अध्याय ४५ वा - श्लोक १७ ते २०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
कृष्णसंकर्षणभुजैर्गुप्ता लब्धमनोरथाः । गृहेषु रेमिरे सिद्धाः कृष्णरामगतज्वराः ॥१७॥
रामकृष्ण जे महाभुज । ब्रह्मांडभरितप्रतापतेज । त्यांचे छायेसि स्वगोत्रज । सहजीं सहज निवाले ॥३३॥
आपुलाले पाळूनि देश । प्रजासि देऊनि संतोष । लाहोनि पूर्ण मनोरथांस । पूर्वश्रमास विसरले ॥३४॥
झाडोझाडीं देशोदेशीं । कंसें लाविले जे भिकेसी । रामकृष्णें त्या कष्टांसी । निरसूनि स्ववासीं निवविले ॥१३५॥
रामकृष्णांचे कृपेंकरून । ज्यांचा निरसिला समस्त शीण । सदा सर्वदा सुखसंपन । सेविती कृष्ण कुरुवर्या ॥३६॥
वीक्ष्यंतोऽहरहः प्रीताः मुकुंदवदनांबुजम् । नित्यं प्रमुदितं श्रीमत्सदयस्मितवीक्षणम् ॥१८॥
श्रीकृष्णाचें वदनांबुज । नित्य नूतन तेजःपुंज । पाहतां नयनें प्राशिती सहज । नाचती भोज सप्रेमें ॥३७॥
कृष्णवदनाब्ज म्हणाल कैसें । नित्य प्रमुदित जें उह्लासें । लावण्यलक्ष्मी सदयहास्यें । आपांगमोक्षें विराजित ॥३८॥
म्हणाल मुकुंदवदनारविंद । अनुदिन नयनीं प्राशितां स्निग्ध । कोण तो लाभ त्यां उपलब्ध । तरी तो प्रसिद्ध अवधारा ॥३९॥
तत्र प्रवयसोऽप्यासन्युवानोऽतिबलौजसः । पिबंतोऽक्षैर्मुकुंदस्य मुखांबुजसुधां मुहुः ॥१९॥
चंद्रमंडळींच्या अमृतधारा । चकोर प्राशिती नेत्रद्वारा । कोणा न होती जरी गोचरा । तरी चकोरां तोषविती ॥१४०॥
तैसा हरिमुखपंकजरस । जे जे सेविती वृद्धप्रवयस । आंगीं तारुण्य बाणे त्यांस । बळें विशेष तेजस्वी ॥४१॥
वृद्ध जरठ झाले तरुण । वीर्यबळिष्ठ प्रतापपूर्ण । धैर्य शौर्य गांभीर्य गुण । दया दाक्षिण्य द्युतिमंत ॥४२॥
भगवन्मुखाविंदामृतें । इत्यादि गुणाढ्य झाले पुरते । तंव तंव प्रेमादरें बहुतें । हरिवदनातें प्राशिती ॥४३॥
नेत्रद्वारा अतिसादर । हरिमुखपीयूष वारंवार । प्राशनालागीं अतितत्पर । लहान थोर सर्वदा ॥४४॥
असो यादवांची हे कथा । कृष्णें सम्मानिलें समस्तां । यानंतरें झाला येता । व्रजप होता त्या ठायीं ॥१४५॥
अथ नंदं समासाद्य भगवान्देवकीसुतः । संकर्षणश्च राजेंद्र परिष्वज्येदमूचतुः ॥२०॥
देवकीतनय श्रीभगवान । सहित अग्रज संकर्षण । नंदादि व्रजयूथा जाऊन । क्षेमा कवळून बोलती ॥४६॥
ऐकें राया कौरवपति । क्षेम देऊनि नंदाप्रति । स्वमुखें स्मरोनियां उपकृति । बोले श्रीपति मृदुवाक्यें ॥४७॥
N/A
References : N/A
Last Updated : May 08, 2017
TOP