अध्याय ८७ वा - श्लोक ४६ ते ५०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
नारद उवाच - नमस्तस्मै भगवते कृष्णायामलकीर्तये । यो धत्ते सर्वभूतानामभवायोशतीः कलाः ॥४६॥
यश लक्ष्मी आणि औदार्य । ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर्य । हे साही अक्षय गुणवर्य । असती सकार्य जयातें ॥८१॥
त्या भगवंता कृष्णा कारणें । नमन माझें अनन्यपणें । ज्याचे अमळकीर्तिश्रवणपठनें । दोषां क्षाळणें जगाचिया ॥८२॥
जेंवि कृशानीं इन्धनें समळ । घालितां निरंतर पुष्कळ । त्यांसि जाळूनि स्वयें निर्मळ । तेंवि कीर्ति प्राञ्जळ अयाची ॥८३॥
म्हणसी नारायणा नमितां येथ । वदला कृष्णनामसंकेत । तरी ऐकें येथींचा भावार्थ । जो असे निश्चित वास्तव ॥८४॥
कृष शब्द हा भूसत्तावचक । नकार आनंदप्रतिपादक । एवं सदानंदरूपी निष्टंक । परबह्म सम्यक श्रीकृष्ण ॥१३८५॥
नारायणादि जे अवतार । ते जयाचे अंश पर । तो पूर्ण हें वदे पुराणनिकर । जें कृष्णस्तुभवान्स्वयम् ॥८६॥
सर्वभूतांच्या अभवास्तव । नाना रूपें धरी वास्तव । हाचि स्पष्ट अभिप्राव । ऐका स्वयमेव विवरणें ॥८७॥
अविद्यायोगें जीव नाना । वरपडे जाले जन्ममरणा । पावूनि त्रिगुणात्मकबंधना । क्लेशें यातना भोगिती ॥८८॥
तयांचिये दुखःअनिवृत्ति । चतुर्विधपुरुषार्थाची प्राप्ति । यांसी करावया करुणामूर्ति । जो धरी व्यक्ति सुन्दर ॥८९॥
जयाया दर्शनें चिन्तनें ध्यानें । स्मरतें गुणकीर्तिवर्ननें । मोक्षावाप्ति जीवां कारणें । ऐसे करणें जयाचें ॥१३९०॥
तो श्रीकृष्ण पूर्णब्रह्म । अवताराचें मूळधाम । योगियांचा निष्काम काय । अभिन्न परम सर्वात्मा ॥९१॥
तया कृष्णावतरते करून । नारायणातें करी नमन । ज्यास्तव झाला प्रबोधनिपुण । सच्चिद्घन पूर्णत्वें ॥९२॥
इत्याद्यमृषिमानम्य तच्छिष्यांश्च महामनः । ततोऽगादाश्रमं साक्षात्पितुर्द्वैपायनस्य मे ॥४७॥
या कारणें तो आद्यऋषी । नारायणाख्य भक्तिविशेषीं । नमस्कारूनि नम्रशीर्षीं । जो अनेकशिष्यीं परिवृत् ॥९३॥
तयां शिष्यांसि ही अभिवंदन । महामना नारद जाण । जयाचें मन ब्रह्मसंपन्न । महद्विशेषण । यास्तव त्या ॥९४॥
ऐसा नारदमुनि महामन । त्या नंतरें तदाज्ञा घेऊन । साक्षात् मम पिता द्वैपायन । सत्यवतीनंदन श्रीव्यास ॥१३९५॥
तयाचिया आश्रमा प्रति । जाता झाला सहज्स्थिति । स्मरता होत्साताआपुले चित्तीं । नारायणोक्ति यथा श्रुत ॥९६॥
येव बोलिला शुक आपण । की साक्षात मम पिता द्वैपायन । हें ऐकोनि शंकायमान । श्रोत्रे विचक्षण जरी होती ॥९७॥
सापत्नविकल्पास्तव माता । वदिजे साक्षाच्छब्दें तत्वता । परंतु पितयासी ऐसें सर्वथा । गमे कथितां विपरीत ॥९८॥
तरी साक्षात्पदें करून अर्थ । जैसा बोलती विपश्चित । तो कथिजेल यथास्थित । श्रीधरोक्तव्याख्यानें ॥९९॥
कोणे एके समयीं व्यास । करीत असतां अग्निमथनास । अरणीं माजी कांहीं रेतांश । पडिला तयास निमर्थिलें ॥१४००॥
तेथ तत्काळचि श्रीशुक । उत्पन्न झाला निष्टंक । योनिव्यवधाना रहित सम्यक । म्हणोनि साक्षाज्जनक व्यासची ॥१॥
इतरांची जैसी उत्पत्ति । पितृरेत मातृयोनी प्रति । पडतां मिळे तच्छोणितीं । मग धातुमिश्रितीं पिण्ड घडे ॥२॥
तो नवमास मातृजठरीं । सावयव पक्क जालिया वरी । जनन पावतसे निर्धारीं । म्हणोनि उभयजन्यत्व तयासी ॥३॥
तैसा नोहे शुकप्रकार । केवळ पितृरेतेंचि पवित्र । अरणीं पासूनि जाला स्वतंत्र । या स्तव अरणिपुत्रवदंती ॥४॥
या अर्थें साक्षात मम पिता । श्रीशुक बोलिला तत्वता । या वरी ऐका तदुक्त वार्ता । जे नृपासि आतां बोलतसे ॥१४०५॥
म्हणे अगा ये परीक्षिति । नारद मत्पित्राश्रमा प्रति । गेलिया तेणें जया रीती । सोपस्करिला तें ऐक ॥६॥
सभाजितो भगवता कृतासनपरिगृहः । तस्मै तद्वर्णयामास नारायणमुखाच्छ्रुतम् ॥४८॥
षड्गुणैश्वर्यसंपन्न । केवळ भगवान द्वैपायन । जेणें नारदा देखोन । अभ्युत्थान दीधलें ॥७॥
पवित्रासनीं बैसविला । स्वागतप्रश्नें तोषविला । गुरुत्वें यथोक्त पूजिला । अभिवंदिला सद्भावें ॥८॥
मग तो देवर्षि अतिसंतुष्ट । त्या व्यासा करणें काम श्रेष्ठ । कथिता झाला जें ऐकिलें स्पष्ट । नारायणाच्या मुखाहूनी ॥९॥
तें पित्या पासूनि सहजें सहज । श्रुत झालें यथार्थ मज । जें हें इतुकें कथिलें तुज । तव प्रश्नपैज देखोनी ॥१४१०॥
इत्येतद्वर्णितं राजन्यन्नः प्रश्नः कृतस्त्वया । यथा ब्रह्मण्यनिर्देश्ये निर्गुणेऽपि मनश्चरेत् ॥४९॥
जैसा प्रश्न तां परीक्षिति । आशंकोनि केला मज प्रति । कीं साक्षान्निर्गुणीं ब्रह्मीं श्रुति । कवणें रीति प्रवर्तती ॥११॥
तें यथातथ्य निरूपण । अनिर्देश्य ब्रह्म निर्गुण । तेथ प्रवर्ते जैसें मन । तें श्रुतिव्याख्यान तुज कथिलें ॥१२॥
मनाचिया उपलक्षणें । वृत्तिरूप श्रुति जाणणें । यांचें जेंवि प्रवर्तणें । ब्रह्मीं होय तें निरूपिलें ॥१३॥
असो आतां इतुक्यावरी । तव शंकेची शर्वरी । न दिसे कीं प्रबोधतमारी । उदेला अंतरीं हृद्गगनीं ॥१४॥
ऐसें बोलोनि मुनिपुङ्गव । तथापि दृढीकरणास्तव । फळितार्थ वेदस्तुतीचा सर्व । संक्षेपें वास्तव नृपा कथी ॥१४१५॥
तो अभिप्राय यथामति । वाखाणिजेल व्याख्यानरीती । भाविक साकांक्ष आत्महितीं । तिंहीं सादर श्रवणार्थी असावें ॥१६॥
योऽस्योत्प्रेक्षक आदिमध्यनिधने योऽव्यक्तजीवेश्वरो यः सृष्ट्वेदमनुप्रविश्य ऋषिणा चक्रे पुरः शास्ति ताः ।
यं सxxपद्य जहात्यजामनुशयी सुप्तः कुलायं यथा तं कैवल्यनिरस्तयोनिमभयं ध्यायेनजस्रं हरिम् ॥५०॥
जो या विश्वाचा उत्प्रेक्षक । म्हणिजे कल्याणपाहता सम्यक । तो कैसा तरी विविच्यविवेक । ऐसा अशेख कथिजेल ॥१७॥
महाप्रळयीं संपूर्ण जग । अव्यक्तीं लीन झालिया साङ्ग । पुन्हा प्रळयावसानीं सर्वग । पाहे मोघ अनुशयी ॥१८॥
अनुशयी म्हणिजे अविद्येमाजी । निद्रित झाली जीवराजी । त्या चतुर्विधपुरुषार्थसिद्धिकाजीं । सृष्टिस्थितिप्रळयादि पावविजे ॥१९॥
धर्म अर्थ काम मोक्ष । चतुर्विधपुरुषार्थ अशेष । सृष्टिस्थितिप्रळय सापेक्ष । न होती प्रत्यक्ष यां वीण ॥१४२०॥
येथील स्पष्ट अभिप्राय । कें जीवांसि देऊनियां देह । प्रतिपाळावे यथावय । शेवटीं विलय करावा ॥२१॥
चतुर्विधपुरुषार्थीं अधिकार । जन्म झालिया होय सधर । त्रिवर्गस्थितिकाळीं सविस्तर । साधे जो वर स्थूळतनु ॥२२॥
अंतीं मोक्ष हे यथाधिकार । त्रिवर्गपरिपाकें स्वतंत्र । प्राप्त होय क्रियानुसार । निर्विकार झालिया ॥२३॥
म्हणोनि जीवांचिये करुणेस्तव । ऐसें अवलोकी प्रभु वास्तव । कीं जीव असमर्थ अविद्ये स्तव । विसरले गौरव आपुलें ॥२४॥
त्यांसी हें त्रिविधसृष्ट्यादिक । चतुर्विधपुरुषार्थप्रापक । प्रापणीयचि आवश्यक । ऐसा आलोचक विश्वाचा ॥१४२५॥
निमित्तकारणत्व जगाचें । येणें ईशासि बोलिलें साचें । ऐसें अवलोकितांची अभांड रचे । अष्टधाप्रकृतीचे संकल्पें ॥२६॥
तेथ होऊनि तत्तदाकार । व्यष्टिसमष्टिरूप अविकार । आदिमध्यनिधनीं निरंतर । वर्ते प्रभुवर विश्वाचा ॥२७॥
आदिशब्दें बोलिजे जन्म । मध्य तें पालनचि परम । निधनें केवळ अंतनाम । आणि जे सुगम पर्यायें ॥२८॥
विद्यमानत्वें इतुक्या कर्मीं । जो वर्ततसे पूर्णत्वधर्मीं । जया न स्पर्शे विकारोर्मी । त्रिविधानुक्रमीं असतां ही ॥२९॥
जेंवि सुवर्ण अलंकारीं । कीं मृत्तिका कुड्यादिविकारीं । विद्यमानत्वें वर्तती पुरी । घडतां राहतां मोडतां ॥१४३०॥
येणें उपादानत्व हे बोलिलें । परमात्मया ऐसिया बोलें । येथ वितर्कें म्हणाल हें कथिलें । कैसें घडेल विचारितां ॥३१॥
प्रकृति आणि पुरुषा कारणें । उभयकारणत्व जाणणें । ऐसें प्रसिद्ध असतां बोलणें । हें प्रतिपादणें कैसेनी ॥३२॥
तरी सत्यचि वितर्क ऐसा । परंतु येथील अर्थ परिसा । तयांचें ही मूळकारण हा आपैसा । यां उत्पत्ति सहसा ज्यास्तव ॥३३॥
हेचि अव्यक्त जीवेश्वर । या पदें व्यास ऋषीश्वर । प्रत्यक्ष बोलिला तो विचार । जाणती चतुर विपश्चित ॥३४॥
अव्यक्त म्हणिजे गुणमयी माया । जीवशब्दें विराटकाया । धर्त्ता समष्टिभूतमया । हीं कारणें जगा या उभयता ॥१४३५॥
याचा ही जो ईश्वर मुख्य । अनंतब्रह्माण्दनायक । आदिकारण जगद्व्यापक । सर्वात्मक परमात्मा ॥३६॥
जयाचें ईशनसत्ताबळ । लाहोनि प्रकृतिपुरुषयुगल । सृजी विश्व हें सकळ । तो कारण केवळ मुख्यत्वें ॥३७॥
आतां तयाचें प्रवेशनियमन । विश्वीं कैसें तें निरूपण । नृपा दर्शवी शुकभगवान । तें श्रोते सुजन परिसोत ॥३८॥
पूर्वोक्तप्रकारें हें विश्व । प्रकृतिविकृतिरूप सर्व । निर्माण करूनि स्वयमेव । मग केलें जास्तव तो ऋषि ॥३९॥
प्रकृति म्हणिजे अष्टधा पृथक । भूं जळ पावक समीर ख । अहं महत् अव्यक्त प्रमुख । विकृति साङ्ग अवधारा ॥१४४०॥
वृत्तिपंचात्मक एक मन । क्रियाकारक पंचप्राण । ज्ञान कर्म दशधा करण । ऐशा षोडश जाण विकृति या ॥४१॥
कोणी पंचवीस ही म्हणती । ज्ञेय पंच विषय मेळविती । अंतःकरणादि पृथग्गणिती । एवं लिंगदेह वदंती या साची ॥४२॥
पंचभूतें तद्गणविषय । शब्दादिकां संज्ञा होय । हें जडत्वें भोग्यकाय । सुखदुःख होय यांचेनी ॥४३॥
बुद्ध्यादिकां कर्तृभोक्तृसंज्ञा । आणि दशेन्द्रियां सहित प्राणां । भोगकर्मकरणसूचना । या केलें सृजना जीवार्थ ॥४४॥
ऋषि ऐसें नाम जीवा । कीं मी ऐसिया अंहभावा । जाणें म्हणोनि ज्ञानविभवा । पात्र परिभावना विपरीत ॥१४४५॥
असो जीवा ऋषिसंकेत । ज्यास्तव सृजिलें हें त्या सहित । विद्यमानत्वें आपण निश्चित । अनुप्रविष्ट होत लिंगदेहीं ॥४६॥
जेंवि अनुलक्षें संप्राप्तवत । घटमठादिकीं गगन होत । पूर्वविद्यमानत्वें यथास्थित । परंतु भासत प्रविष्टा परी ॥४७॥
ऐसा जीवें सहित अनुप्रवेश । सूक्ष्मदेहीं करूनि ईश । मग तयासी भोगायतनें दृश्य । करी प्रत्यक्ष स्थूळतनु ॥४८॥
मग त्या वपुःक्रियानियमें । नियमिता होय संभ्रमें । पृथगिन्द्रियां ज्ञानोद्गमें । तत्तद्धर्में शासित ॥४९॥
एवं स्थूळ लिंग देहद्वय । जीवासि हरि प्रकटिता होय । मग अंतर्यामित्वें शासनकार्य । करूनि अनप्राय प्रतिपाळी ॥१४५०॥
यथाक्रम देऊनि भोग । रक्षित होत्साता साङ्ग । समत्वें पाळी त्या अभंग । परंतु देवयोग अनारिसे ॥५१॥
अनेकबीजां एकचि जळ । समत्त्वें करी प्रतिपाळ । परंतु रसोत्पत्ति केवळ । विविधा फळदळपुष्पदि ॥५२॥
तेंवि पूर्वसंस्कारानुसार । शुभाशुभप्रवृत्ति सधर । जीवासि होती कर्मतंत्र । इहामुत्रफळभोगा ॥५३॥
तें त्यांचिया दृढसंकल्पें । फळ देतसे कर्मानुकल्पें । आणि आत्मोपासकां कैवल्यरूपें । होय साक्षेपें तयाच्या ॥५४॥
आतां हेंचि निरूपण । स्वभक्तां सद्गतिकारण । होय परमपुरुष पूर्ण । करी नृपा कथन शुकमुनि ॥१४५५॥
अनुशयी जो पूर्णशरण । पूर्वसाधनसिद्ध जाण । घडिघडि दण्डवच्चरण । अभिवंदी आपण तो जीव ॥५६॥
ज्यातें पावूनि पूर्णावबोधें । अभेदसाक्षात्कारानुबंधें । द्वैतभावनानिरोधें । अजा स्वच्छंदें सांडीत ॥५७॥
अजा म्हणीजे अविद्या । कार्यकारणरूपसद्या । जे गवसणी स्वबोधा आद्या । तेचि द्विविधा अवधारा ॥५८॥
कारणरूपा तमात्मका । केवळ संज्ञका । तत्कार्यरजःसत्वद्योतका । विपरीतज्ञानें अभिव्यक्त ॥५९॥
होतां आत्मत्वाचा गाढ विसर । जागृतिस्वप्नात्मक वृत्तिप्रसर । देहाध्यासें सविस्तर । सगुण विकार रूपा ये ॥१४६०॥
ऐशी हे अविद्या केवळ । जयाचें स्वरूप अतिनिर्मळ । आत्मत्वें पावूनि टाकी सकळ । जीव प्रेमळ सद्भक्त ॥६१॥
जरी म्हणसी हें कैसें घडे । ब्रह्मसंपन्न ही निवाडें । अविद्यासंबंध दिसे कोडें । जोंवरीं जीवित मांडे यथास्थित ॥६२॥
जागृति स्वप्न सुषुप्ति । तिहीं अवस्थांची प्रतिती । काय ज्ञातया नव्हे निश्चिती । कीं न सेवी कधीं शब्दादिक ॥६३॥
ज्ञानी निद्रा करी हरिखें । निद्रेमाजी स्वप्न ही देखे । जागृति लाहूनि ओळखे । गृहादि आसिकें आपुलें ॥६४॥
यथायुक्त गोष्टी बोले । इतरीं बोलतां ऐकें वहिलें । क्षुधा लागतां चांगलें । अन्न निफजलें भक्षित ॥१४६५॥
तृषाहरणा जळही सेवी । शीतोष्णहरणा वस्त्रें भावी । एवं इत्यादि अविद्यागौरवीं । असतां त्यजिली केंवि मानावी ॥६६॥
तरी ये विषयीं उदाहरण । बोलिला ऋषि द्वैपायन । तें परिसतांचि संपूर्ण । शंकानिवारण होईल ॥६७॥
जयापरी निद्रितपुरुष । शरीर सांडित निःशेष । येथील भाव जो प्रत्यक्ष । विचारसापेक्ष तो ऐका ॥६८॥
निद्रित असतां शरीरवंत । ऐसे इतर पाहती जागृत । परी तो आपण न पाहत । निमग्न निश्चित आनंदीं ॥६९॥
तेंवि जीवन्मुक्ता अविद्यावंत । इतर पाहती ज्ञान अभ्रान्त । तो कांहीं न पाहे स्वरूपस्थित । जो बह्मानंदमय झाला ॥१४७०॥
जयाची दृष्टि वेधली कवळें । तो चंद्रमंडळ म्हणे पिंवळें । ऐसें आपणावरूनि अबळें । देहिकबळें त्या लाविती ॥७१॥
परंतु वस्तुज्ञानी निर्विकार । सबाह्य केवळ आत्माकार । अकर्तात्मक बोधें आत्मप्रचुर । अनुभवें संसार न दिसे त्या ॥७२॥
तो सर्व बोलोनि अबोलणा । सर्व भोगूनि अभोक्ता जाणा । करूनि अकर्ता योगिराणा । मूर्खा कळेना रहस्य हें ॥७३॥
विश्व देखोनि अदेखणा । द्वैत निःशेष स्मरेना । अनुभवी जाणे या लक्षणा । गुरुगम्य खुणा गुरुभक्त ॥७४॥
असो ऐसी अविद्या सर्व । जयाच्या स्वरूपप्राप्तीस्तव । अनुशयी अनन्यभक्त जीव । टाकूनि होय निर्मुक्त ॥१४७५॥
तया हरीतें निरंतर । ध्यावें अंतरीं सादर । जन्ममरणादि भय अपार । निवारी समग्र परमात्मा ॥७६॥
म्हणसी कोठूनि सामर्थ्य ऐसें । श्रीहरीतें परिपूर्ण असे । तरी अच्युतस्वरूपस्थितिवशें । मायानिरासें नित्यबोधें ॥७७॥
मूळकारण माया जेणें । त्यागिली पूर्णात्मस्थितीनें । म्हणोनि निर्भयता तच्चिन्तनें । ऐसें नृपाकारनें शुक बोधी ॥७८॥
ऋषिशापास्तव दुर्मरण । सर्पदंशें होणार म्हणोन । परीक्षिति भयभीत आपण । त्यासि निर्भय संपूर्ण हें कथिलें ॥७९॥
शुद्धपरमात्मस्वरूपबोधें । अभेद आत्मत्वें वृत्ति येथे । तेव्हां सद्गति स्वयेंचि प्रवृत्तिरोधें । होइजे शुद्धें निज ऐक्य ॥१४८०॥
मग देह असतांचि देहातीत । केवळ सन्मयप्रत्ययवंत । होतां मरणवार्ता तेथ । नाहींच निश्चित प्राप्तांसी ॥८१॥
जेव्हां मरणासींच ठाव नाहीं । तेव्हां दुर्गति कैसी कायी । म्हणोनि ऐसा बोध सुनिश्चयीं । अखंद हृदयीं धरावा ॥८२॥
समस्त वेदस्तुतीचा इत्यर्थ । या एका श्लोकें एवंभूत । परीक्षितीतें शुद्ध परमार्थ । कथिला येथ मुनीन्द्रें ॥८३॥
इतुकेन हा अध्याय परम । समाप्त सप्ताशीतितम । साधकीं विवरूनि उत्तम । स्वहित सुगम स्वीकरिजे ॥८४॥
ये वेदस्तुतीचा अर्थ गहन । व्याख्यान करितां गुंतती सुज्ञ । क्रान्तदर्शी शास्त्रप्रवीण । मां पाड कोणा इतरांच ॥१४८५॥
शास्त्रप्रवीण आणि गुरुभक्त । वेदान्तविचारें आत्मरत । त्यांसी च उमजे इत्थंभूत । राहती प्राकृत भावार्थी ॥८६॥
वेदस्तुत्यर्थ परमामृत । गीर्वानभाषाकूपीं स्थित । व्युत्पत्तिसूत्रें प्रयत्नकृत । लाहती पंडित धीपात्रें ॥८७॥
ज्यांसि शास्त्रव्युत्पत्तिसूत्र । नाहीं ते राहती आस्थातंत्र । म्हणोनि गुरुवरें हें रचिले जेणें लाधे । प्रमेय समुदें कृपाळुवें ॥८८॥
देशभाषापर्यायशब्दें । सुगम भाष्य ओंवीप्रबंधें । सोपान रचिलें जेणें लाधे । प्रमेय समुदें सकळांसी ॥८९॥
येथें जे जे मुमुक्षु तृषार्त । आबाल सुबोध समस्त । आस्थाचरणें विक्रमवंत । उतरोनि स्वस्थ अनायासें ॥१४९०॥
श्रद्धाज्जळीनें बुद्धिमुखीं । ओपोनि घोंटिती एकाकी । ते विश्रान्ति पावती सच्चित्सुखीं । भवभय ओळखी मग न उरे ॥९१॥
ऐसा जडमूढां उपकार । सद्गुरुनाथें अपार । ग्रंथरूप केला सविस्तर । सुखकर संपूर्ण दयेनें ॥९२॥
आदिनाथ दयेचा ओघ । विरंचिपात्रें भरला साङ्ग । तो नारदा लाभतां अव्यंग । तेणें दत्तात्रेयीं मग सांठविला ॥९३॥
त्या वरी तो अवधूत दयाळ । जाणोनि संतप्त कळिकाळ । जनार्दनीं वर्षला पुष्कळ । तो चि प्राज्जळ एकनाथीं ॥९४॥
तेथूनि चिदानंदें प्रवाहत । स्वानंदासी जाहला प्राप्त । गोविन्दें वळोनि यथार्थ । स्थिराविला श्रीमद्दयार्णवीं ॥१४९५॥
तये पूर्णदयेनें उचंबळोन । थोर सानें कडसणी न करून । समत्वें प्रबोधामृतप्राशन । करविलें येणें सदुपायें ॥९६॥
आधीच श्रीमद्भागवत । अठरा सहस्र परिमित । प्रबोधक्षीराब्धि निश्चित । त्या माजी मथित दशम हा ॥९७॥
इयेही दशमस्कंधामृतीं । साय परमामृत वेदस्तुति । प्रपय केली सर्वांप्रति । हे अपार उपकृति सद्गुरूची ॥९८॥
पदापदाचा देऊनि झाडा । अक्षरशा अर्थ रोकडा । शास्त्रपरिभाषा निवाडा । केला उघड श्रीधरोक्त ॥९९॥
तत्वार्थ प्रतिपादितां शुद्ध । नाना प्रकारचे शास्त्रवाद । मतान्तरें सिद्धान्तविरुद्ध । पावलीं विशद ये ठायीं ॥१५००॥
तयांचें करूनियां खंडन । केलें वेदान्तप्रतिपादन । मोक्षद निश्चयें भगवद्भजन । ऐसें निरूपण येथींच ॥१॥
हें श्रद्धापूर्वक निष्ठावंत । श्रवणें मननें प्रेमभरित । सेविती ते केवळ अच्युत । होती निभ्रान्त पूर्णत्वें ॥२॥
येथ भगवत्तत्त्वज्ञान । करतळामळवत् कथिलें पूर्ण । तें जाणोनि विवेकसंपन्न । निदिध्यासें आपण अनुभविती ॥३॥
तयां अपरोक्षप्रमेयवंतां । स्वप्नीं न स्मरे भवभयवार्ता । अवस्थामात्रीं तन्मयता । शुद्धसमता बाणेल ॥४॥
आतां पुढिलिये अध्यायीं । ऐसी निरूपणाची नवायी । कीं विष्णुभक्त केवळ निश्चयीं । पावती अद्वयीं समरसतां ॥१५०५॥
त्याहूनि इतर देवांचे भक्त । भोग्यवैभवचि नाशवंत । या पावती त्यासी सायुज्य नित्य । कैवल्य निश्चित दुर्लभ ॥६॥
परीक्षितीच्या प्रश्नास्तव । शुकें हें निरूपिलें वास्तव । सहसा न केला विष्णुस्तव । यथार्थ भाव निरूपिला ॥७॥
ते कथेच्या श्रवणा प्रति । सावध असावें मुमुक्षुश्रोतीं । जेंएं भज्यभजनफलावाप्ती । उमजे चित्तीं पृथक्त्वें ॥८॥
हा निःसंशय विविच्यभाव । पारमार्थिक अन्वय सर्व । वक्ता श्रीकृष्णदयार्णव । वदेल अनुभवगौरवें ॥९॥
सकळमंगलांची जननी । ज्ञानाद्यभ्युदयकारिणी । ते संपादिजे साधकीं जनीं । हरिभक्ति सज्जनीं सुसेव्य ॥१५१०॥
श्रीमद्भागवत दशमस्कंध । टीका हरिवरद अगाध । दयार्णवकृत परमविशुद्ध । अध्याय प्रसिद्ध सत्यायशीवा ॥१५११॥
इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कन्धे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां वेदस्तुतिनिरूपणं नाम अष्टाशीतितमोऽध्यायः ॥८७॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥५०॥ टीका ओव्या ॥१५११॥ एवं संख्या ॥१५६१॥ ( सत्त्याऐशिवा अध्याय मिळून ओवी संख्या ४०१०० )
सत्त्याऐशिवा अध्याय समाप्त.
N/A
References : N/A
Last Updated : June 12, 2017
TOP