अध्याय ४५ वा - श्लोक ४६ ते ५०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
तथेति तेनोपानीतं गुरुपुत्रं यदूत्तमौ । दत्वा स्वगुरवे भूयो वृणीष्वेति तमूचतुः ॥४६॥
गुरुपुत्र घेऊनियां करीं । हात ठेवूनि यमाचे शिरीं । यदूत्तम जे राममुरारी । त्वरें रहंवरीं बैसले ॥४७॥
आस्फुरिलें पांचजन्या । रहंवर चाले जिणोनि पवना । निमेषमात्रें गुरूच्या सदना । अवंतिपाटणा पातले ॥४८॥
तंव ते गुरूची अंतुरी । वल्लभासीं विचार करी । रामकृष्णांची अवसरी । कुमरापरीस मज वाटे ॥४९॥
रामकृष्ण कोमळ बाळ । परम अक्षोभ समुद्रजळ । प्रभासे जाऊनि उताविळ । काय करितील हें न कळे ॥४५०॥
कीं ते सागरीं प्रवेशती । किंवा तपश्चर्ये बैसती । पुत्रनिमाला कर्मगती । केवीं आणिती हें न कळे ॥५१॥
मुनि म्हणे तूं चिंता न करीं । लीलामानुष्य विग्रहधारी । ब्रह्मांड रचिती क्षणाभीतरी । न करीं अवसरी तूं त्यांची ॥५२॥
तंव रथाचा घडघडाट । पांचजन्माचा बोभाट । ऐकतां छात्रीं ठेविला पाठ । धांवले वाट पहावया ॥५३॥
तंव ते रामकृष्ण दोन्ही । आले गुरुपुत्र घेऊनी । माथे ठेविले गुरुचरणीं । गुरुकामिनी वंदिली ॥५४॥
म्हणती स्वामी घ्यावा कुमर । पुढें अभीष्ट मागा वर । आम्ही स्वामीचे किंकर । आज्ञा सत्वर करावी ॥४५५॥
यमें आणितां गुरुपुत्रातें । तो आणूनि अर्पिला आचार्यातें । आणखी आवडी वाटेल चित्तें । त्या वरातें मागा हो ॥५६॥
पुत्र देखोनिया जननी । हृदयीं आलिंगी धांवोनी अश्रुधारा स्रवती नयनीं । पान्हा स्तनीं उथळला ॥५७॥
मुनि अवघ्राण करी माथा । न संवरेचि सत्वावस्था । पुढती सावध करूनि चिता । बोले तत्त्वता शिष्यांतें ॥५८॥
गुरुरुवाच - सम्यक्संपादितो वत्स भवद्भ्यां गुरुनिष्क्रयः । को नु युष्मद्विधगुरोः कामानामावशिष्यते ॥४७॥
एकवाक्यें दोघे जन । वत्स म्हणोनि संबोधून । म्हणे तुम्हीं मनोरथ पूर्ण । केले संपूर्ण पैं माझे ॥५९॥
सम्यक् म्हणिजे बरव्या प्रकारें । गुरुदक्षिणा दिधली बा रे । अध्ययनाच्या प्रत्युपकारें । कोणी नाचरे हे क्रिया ॥४६०॥
गुरुनिष्क्रिय हा संपादिला । तुम्हां योग्यचि प्रताप भला । मनीं न कल्पवे अमराला । मनुष्याला केंवि घडे ॥६१॥
तुम्हां ऐसा इतर कोण । गुरुदक्षिणा समर्पून । कृताध्ययना होय उत्तीर्ण । अद्यापि श्रवण नायकती ॥६२॥
आतां माझिया मनोरथा । माजी मागावया पुरता । कोण काम असे पाहातां । जें पुढती समर्था मी मागूं ॥६३॥
एवं झालों पूर्णकाम । हरला याञ्चेचा संभ्रम । तुम्हां ऐसे शिष्योत्तम । न देखों श्रमपरिहर्ते ॥६४॥
ऐसें म्हणोनि आलिंगिलें । कृपेनें मौळ कुरवाळिलें । येरीं गुरुपद नमस्कारिलें । प्रोत्साहिलें गुरुवर्यें ॥४६५॥
गुरुमातेनें मधुरोत्तरीं । तोषवूनि राममुरारी । पुत्रासमान सर्वोपचारीं । कित्येक रात्री गौरविले ॥६६॥
वियोग न साहवे सर्वथा । तथापि जावया प्रार्थिली माता । चरणांवरा ठेवूनि माथा । सद्गुरुनाथा विनविलें ॥६७॥
म्हणती आज्ञा दीजे स्वामी । स्वगृहा जावया उदित आम्ही । जनकजननींच्या हृदयपद्मीं । वियोगऊर्मी जाकळी ॥६८॥
ऐसें ऐकोनि सभार्य मुनि । पुत्रवियोग स्मरोनि मनीं । म्हणती वियोगें जनकजननी । झुरती मनीं आम्हां ऐसीं ॥६९॥
यालागीं राहवणें उचित नोहे । वियोग सर्वथा न साहे । मग जाकळूनियां महामोहें । परम स्नेहें आज्ञापी ॥४७०॥
गच्छतं स्वगृहं वीरौ कीर्तिर्वामस्तु पावनी । छंदांस्ययातयामानि भवंत्विह परत्र च ॥४८॥
भूभारहणार्थ अवतार । क्षात्रधर्मी धुरंधर । म्हणोनि संबोधी हे वीर । प्रेमा मत्पर असो तुम्हां ॥७१॥
क्षेम जावें स्वगृहाप्रति । आशीर्वाद घ्या वरदोक्ति । तुमची पावन असो कीर्त्ति । जे उद्धरिती त्रिजगातें ॥७२॥
मत्सेवनें कृताध्ययन । तें प्रकाशो नित्य नूतन । जैसा उदेला व्यापी गगन । सहस्रकिरण स्वतेजें ॥७३॥
नातरी स्वतेजें ताप निरसी । पूर्ण कळामंडित शशी । पावन कीर्ति तुमचे तैसी । जगदघ नासी स्मृतिपठनें ॥७४॥
जलचर भूचर खेचर अमर । शक्रविधाताप्रमुख हर । गाती ऐकती निरंतर । कीर्ति अपार हे तुमची ॥४७५॥
कीर्तिश्रवणपठन जे करिती । त्यांची होय अघनिवृत्ति । जैसी पावन भागीरथी । तेंवि ते होती सत्पुरुष ॥७६॥
श्रवणीं पठनीं स्त्रियांसि रति । गाती ऐकती पावन कीर्ति । त्या त्या वनिता साध्वी सती । रमापार्वतीसमसाम्य ॥७७॥
नित्य नूतन तुमची छंदें । त्रिजगीं होती जगद्वंद्यें । मत्सेवनें साधिलीं आद्यें । गद्यें पद्यें स्मृतिशास्त्रें ॥७८॥
ऐसे आशीर्वाद देऊनी । दोघां हृदयीं आलिंगोनि । वारंवार पाहे नयनीं । पडती धरणीं स्नेहाश्रु ॥७९॥
हनुवटिया धरूनि करीं । हस्त कुरवाळी वदनशिरीं । दुरी बोळवितां नेणती कुमरी । ते अवसरीं होतसे ॥४८०॥
मग ते जिरवूनि स्नेहावस्था । कृपेनें हस्त ठेविला माथां । येरी वंदूनि वळघले रथा । मथुरापथा अनुसरले ॥८१॥
गुरुणैवमनुज्ञातौ रथेनानिलरंहसा । आयातौ स्वपुरं तात पर्जन्यनिनदेन वै ॥४९॥
ऐसे गुरूनें आज्ञापिले । मुहूर्तें रथारूढ झाले । छात्रवर्गीं बोळविले । त्रिगव्यूतीपर्यंत ॥८२॥
तेथ राहवूनि सहाध्यायिगण । पुढें चालिला दिव्यस्यंदन । कल्याणदायक होती शकुन । पितृदर्शन सूचक जे ॥८३॥
पवनाहूनि जवीन रथ । गुरुचिंतनें क्रमूनि पंथ । पावले मथुरापुरीं त्वरित । केला अद्भुत कंबुरव ॥८४॥
प्रावृटीं मेघांचा बोभाट । तेंवि रथाचा घडघडाट । गगनगर्भीं लखलखाट । विद्युत्प्राय खगकेतु ॥४८५॥
समनंदन्प्रजाः सर्वा दृष्ट्वा रामजनार्दनौ । अपश्यंत्यो बह्वहानि नष्टलब्धधना इव ॥५०॥
इत्यादि चिह्नीं ओळखून । धांवूनि आला प्रजाजन । देखोनि रामजनार्दन । जाले निमग्न स्वानंदीं ॥८६॥
जेंवि कृपणाचें हारपे धन । पुन्हा चिरकाळीं सांपदे जाण । तो जीवाचें उतरी लोण । तेवीं पुरजन हरि पाहती ॥८७॥
किंवा शरीरा आलिया प्राण । उत्फुल्लित इंद्रियगण । तेंवि देखोनि रामकृष्ण । झाला स्वजन सुखभरित ॥८८॥
इतुकें कुरुकंजाकरतरणि । सार्वभौमचूडामणि । बृहच्छ्रवा प्रायोपशयनी । सादर श्रवणीं परीक्षिति ॥८९॥
तयाप्रति योगाब्जिनीमित्र । जो विधीचा प्रपौत्रपौत्र । निरोपूनियां हरिचरित्र । सुधापात्र सम भरिला ॥४९०॥
सावध म्हणे पुढिलिये कथे । उद्धव प्रेरूनि व्रजपुरव्यथे । निरसिजेल श्रीकृष्णनाथें । तें श्रुतिपथें अवधारीं ॥९१॥
श्रीमद्भागवत पवित्र । दशमस्कंध हरिचरित्र । गुरुदक्षिणे अर्पिला पुत्र । तो अध्याय विचित्र हा कथिला ॥९२॥
प्रतिष्ठानशेषशयनीं । एकनाथ चक्रपाणि । चिदानंद रमा चरणीं । नाभिकंजज स्वानंद ॥९३॥
गोविंद त्रिजग गोपनवंत । दयार्नव क्षीराब्धि निश्चित । श्रोते वक्ते निर्जर तेथ । उपासिती प्रभूतें ॥९४॥
तत्प्रसादवरद टीका । कैवल्यदायक सद्भाविकां । श्रवणें क्षाळी कलिमलपंका । निववी शशांका पडिपाडें ॥४९५॥
इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशकुपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां श्रीरामकृष्णव्रतबंधविद्याभ्यसनगुरुपुत्रानयनं नाम पंचचत्वारिंशत्तमोऽध्यायः ॥४५॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥५०॥ टीका ओव्या ॥४९५॥ एवं संख्या ॥५४५॥ ( पंचेचाळिसावा अध्याय मिळून ओवी संख्या २०४०१ )
पंचेचाळिसावा अध्याय समाप्त.
N/A
References : N/A
Last Updated : May 08, 2017
TOP