अध्याय ४५ वा - श्लोक २१ ते २५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


पितर्युवाभ्यां स्निग्धाभ्यां पोषितौ पालितौ भृशम् । पित्रोरभ्यधिका प्रीतिरात्मजेष्वात्मनोऽपि हि ॥२१॥

यशोदा माउली स्नेहाळ । ताता तुम्ही पुत्रवत्सल । केला आमुचा प्रतिपाळ । यावत्काळपर्यंत ॥४८॥
तुमच्या स्नेहाची कळामात्र । कथनीं समर्थ नोहे वक्त्र । स्वये श्रमोनि अहोरात्र । पाळिले पुत्र कृपेनें ॥४९॥
आपुलें करूनि तनुशोषण । केलें आमुचें संरक्षण । ब्राह्मी माया हे विचित्र जाण । नव्हे कारण आश्चर्या ॥१५०॥
पशुपक्ष्यादि समस्त योनि । आपणाहूनि सुतपाळणीं । झळंबती बहुतां गुणीं । ईश्वरकरणी विचित्र हे ॥५१॥
समस्तांसी आत्मप्रीति । पुत्र आत्मा हे प्रतीति । म्हणोनि पडे ममताभ्रांति । सुखविस्मृति स्वतनूची ॥५२॥
यालागीं आपुल्या देहाहून । करिती आत्मजतनुपोषण । विशेष तुमचें स्नेहाळपण । वदतां मौन वाचेसी ॥५३॥
इतरां पितरांहूनि वरिष्ठ । आम्हांनिमित्त सोसिले कष्ट । विघ्नें उदेलीं गरिष्ठ । साहिलें अनिष्ट तज्जनित ॥५४॥
व्रजा येऊनि पूतना । पाजिती झाली उल्बणपान्हा । जैं ते मुकली आपुल्या प्राणा । तैं व्रजभुवना महाविघ्न ॥१५५॥
राक्षसीतनु दीड योजन । पडतां पीडिले व्रजींचे जन । तिचें करूनि तनुखंडन । केलें दहन समस्तीं ॥५६॥
तेव्हां आमुच्या संरक्षणीं । ब्राह्मण घालूनि शांतिपठनीं । वेंचिल्या धनधान्यांच्या श्रेणी । इतरांलागूनि हें नाहीं ॥५७॥
जन्मनक्षत्र उत्साहदिवसीं । शकटभंगें भय मानसीं । मानूनि धनधान्यें द्विजांसी । धेनुवस्त्रांसी वांटिलें ॥५८॥
तृणावर्त्त महादुष्ट । तेणें व्रजजनां दिधले कष्ट । मेला स्वपापें पापिष्ठ । तुम्ही मन्निष्ठ भयभीत ॥५९॥
कांटा खडा विंचू किडा । झणें आम्हांसि करील पीडा । म्हणोनि खेळतां चहूंकडां । मागा पुढां संरक्षां ॥१६०॥
यमलार्जुनांचिये पतनीं । विचार करूनि पशुपजनीं । आम्हांचिसाठीं कळवळूनी । वृंदावनीं प्रवेशलां ॥६१॥
तेथ अघ बक वत्सासुर । धेनुक कालिय विखार । इत्यादि विघ्नें लहान थोर । पावलां घोर आम्हांसाठीं ॥६२॥
आम्हांनिमित्त आखंडळ । वर्षोनियां करकाजळ । क्षोभें बुडवितां गोकुळ । तुम्हीं तें सकळ साहिलें ॥६३॥
ऐसे अनेक दैत्य दुष्ट । प्रलंब केशी वोम अरिष्ट । विचित्र माया करिती कपट । तुम्हीं ते कष्ट सोसिले ॥६४॥
अक्रूरें आणितां मथुरापुरीं । आमुचा कळवळा तुमचे जठरीं । आम्हां निमित्त सभेमाझारी । कंस तुम्हांवरी कोपला ॥१६५॥
यालागीं इतरां पितरांहूनी । तुम्ही आमुच प्रतिपाळणीं । श्रमला परम स्नेहाळपणीं । दिवस रजनी न म्हणतां ॥६६॥
स्तन्यपाने करलालनें । अभ्यंगादि संस्तोभनें । दधिदुग्धाज अन्नाशनें । वसनें भूषणें वाढविलें ॥६७॥
तें तें काय आठवूं किती । तुमच्या स्नेहाची अभिव्यक्ति । वर्णितां मौनावे भारती । म्हणे श्रीपति नंदातें ॥६८॥
झणें तूं ताता म्हणसी मुखें । वसुदेवदेवकी तुमचीं जनकें । येचिविषीं वचन निकें । सादर ऐकें पशुपेंद्रा ॥६९॥

स पिता सा च जननी यौ पुष्णीतां स्वपुत्रवत् । शिशून्बंधुभिरुत्सृष्टानकल्पैः पोषरक्षणे ॥२२॥

वीर्यदानें जन्मविता । तो बोलिजे प्रथम जनिता । उपनयनादि संस्कार करिता । द्वितीय पिता तो होय ॥१७०॥
औरस पुत्राचि समान । परमार्थबुद्धी विद्याभ्यसन । करवी सांडूनि भेदभान । जनक जाण तृतीय तो ॥७१॥
चतुर्थ जनक तो आपत्काळीं । अन्न देऊनिया प्रतिपाळी । पांचवा दुर्मरण जो टाळी । अभयशाली सर्वस्वें ॥७२॥
हा पंचजनकविचार । बोलती मन्वादि स्मृतिकार । यांही माजी मम निर्धार । ऐक साचार भो ताता ॥७३॥
तोचि पिता तेचि माता । स्वपुत्रासमान पोषण करितां । अंतरीं न स्पर्शे भिन्नता । आह्लाद चित्ता समसाम्य ॥७४॥
पोषणीं असमर्थ जनकजननी । अथवा बंधुवर्गही कोणी । सर्वीं टाकिलें उपेक्षूनी । जे त्यां लागूनि पाळिती ॥१७५॥
तेचि ययार्थ मातापितरें । उपेक्षा करितां पूर्वील इतरें । ऐसीं ताता धर्मोत्तरें । मम निर्धारें जाणावीं ॥७६॥
वसुदेवदेवकी जनकजननी । होती कंसाचिये बंधनीं । तिहीं जठरीं जन्मदूनी । उपेक्षूनी टाकिलों ॥७७॥
तुम्हीं पाळिलें निस्सीम प्रेमें । स्नेहाळपणें अवाप्तकामें । आतां माझ्या प्रार्थनानियमें । व्रजा संभ्रमें जाइजे ॥७८॥

यात यूयं व्रजं तात वयं च स्नेहदुःखितान् । ज्ञातीन्वो द्रशःटुमेष्यामो विधाय सुहृदां सुखम् ॥२३॥

आतां माझिया संवगड्यांसहित । घेऊनि बल्लगगण समस्त । तुम्हीं व्रजपुरा जावें त्वरित । माझा संकेत अवधारा ॥७९॥
सुहृदा यादवगणां । आम्ही भेटोनि थोरां लहानां । सुखसंपन्न करूनि जाणा । तुमच्या दर्शना मग येऊं ॥१८०॥
सुहृद ज्ञाति स्नेहाळपणें । आमुच्या दुःखें शिणती शिनें । त्यांसि दुखाचें पारणें । लागे करणें नावेक ॥८१॥
यालागीं समस्तांचिया भेटीं । परस्परें संवादगोठी । झालिया सुटतील हृदयगांठी । स्नेहदृष्टीं न्याहाळितां ॥८२॥
यालागीं व्रजा जाइजे तुम्हीं । सुहृद तोषवूनि येऊं आम्ही । ऐशिया मधुरोक्तीच्या नियमीं । स्नेहसंभ्रमीं सांतवन ॥८३॥

एवं सांत्वय्य भगवान्नंदं स्रव्रजमच्युतः । वासोऽलंकारकुप्याद्यैरर्हयामास सादरम् ॥२४॥

ज्याचें ऐश्वर्य अव्याहत । मनुष्यनाट्यें नव्हे च्युत । यालागीं नांवें जो अच्युत । श्रीभगवंत जगदात्मा ॥८४॥
तेणें समस्त बल्लवगणां । आणि व्रजस्थां अवघ्या जनां । नंदापासीं वस्त्राभरणां । करूनि स्मरणा अर्पिलें ॥१८५॥
नंद यशोदा रोहिणी । आणि समस्ता बल्लवपत्नी । स्मरणपूर्वक अनुक्रमणीं । वस्त्राभरणीं गौरविलीं ॥८६॥
सुवर्णरजतवर्जित पात्रें । गोरसव्यवहारीं पवित्रें । पानवचनादि विचित्रें । इच्छामात्रें समर्पिलीं ॥८७॥
यांही वेगळीं वस्तुजातें । रत्नें माणिक्यें मुक्तें बहुतें । समर्पिलीं समस्तांतें । श्रीभगवंतें स्नेहाळें ॥८८॥
सदर म्हणिजे स्नेहभरें । अचिंत्यैश्वर्यसत्ताधरें । नंदादिकांचीं स्निग्धांतरें । पदार्थमात्रें प्रलोभिलीं ॥८९॥

इत्युक्तस्तौ परिष्वज्य नंदः प्रणयविह्वलः । पूरयन्नश्रुभिर्नेत्रे सह गोपैर्व्रजं ययौ ॥२५॥

यदुकुळाचें समाधान । करूनि व्रजपुरा येईन । ऐसें नंदें ऐकतां वचन । मोहें मन झळंबलें ॥१९०॥
ऐसा नंद बोधिला असतां । स्वपुत्रभावना विपरीत होतां । वियोगदुःखें कवळिलें चित्ता । तेणें वक्तृता निरोधिली ॥९१॥
रामकृष्ण दोघे जन । हृदयीं धरिलें आलिंगून । न करीच मस्तकावघ्राण । वर्णविवर्ण उमजोनी ॥९२॥
परंतु स्नेहाचा कळवळा । तेणें सद्गदित झाला गळा । टपटपां अश्रु स्रवती डोळां । वदनकमळा न्याहाळी ॥९३॥
अधोमुख पुसी नेत्रां । मोहें कंप दाटला गात्रां । हृदयीं कवळूनि उभय पुत्रां । पाहे वक्त्रा पुनः पुनः ॥९४॥
तंव तंव वियोगदुःखलहरी । विचित्र उठती अभ्यंतरीं । कैसा प्रवेशों व्रजपुरीं । कोण्या उत्तरीं व्रज बोधूं ॥१९५॥
यशोदाप्रमुख गौळणी वृद्धा । पुत्रस्नेहें परमस्निग्धा । त्यांसी न सोसे वियोगबाधा । म्हणती मुकुंदा कां त्यजिलें ॥९६॥
तेव्हां त्यांसि सांगूं काय । पुत्रस्नेहें जाकळे हृदय । पूर्वक्रीडेचा आठव होय । नुचले पाय प्रयाणीं ॥९७॥
परंतु स्वपुत्र झाले पर । तेही होवोनिया निष्ठुर । ताता ठाकिजे व्रजपुर । निरोप उत्तर हें दिधलें ॥९८॥
आतां किमर्थ राहिजे येथें । ऐसें विवरूनिया चित्तें । गोपां आज्ञापी संकेतें । वृषशकटांतें जुंतवी ॥९९॥
कृष्णें दिधली जे सामग्री । अवघी भरूनि शकटांवरी । सज्ज होवोनि पशुपभारीं । नंद व्रजपुरी पावला ॥२००॥
पुढें पातले व्रजींचे लोक । व्यवस्था ऐकोनिया सम्यक । त्यांसि झाला हर्ष शोक । तो नावेक वर्णावा ॥१॥
परंतु कठिन नोहे हृदय । त्याहूनि अवस्था कथितां होय । यालागीं न वदे व्यासतनय । हें कुरुवर्य समजला ॥२॥
म्हणोनि न करितां ते गोठी । पुढील कथा लक्षूनि दिठीं । केली वसुदेवें राहटी । ते वाक्पुटीं शुक वर्णी ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 08, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP