अध्याय ८७ वा - श्लोक २१ ते २५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
दुरवगमात्मतत्वनिगमाय तवात्ततनोश्चरितमहामृताब्धिपरिवर्त्तपरिश्रमणाः ।
न परिलषन्ति केचिदपवर्गमपीश्वर ते चरनसरोजहंसकुलसङ्गविसृष्टगृहाः ॥२१॥
श्रुति म्हणती भो ईश्वरा । दुर्बोध आत्मविचार खरा । तदगमार्थ विवेक दुसरा । भक्ती वांचूनि असेना ॥३९०॥
भक्ति म्हणिजे जाति काय । हा विवरितां अभिप्राय । प्रेमरसावांचूनि सोय । न लगे अन्वय बोधावया ॥९१॥
देव भक्त इतुकें द्वैत । परि माजील प्रेम अद्वैत । भेद असतां तेथ किंचित । ये वैयर्थ्य भक्तीसी ॥९२॥
भक्तितत्त्व ऐसें एक । जें सर्वीं सर्वत्र रोचक । - प्रपंचीं ही विषयसुख । विपरीतबोधें रुचवीतसे ॥९३॥
युवा युवति परस्परें । सप्रेम भजती स्मर पडिभारें । यामाजी पातिव्रत्य जैं खरें । तैं निस्तरे भवसिन्धु ॥९४॥
पिता पुत्र कीं सेवकस्वामी । अभेदप्रेमें वर्ततां सद्मीं । विषय सेवितां सुकृतोद्यमीं । भवदुर्गमीं निस्तरती ॥३९५॥
असो हे स्वैराचारें विषय । सप्रेम सेवितां रोचक होय । प्रेम राहित्यें विपप्राय । लागे हें काय सांगावें ॥९६॥
विपरीतबोधें विषयाभास । प्रगरसेंचि रुचे अशेष । प्रेम भंगतां वैराग्यास । कारण होय तेच क्षणीं ॥९७॥
विषयाभासी जें वैरस्य । वैराग्यनामें बोलिजे त्यास । तैं देहादि प्रपंच फोस । प्रेमा ओस सहजेंची ॥९८॥
तैं मग प्रेमा वास्तवबोधें । पूर्णचैतन्यीं येवोनि नांदे । मृगजल सांडूनि अगाधह्रदें । जेंवि निवती पिपासिक ॥९९॥
पूर्णचैतन्य तूं ईश्वर । धर्मसेतुस्थापनापर । घेऊनि युगानुयुगीं अवतार । लीला विचित्र प्रकाशिसी ॥४००॥
सूर्योदयीं नासे तम । डोळ्यां रुचे प्रकाशप्रेम । तव विग्रहीं भक्तासत्तम । जडती निष्काम सकामवत् ॥१॥
युवा युवति सकाम रमती । विपरीतबोधाचिये भ्रान्ती । वास्तवबोधें सप्रेमभक्ती । तेंवि लाहती सद्भक्त ॥२॥
तुझी जे कां अवतारमूर्ति । तयेची जे अमोघकीर्ति । तया अमृताब्धी माजि निवती । लाहती विश्रांति अक्षय ते ॥३॥
तया सप्रेम सुखापुढें । कैवल्यसुखही नेच्छिती कोडें । तेथ आमुष्मिक बापुडें । कोणीकडे वैवर्ती ॥४॥
ऐसे विरळा भक्तिरसिक । भक्तिप्रेमापुढें आणिक । अपवर्गादि नेच्छिती देख । रमती सम्यक सत्संगीं ॥४०५॥
प्रेमसुखें पूर्ण धाले । केवळ सत्संगीं निवाले । थितें देहादिसुख विसरले । मां इतरां भजले केंवि ॥६॥
त्वत्पदसरोजहंसकुळ । झालें सत्संगें जे अमळ । देहगेहादि बंदिशाळ । मानूनि केवळ संन्यसिती ॥७॥
श्रवण कीर्तन नवविध प्रेमा । भोगितां विसरूनि गेले कामा । अभेदबोधें निष्कामधामा । माजी विश्रामा पावले ॥८॥
ऐसिया भक्तांचें पदकमळ । मुक्त वंदिती सनकादि अमळ । मुमुक्षुही विश्रांतिस्थळ । वेळाउळ सेविती ते ॥९॥
तया सुखाची विश्रान्ती । दुर्लभ मानूनि बद्ध वांछिती । एवं सर्वां वरिष्ठ भक्ती । म्हणती श्रुती भो ईशा ॥४१०॥
भक्तिसुखोपलब्धिस्थळ । तें एक हें भूमंडळ । येथ नरतनु लाहूनि अमळ । भजती केवळ आत्मघ्न ते ॥११॥
ज्याच्या प्रकाशें विश्वोद्यान । कोणी तयातें न पाहोन । विश्वीं विषयाभिलाषें पूर्ण । रमती अनभिज्ञ मूढत्वें ॥१२॥
जेथूनि जन्म झाला आपणा । विसरूनि तया आत्मकारणा । आत्मच्छायेच्या आलिंगना । स्नेह चौगुणा वाढविती ॥१३॥
अरे प्राणी तो तुम्ही सकळ । अज्ञान पांघुरलां केवळ । तेणें विसरलां आपुलें मूळ । भुललां टवाळ देखोनी ॥१४॥
प्राणपोषक विषयासक्त । अनित्यपदार्थीं अनुरक्त । होऊनि वदतां जो वेदान्त । तोचि भ्रान्तिकर होय ॥४१५॥
सकाम भ्रमकर वेदवचनें । प्रतिपादिती जे कर्माचरणें । तत्फलभोगें जन्ममरणें । योनिभ्रमणें न चुकती ॥१६॥
यस्तव भूलोकीं नरतनुय । लाधल्या कीजे ईश्वरभजन । हितोपदेशें श्रुतींचा गण । आक्रोशोन हेंच वदे ॥१७॥
त्वदनुपथं कुलायमिदमात्मसुहृत्प्रियवत् च रति तथोन्मुखे त्वय हिते प्रिय आत्मनि च ।
न बत रमन्त्यहो असदुपासनयाऽऽत्महनो यदुनुशया भ्रमन्त्युरुभये कुशरीरभृतः ॥२२॥
भो भगवंता तुझिये भजनीं । अनुकूल नरतनु सर्वांहूनी । कुलायशब्दें वैयाकरणी । जिये लागून म्हणताती ॥१८॥
कु हें पृथ्वीचें अभिधान । तीमाजी अंतीं होतसे लीन । यालागीं कुलाय म्हणती जाण । देहालागून विपश्चित ॥१९॥
ते नरतनु भजनानुकूळ । आज्ञेसरिसी वर्तनशीळ । आत्मतुल्य प्रेम केवळ । लाहोनि विकळ भजनीं जो ॥४२०॥
तथापि सर्वज्ञ तूं परमात्मा । भावें भजती त्यांचा प्रेमा । जाणोनि पुरविसी तयांच्या कामा । विश्रामधामा विश्वेशा ॥२१॥
अमरतरूच्या तळवटीं । न लावितांही कुसुमादिवाटी । फळपुष्पांच्या विविधकोटी । इच्छितां पोटीं उपलब्ध ॥२२॥
तैसा भक्तभावने सरिसा । तूं सम्मुखची श्रीपरेशा । प्रियतम हितकर तुज ऐसा । आन आपैसा नसतांही ॥२३॥
ऐसा सुसेव्यही तूं असतां । तुझ्या ठायीं प्रेमा चित्ता । सख्यादि भजनें नादरितां । भजती विवर्ता आत्मघ्न ॥२४॥
असत्पदार्थोपासना । अवलंबूनि विपरीतज्ञाना । भजती ऐसिया आत्मघ्नां । दीर्घस्वप्ना वरपडणें ॥४२५॥
म्हणती वडील दरिद्री होते । आपण झालों उद्योगकर्ते । नाना व्यवसायीं धनातें । संपादिलें बहुयत्नीं ॥२६॥
धनवर्धना विश्वसुक । पाहोनि योजिले सेवक । तथापि त्यांचा प्रातिमासिक । पाहणें लेख लागतसे ॥२७॥
नामांकितांसीं तनुसंबंध । केले उत्साह अगाध । वनितारत्नें परम शुद्ध । भाग्यें प्रसिद्ध लाधलीं ॥२८॥
रूपलावण्याच्या खाणी । मनोनुकूला गृहवर्तिनी । सालंकृता वसनाभरणीं । तरुणी तरणि तेज्याढ्या ॥२९॥
तयांचे पोटीं झाले कुमर । प्रज्ञावंत परम चतुर । तिहीं घेतला कुटुंबभार । धार्ष्ण्यें धुरंधर निवडिले ॥४३०॥
निष्कापासूनि कोटिमान । यत्नें संग्रहिलें कांचन । आयव्ययाचें परिज्ञान । अतिसज्ञान प्रबोधनीं ॥३१॥
अनेक वस्तूंचे संग्रह । अष्टादशधान्यसमूह । उभराxxरी करितां पहा हो । अवकाश लाहों न पवती ॥३२॥
विश्वास न वाटेचि कोणाचा । धोका द्रव्यरक्षणाचा । निगूढ ठाव निक्षेपाचा । युक्तिप्रयुक्ती निर्मिती ॥३३॥
ऐसें चित्त ठायीं ठायीं । सर्वदा गुंतोनि गेलें पाहीं । तथापि देखोवेखीं कांहीं । सुकृतप्रवाहीं भरताती ॥३४॥
कार्तिकमाघवैशाखस्नानीं । जाऊनि बैसती पुराणीं । धन वेंचितां मानिनी हानी । म्हणती आम्हां हें कोठूनि आठवलें ॥४३५॥
एक म्हणती नायकों आतां । तुम्हीं साधावें परमार्था । सांडूनि प्रपंचाची चिंता । स्वस्थ एकान्ता सेवावें ॥३६॥
येरू म्हणे बायको भोळी । रक्षूं न शके लुगडें चोळी । तें केंवि धनसदना सांभाळी । आम्हां वेगळी अतिदीन ॥३७॥
लेकुरें नेणतीं आम्हांविणें । किविलवाणीं दिसती दीनें । प्रस्तुत नातोंडांचीं लग्नें । करणें लागती आवश्यकें ॥३८॥
नामा रूपा सारिखे देख । गृहस्थ पाहूनि आवश्यक । त्यांसीं करणें सोयरिक । दीर्घ विवेक करूनियां ॥३९॥
असत्पदार्थोपासना । सप्रेमभावें ऐसी मना । रुचलिया मग वैराग्य कोणा । भावें आत्मना उपजेल ॥४४०॥
समयीं आलिया याचकासी । मुष्टि पिष्ट देतां त्यासी । वदान्य मानी आपणासी । सुकृतराशी म्हणे घडल्या ॥४१॥
सहस्रभोजनें सांबत्सरिकें । कीं श्राद्धपक्षादि वार्षिकें । ग्रहणें व्यतिपातपार्विकें । साधी सम्यकें सुकृतार्थ ॥४२॥
व्रतें उपावास पारणी । तीर्थयात्रांची धांवणी । म्हणे मजहूनि दुसरा कोणी । देवीं ब्राह्मणीं न भजेची ॥४३॥
लोकीं माझी गृहस्थिति । स्त्रीपुत्रादि धनसंपत्ति । मजहूनि सुखी नाहीं क्षिति । म्हणोनि चित्तीं श्लाघेजे ॥४४॥
तंव पूर्वील जे कां विश्वासुक । ठेविले होते जे हस्तक । तेचि होती खग्रासक । पाहतां लेख साकल्यें ॥४४५॥
त्यांसी बोलतां निष्ठुरपणें । तेही बोलती पुरें उणे । पांचांमाजी लाजिरवाणें । नेऊनि भांडणें वाढविती ॥४६॥
तयांसी होती आन्नान्नगति । सभाग्य केले ते स्वसंगति । कृतघ्न फिरूनि पडिले अंतीं । म्हणोनि खंती बहु वाटे ॥४७॥
ऐकतां त्यांच्या विषम गोठी । क्रोधें भडका उठे पोटीं । बळें झोंबूनियां कंठीं । वाटे घांटी फोडावी ॥४८॥
ऐसा प्रचंड क्रोध वाढे । तैं शान्ति क्षमा कोणीकडे । घातपातांवरी वावडे । वेंचूनि कवडे नृपसदनीं ॥४९॥
ऐसे व्यवसाय अनेक । असदाराधनीं मानिती सुख । तेणें प्रबळे शत्रुषट्क । मग भोगिती नरक बहुयोनी ॥४५०॥
रांड मेलिया दुःखें रडे । पोर मेलिया शोकें वरडे । विश्रान्ति न वटे चहूंकदे । वर्णितां तोंडें गुण त्यांचे ॥५१॥
असो वैराग्य नुपजे देहीं । तंववरी सहसा सुटका नाहीं । आत्महंतें मोहप्रवाहीं । ऐसेचि पाहीं निमज्जती ॥५२॥
नरदेह अनुकूळ नवविधभजना । तो मग लावी तद्गुनकथना । दुःखें व्याप्त अंतःकरणा । माजी वेदना भोगीतसे ॥५३॥
हरिगुणश्रवणा पटुतर श्रोत्र । हरिकीर्तना अनुकूळ वक्त्र । हरिपरिचर्ये लागीं कर । नरशरीर ऐसें जें ॥५४॥
असदुपासनेचे राहटी । तें वेंचिती विषयासाठीं । मग भोंगिती दुःखकोटी । देतां घरटी भवचक्रीं ॥४५५॥
जेथ जेथ वासना गुंते । तेथ जन्म घेऊनि कुंथे । पावे अनेक दुर्योनींतें । भवभ्रमपथें परिभ्रमतां ॥५६॥
मर्कट होवोनि कैकाडियाचें । दारोदारीं तत्तंत्र नाचे । कीं सर्प होवोनि गारुडियाचें । कुटुंब त्याचें मग पोषी ॥५७॥
रीस व्याघ्र उक्ष वृश्चिक । श्वान वानर मार्जार मूषक । रासभ सूकर मृग जंबुक । धरी अनेक कुशरीरें ॥५८॥
चौर्यांशी लक्ष संख्या योनी । माजी नरतनु अनुकूळ भजनीं । केवळ आत्मप्राप्ती लागोनी । देवें निर्मूनि ठेविली ॥५९॥
चौर्यांशी लक्ष योनि भ्रमतां । केवळ विषयभोगीं रमतां । दुर्लभ नरदेह हा अवचितां । लाहिजे तत्त्वता बहुभाग्यें ॥४६०॥
दुर्लभ नरदेह लाभल्यावरी । अन्य योनींचिया परी । विषयासक्त होइजे नरीं । तरी मग थोरी काय याची ॥६१॥
लाहोनि नरदेह निधान । संपादूनि आत्मज्ञान । ब्रह्मानिष्ठ होइजे पूर्ण । मिथ्या भवभानं विसरूनी ॥६२॥
आत्मा देखावा ऐकावा । आत्मा मननीं मंतव्यावा । निदिध्यासें अनुभवावा । ध्यावा गावा श्रुति म्हणती ॥६३॥
श्रुतींचा मुख्य अभिपाय । भ्रान्त जीवांचा समुदाय । तयांसी लाधलिया नरदेह । परमार्थसोय साधावी ॥६४॥
असन्मृगाम्बुपानें सुख । मानितां तेथें पावले दुःख । सन्मात्र चिदंबु सम्यक । सेवितां तोख सर्वत्र ॥४६५॥
निभृतमरुन्मनोऽक्षदृढयोगयुजो हृदि यन्मुनय उपासते तदरयोऽपि ययुः स्मरणात् ।
स्त्रिय उरगेन्द्रभोगभुजदण्डविषक्तधियो वयमपि ते समाः समदृशोऽङ्घ्रिसरोजसुधाः ॥२३॥
दमें रोधूनि करणवर्ग । शमें करिती वासनात्याग । अवलंबूनि प्रणवमार्ग । साधिती सांग प्राणजय ॥६६॥
पवनजयें रोधे मन । तैं तें होय कल्पनाविहीन । ऐसे योगाभ्यासीं प्रवीण । दृढ मुनिजन जे ध्याती ॥६७॥
ते सन्मात्रोपासक । म्हणोन पावती अक्षयसुख । द्वेष्टे द्वेष्टिती जरी सम्यक । तरी त्यां वित्सुख सद्द्वेषें ॥६८॥
स्पर्शमणि पूजितां भावें । अष्टलोहाचीं पात्रें सर्वें । होय हेमचि आघवें । स्पर्शगौरवें सन्मात्रें ॥६९॥
द्वेषीं यवनीं फोडितां घनें । तें तो घनाचें करीं सोनें । सन्मात्रवस्तु स्वमहिमानें । चित्सुखाविणें आन नेदी ॥४७०॥
किंवा सन्मात्रविग्रहधारी । पाहोनि सकाम भुलल्या नारी । बाहु भुजगेन्द्रवर्ष्मा सरी । देखोनि अंतरीं प्रविषक्ता ॥७१॥
जरी त्या सन्मात्रसगुणा तूतें । सकामप्रेमें भुलल्या चित्तें । तथापि वास्तव चित्सुखातें । भोगिती निरुतें सद्भजनें ॥७२॥
तैशाचि आम्ही तुज तत्वता । केवळ श्रुतिरूपीं देवता । वास्तवनिर्गुणबोधें भजतां । पदाब्ज माथां धरीतसों ॥७३॥
तस्मात वास्तवसन्मात्रगुणें । द्वेषें प्रेमें स्मरणें ध्यानें । अभेद तव प्राप्ति पावणें । असद्भजनें दुर्लभ ते ॥७४॥
मना सहित परतल्या वाचा । न पवोनि अवबोध ज्याचा । तेथ प्रवेश आणिकांचा । होईल कैंचा जाणावया ॥४७५॥
साक्षाद्वेत्ता कोण तया । कीं वक्ता समर्थ बोलावया । येथ कोठूनि सृष्टि इया । स्थूळ सूक्ष्मा इत्यादि ॥७६॥
ज्याहूनि अर्वाक् देवताचक्र । जें कां सृष्टिसर्ज्जनपर । ज्यापासूनि हें समग्र । होतें झालें स्थूळ सूक्ष्म ॥७७॥
त्यातें जाणता त्याहूनि कोण । असावा तत्पूर्वीं विद्यमान । तरी हें परब्रह्म निर्गुण । एक म्हणोन निगमोक्ति ॥७८॥
तेथ कैंचा तया पूर्वीं । अर्वाक् ब्रह्मादिस्थावरीं सर्वी । ज्याहूनि होयिजे ऐसी पदवी । श्रुति गौरवीं वाखाणे ॥७९॥
जें कां वास्तव असंग एक । निष्कंप अचंचल निष्टंक । मनाहूनियां जवीन देख । विरोधवाक्य हें न मना ॥४८०॥
कल्पने सरिसें मन वावडे । तंव वास्तवस्वरूप त्याहूनि पुढें । तैं मनाहूनियां जवीन घडे । ऐसें उघडें जाणों ये ॥८१॥
मृगजळ सांडून सूर्यश्मी । पुढें जाईल कवणिये भूमी । तैसे ज्यावरी ब्रह्मादि आम्ही । विविधा नामीं वैवर्ती ॥८२॥
यालागीं देव अर्वाचीन । पावूं न शकती जयाचें वयुन । सर्वां पूर्वीं विद्यमान । जें सनातन सन्मात्र ॥८३॥
चंद्र सूर्य तारा पवन । इत्यादि जे जे धावमान । त्या सर्वांचें अतिक्रमण । करून वर्ते सर्वत्र ॥८४॥
सर्वांचें जें बीज आप । तैसाचि वायु प्राणरूप । ज्यावरी भासोनि ज्यामाजि अल्प । वर्ते आकल्प पर्यंत ॥४८५॥
इत्यादि वदे श्रुतींचा निकर । भगवत्तत्व दुर्ज्ञेयपर । कोणी जाणों न शकती अवर । ऐसा निर्धार करूनियां ॥८६॥
अव्यभिचारी भगवद्भक्ति । अंगीकारूनि श्रुति वदती । तो इत्यर्थ आर्षश्रुति । श्रीशुक सुमती बोलतसे ॥८७॥
क इह नु वेद बतावरजन्मलयोऽग्रसरं यत उदगादृषिर्यमनु देवगणा उभये ।
तर्हि न सन्न चासदुभयं न च कालजवः किमपि न तत्र शास्त्रमवकृष्य शयीत यदा ॥२४॥
बत या अव्ययार्थें श्रुति । भो भगवन्ता ऐसें म्हणती । अग्रसर तूं इये जगती । सर्वां पूर्वीं स्वतः सिद्ध ॥८८॥
तया तूतें अर्वाचीन । उत्पत्तिस्थितिनाशवान । जाणों शकेल पुरुष कोण । ज्ञानकारणावांचूनी ॥८९॥
सर्वत्र तुजहूनि अलीकडे । यदर्थीं काय प्रमाण घडे । तरी यतउदगात् या पदें कोडें । देऊनि झाडें सूचविले ॥४९०॥
यतः म्हणिजे ज्यापासून । प्रथम ऋषि जो कां दुहिण । उत्पन्न झाला तेणें सृजन । केलें संपूर्ण सृष्टीचें ॥९१॥
आधिदैविक आध्यात्मिक । द्विविध देवगण दुहिणें देख । सूजिले तिहीं विश्व सम्यक । रचिलें अर्वाक उत्तरोत्तर ॥९२॥
ऐसें तुजमाजी तुजपासून । या विश्वाचें स्थितिलयसृजन । एवं तुजहूनि अर्वाचीन । तुज कोठून जाणती हे ॥९३॥
ऐसें अर्वाक् उत्तरोत्तर । तुजसीं पडतां बहु अंतर । म्हणोनि न कळे या तव पार । पडिला अंधार अज्ञानें ॥९४॥
आणि जेव्हां सर्व आकर्षून । आपणामाजि करूनि लीन । योगमायामंचकीं शयन । उपसंहरून तूं करिसी ॥४९५॥
तेव्हां समस्त जीवकोटी । निद्रित होती मायेच्या पोटीं । ज्ञानसाधनांची त्यां गोठी । नाहीं शेवटीं निद्रितां ॥९६॥
तेव्हां नाहीं सदसद । स्थूळसूक्ष्मादिक जें विशद । दोहीं मिळोनि एकविध । तो शरीरभेद नसेचि तैं ॥९७॥
तेव्हां नाहीं काळवेग । अक्षर पळ घटिकाब्दयुग । काळवैषम्यप्रसंग । तोही मार्ग नसेचि तैं ॥९८॥
तेव्हां ऐंचे पृथक् प्राण । तेथ कैंचा इन्द्रियगण । शास्त्रही ज्ञानसूचक पूर्ण । कैंचें कोठून त्या ठायीं ॥९९॥
तुजपासूनि जन्मला द्रुहिण । तेणें मन्वादि महर्षिगण । उत्तरोत्तर प्रजासृजन । केला उत्पन्न करावया ॥५००॥
आध्यात्मिक आधिदैविक । व्यष्टिसमष्टिकरणात्मक । द्विविधदेवताचक्रविवेक । झाला अर्वाक तुजहूनी ॥१॥
तया देवताचक्रद्वारा । विपरीत ज्ञानाचा उभारा । देहवंतां प्राणिमात्रां । अविद्यापरां औपाधिकां ॥२॥
तेणें काळकाळान्तरें । तुजसीं अंतर पडिलें खरें । यास्तव अज्ञान अंधारें । अविद्याभरें दृढावलें ॥३॥
असो देहादि उपाधिवन्तां । मळिनसत्वां काळान्तरितां । भगवज्ज्ञानीं अनर्हता । घडे तत्वता या अर्थें ॥४॥
परंतु प्रळयाच्या अवसरीं । लय पावल्या चराचरीं । समस्त गुणसाम्येमाझारी । जीवकोटि लीन होती ॥५०५॥
मायामंचकीं तुझें शयन । तैं जीवां तुजसीं सन्निधान । असतां तुझें वास्तव ज्ञान । नोहे संपूर्ण जगदीशा ॥६॥
प्राणादिकरणांचा समुदाय । इहीं साधनीं जाणिजे ज्ञेय । तूंही न होसी ज्ञेयविषय । साधनसमुच्चय नसेचि तैं ॥७॥
तेथ शास्त्र ना शास्त्रवक्ता । श्रवण श्रोता ना मननकर्ता । एवं वास्तवज्ञानवार्ता । नोहे तत्वता दोहीं परी ॥८॥
यास्तव होवोनि तवाङ्घ्रिशरण । सप्रेम करितां नवविध भजन । कृपेनें द्रवूनि बोधिसी ज्ञान । तरी भक्तिसाधन वर सर्वां ॥९॥
याचि श्रुत्यर्था दृढीकरण । करावया व्यासनंदन । करूनि अनेक मतखंडन । करी व्याख्यान तें ऐका ॥५१०॥
जनिमसतः सतो मृतिमुतात्मनि ये च भिदां विपणमृतं स्मरन्त्युपदिशन्ति त आरुपितैः ।
त्रिगुणमयः पुमानिति भिदा यदबोधकृता त्वयि न ततः परत्र स भवेदवबोधरसे ॥२५॥
श्रुति म्हणती भो भो ईशा । याही एका हेतुविशेषा । पाहतां तुझिया झानप्रकाशा । सुशक्य नोहे पावावया ॥११॥
ज्ञानोपदेष्टे सांप्रत । भ्रमबाहुल्यास्तव झाले बहुत । आपुलालें ते बोधिती मत । म्हणती सिद्धान्त मुख्य हा ॥१२॥
नाहीं त्याचा जन्म वदती । आहे त्यासी बोलती मृति । न घडे तेंचि घडतें म्हणती । भ्रमाक्तमति बहुवक्ते ॥१३॥
वास्तव आत्मस्वरूप एक । भेदें कल्पिती अनेक । एक अमर नर तिर्यक । म्हणती सम्यक कर्मफळ ॥१४॥
अवबोधरस तो निरामय । त्या तुज म्हणती त्रिगुणमय । अबोधास्तव भेदासि ठाय । करूनि अपाय दृढाविती ॥५१५॥
ऐसीं पृथक् अनेक मतें । आरोपितभ्रमभ्रान्तें । उपदेशिती तद्वाक्यांतें । विश्वासतां भ्रमवृद्धि ॥१६॥
वैशेषिक जो मतवादी । नसत्या जगाची उत्पत्ति आदि । अरोपितभ्रमबोधें प्रतिपादी । श्रुतिविरोधी यास्तव तो ॥१७॥
सदेव आदिमध्यान्तीं एक । ऐसा श्रुतींचा मुख्य विवेक । तेथ असज्जनांचा जननाङ्क । कैं कोठून म्हणावा ॥१८॥
पातंजळाचिया मतें । पूर्वीं जीवांसि ब्रह्मत्व नव्हतें । योगाभ्यासें साधिजेतें । पंचभूतें प्राशूनि ॥१९॥
धातुवादाच्या साधनें । जेंवि लोहाचें कीजे सोनें । तेंवि जीवा ब्रह्म होणें । योगाभ्यासें करूनियां ॥५२०॥
ब्रह्मचि आसोनि ब्रह्मप्राप्त । ऐसा सिद्धान्त बोले श्रुति । अष्टलोह ऐसिया उक्ति । केली निवृत्ति कनकत्वा ॥२१॥
एकविंशतिदुःखा नाश । तयाचि नांव निःश्रेयस । ऐसा नैयायिकांचा पक्ष । प्रबोधी दक्ष बहुतकें ॥२२॥
अनीशया हें श्रुतींचें वचन । करीं तयाचें मतखंडन । कैसें म्हणाल तरी व्याख्यान । सावधान अवधारा ॥२३॥
अनीशानामें जे अविद्या । तिनें उत्पन्न केलें भेदा । यास्तव अनेक दुःख आपदा । भोगितां खेदा पावती ॥२४॥
वास्तव अखंडैकरसीं । तेथ दुःखाची गोष्टी कायसी । भेद असतां दुःखनाशीं । केंवि मोक्षासी पावणें ॥५२५॥
सुषुप्तिगर्भीं सर्व दुःखा । नाश झाला असतां देखा । तथापि जीवां नोहे सुटिका । मोक्ष लटिका कीं ना तो ॥२६॥
अविद्येमाजी विद्यमान । मानिती आपण बुद्धिमान । म्हणती वास्तवज्ञानसंपन्न । जघन्यमान असतांही ॥२७॥
अधन्यमान म्हणिजे काई । तरी जरामरणादिदुःखप्रवाहीं । पडिले असतां आपुले ठायीं । मानिती मूड्ज मुक्तत्व ॥२८॥
अंधें अंध धरूनि हातीं । नेइजत असतां दुर्घटपथीं । पतन पावती महागर्तीं । तैसीच मति भेदज्ञा ॥२९॥
तस्मात सांख्यभेदवादी । जीवात्मभेदातें प्रेतिपादी । तया मतातें निषेधी । श्रुति इत्यादिवाक्यार्थें ॥५३०॥
इष्टानिष्ट मिश्रफळ । कर्मजनित हें केवळ । सत्य मानिती कर्मशीळ । मीमासकमतवादी ॥३१॥
एकचि अद्वितीय ब्रह्म । तेथ लोक लोकान्तर हा भ्रम । तेथ कैंचें फलद कर्म । वृथा श्रम श्रुति म्हणती ॥३२॥
स्वप्नामाजी झाला राय । वृथा डोळे झांकूनि काय । शेखी रंकत्व तों न जाय । तोचि हा न्याय याज्ञिकां ॥३३॥
त्रिगुणमयत्व पुरुषासि येथें । निर्धारितां वास्तव असतें । तरी हें अवघेंचि घडों शकतें । परि तें येथें अघटित पैं ॥३४॥
श्रुति म्हणती तुझ्या ठायीं । भो जगदीशा भेदचि नाहीं । अबोधास्तव कल्पिला पाहीं । भ्रान्तिप्रवाहीं भ्रमग्रस्तीं ॥५३५॥
त्रिगुणमय पुरुष येणें । हेतुवैशिष्ट्यें उपलक्षनें । तुझ्या ठायीं भेदकल्पनें । अविद्यावरणें आवृतीं ॥३६॥
दृष्टिमाजील नीलिमा जेंवी । गगनीं आरोपिजे प्राकृतीं जीवीं । त्वदिषयिक हें अज्ञान तेंवी । भेदें उपजवी त्रैगुण्य ॥३७॥
वस्तुता पाहतां तुझ्या ठायीं । अबोधासी ठावचि नाहीं । मां तो भेद कैंचा काई । त्रिगुणात्मक तुजमाजी ॥३८॥
ज्ञानघन जो अवबोधरस । तेथ भेदासी कैंचा पैस । अध्यारोपें बहुधा भास । मिथ्या आरोप विवतर्क जो ॥३९॥
ननु ऐसी करूनि शंका । श्रुति म्हणती भो विश्वत्मका । असत्प्रपंच हा असिका । म्हणाल लटिका जरी तुम्ही ॥५४०॥
असत्प्रपंच उपजत नाहीं । तैसाचि त्रिगुणमय पुरुषही । तरी याची प्रतीति नसावी कहीं । ब्रह्मीं अद्वयीं कीं न अहो ॥४१॥
ऐसा वदतां जरी सिद्धान्त । तरी प्रत्यक्ष दोन्ही असतां तेथ । जग आणि जगन्नाथ । कां पां अस्त न पावती हे ॥४२॥
इये शंकेच्या निरसना । श्रीशुक योगियांचा राणा । करी आर्षश्रुतिव्याख्याना । त्या सनंदवचना अवधारा ॥४३॥
N/A
References : N/A
Last Updated : June 12, 2017
TOP