स्कंध १ ला - अध्याय ९ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


६४
धर्माचें रहस्य जाणावें म्हणूनि । भीष्मांच्या चरणीं लीन झाला ॥१
सकल बांधव तैसाचि माधव । तेंवी ऋषिवर्य बहुत होते ॥२॥
सर्वज्ञ भीष्मांनी पाहूनी कृष्णासी । मनेंचि तयासी पूजियेलें ॥३॥
धर्मार्जुनांप्रति पाहूनि नयन । होती अश्रुपूर्ण प्रेमभावें ॥४॥
वासुदेव म्हणे धर्मादिकां भीष्म । बोलले वचन ऐका काय ॥५॥

६५
धार्मिकांही तुम्हां कष्ट बहु झाले । काळाचे हे सारे खेळ जाणें ॥१॥
मेघसमुदाय कालाधीन जेंवी । तेंवी काल ठेवी तैसे जन ॥२॥
नीतिमंत धर्म, गदायोद्धा भीम । सर्वास्त्रनिपुण पार्थ जेथें ॥३॥
गांडीव धनुष्य सखा यदुनाथ । तेथें ऐसे क्लेश आश्चर्य हें ॥४॥
परि अनिवार्य गति या कालाची । लीला श्रीकृष्णाची अगाध या ॥५॥
परब्रह्मचि हा परमात्मा कृष्ण । द्यावया दर्शन आला मातें ॥६॥
अंतकाळीं ज्यातें स्मरतां मुक्तिलाभ । स्वयंभ सन्निध तोचि माझ्या ॥७॥
वासुदेव म्हणे विनविती भीष्म । सर्वदा श्रीकृष्ण कृपा करो ॥८॥

पुशितां पुढती भीष्म धर्माप्रती । विविध कथिती श्रेष्ठ धर्म ॥१॥
सामान्यधर्म तैं वर्णाश्रमधर्म । प्रवृत्तिलक्षण निवृत्तिही ॥२॥
राजधर्म तेंवी स्त्रीधर्म कथिले । विविध दाविले दानमार्ग ॥३॥
भागवतधर्म तेंवी मोक्षमार्ग । पुरुषार्थ साड्ग निवेदिले ॥४॥
उत्तरायण जैं पातले पुढती । भीष्म तैं मरणासी सिद्ध झाले ॥५॥
वासुदेव म्हणे तापदैन्यनाश । करी यदुनाथ सद्भक्तांचा ॥६॥

६७
सद्‍गतित कंठें भीष्म श्रीकृष्णांची । करिताती स्तुति तया वेळीं ॥१॥
एकाग्र निष्काम निश्चल मन्मन । असो कृष्णार्पण सर्वकाल ॥२॥
आनंदस्वरुप श्रीकृष्ण मायेतें । कदा लीलामात्रें अंगिकारी ॥३॥
परी तो मायेच्या आधीन न होई । अनुपम पाहीं रुप याचें ॥४॥
तमालवर्ण जो पीतांबरधारी । कांती विराजली सूर्यासम ॥५॥
पार्थसारथी जो कमलवदन । पादपद्मीं मन जडो त्याच्या ॥६॥
वासुदेव म्हणे भक्तसखा हरि । वसावा अंतरीं म्हणती भीष्म ॥७॥

६८
अवलोकनेंचि आयुष्य वैर्‍यांचें । हरी रणामध्यें रथ स्थापी ॥१॥
तेंवी मोहमग्न पार्थालागीं ज्ञान । कथूनि स्वधर्मनिरत करी ॥२॥
तया श्रीकृष्णाचे चरणीं मन्मन । असो रममाण सर्वकाल ॥३॥
‘न धरीं शस्त्र’ हे प्रतिज्ञा तयाची । मोडीन मी ऐसी वदलों वाणी ॥४॥
सत्य तें कराया धांवला जो रणीं । देव चक्रपाणी नमन तया ॥५॥
वासुदेव म्हणे भक्तांचें महत्त्व । वाढवी अच्युत सर्वकाळ ॥६॥

६९
जगत्पालक तो संरक्षी पार्थासी । तोत्ररज्जु हस्तीं मोक्षदाता ॥१॥
दर्शनें जयाच्या मृत तोचि मुक्त । त्याच्या पदीं चित्त जडो माझें ॥२॥
रुपगुणलुब्धा गोपी ज्या स्वरुपीं । मिळाल्या तयासी नमन असो ॥३॥
जयाच्या प्रभावें अग्रपूजामान । अर्पूनि मुनिगण तुष्ट झाले ॥४॥
सन्निध तो माझ्या असे हें मद्भाग्य । असूनियां एक विविध दिसे ॥५॥
वासुदेव म्हणे तया श्रीहरीतें । ऐक्य झालें मातें म्हणती भीष्म ॥६॥

७०
सूत कथिती ऋषिजनां । वृत्ति अर्पूनि श्रीकृष्णा ॥१॥
चरणीं लावियेली दृष्टि । लीन भीष्म स्वस्वरुपीं ॥२॥
लीन होतां पंचप्राण । वदती मुनि धन्य धन्य ॥३॥
पुष्पवृष्टि करिती देव । भीष्मस्तवन करिती सर्व ॥४॥
दु:खाकुल धर्मादिक । करिती क्रिया शास्त्रोचित्त ॥५॥
येती हस्तिनापुरासी । करिती शांत सकलांसी ॥६॥
पुढती थोर आशीर्वादें । धर्म सिंहासनीं बैसे ॥७॥
वासुदेव म्हणे वृत्त । कथिलें संक्षेपें समस्त ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 01, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP