमघुमी ब्रह्मांडघटीं । त्या प्राणघोषाची अनुमटी । झाली शेवटीं क्म्सासी ॥५८॥
वृक्ष स्वर्णाकार वाटती । चिखलीं पाउलें नुमटती । ऐसी दुर्निमित्तें जागृती - । माजी होती तें कथिलीं ॥५९॥
सुषुप्तीवीण भ्रमभयभरें । झांपडी घाली नेत्रद्वारें । तेथें देखे स्वप्नाकारें । चिह्नें अपरें तीं ऐका ॥२६०॥

स्वप्न प्रेतपरिष्वंगः खरयानं विषादनम् । यायान्नलदमाल्येकस्तैलाभ्यक्तो दिगंबर - ॥३०॥

एकएके झांपडीपोटीं । देखे दुर्निमित्तांच्या कोटी । त्यांमाजी शुकें जे वाक्पुटीं । कथिली गोठी ते परिसें ॥६१॥
भयभ्रमें जो झांपडी घाली । तंव अवलोकी वडिलें मेलीं । त्यांसी आळंगीं स्नेहभुलीं । ओसणें बोली तच्छंदें ॥६२॥
किंवा प्रेमाथिलीं आप्तें । झांपडीमाजी तें देखे मृतें । त्यांचीं आलिंगूनियां प्रेतें । करी रुदनाते दीर्घस्वरें ॥६३॥
तेव्हां वनिता सावध करिती । घाबिरा उतरी नेत्रपातीं । म्हणे पडिलों शोकावर्तीं । कोण विपत्ति चुकवील ॥६४॥
तंव त्या प्रबोधिती कामिनी । राया सुखरूप असतां शयनीं । रुदन करिसी काय म्हणोनि । पाहें नयनीं निज वनिता ॥२६५॥
जरासंधजा अस्ति प्राप्ति । कंसांगना या आपुले हातीं । परिमार्जूनि नेत्रींप्रति । तांबूल देती सोपस्कर ॥६६॥
राया विलाससुमनशयनीं । आजि कां हे उपजली ग्लानि । काय निमित्त भोगायतनीं । सशोकवदनीं प्रलाप ॥६७॥
ऐसीं ऐकोनि वनितावचनें । कांहीं उत्तर नेदी वदनें । पुन्हा झांपडी घालूनि नयनें । अन्य दुश्चिह्नें देखतसे ॥६८॥
काळा गाढव महाथोर । त्यावरी आपण होवोनि स्वार । मागें लागले भयंकर । पळे सत्वर दक्षिणे ॥६९॥
परिघतोमरकृपाणपाणि । बोलती निष्ठुर भयंकर वाणी । तेणें भयें जल्पे वदनीं । धांवा कोणी सोडवा ॥२७०॥
सवेंचि सावध करिती जाया । म्हणती उठोनि बैसे राया । काळमृत्यूची पडली छाया । आलीं उदया दुश्चिह्नें ॥७१॥
वीणा वाहूनि गाती राग । पाहती अवशेष रात्रिभाग । तंव तो लागोनि अपांग । राहे सवेग भ्रमग्रस्त ॥७२॥
तेथें पुन्हा देखे स्वप्न । जें आपण करूनि विषभक्षण । रडत उठे वोसणोन । आलें मरण म्हणोनियां ॥७३॥
तेणें भयें दचकोनि उठे । म्हणे म्यां विष भक्षिलें खोटें । मरण पातलें वोखंटें । स्त्रिया अनिष्टें भाविती ॥७४॥
म्हणती राया घेईं उटी । सांगें प्रियतमा कांहीं गोठी । कां ये दुश्चिह्नें वोखटीं । तुझिये दृष्टीं भासती ॥२७५॥
जवादि कस्तूरी केशर । माजी संमिश्र मलयजसार । आंगीं चर्चिती सकर्पूर । दिव्य धूसर उधळिती ॥७६॥
त्रयोदशगुणी देऊनि विडा । विनोदें म्हणती आदरीं क्रीडा । तंव तो पाहे नेत्रांपुढां । भ्रमें रोकडा दुश्चिह्नें ॥७७॥
देखे आपणा उद्वसदांगीं । परम विकराळ तिहीं मांगीं । तेल माखूनियां सर्वांगीं । म्हणती वेगीं ऊठ चाल ॥७८॥
आपण नागिवा दिगंबर । कंठीं जपाउशीरहार । एकटा रासभीं होऊनि स्वार । याम्ये समोर प्रयाण ॥७९॥
भोंवते निर्भय दस्युगण । बळें करविती विषयभक्षण । ऐसा देखोनि समय कठिन । उठे ओरडोन ओसणत ॥२८०॥
तंव त्या सावध मागधतनया । म्हणती भ्रांति उपजली राया । दुर्निमित्तें आलीं उदया । कोण या समया टाळील ॥८१॥
म्हणती चिन्हीं पालट झाला । विनाशकाळ समीप आला । राजा स्मृतीचें सांडवला । न दिसे भला फलितार्थ ॥८२॥
हीं दुचिह्नें स्वप्नोद्भवें । प्रकटल्या मरण होय ठावें । अनेक असतीं यांचीं नांवें । संक्षेपभावें सूचविलीं ॥८३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 07, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP