अध्याय ४५ वा - श्लोक ३१ ते ३५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
अथो गुरुकुले वासमिच्छंताबुजम्मतुः । काश्यं सांदीपनिं नाम ह्यवंतीपुरवासिनम् ॥३१॥
एवं व्रतबंधानंतर । असतां सर्वविद्याआगर । तथापि मनुष्यदेहीं सार । दास्य साचार सद्गुरूचें ॥५६॥
यालागीं गुरुकुळीं करूनि वास । काया वाचा आणि मानस । न वंचिता कीजे दास्य । इच्छा विशेह हे धरिली ॥५७॥
श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ । सकळ विद्यांचें मूळपीठ । दयादाक्षिण्यें गरिष्ठ । परम श्रष्ठ कुटुंबी ॥५८॥
ऐसियांचें शुश्रूषण । करितां होय इच्छा पूर्ण । त्यामाजी जी लक्षणें न्यून । तितुकी अपूर्ण फळसिद्धि ॥५९॥
ऐसा लक्षूनियां महंत । बंधु बळराम श्रीभगवंत । जाते झाले स्वानंदभरित । कोठपर्यंत तें ऐका ॥२६०॥
मथुरेहूनि अवंतिपुरी । पंचाशत योजनें दुरी । दक्षिणप्रांतीं तीमाझारीं । मुनिवर श्रोती सांदीपत्नि ॥६१॥
काश्यपगोत्रोत्पन्न महंत । पूर्वोक्तलक्षणीं आचारवंत । त्याप्रति येऊनि बळभगवंत । शरण विनीत जाहले ॥६२॥
सुस्नात होवोनिया सुभदिनीं । सफळोपचार समित्पाणि । दृष्टि एकाग्र ठेवूनि चरणीं । विनीतवाणी नियमस्य ॥६३॥
जाणोनि परम शुद्धांतर । केवळ करुणाब्धि मुनिवर । केला शिष्यत्वें अंगीकार । दिधला अधिकार सेवेचा ॥६४॥
दास्यचरणाचा अधिकार । झाला जाणोनि हर्षनिर्भर । झाले दास्यासि तत्पर । तो प्रकार अवधारा ॥२६५॥
यथोपसाद्य तौ दांतौ गुरौ वृत्तिमनिंदिताम् । ग्राहयंतावुपेतौ स्म भक्त्या देवामिवाऽवृतौ ॥३२॥
भक्ति करूनि सर्वेश्वर । जेंवि आराधिती उपासक नर । ऐसे प्रेमपुरस्पर । आदरें गुरुवर आराधिती ॥६६॥
दान्त म्हणिजे दमनशील । शमदमादिसाधनीं कुशल । सद्गुरूचें चरणकमल । भजती केवळ सद्भावें ॥६७॥
उषःकाळीं प्रातःस्नान । सद्गुरूपूर्वीं करिता आपण । तेथूनि सर्व आह्निकाचरण । करिती लक्षूनि गुरुदास्य ॥६८॥
स्वामीचिया शौचाचारीं । जळमृत्तिका अर्पिती करीं । दंतशोधनाच्या अवधारीं । दंतकाष्ठ अर्पिती ॥६९॥
आसन पादप्रक्षाळना । विध्युक्त काष्ठ दंद्तशोधना । गंडूषार्थ शुद्द जीवना । देती आचमना पृथक् जळ ॥२७०॥
सद्गुरु करितां प्रातःस्नान । तदुर्चित द्रव्यें समर्पून । आसन वसन तिलक जीवन । करिती अर्पूण यथोचित्त ॥७१॥
होमशाळासंमार्जन । होमार्थ करितां प्रादुषीकरण । अर्पिती विशुद्ध शुष्केधन । आज्ञालंघ न नकरिती ॥७२॥
कुश पलाश समिधा पुष्पें । आणूनि भरिती शुद्ध आपें । गंधाक्षताधूपदीपें । परम साक्षेपें ओळगती ॥७३॥
नैवेद्य फळ तांबूल दक्षिणा । यथाकाळीं अर्पिती जाणा । गुरुगृहींच्या परिवारगणा । गुरुतोषणा आराधिती ॥७४॥
समस्तांचीं क्षाळिती वसनें । स्वर्चित वास्तु रंगाभरणें । पानवचनादिभाजनें । सर्वोपकरणें क्षाळिती ॥२७५॥
तृणधान्यांचा परामर्ष । पशुरक्षणीं परम हर्ष । तंव तंव गुरुकृपा विशेष । दिवसें दिवस वाढतसे ॥७६॥
काष्ठभारे वाहूनि शिरीं । इंधनसंग्रह गुरूचे घरीं । गोपयपिंड करिती करीं । तंद्रा शरीरीं अस्पृष्ट ॥७७॥
संमार्जिती सदनभित्ति । जळनिर्गम शोधिती हातीं । गुरुतोषणीं परमप्रीति । उह्लासती बहुदास्यें ॥७८॥
जाणोनि गुरूचें मनोगत । तैसे वर्तती अतंद्रित । सांडूनि व्रतें नेम समस्त । गुर्वाज्ञेंतें वर्तती ॥७९॥
आगम अनुल्लंघ्य उपासकां । कीं विधि नुल्लंघवे याज्ञिकां । कीं काम्यव्रतें जेंवि काम्कां । तेंवि त्यां देखा गुर्वाज्ञा ॥२८०॥
सद्गुरु बोलतां आणिकांसी । श्रवणीं सावध वृत्ति कैसी । चातक मेघोदकाते लक्षी । तेंवि मानईं सादरता ॥८१॥
सर्व ऐश्वर्यभोग वैकुंठीं । परि गुरुदास्याची दुर्लभ गोठी । यालागीं नटोनि मनुष्यनटीं । अप्रेम पोटीं गुरुभजनीं ॥८२॥
येर अवतारचरित्र । तेथ साह्दनें सुरकार्य मात्र । लक्षूनि गुरुदास्यलाभ स्वतंत्र । जालें पाव पेर्माचें ॥८३॥
वेतन भक्षूनि सेवक । सेवेसि वर्ततां प्रवासोन्मुख । तेथ पंथीं जोडल्या गंगोदक । तो लाभ सम्यक स्वतंत्र की ॥८४॥
कीं सहोदर जोडिती धन । विभागें करिती दायादन । त्यांमाजी गुरुदास्य विद्यापठन । स्वतंत्र जाण तो लाभ ॥२८५॥
अतेंवि देवकार्याकारणें । मर्त्यलोकीं म्याम अवतार घेणें । तेथ सद्गुरूच्या दास्याचरणें । सनाथ होणें स्वतंत्र ॥८६॥
ऐसिया भावें कमलापति । रामकृष्णत्वें धरूनि व्यक्ति । सप्रेम गुरुदास्याची रीति । संपादिती कुरुवर्या ॥८७॥
चाहूरिया चित्रासनें । गाद्या मृदोळिया ओटंगणें । झाडूनि बैसकार करणें । अध्यापना बैसतां ॥८८॥
आपण होऊनि चामरधर । तिष्ठती सेविसि सादर । मानस जाणोनि तदनुसार । सर्वोपचार अर्पिती ॥८९॥
सद्गुरु करिती निरूपण । तेथ सादर करिती श्रवण । ते र्पसंगीं कार्य आन । पडतां उठोन सारिती ॥२९०॥
सद्गुरूचें माध्याह्निक । दास्य वोळगती सम्यक । पूजन करूनि तीर्थादिक । आवश्यक स्वीकरिती ॥९१॥
गंधाक्षता कुसुममाळा । घवघवीत घालिती गळां । परिमळद्रव्याचा वरी उधळा । त्यावरी अमळा श्रीसुळसी ॥९२॥
धूपदीप एकारती । नैवेद्य षड्रसनिष्पत्ति । फळतांबूल अनन्यभक्ति । दक्षिणा देती तनुमनवाक् ॥९३॥
जेव्हां केलें गेलें आत्मार्पण । तेव्हांचि त्यांचें अभेदभजन । त्यांसीच म्हणावें अनन्य । दक्षिणाधन त्यां न लगे ॥९४॥
गुरुगृहींची जे संपत्ति । आत्मार्पकांची तेचि आइती । कारावाचामनोवृत्ति । अवंचक रीती तें भजन ॥२९५॥
मनें न कल्पी दोषदर्शन । दास्यविषयीं हाव पूर्ण । पुढील कार्याचें चिंतन । मानसभजन अवंचक हें ॥९६॥
वाचा न वदे दोषगुण । कोण्हापासी नुमसे न्यून । गुरुयशाचें संकीर्तन । वाचिक भजन या नांव ॥९७॥
बहळ कार्यांच्या अवसरीं । प्रेमोत्साहें धैर्य शरीरीं । नीचकार्यासि तनु न चोरी । दास्य निर्धारीं कायिक हें ॥९८॥
एवं कायावाचामन । तेंचि अप्रूनि दक्षिणाधन । करूनि सर्वस्व नीराजन । निष्काम पूर्ण पुष्पांजळि ॥९९॥
प्रदक्षिणा नमस्कार । घालूनि वारंवार । विनीतभावें निरहंकार । न्यूनोपचार सांगता ॥३००॥
भोजनपात्र विसर्जून । शेषप्रसादसेवन । गुरु मंचकीं पौढवून । पादसेवन आचरती ॥१॥
सद्गुरूचा परिवार सर्व । जाणोनि गुरूचे अवयव । त्यांचे भजनीं प्रेमभाव । दंभभाव नातळतां ॥२॥
जाणोनि गुरूचें प्रयाण । गज रथ शिबिका अश्वयान । सन्नद्ध करिती आज्ञेवरून । होती आपण अनुयायी ॥३॥
यानारूढ असतां गुरु । चरणीं खोलती समोरु । पायी चालतां अनुचरु । सर्वोपचार घेऊनी ॥४॥
सभास्थानीं बैसतां गुरु । सम्मुख तिष्ठती आज्ञाधरु । किंवा होती चामरधरु । पार्श्वभागीं स्वामीच्या ॥३०५॥
ज्यांवरी कृपा सद्गुरूची । सप्रेम प्रीति धरिती त्यांची । उपेक्षा करिती उपेक्षितांची । वमनअन्नासारिखी ॥६॥
दुग्धपाचित क्रमुक फोडी । खदिरवटिकाकृतकेवडी । मुक्तत्रिभागचर्चितविडी । भुजंगवल्लीपत्रांची ॥७॥
तांबूल ऐसा त्रयोदशगुणी । अर्पिती संकेत जाणोनि । गंडूषपात्र धरूनि पाणी । ष्ठीवनग्रहणीं वोळगती ॥८॥
सद्गुरूचे आज्ञेवरून । इतरां तांबूलसमर्पण । करिती यथोचित सम्मान । मनोगत जाणोनि स्वामीचें ॥९॥
असो ऐसी सायंसंध्या । जाणोनि वर्त्तति सर्वदा । गोदोहनादि सर्व धंदा । करूनि मोदा पावती ॥३१०॥
गुरुवत् गुरुभार्येची सेवा । करिती समान मानूनि देवा । सदार गुरु पहुडती जेव्हां । तैं श्रम अवघा परिहारिती ॥११॥
ऐसी अनिंदित गुरुदास्यवृत्ति । अनन्यभावें चढली हातीं । गुरु बंधूंतें ते शिक्षिती । पुत्राप्रति जेंवि पिता ॥१२॥
ऐसे स्वाध्यायीं समस्त । केले अनन्य सद्गुरुभक्त । अनन्यभावें सेवास्वार्थ । सर्वां यथोक्त उपजविला ॥१३॥
अव्यभिचार गुरुवृत्तीतें । लाहोनि बोधिली गुरुभक्तांतें । हें देखोनि सद्गुरुनाथें । सदयचित्तें तुष्टला ॥१४॥
तयोर्द्विजवरस्तुष्टः शुद्धभावानुचृत्तिभिः । प्रोवाच वेदान्निखिलान्सांगोपनिषदो गुरुः ॥३३॥
भजनीं सादर निर्विकार । देखोनि तोषला ऋषीश्वर । पाचारूनि उभय छात्र । केला अधिकार अध्ययनीं ॥३१५॥
विवरूनियां सुमुहूर्तवेळा । विद्यादैवभचंद्रबळा । गुरुगणपतिदैवतकुळा । अर्चूनि सकळां द्विजादिकां ॥१६॥
आरंभिला निगमपाठ । ऋक्सामादि आम्नाय श्रेष्ठ । शिक्षा व्याकरण ज्योतिष स्पष्ट । छंद निरुक्त कल्पादि ॥१७॥
घ्राण वदन नयन श्रवण । हस्तहृदयादि षडंगें जाण । उपनिषद्भाग मस्तक पूर्ण । वेदोनारायण सांग हा ॥१८॥
ऐसेचि सांग अवधे वेद । गुरुवर पढविता झाला विशद । गुरु शिष्यांसि परमाह्लाद । प्रज्ञाप्रबोधपाठत्वें ॥१९॥
प्रज्ञा देखोनि संतुष्ट गुरु । म्हणोनि अध्ययनीं तत्परु । प्रबोधशक्तिचमत्कारु । तेणें शिष्य सादर अध्ययनीं ॥३२०॥
परस्परें आनंदभरित । अध्यापनीं गुरूसि आर्त । तंव तंव अध्ययनाचा स्वार्थ । शिष्य समर्थ आंगविती ॥२१॥
न पुसतांचि सद्गुरु सांगे । प्रज्ञाबळें ते पढती वेगें । पुडती अनुवृत्ति करणें न लगे । हें सामर्थ्य अवघें गुरुभजनीं ॥२२॥
सरहस्यं धनुर्वेदं धर्मान्न्यायपथांस्तथा । तथा चान्वीक्षिकिं विद्यां राजनीतिं च षड्विधाम् ॥३४॥
सर्वं नरवरश्रेष्ठौ सर्वविद्याप्रवर्त्तकौ । सकृन्निगदमात्रेण तौ संजगृइहतुर्नृप ॥३५॥
अथर्वणआंगीरसरहस्यें । मंत्रविद्यादेवतावश्यें । गूढ गोप्यें समरलास्यें । तियेंही अशेषें कथियेलीं ॥२३॥
अस्त्रविद्या धनुर्वेद । शस्त्रसाधनांचे भेद । मंत्ररहस्यें सहित विशद । बोधी प्रवुद्ध गुरुवर्य ॥२४॥
पौरंदरास्त्र पावकास्त्र । संयमनास्त्र कोणपास्त्र । वरुणपाशादि वारुणास्त्र । अकूपाराख प्रबोधी ॥३२५॥
नाक्र माकर शिशुमारास्त्र । तिमिंगिळास्त्र राघवास्त्र । शाफर मौद्गर कंबुकास्त्र । पन्नकास्त्र ताक्षकी ॥२६॥
यक्षराक्षसगुह्यकास्त्र । कौबेरास्त्र पिंगलास्त्र । शरभऋभवगारुडास्त्र । प्लवंगास्त्र सरहस्य ॥२८॥
सिद्धसाध्यगंधर्वास्त्र । वीरभद्रास्त्र भैरवास्त्र । कृत्याकौष्मांडवेताळास्त्र । वैनायकास्त्र् भास्मिक ॥२९॥
माहेश्वरास्त्र शांभवास्त्र । कालिकास्त्र दुर्गमास्त्र । चंडिकास्त्र चामुंडास्त्र । पाशुपतास्त्र विश्वभुक् ॥३३०॥
महाघोर अघोरास्त्र । तत्पुरुषास्त्र ईशानास्त्र । वामदेवास्त्र सरौद्रास्त्र । सद्योजातास्त्र कर्कश ॥३१॥
भास्करास्त्र भगणपास्त्र । भौमभानुजभार्गवास्त्र । जीवविधुजविधुंतुदास्त्र । कैतवास्त्र कैतवी ॥३२॥
पर्जन्यास्त्र पावनास्त्र । पर्वतास्त्र सवज्रास्त्र । आप्ययास्त्र कृतांतास्त्र । मृत्युंजयास्त्र निवेदी ॥३३॥
कफवातादिमहामायास्त्र । सुदर्शनास्त्र वैष्णवास्त्र । अनंतास्त्र आदित्यास्त्र । महाब्रह्मास्त्र निवेदि ॥३४॥
अस्त्रविद्या रहस्येंसीं । प्रबोधिली विधानेंसीं । आणि शस्त्रविद्याही तैसी । कौशल्येंसीं साधविली ॥३३५॥
खड्ग खेटक शूळ परशु । तोमर वज्र शक्ति पट्टिश । परिघ मुद्गर कुंत पाश । यमदंष्ट्रादि छूरिका ॥३६॥
टंक कृपाण त्रिशूळ लहुडी । लांगल चक्र मुसल भृशुंडी । कुरंगश्रृंगज अंकुशदंडी । व्याघ्रनखादि वृश्चिक ॥३७॥
गदा कुठार परश्वध । कंबुकंकणान्वितमणिबंध । कटिप्रदेशीं चक्रायुध । खट्वांगवंशकूर्परिका ॥३८॥
भिंदिपाळादि छत्तिस । दंडायुधीं विद्याभ्यास । करविता झाला सावकाश । तुष्टमानस गुरुवर्य ॥३९॥
मल्लविद्या द्वंद्वयुद्ध । प्रबोधूनि यथाविध । आयुर्वेद गांधर्ववेद । ज्योतिर्वेद निरोपी ॥३४०॥
एवं उपवेदाध्यापन । सांगोपांग करूनि जाण । पुढें मांडिलें शास्त्राध्ययन । कृपाळु पूर्ण गुरुवर्य ॥४१॥
मन्वादिकांचिया स्मृति । अनुकूळ पुराणसंमति । धर्मशास्त्र यथानिगुती । मन्वादि धर्म प्रबोधिले ॥४२॥
न्यायशास्त्र गौतमकृत । पूर्वमीमांसा श्रुतिसंमत । आन्वीक्षिकीं इत्थंभूत । कथिली समस्त तर्कविद्या ॥४३॥
राजनीति षड्विध म्हणिजे । तेही साङ्ग कथिली द्विजें । तेच साही प्रकार जे जे । चतुरीं वोजें परिसावे ॥४४॥
शत्रु जाणोनि बळिष्ठ । स्नेहवादें तो कीजे इष्ट । यातें संधि म्हणती श्रेष्ठ । उपाय वरिष्ठ हा मुख्य ॥३४५॥
बळिष्ठ शत्रूंशीं करूनि सख्य । तुल्य शत्रूचा कीजे द्वेष । याच्या बळें तो जाणिजे देख । विग्रह सम्यक या नांव ॥४६॥
आपणाहूनि सामान्य भूप । मनीं धरिती दुष्ट संकल्प । इतरांवरी दावूनि कोप । स्वारी साटोप करावी ॥४७॥
येणें मिषें अकस्मात् । जाता देखती ते भयभीत । द्रव्यें घेऊनि पादाक्रान्त । करूनि यथोक्त रक्षावे ॥४८॥
तिसरा उपाय या नांव यान । चतुर्थ उपाय तें आसन । ऐका तयाचें लक्षण । सावधान होऊनी ॥४९॥
बळिष्ठांसिं करूनि सख्य । तुल्य शत्रु जिंकिले देख । ते ते पोटीं धरूनि दुःख । साह्य आणिक मेळविती ॥३५०॥
यालागीं तेथ दुर्गम दुर्गीं । ठाणें घालूनि प्रसंगीं । पुन्हा शत्र नुधवे जगीं । ऐसिया योगीं रक्षावा ॥५१॥
वश्य करूनि मांडलिक । बलिष्ठ शत्रु होय एक । तेह द्वैधीभावविवेक । उपाय सम्यक पंचम हा ॥५२॥
तयाचा गोत्रज अथवा बन्धु । फोडोनि कीजे स्नेहसंबंधु । त्यांमाजी परस्परें विरोधु । युक्तिप्रबोधें उपजविजे ॥५३॥
मग ते मांडलिक सोयरे । उभयतांच्या स्नेहादरे । द्विधा होती परस्परें । द्वैध खरें त्या नांव ॥५४॥
शत्रु भंगले पराच्या भयें । त्यांसि आपण देऊनि अभय । प्रतिपाळावें निजाश्रयें । षष्ठ उपाय हा श्रेष्ठ ॥३५५॥
शत्रूंसी करावा उपकार । शस्त्रांहूनि हें मारणें सार । राजनीतीचे प्रकार । साही साचार हे कथिले ॥५६॥
मंत्रदेवता सुप्रसन्न । अस्त्रप्रेरण उपसंहरण । सरहस्य धनुर्वेदग्रहण । सांग संपूर्ण उपवेद ॥५७॥
धर्मन्यायप्रमुख शास्त्रें । राजनीतीशीं कथिली वक्त्रें । तें तें सकृत्न्निगदमात्रें । घेतलीं श्रोत्रें परिसतां ॥५८॥
मनुष्यदेहधारी ते नर । कुशळ वर्णश्रेष्ठ ते नरवर । त्यांमाजी हे श्रेष्ठतर । केवळ ईश्वर बलकृष्ण ॥५९॥
सकळविद्याप्रवर्तक । तिहीं धरूनि मनुष्यवेख । दास्य करूनियां सम्यक । केला संतोष स्वामीतें ॥३६०॥
स्वामीचिया कृपावरदें । सर्व विद्या सकृन्निगदें । अभ्यासितां परमानंदें । गुरु आह्लादे हृत्कमळीं ॥६१॥
वेदोपवेदशास्त्राध्ययन । कृपेनें सद्गुरु करितां कथन । श्रवणमात्रें करिती ग्रहण । प्रज्ञागहन अनुपम ॥६२॥
चौसष्टी अहोरात्रांतरीं । चौसष्टी कळांची कुसरी । अभ्यासिली निगदमात्रीं । तें अवधारीं कुरुवर्या ॥६३॥
N/A
References : N/A
Last Updated : May 08, 2017
TOP