अध्याय ४५ वा - श्लोक ३६ ते ४०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


अहोरात्रैश्चतुःषष्ट्या संयत्तौ तावतीः कलाः । गुरुदक्षिणयाऽऽचार्यं छंदयामासतुर्नृप ॥३६॥

शैवतंत्रीं ज्या कळा कथिल्या । त्या येथ जाती निरूपिल्या । श्रोतीं पाहिजे श्रवण केल्या । अभ्यासिल्या अवगमती ॥६४॥
सप्तस्वरीं गायनकळा । सप्तताल वाद्यकळा । भावसाहित्य नृत्यकळा । नाट्यकळा तौर्यत्रिक ॥३६५॥
विशेषकच्छेद्य कृंतनकळा । आलेख्यरंजनी लेखनकळा । तंडुलकुसुमविकारकळा । सपर्याविधिप्रकरणीं ॥६६॥
करकौशल्यें पुष्पास्तरण । दशनवसनांगरंजन । मणिभूमिकाकर्म गहन । शयनरचन अकरावें ॥६७॥
उदकवाद्य उदकघात । चित्रयोग अत्यद्भुत । माल्यग्रथनविकल्प येथ । शेखरापीडयोजना ॥६८॥
षोडशी कळा नेपथ्ययोग । सत्रावी ते कर्णपत्रभंग । सुगंधयुक्तीचा प्रसंग । कळा सांग अठवावी ॥६९॥
भूषणयोजना ऐश्वर्यजाळ । कौचुमारयोगकौशल्य । हस्तलाघव सुचापल्य । बाविसावी हे कळा ॥३७०॥
चित्रशाकाव्यंजनादि या । अपूपभक्ष्यविकारक्रिया । तेविसावी कळा राया । तुज लागूनि हे कथिली ॥७१॥
पानकरसरागासव - । योजना कळा हे अपूर्व । सूचिवायकर्म सर्व । कळा स्वमेव पंचविसावी ॥७२॥
सव्विसावी सूत्रक्रीडा । डमरुवीणादि वाद्य सुघडा । प्रहेलिका कळा प्रौढा । अठ्ठाविसावी जाणिजे ॥७३॥
एकोणतिसावी ते प्रतिमाळा । दुर्चंचकयोग तिसावी कळा । पुस्तकवाचन कुरुभूपाळा । जाणिजे कळा एकतिसावी ॥७४॥
नाटकारव्यायिकादर्शन । काव्यसमस्यापूरण । पट्टिकाविकल्पवेत्रबाण । तर्ककर्मादि पंचतिस ॥३७५॥
तक्षण आणि वास्तुविद्या । रूपरत्नपरीक्षा शुद्धा । आकरज्ञान धातुवादा । मणिरागादिज्ञानकळा ॥७६॥
वृक्षआयुर्वेद सिद्ध । मेषकुक्कुटलावकयुद्ध । शुकसारिका पढवें शुद्ध । चव्वेताळिसावी ही कळा ॥७७॥
उत्सादन केशमार्जन । आणि अक्षरमुष्टिकाकथन । म्लेच्छितकुतर्कविकल्प जाण । भाषाज्ञान देषभव ॥७८॥
पन्नासावी पुष्पशकटिका । निर्मितिज्ञान कुरुनायका । यंत्रमातृकाधारणमातृका । संवाच्यकळा बावन्न ॥७९॥
मानसीकाव्यक्रिया जाण । अभिधानकोश समयीं स्मरण । पिंगळादिछंदोज्ञान । क्रियाविकल्प कळा हे ॥३८०॥
वस्त्रगोपनें छळितक योग । द्यूत दिविशेषप्रसंग । आणि आकर्षक्रीडा सांग । बालक्रीडनें बहुधा पैं ॥८१॥
वैतालिकी वैजयिकी । तृतीय विद्या वैनायिकी । या विद्यांचीं ज्ञानें ठाउकीं । एवमादिकी चौसष्टी ॥८३॥
चौषष्टी अहोरात्री नृपाळा । अभ्यासिल्या चौषष्टी कळा । मग गुरूच्या चरनकमळा । अभिवंदिती समस्तकें ॥८३॥
सर्वसेवेसी सादर । चुकों नेदिती अवसर । अगाध प्रज्ञेचा विचार । अभ्यासपर देखिला ॥८४॥
नुलंघवे मर्यादरेखा । येर्‍हवीं गुरूहूनि आगळिका । सर्व विद्यांच्या भूमिका । ज्याच्या विवेका अवगमती ॥३८५॥
सदार गुरूच्या परिवारगणा । गुरुप्रेमेंचि भजती जाणा । स्नेहें सर्वांच्या अंतःकरणा । वशीवर्तना अनुसरती ॥८६॥
समयीं देती मागितलें । करिती समयीं सांगितलें । मर्यादरेखेचीं पाउलें । कोण्या काळें नुल्लंघितीं ॥८७॥
ऐसी देखोनि अद्भुत शक्ति । मुनि म्हणे या ईश्वरमूर्ति । धरूनि मनुष्यांच्या व्यक्ति । सादर तिष्ठती सेवेसी ॥८८॥
कोण्या कार्यार्थ हें तो न कळे । परंतु माझें दैव आगळें । आतां याचीं चरणकमळें । स्वयें निजमौळें वंदावी ॥८९॥
ऐसा विवरी अंतःकरणें । यांपासूनि जें सेवा घेणें । तें अनुचित बहुतां गुणें । मजकारणें घडलें कीं ॥३९०॥
ऐसें गुरूचें मनोचेष्टित । जाणोनि रामकृष्ण समर्थ । म्हणती गुरुसेवा समाप्त । करूनि त्वरित निघावें ॥९१॥
गुरु आदरिती आमुची सेवा । तेव्हां विचार नोहे बरवा । यालागीं आज्ञा घेऊनि गांवा । जावें लाघवा रक्षूनी ॥९२॥
ऐसें विवरूनि बंधु दोघे । सद्गुरुचरण वंदूनि वेगें । गुरुदक्षिणाप्रसंगें । विनीत आंगें विनविती ॥९३॥
गुरुदक्षिणेचें करूनि मिष । उपलोभिती गुरुमानस । म्हणती आम्ही लघुतर दास । विनति उदास न करावी ॥९४॥
पक्षिणीपक्षी रक्षी आंडीं । चांचुवें चारा घाली तोंडीं । स्वामीनें त्याचि परवडी । आम्हां आवडी पाळिलें ॥३९५॥
जनकाहूनि कोटि गुणें । विद्या बोधिल्या कृपाळुपणें । आतां घेऊनि गुरुदक्षिणे । सफळ करणें निजवरें ॥९६॥
अल्प स्वल्प गुरुदक्षिणा । समर्पावी सद्गुरुचरणा । द्यावी स्वामींहीं अनुज्ञा । ऐसी करुणा भागिती ॥९७॥
राया कुरुकुळकुवलयतरणी । रामकृष्णांची ऐकोनि वाणी । मुनीनें विवरूनि अंतःकरणीं । वदला वचनीं तें ऐका ॥९८॥

द्विजस्तयोस्तं महिमानमद्भुतं संलक्ष्य राजन्नतिमानुषीं मतिम् ।
संमंत्र्य पत्न्या स महार्णवे मृतं बालं प्रभासे वरयाबभूव ह ॥३७॥

पत्नी पाचारूनि एकांतीं । गुह्य सांगे तियेप्रति । रामकृष्ण हे मनुष्याकृति । ईश्वरमूर्ति प्रत्यक्ष ॥९९॥
गुरुदक्षिणा देऊं म्हणती । तरी काय मागावें ऐसियांप्रति । बरवें विचारूनियां चित्तीं । सांगें युक्ति बरांगने ॥४००॥
एवं स्त्रीपुरुषीं दोघीं जणीं । विवरूनियां अंतःकरणीं । पुत्र निमाला समुद्रस्नानीं । प्रभासपाटणीं दुर्मरणें ॥१॥
तो याचिला गुरुदक्षिणे । आज्ञा वंदूनि रामकृष्णें । तथास्तु म्हणोनि केलीं नमनें । गवेषणें चालिले ॥२॥

तथेत्यथाऽऽरुह्य महारथौ रथं प्रभासमासाद्य दुरंतविक्रमौ ।
वेलामुपव्रज्य निषीदतुः क्षणं सिंधुर्विदित्वाऽऽर्हणमाहरत्तयोः ॥३८॥

यानंतरें दोघे बंधु । महारथी प्रतापसिंधु । हृदयीं देदीप्य धनुर्वेदु । विद्याप्रबोध मुनीचा ॥३॥
सज्ज होऊनि बैसले रथीं । घेऊनि शस्त्रास्त्रसंपत्ति । चालिले प्रभासपाटणाप्रति । मार्गीं होती शुभशकुन ॥४॥
मेघगंभीरघोषें रथ । गर्जना करी घडघडीत । दोघे बंधु प्रतापवंत । गुरुकार्यार्थ चालिले ॥४०५॥
अश्व जवीन जिंकिती अनिळा । गरुडचिह्नितकेतु निळा । मार्गीं देखत्यांचिया डोळां । अमृतपान फावतसे ॥६॥
सवेग टाकिली सोरटी । पातले सोमेश्वरा निकटीं । रत्नाकराचे वाळुवंटीं । रथातळवटीं ऊतरले ॥७॥
रामकृष्णांचें आगमन । जाणोनि सिंधु आला सह्रण । रत्नाभरणें समर्पून । करी पूजन सद्भावें ॥८॥
दिव्य वसनें गंधाक्षता । दिव्यसुमनें वाहिलीं मथां । धूपदीपादि अमृता । नैवेद्यार्था अर्पिलें ॥९॥
फलतांबूल दक्षिणा । पुष्पांजलि प्रदक्षिणा । सहस्रशः करूनि नमना । विज्ञाएना करीतसे ॥४१०॥
कोणीकडे येणें झालें । मज दासातें सनाथ केलें । कोण कार्य मनीं धरिलें । तेंही कथिलें पाहिजे ॥११॥
ऐकूनि सिंधूची विनीत वाणी । बलराम आणि चक्रपाणि । बोलतसे झाले आज्ञावचनीं । परिसिजे श्रवणीं तें राया ॥१२॥

तमाह भगवानाशु गुरुपुत्रः प्रदीयताम् योऽसाविह त्वया ग्रस्तो बालको महतोर्मिणा ॥३९॥

अचिंत्यैश्वर्यसंपन्न । जो कां अनंतगुणपरिपूर्ण । सिंधूप्रति प्रतापगहन । आज्ञावचन निरूपी ॥१३॥
सांदीपनि अवंतीवासी । आमुचा स्वामी तपोराशि । येथें करितां स्नानविधीसी । तां तत्पुत्रासी ग्रासिलें ॥१४॥
तुझिया ऊर्मी महा प्रबळ । तिहीं कवळूनि गुरूचा बाळ । तुवां ग्रासिला होऊनि काळ । तो तत्काळ दे आतां ॥४१५॥
कांहीं विलंब करितां येथें दण्ड पावसी आमुच्या हातें । जाणोनि निष्ठुर आज्ञेतें । गुरुपुत्रातें दे वेगीं ॥१६॥
निष्ठुर ऐकोनि भगवद्वाणी । सिंधु भयभीत अंतःकरणीं । माथा ठेवूनियां चरणीं । करुणावचनीं प्रार्थितसे ॥१७॥

समुद्र उवाच - नैवाहार्षमहं देव दैत्यः पंचजनो महान् । अंतर्जलचरः कृष्ण शंखरूपधरोऽसुरः ।
आस्ते तेनाहृतो नूनं तच्छ्रुत्वा सत्वरं प्रभुः ॥४०॥

सिंधु म्हणे मधुसूदना । ग्रासिलें नाहीं म्यां गुरुनंदना । यदर्थीं करितों विज्ञापना । ते सर्वज्ञा अवधारीं ॥१८॥
देव म्हणोनि संबोधन । तुझें अमळ दिव्य ज्ञान । भूतभविष्यवर्तमान । तुजलागून अवगत हें ॥१९॥
पंचजन या नामें दैत्य । शंखरूपी जलचर सत्य । माझे जठरीं राहे नित्य । त्याचें कृत्य हें गमतें ॥४२०॥
शंखरूप तो धरूनि असुर । माझे जठरींचे जे जळचर । त्यांतें पीडी अहोरात्र । दुष्ट निशाचर निर्दय ॥२१॥
बहुतेक हें त्याचें कृत्य । हें ऐकोनि त्वरान्वित । कृष्ण परमात्मा समर्थ । झाला उद्युक्त तद्वधा ॥२२॥

N/A

References : N/A
Last Updated : May 08, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP