स्कंध १ ला - अध्याय ५ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


३१
नारदासन्निध सुखासनीं व्यास । बैसतां नारद बोलती त्यां ॥१॥
कुशल असे कीं पाराशर्या तव । अवतारकार्य जाहलें कीं ॥२॥
सर्वज्ञानमय रचिलें भारत । ब्रह्म तें शाश्वत जाणिलेंसी ॥३॥
तथापीहि ऐसा असंतुष्ट मनीं । अकृतार्थ जनीं दिससी कांरे ॥४॥
वासुदेव म्हणे नारदांसी व्यास । निवेदिती स्पष्ट ऐका तेंचि ॥५॥

३२
मुने, भारतादि रचूनिही मज । वाटे असंतोष सत्यचि हें ॥१॥
ब्रह्मदेवपुत्र तुम्हीं महाज्ञानीं । रहस्य जाणूनि मज कथा ॥२॥
न्यून मजमाजी सांगा काय असे । केलीं नियमव्रतें बहुविध ॥३॥
नारद म्हणती व्यासा, धर्मादिक । वर्णिलेसी स्पष्ट भारतीं तूं ॥४॥
परी वासुदेवमहिमा न गाईला । कीर्ति ती विमला गाइली न ॥५॥
तेणें तुज ऐसा असंतोष वाटे । नवल चित्तातें वासुदेवा ॥६॥

३३
द्वैपायना, जरी काव्य गोड झालें । अद्‍भुत साधिले शब्द जरी ॥१॥
परी जगन्मंगलातें न वर्णितां । जाणें काकतीर्था तया काव्या ॥२॥
मानसविहारी हंस तयास्थानीं । रमती न ध्यानीं असो नित्य ॥३॥
अज्ञ जन तेथ पावती आनंद । ज्ञाते महाभाग वर्जिती त्या ॥४॥
शब्दसौष्ठवें न काव्याची योग्यता । तोष भगवंता व्हावा तेणें ॥५॥
असंबद्ध जरी भगवद्वर्णन । प्रेमें साधुजन गाती तेंचि ॥६॥
वासुदेव म्हणे रसरुप हरी । सांठवी अंतरीं, तेंचि काव्य ॥७॥

३४
काव्य वा शास्त्रही नामाविण व्यर्थ । नवल न यांत द्वैपायना ॥१॥
अनासक्तकर्मार्जितही तें ज्ञान । हरिप्रेमाविण शोभाहीन ॥२॥
मग इतरांची कथा काय तेथ । भक्तावीण व्यर्थ सकल ज्ञान ॥३॥
यास्तव भगवद्‍गुण गाईं प्रेमें । समाधान तेणें पावसील ॥४॥
ज्ञान तुझें थोर कीर्तिही निर्मल । वेदोक्त आचार सत्यनिष्ठा ॥५॥
ईशगुणगान सुलभ तुजसी । कथिती व्यासांसी ब्रह्मसुत ॥६॥
वासुदेव म्हणे भक्तीनें पूर्णता । येई, साधनांचा क्रमितां पंथ ॥७॥

३५
आजवरी भिन्न दृष्टि ठेऊनियां । वर्णिलें उपायां धर्मादिकां ॥१॥
परी प्रवृत्तीचा मार्ग तो अपूर्ण । लाभे समाधान निवृत्तीनें ॥२॥
सहज प्रवृत्ति, प्रवृत्तिमार्गांत । निवृत्तीचि श्रेष्ठ परी असे ॥३॥
प्रवृत्तिमागेंही पुढती जाती ज्ञाते । परी अज्ञानी तें न कळे कांहीं ॥४॥
भक्तीवीण तयां साधन न अन्य । गाईं भगवद्‍गुण यास्तव तूं ॥५॥
वासुदेव म्हणे भक्तीचा महिमा । कथी द्वैपायना ब्रह्मसुत ॥६॥

३६
प्रवृत्तिमार्गही भक्तिविणें व्यर्थ । कल्याणकारक भक्ति जनीं ॥१॥
स्वीकारुनि भक्तिमार्ग मृत्यु येतां । अन्य जन्मीं पंथा पुढिल लाभे ॥२॥
निवृत्तिपूर्वक भक्तिमार्ग श्रेष्ठ । सर्व साधनांत मानवासी ॥३॥
स्वर्गसौख्याहूनि भक्तिसुख श्रेष्ठ । यत्न व्हावे नित्य भक्तीस्तव ॥४॥
यत्नावीण सुख-दु:ख प्रारब्धानें । जनीं अनिच्छेनें पुढती ठाके ॥५॥
भक्तीवीण कर्मे बंधन न तुटे । भक्तिलाभें आटे भवसिंधु ॥६॥
मुकुंदपादाब्ज मकरंदीं धुंद । तया विषयसंग काय करी ॥७॥
वासुदेव म्हणे श्रीखंड चाखितां । कांजी केंवीं चित्ता मोह पाडी ॥८॥

३७
दृश्य जगामाजी असूनि निराळा । पाहीं त्या गोपाळा द्वैपायना ॥१॥
अधिष्ठानाहूनि भ्रम जेंवी भिन्न । असूनि अभिन्न नाम रुपें ॥२॥
जाणसी तूं सर्व निवेदितों परी । साक्षात्‍ नरहरी तूंचि व्यासा ॥३॥
जगत्कल्याणाचा हेतु सिद्ध व्हावा । यास्तवचि गाव्या हरिलीला ॥४॥
हरिकीर्तनाचें अविनाशी फल । यागादि सकळ गौण जाणें ॥५॥
वासुदेव म्हणे भक्तिवर्णनार्थ । निजपूर्ववृत्त कथिती मुनि ॥६॥

३८
वेदवित्‍ साधूंच्या दासीचा मी पुत्र । पूर्वजन्मीं, वृत्त परिसें माझें ॥१॥
अन्य ऋतूंमाजी भ्रमण तयांसी । वर्षाऋतूमाजी एक स्थान ॥२॥
ऐशा साधुजनसेवेसी मातेनें । योजितां मी प्रेमें सेविलें त्यां ॥३॥
बालपणींही मी नव्हतों चंचळ । अल्पभाषी शांत क्रीडाहीन ॥४॥
सदा सेवारत पाहूनि मजसी । समही साधूंची जडली प्रीती ॥५॥
उच्छिष्टात्रें त्यांच्या दग्ध झालें पाप । दंग कीर्तनांत चित्त होई ॥६॥
वासुदेव म्हणे संतसंग ऐसा । ईशकृपा होतां लाभतसे ॥७॥

३९
प्रति चातुर्मास्य ऐकूनि कीर्तन । कृष्णपदीं प्रेम उपजलें ॥१॥
चित्तस्थैर्य तेथें होऊनि अखंड । उपासनामार्ग रुचला मज ॥२॥
तेणें मायामय कळलें हें विश्व । प्रगटला सत्त्वगुण अंगीं ॥३॥
पुढती साधूंनीं उपदेश केला । मार्ग दावियेला गुह्य मज ॥४॥
श्रीहरीमायेचें कळलें स्वरुप । ज्ञानचि औषध भवभंगासी ॥५॥
वासुदेव म्हणे ईश्वरार्थ कर्म । करितां ब्रह्मज्ञान सहज घडे ॥६॥

४०
निश्चयें हें कर्म बंधनकारक । उपाय त्या ऐक कथितों एक ॥१॥
ईश्वरार्थ कर्मे लाभतसे ज्ञान । अज्ञानबंधन तुटे तेणें ॥२॥
रोगकारी वस्तु अनुपानें सेवितां । करी रोगनाशा व्यवहारीं ॥३॥
तेंवी ईश्वरार्थं कर्मे जडे भक्ति । ज्ञानोत्तर मुक्ति पुढती तेणें ॥४॥
वासुदेव नामें घडतांहि कर्म । न करी बंधन पुढती भक्तां ॥५॥
वासुदेव म्हणे वासुदेवनामें । कृतार्थता ज्ञानें मानवासी ॥६॥

४१
व्यासा बहुकाळ नियमें या वागतां । दया भगवंता आली माझी ॥१॥
तेणें ज्ञानभक्ति ऐश्वर्यही मज । लाभलें सहज कृपालेशें ॥२॥
केवळ विद्वत्ता सर्वदा अपूर्ण । गातां गुणगान शांति लाभे ॥३॥
यास्तव तूं गाईं गुण ईश्वराचे । तेणें तुज लाभे समाधान ॥४॥
वासुदेव म्हणे ऐका नारदोक्ति । गुणगान शांति देई जगीं ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 01, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP