स्कंध १ ला - अध्याय १३ वा
सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य
अध्याय १३ वा
अंतीं जीवगति केंवी या ज्ञानार्थ । तीर्थामार्गें तीर्थ विदुर हिंडे ॥१॥
श्रेष्ठ गति सर्वां गोविंदचि ऐसें । मैत्रेय तयातें कथिती प्रेमें ॥२॥
प्रश्न विदुराचे होते बहुतचि । उत्तरें बहुतांचीं सहज आलीं ॥३॥
अल्पचि कथनें इंद्रियचालक । प्रिय अधोक्षज तया होई ॥४॥
अन्य उत्तरांची नुरली अपेक्षा । हस्तिनापुरीचा धरिला पंथ ॥५॥
धर्मादिक त्याचें करुनि स्वागत । पावती आनंद पूजूनि त्या ॥६॥
वासुदेव म्हणे शवामाजी प्राण । येतां समाधान सकलां तेंवी ॥७॥
८४
भोजनादि नित्यविधि आटोपतां । आत्रावृत्त राजा विदुरा पुशी ॥१॥
तैसेंचि श्रीकृष्णकुशल । भेटले श्रीहरी काय तुज ॥२॥
धर्मासी तैं क्षत्ता कथी सर्व वृत्त । यादवांचा नाश न कथी परी ॥३॥
स्वयंप्राप्त दु:ख दु:सह जनांसी । स्थिती दु:खितांची पाहवेना ॥४॥
यास्तव यादववृत्त न कथिलें । दिन ऐसे गेलें कांहीं सौख्यें ॥५॥
वासुदेव म्हणे ब्रह्मज्ञान नित्य । निवेदी सहर्ष सकलां क्षत्ता ॥६॥
८५
अधिकचि वाटे सकलां आदर । ज्ञान निरंतर ऐकूनियां ॥१॥
शूद्रही विदुर ज्ञान केंवी कथी । संदेह हा चित्तीं धरुं नये ॥२॥
मांडव्यशापानें शतवर्षे यम । शुद्रत्व पावून विदुर झाला ॥३॥
अर्यमा त्या वेळीं झाला होता यम । साक्षात् यमधर्म विदुर ऐसा ॥४॥
वासुदेव म्हणे विदुर पुढती । धृतराष्ट्राप्रती बोध करी ॥५॥
८६
कालभगवान पातला कठीण । नसे निवारण शक्य याचें ॥१॥
त्वरित तूं मायामोह त्यागीं राजा । काळमुखीं जातां सुटका नसे ॥२॥
प्राणही सोडून जातील तुजसी । तेथ इतरांची कथा काय ॥३॥
जराजर्जर तूं झालासी नृपाळा । मोह मानसाला कासयाचा ॥४॥
राजा, तुजप्रती सुखानें पांडव । सांभाळिती काय चिंती मनीं ॥५॥
जाळिलें पोळिलें विषही चारिलें । सभेंत ओढिलें साध्वीलागीं ॥६॥
ऐसेंही करुनि तयांचेंचि अन्न । भक्षून जीवन कंठिसी हें ॥७॥
वासुदेव म्हणे विवेकी विदुर । वैराग्यार्थ घोर वदे ऐसें ॥८॥
८७
राया, श्वानासम कंठितोसी जिणें । पराधीनपणें कां रे ऐसें ॥१॥
काय जीविताची प्रबलही आशा । मृत्यु न कोणाचा रक्षी प्राण ॥२॥
जीर्ण वस्त्रासम पावसील नाश । उपचार व्यर्थ सकल बाह्य ॥३॥
यास्तव अज्ञातपणें गृहत्याग । करी अनासक्त तोचि धन्य ॥४॥
ज्ञानें, सत्संगें वा संसारव्यर्थत्व । कळे तो सर्वस्व त्यजूनि जाई ॥५॥
यास्तव नृपाळा, नकळत कोणा । गांठीं गिरिराणा उद्धारार्थ ॥६॥
वासुदेव म्हणे ऐकूनि तें वच । गांधारी धृतराष्ट्र त्यजिती गृह ॥७॥
८८
जन्म दिनीं प्रात:कालीं धर्मराज । जाई वंदनार्थ वडिल जनां ॥१॥
परी न तयासी कोणीही दिसतां । पुशीतसे वृत्ता संजयातें ॥२॥
आजवरी गावल्गणीतें वियोग । नव्हता अनुभूत नृपाळाचा ॥३॥
धर्मासी तो कथी क्षत्त्यासवें राजा । गेला कवण देशा नकळे मज ॥४॥
ऐकूनि धर्मातें शोक न आंवरे । इतुक्यांत आले ब्रह्मसुत ॥५॥
शोकाकुल धर्मे उठूनि सन्मान । करुनियां प्रश्न केला तया ॥६॥
तात कोठें गेलें सांगावें नारदा । असह्य हें चित्ता दु:ख माझ्या ॥७॥
वासुदेव म्हणे धर्मासी नारद । संकटीं त्या बोध करिती ऐका ॥८॥
८९
ईश्वराधीन हें विश्व युधिष्टिरा । त्यावीण आसरा नसे कोणी ॥१॥
संयोग वियोग तयाच्या सत्तेनें । सकलही जाणें क्रीडा त्याची ॥२॥
अज्ञानमूलक शोक हा जाणावा । स्नेह तो त्यजावा शोकमूळ ॥३॥
मजवीण नाश पावतील वृद्ध । त्यजीं हा संकल्प अंतरींचा ॥४॥
संचित जयाचें जैसें तेंवी भोग । संरक्षी कोणास कोण मर्त्य ॥५॥
अजगरग्रस्त वांचवील अन्या । वदणें मूर्खपणा जैशापरी ॥६॥
वासुदेव म्हणे नारदवचन । सावध होऊन पुढती ऐका ॥७॥
९०
रक्षिती न परी भक्षिती जीवांतें । जीवचि हें ऐसें सत्यतत्त्व ॥१॥
अहस्त सहस्तां, तृणादि पशूंसी । जीवन जीवासी जीवचि ते ॥२॥
द्वैताहूनि धर्मा, यास्तव अद्वैत । सौख्यद, हरिरुप विश्व सारें ॥३॥
दुष्टविनाशार्थ तोचि हा श्रीहरी । कृष्णरुपधारी पातलासे ॥४॥
अल्पकार्य त्याचें आतां अबशिष्ट । होईल त्वरित तेंही पूर्ण ॥५॥
जोंवरी श्रीकृष्ण असे भूमीवरी । वसावें तोंवरी तुम्ही एथ ॥६॥
वासुदेव म्हणे पुढती नारद । कथीतसे वृत्त धृतराष्ट्राचें ॥७॥
९१
धर्मा, धृतराष्ट्र, गांधारी विदुर । वसती पवित्र सप्तस्त्रोतीं ॥१॥
प्राशिती त्या ठाईं केवळ उदक । निर्वासन शांत करुनि मन ॥२॥
अहंकाराश्रय मन बुद्धीमाजी । बुद्धी ते नृपाची ब्रह्मीं लीन ॥३॥
घटाकाश व्हावें मठाकाशीं लीन । तैसें जीवब्रह्मऐक्य त्याचें ॥४॥
मायापाश आतां बाधती न तया । जिंकूनि इंद्रिया अचल होई ॥५॥
पंचम दिनीं तो ठेवील हा देह । योगाग्नीनें दग्ध करुनि स्वयें ॥६॥
पाहूनि गांधारी प्रवेशेल त्यांत । क्षत्ता हर्ष खेद पावले तैं ॥७॥
अन्यस्थानाप्रति जाईल विदुर । कथूनि नारद निघूनि जाती ॥८॥
वासुदेव म्हणे नारदवचनें । आंवरी शोकातें धर्मराज ॥९॥
N/A
References : N/A
Last Updated : November 01, 2019
TOP