अन्यानि चेत्थंभूतानि स्वप्नजागरितानि च । पश्यन्मरणसंत्रस्तो निद्रां लेभे न चिंतया ॥३१॥

ऐसीं जागृतीं स्वप्नीं चिह्नें । मृत्युदूतत्त्वीं ज्यांचें होणें । अनेकें देखिलीं त्यांच्या भेणें । अंतःकरणें संत्रस्त ॥८४॥
बैसली मरणाची काजळी । चिंता चिताग्नीतें पाजळी । ज्ञप्ति सुप्ति हारपली । ऐसी क्रमिली ते रात्री ॥२८५॥
न फवे विश्रांतीचा लेश । निद्रा न बणे । डोळ्यांस । दुष्टचिह्नीं मरणत्रास । तेणें सक्लेश सचिंत ॥८६॥
ऐसी क्रमिल्यानंतर निशी । सूर्य पातलिया उदयासी । पुढें कथा वर्तली कैसी । ते रायासि शुक सांगे ॥८७॥

व्युष्टायां निशि कौरव्य सूर्ये चाद्भ्यः समुत्थिते । कारयामास वै कंसो मल्लक्रीडामहोत्सवम् ॥३२॥

अस्तमानीं अस्ताचळ लंघोनि सागरीं रविमंडळ । मग्न झालें तें सांडूनि जळ । उदयाचळ वळघलें ॥८८॥
तये समयीं कंसासुर । उठिला सांवरूनियां धीर । पूर्वीं रचिला जैसा मंत्र । तदनुसार उद्युक्त ॥८९॥
सूचनामात्रें मंत्रिवर्ग । एकांतसदनीं मिनला सांग । पूर्वमंत्राचा उद्योग । अतिसवेग करविला ॥२९०॥
शत्रु आवंतूनि आणिले घरा । त्यांचें चेष्टित कां न विचारा । रजक मारूनि मथुरापुरा । माजी नागरा वेधिल्या ॥९१॥
आपुली पुरी पारखी जाली । अवघीं तच्छंदीं वेधलीं । दैवरेखा पालटली । किंवा ठाकली मर्यादा ॥९२॥
लीले करूनि दोघे वैरी । निर्भय रिघाले धनुष्यागारीं । धनुष्य मोडूनि बलात्कारीं । केली बोहरी रक्षकां ॥९३॥
साह्य प्रेरिलें बळ प्रबळ । तेंहि निवटिलें तत्काळ । फिरोनि गेले न लगतां पळ । परम चपळ प्रतापी ॥९४॥
जंव ते न वचती वृंदावना । तंव करा हो मंत्ररचना । बुद्धियुक्ति रिपुमर्दना । दीर्घप्रयत्ना न चुकावें ॥२९५॥
जंव शत्रूशीं बाळदशा । नेणती शस्त्रास्त्रविद्याभ्यासा । नाहीं बळिष्ठ नृपकुंवासा । धरिती भरंवसा स्वबळाचा ॥९६॥
ऐसे आतुडले एकाकी । आळस न कीजे यत्नाविखीं । कोणां न होतां ठाउकी । करा हो निकी रंगरचना ॥९७॥
अल्प पेटता अनळ सदनीं । सवेग विझविजे घालोनि पाणी । प्रबळ वाढल्या पुर जाळूनी । करी हानि सर्वस्वें ॥९८॥
ऐसे विषुद्रुमाचे कोंभ । सांपडले हा मानूनि लाभ । आतां उन्मूळनीं प्रगल्भ । मंत्र स्वयंभ रचा हो ॥९९॥
अंबष्ठासि सूचना करा । करूनि कुवलियापीड माजिरा । वसुदेवाच्या उभय कुमरां । वधवा द्वारामाझारीं ॥३००॥
तथापि ते जरी तेथूनि वांचिले । तरी मल्लरंगीं जाती वधिले । मल्लां सूचना करूनि वहिलें । रंगा आणिलें पाहिजे ॥१॥
मल्लक्रीडामहोत्सव । कंसें करविला प्रेरूनि सचिव । मंचा रंगरचना सर्व । कथिली स्वमेव त्यापासी ॥२॥
ऐसा मंत्रिया बोधूनि मंत्र । शौच सारूनि क्षाळिलें वक्त्र । स्नानसंध्या यथासूत्र । कंसें सत्वर विसर्जिली ॥३॥
आज्ञे सरिसी अमात्यवर्गीं । अंबष्ठ ठेवूनि द्वारभागीं । रंगरचना ते प्रसंगीं । केली सवेगीं ती ऐका ॥४॥

आनर्चुः पुरुषा रंग तूर्यभेर्यश्च जघ्निरे । मंचाश्चालंकृताः स्रग्भिः पताकाचैलतोरणैः ॥३३॥

आज्ञा ऐकोनि पुरुषवर्ग । शृंगारिता झाला रंग । चतुःशालादिविभाग । मंचकीं सांग सज्जिले ॥३०५॥
रत्नखचित रंगागार । माजी मंचावळी सुंदर । उच्च मध्यम निम्नतर । धरूनि सूत्र साधिल्या ॥६॥
महद्वितान उभवलें गगनीं । पृथगाकारें मंचश्रेणी । शृंगारिल्या खणोखणीं । गर्भवितानीं सुरंगीं ॥७॥
इंद्रगोपवर्णीं ऊर्णा । वसनें माढिलीं स्तंभावरणा । कांचनसन्निभ तगटी जाणा । ओटंगणें प्रतिमंचा ॥८॥
चित्रविचित्र रत्नरंगीं । विस्तीर्ण चित्रासनें भूभागीं । मंचा प्रतिमंचा विभागीं । कपिशासनें मृदोलिका ॥९॥
माळा तोरणें सुमनस्रजा । खणोखणीं विचित्र ध्वजा । मुक्तादामा रत्नपुंजा । खचिले वोजा वितानीं ॥३१०॥
गंधाक्षता सुमनहार । परिमळद्रव्यें दिव्यधूसर । नागवल्लीदळें सुंदर । क्रमुक खदिर सचूर्ण ॥११॥
एला लवंगा जाजीफळ । जाजीपत्री सकंकोळ । नागर काश्मीर चंद्रधवळ । पात्रें सुढाळ स्थळोस्थळीं ॥१२॥
उदकाडिया प्रतिआसनीं । स्थापिल्या पावक चेतवूनी । सोज्वळ पिकपात्रांच्या श्रेणी । अनुक्रमणी ठेविल्या ॥१३॥
गाळींव सिकता रंगांगणीं । पसरूनि मृदुल केली धरणी । लहुडी भृशुंडी बाहुतुळणीं । लेहमुद्गर स्थळोस्थळीं ॥१४॥
वज्रसार वर्तुलोपळ । उचलोनि अनुमानिजे बळ । परिघ लोहाचे विशाळ । स्थापिले स्थूळ मल्लरंगीं ॥३१५॥
ऐसी अर्चूनि रंगक्षिति । अलंकारूनि मंचपंक्ति । राजपुरुष गर्जना करिती । भेरी तुरें त्राहाटुनी ॥१६॥
करणे तुतारें नफेरी । एक त्राहाटिती कुंजरभेरी । बांके बुरंगी श्रृंगें मोहरी । शंखस्वरीं नभ गर्जें ॥१७॥
ऐसे स्वर्चित रंगस्थानीं । येऊनि बैसिजे नागरीं जनीं । ऐसी राजाज्ञा ऐकूनि । समस्त येऊनि बैसले ॥१८॥

तेषु पौरा जानपदा ब्रह्मक्षत्रपुरोगमाः । यथोपजोषं विविशू राजानाश्च कृतार्हणाः ॥३४॥

तिया रंगस्थाना माजी । जे कां उचमंचराजी । तेथ बैसका केली द्विजीं । क्षत्रसमाजीं राजन्य ॥१९॥
एके विभागीं मध्यपंक्ती । बैसल्या वार्धुषिकांच्या जाती । लहान थोर वैश्यव्यक्ति । यथासंपत्ति सम्मानें ॥३२०॥
त्याहूनि अवर मंचश्रेणी । तेथ बैसका कनीयजनीं । तैशाच नारी प्रासादभुवनीं । पिहितासनीं बैसलिया ॥२१॥
साधारणा ज्या पौरा नारी । वृद्धा प्रगल्भा सभेमाझारी । बैसत्या झाल्या निजाधिकारीं । स्वल्प अंतरें पृष्ठीसीं ॥२२॥
यथावकाशें यथाधिकारें । यथासंतोषें बैसले सारे । राजमंच राजेश्वरें । मंडळेश्वरां निरोपिले ॥२३॥
एवं राजमंच श्रेणी । विराजमाननृपासनीं । कंस सामात्य सिबिकायानीं । कैसा येऊनि बैसला ॥२४॥

कंसः परिवृतोऽमात्यै राजमंच उपाविशत् । मंदलेश्वरमध्यस्थो हृदयेन विदूयता ॥३५॥

किरीटकुंडलें कंठमाळा - । वेष्टित अमात्यपार्षदमेळा । सिबिकायानीं रंगस्थळा । कंस पातला तुरगजरीं ॥३२५॥
चामरें रत्नदंडी द्विभागीं । सेवक वीजिती कंसालागीं । एक धांवती लागवेगीं । सूचना लिंगीं सुचविती ॥२६॥
भोजेंद्र जाणोनि सन्निध । आसनें सांडूनि सामंतवृंद । बद्धांजळी नमिती पद । भंवते पार्षदसम ठाती ॥२७॥
उच्चमंचीं भोजभूवर । भोंवते बैसले मंडलेश्वर । मंत्री सचिव अमात्यनिकर । यथाधिकार बैसले ॥२८॥
एक निटाविती राजवसनें । एक अर्पिती माळा सुमनें । हार अवतंस मुकुटरत्नें । सरसाविती पैं एक ॥२९॥
विलेपनें चर्चिती दिव्यें । एक उधळिती परिमळद्रव्यें । सुगंधतैलीं माखिती आघवे । कुंतळगुच्छः सश्मश्रु ॥३३०॥
सुवर्णवर्णी तांबूलपत्रें । सर्वोपचारीं भरूनि पात्रें । नृपासनाप्रति विचित्रें । स्थापिती करें अनुयायी ॥३१॥
ष्ठीवनपात्रीं धरिती पिका । हस्तांशुकीं पुसिती मुखा । दर्पण पाहोनि पावती तोखा । तेथ कंस एकां हृत्ताप ॥३२॥
बैसला असतां सिंहासनीं । भय संताप अंतःकरणीं । दुर्निमित्तें स्मरती मनीं । तेणें कणाणी सर्वांगीं ॥३३॥
तंव शण्णवति विविधें तुरें । मल्लरंगीं तालगजरें । खाखाइलीं उच्चस्वरें । वीरश्रीवारें प्रकाशिती ॥३४॥

N/A

References : N/A
Last Updated : May 07, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP