स्कंध १ ला - अध्याय १९ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


१३०
सूत म्हणे गृही जातां नृपाळासी । आपुली ती कृति निंद्य वाटे ॥१॥
पश्चात्ताप बहु जाहला तयातें । व्यर्थ तपस्व्यातें अवमानिलें ॥२॥
भस्माच्छादित तो अग्नीचि ब्राह्मण । मूढ मी अज्ञान, छळिलें देवा ॥३॥
ऐसा अवमान ईश्वरा कदाही । न घडो कवणाचाही मम हस्तें ॥४॥
देव, धेनु, विप्र अवमान ऐसा । होऊं नये नाशा पावतांही ॥५॥
वासुदेव म्हणे राव चिंती ऐसें । पाही तों विप्रातें द्वारीं कोणा ॥६॥

१३१
शमीकआज्ञेंने विप्र तो रायातें । निवेदी शापाचें सकळ वृत्त ॥१॥
ऐकूनि तें राव तोष पावे मनीं । दृढ विरागी मी व्हावें म्हणे ॥२॥
अनासक्तचित्तें कृष्णपदांबुज । सेवावे हा दृढनिश्चय करी ॥३॥
अनशनव्रतें जाईं गंगातीरीं । बैसूनि मुरारी चितीं मनीं ॥४॥
तेथ मुनि येती अत्रि-पिप्पलाद । गौतम उतथ्य देवलादि ॥५॥
देवर्षि, ब्रह्मर्षि, राजर्षिही येती । पावन करीती तीर्थासी जे ॥६॥
वासुदेव म्हणे सन्मानूनि राजा । आशय मनींचा निवेदी त्यां ॥७॥

१३२
अनुमोदन त्या देती सर्व ऋषी । राव तदा प्रार्थी तयांलागीं ॥१॥
मलमूत्र-पादप्रक्षालनोदक । त्याहूनिही निंद्य म्हणे आम्ही ॥२॥
कुरुवंश परी जाहला कृतार्थ । बहु आशीर्वाद विप्रांचे त्या ॥३॥
कल्याणार्थ माझ्या ईश्वरें हा शाप । देवविला अद्य विप्रद्वारा ॥४॥
होतांही हा शाप संसारीं आसक्त । होई त्याचा नाश तत्काळचि ॥५॥
विप्रहो, तक्षक येवो आतां सौख्यें । प्रतिकार त्यातें न घडो कांहीं ॥६॥
कृष्णकथागान करोइ आनंदानें । वृत्त कथी प्रेमें वासुदेव ॥७॥

१३३
जन्मोजन्मीं मज प्रेम श्रीहरीचें । दर्शन संतांचें घडो नित्य ॥१॥
प्रार्थूनियां ऐसें स्वपुत्रातें राज्य । अर्पूनि व्रतस्थ बसला स्थिर ॥२॥
दुंदुभिनाद तैं जाहला गगनीं । प्रशंसा मुनींनी केली बहु ॥३॥
राव म्हणे परउपकारब्रीद । यास्तवचि एथ पातलांती ॥४॥
मरणोन्मुखासी काय हितप्रद । कथा एकमत करुनि मज ॥५॥
वासुदेव म्हणे मुनीतें चिंतितां । सत्पुत्र व्यासांचा येई तेथ ॥६॥

१३४
निर्हेतुक पर्यटन वर्ण-आश्रमविहीन ॥१॥
आत्मानंदीं लीन सदा । नव्हती वस्त्राचीही चिंता ॥२॥
विवस्त्र तें बालरुप । थट्टा करिती सकल लोक ॥३॥
सुकुमार अंगकांती । वर्षे शोडष तयासी ॥४॥
सरळ नासिका सुनेत्र । भुंवया शोभती सुरेख ॥५॥
कंठावरी वलित्रय । वंदी तया वासुदेव ॥५॥

१३५
गूढ जत्रु, पृथु, तुंग वक्षस्थल । बलि, वल्गूदर, गूढ नाभि ॥१॥
कुरळे कुंतल मस्तकीं शोभले । यौवन ओतलें रोमरोमीं ॥२॥
सुंदर शरीर, हास्य मनोहर । पाहूनि चंचल होती स्त्रिया ॥३॥
अप्रगट तेज परी सर्व मुनी । स्वागत उठूनि करिती थोर ॥४॥
परीक्षिती घाली पदीं लोटांगण । करुनि वंदन नम्रभावें ॥५॥
पलायन तदा करिती थट्टाखोर । विराजला चंद्र तारकांत ॥६॥
वासुदेव म्हणे शुकांप्रति राजा । जोडूनियां हस्तां विनवीतसे ॥७॥

१३६
ब्रह्मनिष्ठा, मज अधम क्षत्रिया । पुनीत या ठायां केलेंसी त्वां ॥१॥
पादस्मरणें या नष्ट होती पापें । दर्शनादि ज्यातें तोचि थोर ॥२॥
विष्णुसान्निध्यें जैं असुरविनाश । तेंवी पापनाश त्वत्सान्निध्यें ॥३॥
पांडवसखा तो तोषलासे वाटे । दर्शन हें मातें लाभे तेणें ॥४॥
कल्पवृक्ष कामधेनु दरिद्र्यासी । तैसीच हे भेटी अद्य मज ॥५॥
वासुदेव म्हने आनंदित मनीं । जोडूनियां पाणी विनवी राव ॥६॥

१३७
मरणोन्मुखासी अमोघ साधन । कथावें होऊन दयावंत ॥१॥
ऐकावें, जपावें करावेंही काय । स्मर्तव्य भजनीय तेंही कथीं ॥२॥
निषिद्धही जें जें तें तें कथीं देवा । अनुग्रह व्हावा दीनावरी ॥३॥
दोहनकालही वससी न कोठें । यास्तव कथीं जें त्वरित हित ॥४॥
सूत म्हणे ऐसी ऐकूनि नृपोक्ति । आनंदें बोलती शुक ऐका ॥५॥
प्रथम हा स्कंध जाहला समाप्त । श्रीहरी संतुष्ट होवो तेणें ॥६॥
वासुदेव म्हणे सर्वांगाचे कान । करुनि, तें ज्ञान ऐकूं आतां ॥७॥

इतिश्री वासुदेवकृत अभंग-भागवताचा स्कंध १ ला समाप्त
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 03, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP