अध्याय ४५ वा - श्लोक १ ते ५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
श्रीशुक उवाच - पितरावुपलब्धार्थौ विदित्वा पुरुषोत्तमः ।
मा भूदिति निजां मायां ततान जनमोहिनीम् ॥१॥
चव्वेचाळिसाव्याचिये अंतीं । वसुदेवदेवकी सांडूनि भ्रांति । रामकृष्णांतें वंदिती । ईश्वरमूर्ति जाणोनी ॥२५॥
पुत्र म्हणोनि न देती क्षेम । म्हणती केवळ हें परब्रह्म । ऐसी जाणोनि विगतभ्रम । पुरुषोत्तम मनीं विवरी ॥२६॥
पुत्रदर्शनावाप्तिसुख । त्याहूनि उत्कृष्ट पारमार्थिक । केवळ ईश्वर आत्मतोक । झालीं सम्यक लब्धार्थें ॥२७॥
पुत्रावाप्तीचा जो हरिख । अविद्यासंभ्रम सांसारिक । वास्तवज्ञानें पारमार्थिक । कैवल्यसुख अनुभविती ॥२८॥
ऐसीं लब्धार्थें जाणोनि पितरें । झणें हें होती भजनपरें । म्हणोनि स्वमाया जगदीश्वरें । चमत्कारें पसरिली ॥२९॥
जिये मायेचें मोहन । पावोनि भ्रांत अवघे जन । नोळखे आपणा आपण । विषयाचरण प्रिय मानीं ॥३०॥
तये मायेचा पडतां पडदा । आनंद झाला बळगोविंदा । मग पितरांच्या निरसिती खेदा । मृदु अनुवादा करूनियां ॥३१॥
उवाच पितरावेत्य साग्रजः सात्वतर्षभः । प्रश्रयावनतः प्रीणन्नंब तातेति सादरम् ॥२॥
दैवी संपत्तिसंपन्न । अनन्यबोधें ज्यांचें भजन । सात्वत ऐसें त्यां अभिधान । करिती सेवन ते ज्याचें ॥३२॥
तो श्रीकृष्ण ऋषीकेशी । साग्रज म्हणिजे बळरामेंसीं । येवोनि जननीजनकांपासीं । संतोषासी पाववित ॥३३॥
बद्धांजळि नम्र माथा । आदरें म्हणे अंब ताता । तुमच्या स्नेहासी उत्तीर्णता । आम्ही सर्वथा हो न शकों ॥३४॥
नामस्तो युवयोस्तात नित्योत्कंठितयोरपि । बाल्यपौगंडकैशोराः पुत्राभ्यामभवन्क्कचित् ॥३॥
आम्हांनिमित्त तुमचें चित्त । अहोरात्र हृद्रोगवंत । कैसे आसती उभय सुत । म्हणोनि संतत श्रम पावां ॥३५॥
रात्रिदिवस आमुच्या ठायीं । तुमचें हृदय वेधलें पाहीं । तेणें स्वप्नामाजीही कांहीं । सुखनवाई नानुभवां ॥३६॥
अभ्रें झांकतां मार्तंड । मुकुळित होय पद्मिनीखंड । तेंवि पूतनादि विघ्नें चंड । जाणोनि अखंड झुरतसा ॥३७॥
आम्हांवरी पदतां विघ्नें । तुम्हां जाकलिती दुःखस्वप्नें । जागृतीमाजी तीं स्मरोनि रुदनें । करूनि क्लिन्नें तुम्ही झालां ॥३८॥
आम्हांपासूनि पुत्रसुख । तुम्ही नेणांचि निःशेष । बाल्य पौगंड कैशोरिक । वयसा फोक वेंचल्या ॥३९॥
नाहीं पूजिली षष्टिका । नेणां दशरात्रोत्सव निका । पुरंध्री घालिती पल्लका । त्या संतोषा न भोगिलें ॥४०॥
नाहीं घडलें नामकरण । जातकर्मादि स्वस्तिवाचन । पुरंध्रीतोषण द्विजार्चन । अभीष्टदान अघटित ॥४१॥
नाहीं खेळविलें उत्संगीं । सुख न फवेचि कृताभ्यंगीं । स्तन्य देवोनि अंगसंगीं । सर्वभोगीं न निवां हो ॥४२॥
आंग्या टोप्या पिंपळपानें । श्रवणभूषणें नेत्रांजनें । सालंकृतें पुत्रवदनें । नाहीं नयनें देखिली ॥४३॥
पुत्र रिंगतां प्रांगणीं । सस्निग्ध पाहोनियां नयनीं । परमानंद अंतःकरणीं । तुम्हां लागोनि दुर्लभ तो ॥४४॥
स्मिताननें कलभाषणें । बाळकांचिया गमनागमनें । परमानंद भोगिजे मनें । तुम्हांकारणें तो न फवे ॥४५॥
नाहीं वदन कुरवाळिलें । नाहीं हृदयीं आलिंगिलें । नाहीं हस्तीं संस्तोभिलें । नाहीं देखिलें क्रीडेतें ॥४६॥
पयाज्यमिश्रित भरूनि वाटी । लावूनि पुत्राचिये ओंठीं । परमानंद भोगिजे पोटीं । तुम्हां ते गोठी न फवली ॥४७॥
जेवितां सवें घेऊनि बाळ । नाहीं मुखीं घातले कवळ । बाळतृप्तीचा सुखकल्लोळ । तुम्हां केवळ न भोगला ॥४८॥
नाहीं परिमार्जिलीं गात्रें । क्रीडा नाहीं देखिली नेत्रें । वाळे वांकी परिसोनि श्रोत्रें । सुखासि पात्रें न झालां ॥४९॥
कुमारांची हे कौमार्यलीला । तुम्हीं नाहीं देखिली डोळां । पौगंडवयसेचा सोहळा । नाहीं भोगला तुम्हांसी ॥५०॥
आम्हां पुत्रांचें किशोरपण । न देखती तुमचे नयन । आम्हांनिमित्त दृढबंधन । यालागीं उत्तीर्ण हों न् शकों ॥५१॥
कोणे समयीं कोणे ठायीं । तुम्हां पुत्रसुख फावलें नाहीं । एवं आम्हीच निर्दैवदेही । ऐका तेंही निरूपण ॥५२॥
न लब्धो दैवहतयोर्वासो नौ भवदंतिके । या बालाः पितृगेहस्था विंदंते लालिता मुदम् ॥४॥
कैसें आमुचें दैव कुडें । तेणें विघडिलों कैवाडें । नाहीं क्रीडलों तुम्हांपुढें । सुखसुरवाडें स्वानंदें ॥५३॥
मातापितरांच्या छायेसी । वाढतां आह्लाद बाळकासी । नाहीं भोगला तो आम्हांसी । झालों परदेशी दुर्दैवें ॥५४॥
बाळक्रीडा देखूनि नयनीं । उह्लासती जनकजननी । धांवोनि घेती पैं उचलोनी । स्नेहें द्रवोनि आलिंगिती ॥५५॥
तया सुखाच्या पडिपाडीं । तुळणा न देखों ब्रह्मांडीं । नित्य नूतन घडिघडी । आनंद्कोडी भोगिती ॥५६॥
पितृगेहीं जीं वाढती बाळें । तीं हे भोगिती सुखसोहळे । आम्हां विघडिलें दैवें विफळें । नाहीं भोगिलें सांनिध्य ॥५७॥
विफळ तुमचें ही प्रारब्ध । आमुचें दुर्दैव तों प्रसिद्ध । म्हणोनि उभयतांही खेद । नेणों आह्लाद परस्परें ॥५८॥
तुमच्या उपकारा उत्तीर्ण । शताब्दपर्यंत वांचल्या जाण । होऊं न शकों हें व्याख्यान । करी श्रीकृष्ण तें ऐका ॥५९॥
सर्वार्थसंभवो देहो जनितः पोषितो यतः । न तयोर्याति निर्वेशं पित्रोर्मर्त्यः शतायुषा ॥५॥
जन्मांतरींचें कर्म दुष्ट । यास्तव भोगिले वियोगकष्ट । येही जन्मीं दुरदृष्ट । सेवा अभीष्ट घडों नेदी ॥६०॥
मनुष्यदेहीं जन्मोनि नर । शताब्ध वांचल्याही समग्र । मातापितरांचा उपकार । नोहे अणुमात्र उत्तीर्ण ॥६१॥
काय म्हणोनि म्हणाल ऐसें । तरि ते ऐका स्वस्थमानसें । पित्रुऋणासी उत्तीर्ण कैसें । केंवि पुरुषें न होइजे ॥६२॥
सुकृताचरणानुष्ठान । चतुर्विधपुरुषार्थसाधन । देहाधारें घडे पूर्ण । जनकापासून तो देह ॥६३॥
स्ववीर्यदान गर्भधारण । नवमासवरी क्लेशसहन । अन्नपाननिद्रेवीण । नित्य नूतन वेदना ॥६४॥
पुढें जन्मकाळींचे कष्ट । गर्भ गर्भिणी भोगी वरिष्ठ । जन्म पावल्या तनु लघिष्ठ । इष्ट अनिष्ट अनभिज्ञ ॥६५॥
ऐशिया गर्भगोळाप्रति । माता वाढवी स्नेहाभिव्यक्ति । आपुली विसरोनि विश्रांति । अहोरात्रि तन्निष्ठ ॥६६॥
बाळकाच्या मळमूत्रवमनीं । माता जेवितां न शिणे मनीं । अहोरात्र स्तन्यपानीं । न मनी ग्लानि तत्क्लेशें ॥६७॥
बाळग्रहादि रोग विविधा । दशननयनरुदनबाधा । देवी गोंवर सोशितां कदा । जनकें खेदा न पवती ॥६८॥
रक्तरेतें जठरीं जनन । स्तन्यें अन्यें तनुपोषण । रुग्णकाळीं भेषजदान । मळादिसहन सर्वदा ॥६९॥
ज्याच्या रक्तमांसांचा देह । तदाधारें पुरुषार्थसमूह । त्या पितरांसि उत्तीर्णार्ह । कोण निर्वाह सांगपां ॥७०॥
देह वांचव्या शताब्दवरी । पूर्ण ऐश्वर्य असतां घरीं । तथापि उत्तीर्णतेची परी । नसे संसरीं घटिकेची ॥७१॥
ऐसियां जननीजनकांप्रति । ऐश्वर्यशरीरें जे वंचिती । तयां पापिष्ठां नरकावाप्ति । स्वमुखें श्रीपति बोलतसे ॥७२॥
N/A
References : N/A
Last Updated : May 08, 2017
TOP