अध्याय ८७ वा - श्लोक ३६

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


सत इदमुत्थितं सदिति चेन्ननु तर्कहतं व्यभिचरति क्व च क्व च मृषा न तथोभययुक् ।
व्यवहृंतये विकल्प इषितोऽन्धपरम्परया भ्रमयति भारती त उरुवृत्तिभिरुक्थजडान् ॥३६॥

हें ऐकोनि मीमांसक । म्हणती विश्व सदात्मक । असत् म्हणणें हा अविवेक । उपपादून देत असों ॥४४॥
हें विश्व धर्मीं हा प्रक्ष प्रथम । येथ सत् हा साध्यधर्म । सत् उत्पन्नत्वास्तव हा परम । हेतु नाम बोलिजे ॥९४५॥
जें ज्यापासूनि उत्पन्न होय । तें तदात्मक देखिता हे । ऐसी समाख्या म्हणिजे न्यायें । दृष्टान्त आहे तो ऐका ॥४६॥
कनकापासूनि कुण्डलादिक । तेंवि सदा पासूनि सदात्मक । विश्व सन्मय हा विवेक । अनुमानप्रमाणें प्रतिपाद्य ॥४७॥
हें ऐकोनि वेदान्तवक्ता । म्हणे अभेद कीं भेदसाधितां । पंचमीनिर्देशें सन्मयता । साधूं जातां भेद घडे ॥४८॥
( ननुतर्कहतमिति ) निश्चयेंसीं तर्कहत । ऐसें खंडिलें तुमचें मत । पुन्हा प्राश्निक उपपादित । श्रोते समस्त तें ऐका ॥४९॥
प्राश्निक म्हणे अभेद कांहीं । आम्ही सर्वथा साधीत नाहीं । कनकापासूनि कुण्डल पाहीं । उत्पन्नभेद निषेधितसों ॥९५०॥
कनकापासूनि कुण्डल जालें । न तें कनकत्वा मुकलें । भेदनिषेधा ऐसें केलें । म्हणतां बोले वेदान्ती ॥५१॥
प्रत्यक्ष आपुली म्हणां माता । परि जनकाची न म्हणां कान्ता । ऐसिया वचनीं निषेधितां । अभेद वदतां मूर्खत्व ॥५२॥
कनकापासूनि कनकमय । अभेद कनकीं कुण्डल होय । तरी अनैकान्तिक दूषणें जाय । मत तुमचें हें खंडिलें ॥५३॥
( व्यभिचरति क्क चेति ) पित्या पासून पुत्र झाला । क्रियारूप गुणादि त्याला । साम्यता घडे कीं न घडे बोला । व्यभिचार घडला कीं नाहीं ॥५४॥
मुद्गरापासूनि घटध्वंस । मुद्गरासमान म्हणतां दोष । साम्यता न दिसे म्हणोनि ओस । पडिला पक्ष हा तुमचा ॥९५५॥
हें ऐकूनि वादी म्हणे । तदुत्पन्नत्व उपपादणें । न विवरितां दूषण देणें । अयुक्तपनें तुम्हीं आम्हां ॥५६॥
तदुत्पन्नत्व उपपादणें । तें न मनिजे निमित्तकारणें । तैं अनेकान्तिकत्वदूषणें । दूषिलें नवचे आमुचें मत ॥५७॥
हें ऐकूनि पुन्हा वेदान्ती । म्हण कां वाढवां वृथा युक्ति । तुमच्या मता निषेधी श्रुति । तरी ते उक्ति अवधारा ॥५८॥
( क्वचमृषेति ) उपादानही कारणें मृषा । कार्य ऐसे कोठें परिसा । गुणोपादान सर्पाभासा । कारण होय कीं ना हो ॥५९॥
कनकापासूनि कुण्डल प्रकट । भेदें अभेदें दिसे स्पष्ट । तेंवि न देखोनि रज्जुनिष्ठ । भुजंग नष्ट मिथ्यात्वें ॥९६०॥
ऐसें तुमचें मत खंडिलें । अनैकान्तिकत्व दूषणाथिलें । हें ऐकूनि वादी बोले । तेंही परिसिलें पाहिजे ॥६१॥
पुरतें आमुचें मत नेणतां । तुम्ही आग्रहें दूषण देतां । रज्जु उपादान केवळ म्हणतां । तुमच्या मता सत्यव ॥६२॥
म्हणे वेदान्ती यदर्थी कैसें । तुझें प्रतिपादन जें असे । तें प्रतिपादीं स्वेच्छावशें । संकोच मानसें न करूनी ॥६३॥
ऐकूनि ऐसिया उत्तरा । वादी वदे प्रत्युत्तरा । केवळ रज्जु सर्पाकारा । उपादान हें न वदों कां ॥६४॥
अविद्याभ्रमें तवाक्त मही । गुणीं फणित्व तियेचे ठायीं । तस्मात् अविद्यागुणां या दोहीं । उपादानत्व वदों आम्ही ॥९६५॥
अविद्यायुक्ति अवस्तु फणी । यालागीं मिथ्यात्व त्या लागूनी । यावरी वेदान्ती वदे वाणी । तैसेंचि म्हणोनि येथ समजा ॥६६॥
तुल्यदृष्टान्तें दूषिली युक्ति । सदुपादान प्रपंचा प्रति । न घडे ऐसी सधर उक्ति । अविद्याभ्रान्तिस्तव भासे ॥६७॥
केवळ सन्मात्रीं प्रपंच न घडे । अविद्यायोगें उभया घडे । हें तो आम्ही ही न मनूं कोडें । निषेध तोंडें तुम्हां तुमच्या ॥६८॥
भ्रमें भासलें तितुकें लटिकें । भ्रमनिरसना नंतर न टिके । स्वप्नींचें वैभव आघवें घटिके - । माजी भासोनि लोपतसे ॥६९॥
हें ऐकोनि वादी बोले । यया हेतूनें न साधिलें । हेत्वंतरें तैं साधूं भलें । प्रपंचालागूनि सत्यत्व ॥९७०॥
तेंचि ऐका हेत्वंतर । इदं इतुका पक्ष सधर । सत्साध्य हा निर्धार । हेतुक्रियाकारित्व ॥७१॥
या वरी सम्याख्यानिगमन । व्यतिरेक युक्तिप्राति प्रतिपादन । करितसां ते समजा खूण । उदाहरण परिसोनी ॥७२॥
हेतु असिद्ध जिये ठायीं । तेथ साध्यही तद्वत्त पाहीं । शुक्तिरजतन्यायें दोहीं । सत्यासत्यत्व जाणावें ॥७३॥
त्रिधा अनुमानाची जाति । बोलिली नैयायिकांची मति । अव्ययी अनुमान एका म्हणती । द्वितीय व्यतिरेक अनुमान ॥७४॥
अव्नयव्यतिरेकात्मक तृतीय । त्या माजी अन्वयी अनुमानें न होय । तरी व्यतिरेक अनुमानें सिद्ध होय । पक्ष आमुचा निर्धारें ॥९७५॥
जें कां अर्थक्रियाकारी नव्हे । तें सत् ही निश्चयें न वदावें । शुक्तिरजतवत् जाणावें । तैसें न मनावें हें विश्व ॥७६॥
अर्थक्रियाकारी रजत । शुक्तिजन्य नव्हे निश्चित । तैसा येथ न घडे अर्थ । ऐका स्वस्थ वदतसों ॥७७॥
विश्वीं अर्थक्रियाकारित्व घडे । म्हणोनि सदत्व ही रोकडें । गंधवत्त्व पृथ्वी कडे । गंधीं सांपडे पार्थिवता ॥७८॥
ऐकोनि म्हणे वक्ता धन्य । शाखाचंक्रमणें तव संभवन । म्हणोनि स्वपक्षप्रतिपादन । करिसी न शिणोन तैसाची ॥७९॥
अर्थक्रियाकारित्व जेथें । सन्मात्रत्व सत्य तेथें । म्हणसी तरी हें भ्रमाचें भरतें । व्यवहारार्थ आवश्यक ॥९८०॥
व्यवहारार्थ विकल्पभ्रम । अवश्यमेव इष्ट परम । कूटकार्षापणादि कृत्रिम । व्यवहार निस्सीम देखिजतो ॥८१॥
कूटकार्षापण तें काय । याचा स्पष्टार्थ ऐसा आहे । कृतिम रजतादि गाङ्गेय । मुद्रा तन्मय निर्मिती ॥८२॥
सत्य न होनि सत्यासम । भासवी जो असत्यभ्रम । व्यवहारार्थ तो संभ्रम । इष्टचि परम आवश्यक ॥८३॥
संध्याकाळीं वसनक्रयी । पडदा बांधिती क्रयविक्रयीं । देखणयांची दृष्टी पाहीं । भ्रामक्त करिती तद्योगें ॥८४॥
अर्थक्रियार्थ जो विकल्पभ्रम । तो व्यवहारीं इष्ट परम । देखिजत असतां ही कृत्रिम । ऐसें निस्सीम कळलें कीं ॥९८५॥
हें ऐकोनि वादी म्हणे । असत्वीं भ्रमाचें केंवि होणें । भ्रमोत्पति ते विवरणें । मग दूषणें मत आमुचें ॥८६॥
यथार्थ सर्प एके ठायीं । देखिला तद्भयाची हृदयीं । वसती होती तेणें पाहीं । भाविला अहि रज्जूवरी ॥८७॥
सरितासागरीं वास्तव जळ । पूर्वीं देखिलें असे केवळ । भ्रमें भासे तेंवि मृगजळ । तैं भ्रम निर्मूळ केंवि म्हणां ॥८८॥
अत्यंताभावीं भ्रमोत्पति । कैसी घडे प्रपंचा प्रति । सत्याश्रयें भ्रमा प्रति । होणें न होणें घडो पैं ॥८९॥
वास्तव प्रपंच देखिला पूर्वीं । स्वप्नीं भ्रमें तो भासला तेंवि । तैं तो अवास्तव न घडे जेंवि । अद्वैत केंवि साधितसां ॥९९०॥
जैसें परब्रह्म सन्मात्र । तैसा प्रपंच सत् स्वतंत्र । द्वैत असतां अद्वैतपर । बलात्कार हा तुमचा ॥९१॥
यदर्थीं भट्टाचार्यवचन । भ्रमोत्पत्तीचें कारण । बोलिलें तें विचक्षण । श्रोतें सर्वज्ञ परिसोत ॥९२॥


References : N/A
Last Updated : June 12, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP