अध्याय ८७ वा - विशेष श्लोक १ ते ५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


नृदेहमाद्यं सुलभं सुदुर्लभं प्लवं सुकल्पं गुरुकर्णधारम् ।
मयानुकूलेन नभस्वतेरितं पुमान्भवाब्धिं न तरेत्स आत्महा ॥१॥

नरदेह आद्य सर्वां प्रति । काय म्हणोनि पुसतां श्रोतीं । ऐसी येथींची व्युत्पती । प्रवृत्तिनिवृत्तिप्रद हाची ॥६१॥
नरदेहींच्या कर्माचरणें । स्वर्गी देवतादेह धरणें । किंवा तिर्यग्योनि फिरणें । कर्माचरणें जेथींचिया ॥६२॥
निष्कामसत्कर्मानुष्ठानें । सुप्रसन्न ईश्वरा करणें । तत्प्रसादें मग साधनें । वैराग्यादि प्रकटती ॥६३॥
साधनसंपन्न मुमुक्षु शुद्ध । सद्गुरु आश्रयी प्रबुद्ध । तत्प्रसादें निर्विवाद । कैवल्यपद मग लाहे ॥६४॥
तिर्यक् इहामुत्रनिर्वाण । प्रापक नरदेह मुख्य जाण । या लागीं तो आद्य म्हणोन । श्रीशुक सज्ञान बोलिला ॥७६५॥
तो नरदेह जया प्रति । प्राप्त झाला मर्त्यक्षिती । त्यांसी सुलभ हे भारती । योगीन्द्राची वाखाणी ॥६६॥
एर्‍हवीं दुर्लभ बहुतां यत्नें । न मिळे घेतां बहुधा धनें । अथवा दुर्घट तपःसाधनें । लाहों न शके कोणी ही ॥६७॥
पुण्याधिक्यें स्वर्गभुवनीं । पापाधिक्यें तिर्यग्योनी । समान तुलना पापपुण्यीं । होतां मिळणी नरदेहा ॥६८॥
त्यामाजी ही कर्मव्यत्यासें । शुष्कें सांसर्गिकें दोषें । कर्मफळाच्या भोगा ऐसे । व्यंग विकळ जडमूढ ॥६९॥
असो सुलभ नरदेह जयां । अवयव पटुतर लाधलिया । सुदृढ नौका जोडली तयां । भवसागरीं निस्तरण्या ॥७७०॥
सदय सद्गुरु कर्णधार । दुस्तरीं तारक परमचतुर । विशेष प्रेरक मी ईश्वर । शास्ता समीर अनुकूळ ॥७१॥
ऐसी तरणोपायसमृद्धि । लाहोनि न तरेचि जो भवाब्धि । तो नर अधम मंदबुद्धि । लाहे न कधीं सुटिकेतें ॥७२॥
सद्गुरूसी न रिघोनि शरण । ईश्वरप्रेरणाशास्त्र लंघून । अहंबुद्धि यथेष्टाचरण । करिती आत्मघ्न नरदेहीं ॥७३॥
ईश्वरानुग्रहा वीण गुरु । तो न तारी भवसागरु । विशेष रुचवी इहामुत्र । कर्मपरतंत्र करूनियां ॥७४॥
सद्गुरु म्हणोनि असद्गुरु । सेवितां न तारी भवसागरु । वामी कौळिक दाम्भुक क्रूरु । जेंवि संवचोर पथसंगीं ॥७७५॥
अनृताहूनिं पातक थोर । नाहीं म्हणोनि स्मृतीचा निकर । प्रतिपादी ते अनृताचि फार । यास्तव दुस्तर ते मार्ग ॥७६॥
प्लव म्हणिजे नौकेप्रति । सुकल्प म्हणिजे सुष्ठु सुमति । तारकाश्रयें भवावर्तीं । सुवातें तरती मुमुक्षु ॥७७॥
भवावर्तीं बुडणें कोणा । दाटूनि आवडे विचक्षणा । तरी कां बुडती दुष्टाचरणा । वश होवूनि अविरक्त ॥७८॥
यदर्थीं पूर्वश्रुती माझारीं । त्रिनेमिकाळचक्राची भंवरी । कथिली तेथ युगें चारी । पाडिती फेरीं शुभाशुभां ॥७९॥
यास्तव कळिकाळ कनिष्ठ । तोचि प्रवर्तला असतां स्पष्ट । यथेष्टाचरण वाटे श्रेष्ठ । कर्मभ्रष्टमति होती ॥७८०॥
द्युमणि अस्त सायंकाळीं । निबिड ध्वान्त दिग्मंडळीं । भूतीं प्रेतीं पिशाचमेळीं । तिये वेळीं प्रकटावें ॥८१॥
जार चोर दुष्पथाचार । तत्प्रवृत्ति होय फार । कली माजी अनाचार । तैसाच कुनर आदरिती ॥८२॥
बोलती एक करिती एक । वेषधारी शठ दाम्भिक । त्यांसी गुरुत्वें सेविती मूर्ख । नरकदायक न म्हणूनी ॥८३॥
मुखें म्हणती हरिदास । केवळ पोटार्थी हरिदास । हरिचरणीं त्या दृढविश्वास । असतां देश कां फिरती ॥८४॥
एक शंसिती योगमार्ग । कीर्तनमिषें रागरंग । योनिरहित वेश्या साङ्ग । मोडिती आंग नटनाट्यें ॥७८५॥
योगमार्गें आनन्दप्राप्ति । लाहोनि पावता जरी विश्रान्ति । तरी तो किमर्थ धजिकांप्रति । नृत्यगीतीं रंजविता ॥८६॥
वेदान्त वैराग्य वदती तोंडें । वसनीं भूषणीं भूषिती मडें । त्यांसीं भाळोनि जन ही वेडें । गुरुत्वें कोडें सेवितसे ॥८७॥
वेषधारियांच्या ऐशा झुंडा । शिष्य करिती पोरें रांडा । संप्रदायें पाखंडबंडा । भंड उभंडा रूढविती ॥८८॥
अष्टादशयाति शिष्य । करूनि पोषिती कुटुम्बास । हा चि व्यवसाय सावकाश । करिती हव्यास वाढवूनी ॥८९॥
शिष्यांचिये सभे पुढें । तों करूनि वेडें वांकुडें । गुरु नाचे जठरचाडे । वैराग्य रडे निरूपणीं ॥७९०॥
कोणी तेथें विचक्षण । सहसा न करी परीक्षण । कीं यास असतें वास्तवज्ञान । तरी हा वणवण कां फिरतां ॥९१॥
योगमार्गें अमृतावाप्ति । लाधल्या किमर्थ विषयासक्ति । ऐसें न म्हणोनि मंदमति । शिष्य होती कळिकाळीं ॥९२॥
वासनाभरणें रागरंग । देखोनि सन्मानी ज्या जग । त्याचा वरिष्ठ मानूनि मार्ग । तेथ सवेग अनुसरती ॥९३॥
प्रथमाश्रमें त्या वेदाभ्यास । द्वितीयाश्रमें तपःसायास । तुरीय प्रणवास नुपलविती ॥९४॥
नोहती शैव ना भागवत । नाचरती श्रौत स्मार्त । रूढ करूनि पाखंडमत । वदती परमार्थ आवडता ॥७९५॥
कोण संप्रदाय तयांचा । श्रुति स्मृति न वदती वाचा । धुमाड माजविती विषयांचा । मोक्ष कैंचा मग तेथें ॥९६॥
शिष्य प्रलोभावया पुरते । आगम विवरूनि घेती निरुते । कौळमार्गें चहूं वर्णांतें । एकत्र करिती दुरात्मे ॥९७॥
कादिहादि उर्ध्वाम्नाय । नाथ नित्या अहर्गण काय । श्रीविद्येची नेणोनि सोय । शिष्यसमुदाय मेळविती ॥९८॥
ऐसे कळिकाळींचे भोंदु । गुरुत्व मिरविती होऊनि साधु । त्यांसी शरण बुद्धिमंदु । होती आनंदु इच्छूनी ॥९९॥
मृगतृष्णिका मानूनि तोय । तृषार्त आस्था धरूनि जाय । श्रम मात्रचि तो फळ लाहे । ते गति होय तच्छिष्यां ॥८००॥
साधनसंपन मुमुक्षु शिष्य । होऊनि करूं लागे दास्य । कुळाचार बोधिती त्यास । म्हणती विशेष श्रीअर्चा ॥१॥
पंचोपचारें श्री पूजितां । सधका पावती अभिवाञ्छिता । कंटक सदसा नुधवी माथा । अभेदपथा अनुसरिजे ॥२॥
तंव तो म्हणे अहो स्वामी । मुमुक्षु केवळ कैवल्यकामी । त्यांसी प्रयोजन काय वामें । इन्द्रियग्रामीं कां रमिजे ॥३॥
तीर्थ म्हणोनि आसव घेतां । विलंब न घडे उन्मत्त होतां । पातित्यदोष लागे माथां । लाभ कोणता या माजी ॥४॥
शुद्धि सेवनें रसना तोषे । शफरास्वादनें पिण्ड पोषे । मुद्रा चर्वणें विविधा रसें । वीर्य उल्लासें वाढतसे ॥८०५॥
बहुधा वीर्यवृद्धीच्या कोडें । पंचमीपरिष्वंग आवडे । तैं वैराग्य पालथें पडे । मोक्ष आतुडे मग कैंचा ॥६॥
हें ऐकोनि म्हणती गुरु । केवळ विरक्त नर पामरु । शुष्क साधनीं श्रमतां फारु । न पवे परपारु भवाचा ॥७॥
गुप्तो मुक्तः प्रकटो भ्रष्टः । हें वर्म विदित असे श्रेष्ठां । न कळे कंटकां कर्मठां । वृथा पुष्टां शुष्कांतें ॥८॥
येरु म्हणे गुप्तगति । विषभक्षणें अमर होती । प्रकट केलिया प्राणी मरती । हे कैं वदंती नायकिली ॥९॥
ऐसा बोधितां परोपरी । युक्ती प्रयुक्तीं प्रत्युत्तरीं । श्रुतिसंमतें निरुत्तर करी । अनधिकारी त्या म्हणती ॥८१०॥
ऐसे कळिकाळींचें गुरु । यथेष्टाचरणीं विषयपरु । त्यांच्या बोधें नरपामरु । भवसागरु केंवि तरती ॥११॥
ऐसे कळिकाळीं कर्मभ्रष्ट । आपणां म्हणविती ब्रह्मनिष्ठ । विषयसेवनीं यथेष्ट । सहसा दुष्ट न लसती ॥१२॥
त्यागें एकें अमृतावाप्ति । ऐसा निश्चय केला श्रुति । इतरसाधना संसृति । न चुके कल्पान्तीं अविरक्तां ॥१३॥
तस्मात कळीकाळीं यथेष्टाचारु । बोधिती तेची श्रेष्ठ गुरु । मानूनि तेथ विषयी नरु । होती सादर कळतां ही ॥१४॥
लोकें म्हणविती हरिदास । धनार्जनाचा हव्यास । त्यांसी उबगला जगदीश । धनलोभास प्रेरूनियां ॥८१५॥
योगाभ्यास बोलती तोंडें । कुले मुरडूनि धनिकां पुढें । नाचती धनमानाचे चाडे । कपटी कुडे कीं ना ते ॥१६॥
योगाभ्यासें ब्रह्मानंद । जरी ते पावले असते विशद । तरी मग ऐसें कर्म विरुद्ध । कां मतिमंद आचरते ॥१७॥
जो गजासनीं मिरवला । तो न इच्छी अजयानाला । ब्रह्मानंदें तृप्त झाला । जन मानाला तो न भुले ॥१८॥
भ्रमर वेधला पंकजपाना । तो काय अपेक्षी अपाना । सहस्रदळीं फावल्या पान्हा । स्वाधिष्ठाना केंवि भुले ॥१९॥
तस्मात् शाब्दिक ब्रह्मज्ञान । विषयासक्ति धनसम्मान । उभयभ्रष्ट ते श्वपचाहून । मानिती हीन श्रुतिवक्ते ॥८२०॥
हिजडीं डफडीं डौरकार । पोतभळंदी बाजीगार । धनार्थ फिरती दारोदार । चमत्कार दाखवूनी ॥२१॥
भुते वाघे बहुरूपी नट । जंगम दासरी दांगट । तेंवि गुरुत्वें कर्मभ्रष्ट । भरिती पोट धीटपणें ॥२२॥
वेदाध्ययनें पडलीं ओसें । शास्त्राध्ययना कोणी न पुसे । युक्तिप्रयुक्ति घालूनि फांसे । गुरुत्व ऐसें लढविती ॥२३॥
असो ऐसी कळिकाळीन । नरदेहनौका ही पावोन । दुष्पथ दुरावर्ती मग्न । होती व्याख्यान तें केलें ॥२४॥
ईश्वरानुग्रहा वांचूनि कांहीं । सद्गुरु प्राप्त होणार नाहीं । शुकाचार्याचा पूर्वज पाहीं । वशिष्ठ निश्चयीं हें वदला ॥८२५॥
ईश्वराज्ञा दृढविश्वासें । निष्कामकर्माचरणवशें । प्रेमळ देखोनि ईश्वर तोषे । करी अनायासें चित्तशुद्धि ॥२६॥
तैं मग इहामुत्रीं विरक्त । नित्यानित्यविवेकवंत । सद्गुरु लाहे अकस्मात । मग रंगे निश्चित तद्दास्या ॥२७॥
चारी आश्रम समान असतां । सद्गुरुपदवी केंवि गृहस्था । श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठता । केंवि शंसितां ते ठायीं ॥२८॥
तरी व्रती तो वेदाभ्यासी । स्वयें रंगला गुरुदास्यासी । तो न बोधी सच्छिष्यांसी । ऐसें सर्वांसी कळलें कीं ॥२९॥
तृतीयाश्रमी तो वनस्थ । तपस्वी राहे दृढनियमस्थ । मनोनिग्रहीं अतंद्रित । शिष्यसंगम न रुचे त्या ॥८३०॥
ईषणात्यागें विरजाहोम । सारूनि केला चतुर्थाश्रम । प्रणवजपमात्राचा नियम । शिष्यसंगम न रुचे त्या ॥३१॥
यां पासूनि दीक्षाग्रहण । केलिया निष्फळ होय जाण । ऐसें बोलिला त्रिलोचन । संमतिवचन तें ऐका ॥३२॥

यतेर्दीशा पितुर्दीक्षा दीक्षा च वनवासिनः । विविक्ता श्रमिणां दीक्षा न सा कल्याणदायिनी ॥१॥
पितृर्मन्त्र न गृह्णीयात्तथा मातामहस्य च । सोदरस्य कनिष्ठस्य वैरिपक्षाश्रितस्य च ॥२॥
इत्यादि निषेधवचनादेभ्यो मन्त्रं न गृह्णीयात् ।

आत्मा वै पुत्रनामासि । आपुला मंत्र आपणासी । अयोग्य म्हणूनि पितृमंत्रासी । अनादरिलें स्मृतिकारीं ॥३३॥
यतीनें करूनि विरजाहोम । होमिलें वेदोक्तक्रियाकर्म । त्यासि अयोग्य उपदेशक्रम । आत्माराम स्वयें झाले ॥३४॥
वेद बोलिला कर्मकाण्ड । तेथ नुमलावें तिंहीं तोंड । उपनिषत्प्रनवार्थ अखंड । विवरूनी गूढ असावें ॥८३५॥
विश्वाभास हा विवर्त । चैतन्य आत्मा नित्य सत्य । पृथक शिष्य कैंचा तेथ । उपदेशार्थ उरलासे ॥३६॥
मातामह पितृस्थानीं । म्हणोनि निषेध दीक्षाग्रहणीं । कनिष्ठ सोदर आपणाहूनी । गुरुत्वा लागोनी अयोग्य तो ॥३७॥
तैसाचि वैरिपक्षाश्रित । त्या पासूनि दीक्षा अनुचित । म्हणोनि ब्रह्मनिष्ठ गृहस्थ । श्रुतिसंमत सद्गुरु तो ॥३८॥
शास्त्रां परस्परें विरोध । यालागीं तत्पक्ष निषिद्ध । भट्टाचार्यीं जेंवि उच्छेद । केला प्रसिद्ध चार्वाका ॥३९॥
कित्येक पाखंडी दुर्मति । गृहींच्या देवता त्यागविती । वर्नबाह्या ऐसियांप्रति । शरण रिघती दुरात्मे ॥८४०॥
एवं संमतवचनानुसार । ज्यांतें गुरुत्वीं अनधिकार । त्यांसी शरण न रिघती चतुर । सेविती सधर सर्वज्ञ ॥४१॥
आश्रमत्रयासी आधार । गृहस्थाश्रमचि केला सधर । यास्तव प्रवृत्तिनिवृत्तिपर । षट्कर्मविचार नियोजिला ॥४२॥
यजनाध्ययनदानें निवृत्ति । मार्गें साधिजे कैवल्यप्राप्ति । प्रतिप्रहयाजनाध्यापनें प्रवृत्ति । जीविकावृत्ति साधावी ॥४३॥
एवं आश्रमत्रयाचें ओझें । गृहस्था शिरीं घातलें सहजें । या लागीं शिष्यांच्या समाजें । ते न्सितरिजे परिचर्या ॥४४॥
जेथ परिचर्या विशेष पाडे । तेथ शिष्याचें स्वहित घडे । इतराश्रमीं सहसा न घडे । हेंही निवाडें जाणावें ॥८४५॥
श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ । ऐसें बोलिलें असे स्पष्ट । मुमुक्षुत्वीं जो उपविष्ट । द्विविध कटकट किमर्थ त्या ॥४६॥
या प्रश्नाचें प्रत्युत्तर । श्रोतीं परिसावें सादर । तरी जीव जितुका नृदेहधर । मोक्षीं अधिकार त्या सर्वां ॥४७॥
परंतु त्यांच्या द्विविध कोटी । रागविरागपर राहटी । त्या सर्वांची करुणा पोटीं । लक्षूनि वाक्पुटीं श्रुति वदती ॥४८॥
एकां विषयासक्ति न सुटे । त्यांसि बोधूनि कर्मनिष्ठे । विषयविरक्ति आंगीं उमटे । तंववरी हठें निरोधवी ॥४९॥
तारुण्याचा ओहटतां भर । अंगीं जरेचा संचार । तापत्रयें त्रासतां नर । वैराग्यपर मग होय ॥८५०॥
प्रियवस्तूचा होतां नाश । शोकें आहळे मग विशेष । स्त्रीपुत्रादिकीं उदास । तैं होय परवश अनुतापी ॥५१॥
तेव्हां बोधूनि ब्रह्मनिष्ठा । निरसी जन्ममरणाच्या कष्टा । आत्मानुभवें लावूनि काष्ठा । करी प्रतिष्ठा स्वानंदीं ॥५२॥
तुरीयाश्रमीं कर्मकाण्ड । पठनीं सहसा नुमलिजे तोंड । यालागीं श्रोत्रिय आणि अखंड । ब्रह्मनिष्ठ स्वानुभवी ॥५३॥
तस्मात् नौका नरशरीर । ऐसा सद्गुरु कर्णधार । शास्त्रप्रेरक मी ईश्वर । असतां समीर अनुकूळ ॥५४॥
भवाब्धि न तरे जो नर अधम । तो मग भोगी अनेक जन्म । आत्मघातक पापी परम । त्यालागीं दुर्गम भवसिन्धु ॥८५५॥
सद्गुरूसी कर्णधार । म्हणूनि केला जो निर्धार । या वाक्याचें अभ्यंतर । ऐका साचार मुनिगदित ॥६५॥

श्लोकसंमतिः - संस्कृतैः प्राकृतैश्चैव गद्यपद्याक्शरैस्तथा । देशभाषादिभिः शिष्यं बोधयेत्सद्गुरुः स्मृतः ॥३॥

नौके अहंतेच्या खडकीं । सवेग बैसों पाहे धडकी । तेथ प्राकृतां वाक्यविवेकीं । अवलीं झडकी जळलोटा ॥५७॥
सवेग वळूनि मागिलीकडे । पूर्वप्रवाहें चालवी कोडें । ज्ञानअहंतेचे कठोर कडे । चुकवूनि पुढें नौका ने ॥५८॥
असंभावनासंशयावर्ती । नौका बुडों पाहे अवचिती । तेथ संस्कृता उपनिषदुक्ति । सद्भावभक्ति तागादी ॥५९॥
मुक्तता यथेष्टाचारखळाळी । पडतां शास्त्रोक्तिगुणीं बहळीं । गद्यपद्याक्षरीं बळी । अचंचळजळीं नियमाच्या ॥८६०॥
रसास्वादनवावधानीं । ऋद्धिसिद्धिहेलावनीं । नौका उलथतां लंगरें करूनी । भाषावचनीं स्थिरावी ॥६१॥
ऐसा सद्गुरु कर्णधार । नृदेहनौकातारक चतुर । तत्सेवनें साधक सधर । मनस्तुषार आकळिती ॥६२॥
मानसवेग म्हणती मोठा । क्षणार्धें फिरे ब्रह्माण्डमठा । साधकांच्या भंगी निष्ठा । यास्तव काष्ठा असाध्य ॥६३॥
काशी आणि रामेश्वरीं । क्षणार्धें सहस्र वेरझारी । जगन्नाथीं द्वारकापुरीं । करितां फेरी पळ न लगे ॥६४॥
यथार्थ मन जरी जात असतें । तरी यात्रेची वार्ता यातें । पुसतां सविस्तर सांगतें । तैं अनावर होतें मग सत्य ॥८६५॥
मना जावया कैंचे पाय । स्मृतिचाञ्चल्यें पवनप्राय । वेगवत्तर भासताहे । जें अभक्तां होय अनावर ॥६६॥
लाहूनि गुरुकृपेचें बळ । भजनीं नियोजिती प्रेमळ । भावें भजतां श्रीपदकमळ । तैं होय निश्चळ अनायासें ॥६७॥
भगवद्भजनसुखानुभवें । संकल्पत्यागें मानस निवे । गुरुकृपेवीण निश्चळ नव्हे । उपाय आघवे करितां ही ॥६८॥
मनश्चाञ्चल्य कुनर पिसे । यास्तव व्यसनशताकुळ ऐसे । बोलिले ते ज्या व्यसनसोसें । भवीं बुडती तें ऐका ॥६९॥
आणि सद्गुरु कर्णधार । तव पदभजनें भवसागर । तारी ऐसा कृतनिर्धार । तो सविस्तर कथिला कीं ॥८७०॥
तुझिया चरनभजकां प्रति । सद्गुरुकृपे ज्ञानप्राप्ति । तेणें भवसुखीं होय विरक्ति । व्यसनाची गुंती त्यां नाहीं ॥७१॥
सद्गुरु बोधी तव पदभजन । तेणें न निग्रहितां निग्रहे मन । व्यसनशतका अस्तमान । निमुक्तपणें सहजेंची ॥७२॥
अनुभवूनि लोक समस्त । कोथें न चुके दुःखावर्त । ऐसा जाणोनियां सिद्धान्त । होय विरक्त ब्रह्मिष्ठ ॥७३॥
कर्मरचित सर्व लोक । स्थावरान्त ब्रह्मादिक । जाणोनि करी मग विवेक । म्हणे भवसुख दुःखमय ॥७४॥
कूपीं देखूनि स्वप्रतिबिम्बा । सिंह आवेशें चढे क्षोभा । कोण्ही न मरितां क्रौर्यवालभा - । स्तव तो उभा बुडे दुःखीं ॥८७५॥
तेंवि धरूनि विषयीं प्रेम । तत्प्राप्त्यर्थ करूनि कर्म । लोक लोकान्तरें समविषम । स्वेच्छा अधम अनुभविती ॥७६॥
येथ कोणाचा बळात्कार । नसतां सकामकर्मादर । करिती तेणें भवसागर । स्वकृत घोर अनुभविती ॥७७॥
इष्टकर्मांच्या साधनें । ब्रह्मलोका पर्यंत जाणें । पुढती तव पदभजनाविणें । क्षीणपुण्यें अधःपतन ॥७८॥
तैसेंचि करितां अनिष्ट कर्म । पाविजे अंधतम दुर्गम । मिश्रकर्में नृपोत्तम । धनसुतसंभ्रमकर होय ॥७९॥
अकृत म्हणिजे मोक्षावाप्ति । कर्में न पविजे कल्पान्तीं । जेव्हां निष्काम होय मति । नैष्कर्म्यगति तैं लाहे ॥८८०॥

संमतिः - प्रजहाति यदा कामान्त्सर्वान्पार्थ मनोगतान् । आत्मन्येवत्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते ॥४॥
आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् ।
तद्वत्कामायं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी ॥५॥

ऐसीं स्मृतींचीं निश्चयवचनें । हाचि श्रुत्यर्थही जाणणें । कैवल्य निष्कामकर्माचरणें । लाहिजे म्हणे श्रुतिनिकर ॥८१॥
हृदया माजी वसे काम । तो त्यागिजे तैं निष्काम । होतां लाहिजे कैवल्यधाम । ऐसा नियम निगमान्तीं ॥८२॥
तस्मात् कर्माचरणें मोक्ष । न लाहिजे हें जाणोनि दक्ष । उभयभोगीं मग अनपेक्ष । होय साक्षेप गुरुभजनीं ॥८३॥
पूर्वीं व्यसनशतान्वित । तैं तो तेथूनि होय विरक्त । स्वदेह दारा सुहृद सुत । गृह धन आप्त न रुचती तैं ॥८४॥

N/A

References : N/A
Last Updated : June 12, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP