अध्याय ८७ वा - श्लोक ६ ते १०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


जो वै भारतवर्षेऽस्मिन्क्षेमाय स्वस्तये नृणाम् । धर्मज्ञानशमोपेतमाकल्पादास्थितस्तपः ॥६॥

जो या भारवर्षामाजी । मर्त्यजनाच्या कल्याणकाजीं । धर्मज्ञानशमादिपुंजीं । युक्त आचरे तपश्चर्या ॥२६॥
आकल्प तपश्चर्यानिश्चय । नियमूनि कायावाचा हृदय । अढळ बैसला मेरुप्राय । वेष्टित समुदाय मुनींचा ॥२७॥
धर्मानुकूळ ज्याचें ज्ञान । ज्ञानानुकूळ धर्म पावन । उभयानुकूळ वृत्त्युपशमन । शमसंपन्न सद्बोधें ॥२८॥
ऐसा तपस्वी चिरस्थायी । विराजमान ऋषिसमुदायीं । वेष्टित कलापग्रामस्थांहीं । भगणवलयीं भगणपवत् ॥२९॥

तत्रोपविष्टमृषिभिः कलापग्रामवासिभिः । परीतं प्रणतोऽपृच्छदिदमेव कुरूद्वह ॥७॥

त्यातें देखोनि विधिनंदनें । दण्डप्राय़ अभिवंदनें । प्रसन्न करूनि हेंचि प्रश्नें । रहस्य पुसिलें कुरुवर्या ॥१३०॥
ऐकोनि नारदाचा प्रश्न । कल्पस्थायी तपोधन । केवळ जो नरनारायण । वदला वचन तें ऐका ॥३१॥

तस्मै ह्यवोचद्भगवानृषीणां श्रृण्वतामिदम् । यो ब्रह्मवादः पूर्वेषां जनलोकनिवासिनाम् ॥८॥

मग त्या नारदा कारणें । षड्गुणैश्वर्यसंपन्नें । जें बोलिलें नारायणें । तें हे श्रवणें अवधारीं ॥३२॥
कलापग्रामनिवासी मुनि । तेही ऐकत असतां श्रवणीं । इतिहासरूपा पुरातनी । गाथा कथिली ब्रह्मपरा ॥३३॥
म्हणाल कैसी गाथा कोण । तरी जनलोकवासी श्रेष्ठ मुनिजन । पूर्विलांहूनि पुरातन । संवाद पूर्ण जो त्यांचा ॥३४॥
जो ब्रह्मपर उपनिषब्दोध । केवळ श्रुतींचा अनुवाद । नारदाप्रति तो ब्रह्मविद । वदला विशद नारायण ॥१३५॥

श्रीभगवानुवाच - स्वायम्भुव ब्रह्मसूत्रं जनलोकेऽभवत्पुरा । तत्रस्थानां मानसानां मुनीनामूर्ध्वरेतसाम् ॥९॥

भाविभूतवर्तमान । ज्ञाता सर्वज्ञ नारायण । स्वमुखें नारदा लागून । इतिहास प्राचीन निरूपी ॥३६॥
पूर्वीं जनलोकाच्या ठायीं । ब्रह्मसत्र होतां पाहीं । स्वायंभुव या नामें तिहीं । लोकीं सर्वही जाणती जें ॥३७॥
स्वयंभू यजमान जियें सत्रीं । या लागीं स्वायंभुव हें नाम वक्त्रीं । श्रेष्ठीं वदतां चराचरीं । ख्यात झालें सर्वत्र ॥३८॥
परंतु सत्रें बहुविध असती । मीमांसात्मकें शंसिली श्रुती । त्यांमाजी स्वायंभुव हे व्युत्पत्ती । द्विविध श्रोतीं परिसावी ॥३९॥
स्वयंभू जे सत्रीं यजमान । तयासे स्वायंभुव अभिधान । स्वयंभूपासोनि ज्यांचें जनन । तें तपोधन स्वायंभुव ॥१४०॥
कर्मकलाप यथोक्त चांग । ऋत्विज यजमान यथायोग्य । प्रायश्चित्ताचा न पडे पांग । तें अव्यंग कर्मसत्र ॥४१॥
कर्मसत्र स्वयंभूकृत । यास्तव स्वायंभुव त्या नामसंकेत । तैसें नव्हे हें वेदोदित । ब्राह्मी संतत मीमांसा ॥४२॥
स्वयंभूचे स्वायंभुव । ऊर्ध्वरेते कुमार सर्व । ब्रह्मवेत्ते मुनिपुङ्गव । तत्कृत अपूर्व ब्रह्मसत्र ॥४३॥
समान वक्ते श्रोते जेथ । ब्रह्मनिष्ठ पूर्व विरक्त । ऊर्ध्वरेते भवनिवृत्त । प्रत्ययवंत अपरोक्ष ॥४४॥
त्यांमाजी अध्वर्यु करूनि वक्ता । प्राश्निक यजमान तत्वता । प्रशंसिता केवळ होता । अनुमोदिता आग्रीध्र ॥१४५॥
ऐसे करूनि ऋत्विजगण । ऊर्ध्वरेते मुनि सर्वज्ञ । ब्रह्ममीमासामय मख पूर्ण । कृतनिर्वपण जनलोकीं ॥४६॥
तया जनलोकनिवासियांचा । ब्रह्ममीमांसामय मख साचा । झाला तो आजी मज तां वाचा । प्रश्न केला देवर्षि ॥४७॥
नारदा तूं जरी म्हणसी ऐसें । तो मख मज कां विदित नसे । तरी तें कथितों सावध परिसें । प्रसंगा सरिसें उपस्थित ॥४८॥

श्वेतद्वीपं गतवति त्वयि द्रष्टुं तदीश्वरम् । ब्रह्मवादः सुसंवृत्तः श्रुतयो यत्र शेरते ।
तत्र हायमभूत्प्रश्नस्त्वं मां यमनुपृच्छसि ॥१०॥

श्वेतद्वीपाप्रति तुजलागीं । तत्रस्थ परमेश्वर मी शार्ङ्गी । अनिरुद्धरूपी विख्यात जगीं । गेलों असतां देखावया ॥४९॥
अनिरुद्धमूर्तींच्या दर्शना । श्वेतद्वीपाप्रति तां गमना । केलें असतां मागें यज्ञा । मानसपुत्रीं प्रवर्तविलें ॥१५०॥
सुष्ठु म्हणिजे बरव्या परी । ब्रह्मप्रतिपादकसंवादकुसरी । ब्रह्ममख वर्तला ते अवसरीं । तुझिया श्रोत्रीं अविदित पैं ॥५१॥
ब्रह्म म्हणिजे म्हणसी वेद । तरी हा ब्रह्मोत्तमाङ्गमय वाद । ज्याच्या ठायीं श्रुति निःशब्द । होवोनि प्रसुप्त झालिया ॥५२॥
ज्ये ठायीं पूर्ण चैतन्य । विसरे सर्वसाक्षित्वाभिमान । कर्तृत्वभोक्तृत्वज्ञातृत्ववयुन । होय लीन सन्मात्रीं ॥५३॥
केवळ ब्रह्म ब्रह्म तें सन्मात्र । अगाध अपार अगोचर । जेथ समरसे ईश्वर । स्वव्यापार विसरूनी ॥५४॥
तया पूर्णचैतन्यामाजी । अखिलात्मवयुनें श्रुतींची राजी । लीन होय सहज सहजीं । ऐसी वाजी तिहीं केली ॥१५५॥
एवं उत्कृष्ट ब्रह्मवाद । ऊर्ध्वरेते जे ब्रह्माविद । तिहीं जनलोकीं केला विशद । पूर्वी प्रसिद्ध सत्रमय ॥५६॥
तेथ तये ब्रह्माध्वरीं । हा प्रश्न केला विधिकुमारीं । जो त्वां मातें या अवसरीं । अत्यादरीं पुसियेला ॥५७॥
जिंहीं अनुष्ठिलें तें ब्रह्मसत्र । ते विधीचे मानसपुत्र । समान श्रुतशील शत्रु मित्र । तपस्वी तीव्र अवघेची ॥५८॥

N/A

References : N/A
Last Updated : June 12, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP