अध्याय ४५ वा - श्लोक ४१ ते ४५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


जलमाविश्य तं हृत्वा नापश्यददुरेऽर्भकम् । तदंगप्रभवं शंखमादाय रथमागतम् ॥४१॥

आज्ञा देऊनि सागराप्रति । जळीं प्रवेशला श्रीपति । मारूनि पंचजन दुर्मति । पाहे निगुती तज्जठरीं ॥२३॥
गुरुसुत तेथें न देखतां । ज्ञानीं पाहोनि मन्मथजनिता । पंचजनांग वागविता । जाला तत्त्वता आयुधार्थ ॥२४॥
तो पांचजन्य शंख करीं । घेऊनि बाहेर आला हरि । वेगीं बैसोनि रहंवरीं । त्वरें यमपुरीं ठाकिली ॥४२५॥

ततः संयमनीं नाम यमस्य दयितां पुरीम् । गत्वा जनार्दनः शंखं प्रदध्मौ सहलायुधः ॥४२॥

त्यानंतरें ते संयमनी । यमाची प्रियतम राजधानी । तेथ जाऊनि चक्रपाणि । स्फुरिला वदनीं पांचजन्म ॥२६॥
हलायुधेंसीं जनार्दन । संयमनी अधिष्ठून । मुखें स्फुरिला पांचजन्य । यम ऐकोनि साशंक ॥२७॥

शंखनिह्रादमाकर्ण्य प्रजासंयमनो यमः । तयोः सपर्यां महतीं चक्रे भक्त्युपबृंहिताम् ॥४३॥

भूतमात्रां तें संयमिता । तेणें पांचजन्य ऐकतां । हृदयीं झाला दचक धरिता । आला तत्त्वता भेटीसी ॥२८॥
रामेंसहित चक्रपाणि । वंदिता झाला लोटांगणीं । बैसवूनियां दिव्यासनीं । प्रेमें अर्चनीं प्रवर्तला ॥२९॥
बळपूर्वक जनार्दन । उभयतांचे क्षाळूनि चरण । तीर्थ मस्तकीं अभिवंदून । केलें प्राशन सद्भावें ॥४३०॥
नीलकौशेयपीतांबरें । नेसवूनियां अत्यादरें । क्षीराब्धि अरुणरंगाकारें । उत्तरीयार्थ अर्पिलीं ॥३१॥
मुकुट कुण्डलें मेखळा । केयूराम्गदें बाहुयुगला । जडित मुद्रिका दशांगुळां । कटकें तेजाळ अर्पिलीं ॥३२॥
वैजयंती कौस्तुभमणि । प्रभे लोपवी दिनमणि । वांक्या नूपुरें अंदु चरणीं । त्वाष्ट्रघडणी सुघटित ॥३३॥
अर्पूनियां गंधाक्षता । माला सुमनें वाहिलीं माथां । सधूप एकारती होतां । पात्रीं अमृता ओगरिलें ॥३४॥
अर्पूनि नैवेद्य फलतांबूल । हेमरत्नें दक्षिणा बहळ । पुष्पांजळि अर्पूनि अमळ । जोडोनि करतळ अभिवंदी ॥४३५॥
भक्तियुक्त महापूजा । यमें करूनि ऐसिया वोजा । प्रार्थिता झाला गरुडध्वजा । तें कुरुराजा अवधारीं ॥३६॥

उवाचावनतः कृष्णं सर्वभूताशयालयम् । लीलामनुष्य हे विष्णो युवयोः करवाम किम् ॥४४॥

नम्रकंधरें बद्धांजळि । म्हणे श्रीकृष्ण वनमाळी । आजि आपुल्या चरणकमळीं । सनाथ केली संयमनी ॥३७॥
ब्रह्मादि अमरांचिये मुकुटीं । व्यापक विष्णु तूंचि जगजेठी । लीलेकरूनि मनुष्यनटीं । सुरसंकटीं नटलासी ॥३८॥
जे कां सर्वभूताशय । तूं तयांचा वसता ठाय । विश्वप्रभव तूं अव्यय । जगन्मय जगदात्मा ॥३९॥
तुमचें काय मी करूं दास्य । आज्ञापिजे किंकरास । सेवाहीन तरी पोष्य । लागे अवश्य पोसावें ॥४४०॥
तुमच्या सेवेच्या अधिकारा । आज्ञापिजे मज किंकरा । सेवेविषीं जरी अपुरा । तरी दातारा अनुपेक्ष ॥४१॥
ऐसी विनीत यमाची वाणी । परिसोनियां पंकजपाणि । काय्बोलिला तें कुरुमणि । सावध श्रवणीं परिसावें ॥४२॥

श्रीकृष्ण उवाच - गुरुपुत्रमिहानीतं निजकर्मनिबंधनम् । आनयस्व महाराज मच्छासनपुरस्कृतः ॥४५॥

यमासि म्हणे गरुडध्वज । भूतशास्ता तूं महाराज । आमुचें इतुकें सांगणें तुज । तें त्वां काज करावें ॥४३॥
गुरुपुत्र येथें त्वां आणिला । जो कां निजकर्में बांधला । यदर्थीं अपराध नाहीं तुजला । विदित मजला हें सर्व ॥४४॥
आतां ममाज्ञा वंदूनि शिरीं । गुरुसुत आणूनि दे झडकरी । कर्मनिर्मुक्त करिता हरि । हें अंतरीं जाणोनी ॥४४५॥
ऐसें बोलतां कृष्णनाथा । यमें आज्ञा वंदिली माथा । गुरुपुत्रातें आणूनि देता । झाला तत्वता उह्लासें ॥४६॥

N/A

References : N/A
Last Updated : May 08, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP