स्कंध १ ला - अध्याय १ ला
सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य
१
नमूं गजानन शारदा शंकर । आदिकवि थोर तेंवी व्यास ॥१॥
शुकमहामुनि तेंवी भक्तजन । आदिति - वामन, कोळेश्वर ॥२॥
वेदत्रयात्मक गायत्रीनंदन । प्रारंभीं करीन अत्यादरें ॥३॥
दत्तदयाघन वंदितों मी अद्य । द्या हो आशीर्वाद पुण्यकार्या ॥४॥
‘तोता’ बाळरुपें हिमाचलामाजी । शुक भेटे, त्यासी वंदूं प्रेमें ॥५॥
पिता शिवराम, माता ते पार्वती । सकल पूर्वजांसी नमन असो ॥६॥
‘राम-गीत सुधा’ ‘अभंग-भारत’ । गाववूनि तृप्त केली इच्छा ॥७॥
आतां या ‘अभंग-भागवत’ गानीं । प्रसाद अर्पूनि स्फूर्ति द्यावी ॥८॥
जोडूनियां कर मस्तक चरणीं । ठेवितों द्या वाणी प्रासादिक ॥९॥
वासुदेव प्रेमें मारीतसे हांका । उद्धार आमुचा करा वेगें ॥१०॥
२
झाली कंपित धरणी । आम्हां वाली नसे कोणी ॥१॥
नकळे धर्माची श्रेष्ठता । अर्थकामलोलंगता ॥२॥
गेलें ब्राह्मण्य लयासी । वर्णाश्रमां कोण पुशी ॥३॥
धर्मविद्वेष वाढला । स्वैराचार बळावला ॥४॥
सुटला अधर्माचा वारा । वेदमार्ग अडूनि गेला ॥५॥
भक्तिनिर्झर आटले । अश्रद्धेचे सर्व चाळे ॥६॥
ऐशा संकटाच्या वेळीं । ‘भागवत’ आम्हां वाली ॥७॥
धर्मराज्यप्रथापना । घडो हेचि मनकामना ॥८॥
याचि विश्वासें अभंग । गायनाचा धरिला मार्ग ॥९॥
वासुदेव म्हणे इच्छा । यावी ग्रंथा सुलभता ॥१०॥
३
पुण्यकथालुब्ध श्रोत्यांसी वंदन । नित्य जे स्फुरण देती मज ॥१॥
संतसज्जन जे धर्मप्रवर्तक । वेदाज्ञाधारक नमन तयां ॥२॥
शुकचंचूतूनि गलित जो रस । तोचि अभंगांत सांठवावा ॥३॥
धरुनियां ऐसी इच्छा प्रवर्तलों । प्रेममय झालों संकल्पेंचि ॥४॥
प्रसादचिन्हें हीं बहु पुरस्थित । आशीर्वाद स्पष्ट दाविताती ॥५॥
वासुदेव म्हणे व्हावें निर्वासन । एक नारायण हृदयीं घ्यावा ॥६॥
४
विश्वोत्पत्ति स्थिति लयासी कारण । सकलां व्यापून अलिप्त जो ॥१॥
स्वत: सिद्ध, देवांतेंही अगोचर । यदिच्छेनें वेद लाभे ब्रह्मया ॥२॥
आदिकवि ब्रह्मा ज्या लाभें कृतार्थ । जयावरी सत्य भासे सृष्टि ॥३॥
ज्ञानस्वरुपें जो मायेहूनि पर । सत्य पराप्तर तोचि ध्याऊं ॥४॥
वासुदेव म्हणे ध्याता ध्येय ध्यान । वंदूं तो श्रीकृष्ण सर्वकाल ॥५॥
५
कपटविहीन सज्जनांचा धर्म । निर्मत्सरपूर्ण कथिला जेथें ॥१॥
त्रितापशामक बोध जया ग्रंथीं । श्रेष्ठता जयाची इतरांसी न ॥२॥
श्रवणेंचि ज्याच्या हृदयीं ईश्वर । प्रगटे साचार महिमा ऐसा ॥३॥
वासुदेव म्हणे भागवत श्रेष्ठ । साधन वरिष्ठ नाहीं दुजें ॥४॥
६
रसज्ञ हो वेदकल्पवृक्षाचें हें । परिपक्व असे गलित फल ॥१॥
परमामृत हें रसाळ मधुर । लाभलें भूवर शुकद्वारा ॥२॥
भाविकहो, नित्य प्राशूनियां मुक्त । व्हावें श्रद्धायुक्त अंतरानें ॥३॥
वासुदेव म्हणे ग्रंथाचें हें फल । ऐकूनि चांचल्यरहित व्हावें ॥४॥
७
नैमिष नामक अरण्यांत सत्र । चाललें सहस्त्रवर्षे पूर्वीं ॥१॥
प्रात:कालीं एका सूत येई तेथ । सन्मानिती त्यास शौनकादि ॥२॥
जोडूनियां कर तया विनविती । शास्त्र-पुराणादि जाणसी तूं ॥३॥
व्यासादि मुनींचा प्रेमळ तूं शिष्य । प्राप्त तेणें तुज सकल ज्ञान ॥४॥
यास्तव कथीं जें निश्चित जनासी । दावी कल्याणाची श्रेष्ठ वाट ॥५॥
कलीमाजी अल्पायुष्य मंदमति । सिद्धांत नेणती हिताचेही ॥६॥
यास्तव प्रसन्ना होई नारायण । कथीं तें साधन चिंतूनियां ॥७॥
वासुदेव ह्मणे श्रद्धा सूतावरी । ठेवूनि अंतरीं पुशिती मुनि ॥८॥
८
सूता, श्रीकृष्णाचें कथीं सर्व वृत्त । इहपरलाभ जेणें घडे ॥१॥
भयही जयाच्या नामें भय पावे । चरित्र कथावें तेंचि आह्मां ॥२॥
भक्तांचेंही ज्याच्या दर्शन तत्क्षणीं । पावन करुनि शांति देई ॥३॥
लीलामात्रें बहु घेई जो अवतार । तयाचें चरित्र कथीं आम्हां ॥४॥
अवीट तें नित्य ऐकावेंसें वाटे । मानवस्वरुपें नटला प्रभु ॥५॥
अतिमानुष तीं कृत्यें रामासावें । खेळला जो गावे गुण त्याचे ॥६॥
वासुदेव म्हणे विवेकी मानव । ईशपदीं भाव ठेवी नित्य ॥७॥
९
मुनि बोलती हे सूता । कलिकाल नाडी लोकां ॥१॥
सत्र आरंभ यास्तव । केला गाईं तूं केशव ॥२॥
सत्वहरण करुनि कलि । पुरुषबुद्धि मलिन करी ॥३॥
दृढतरे त्याचे पाश । छेदावे हे मनीं आस ॥४॥
कुशल कर्णधार आह्मां । सागरीं या तूं सज्जना ॥५॥
जातां निजधामा कृष्ण । योगेश्वर तो ब्रह्मण्य ॥६॥
धर्म कोणा शरण गेला । तेंही कथावें या काला ॥७॥
वासुदेव ह्मणे ऐसा । प्रथमाध्याय भागवताचा ॥८॥
N/A
References : N/A
Last Updated : November 01, 2019
TOP