स्कंध १ ला - अध्याय १२ वा
सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य
८०
सूतालागी प्रश्न करिती शौनक । परीक्षितवृत्त सकळ कथा ॥१॥
चरित्र तयाचें तेंवी ब्रह्मबोध । केंवी परलोक लाभला त्या ॥२॥
सूत म्हणे धर्मा, क्षुधितासी अन्न । तैसाचि श्रीकृष्ण सकलां प्रिय ॥३॥
गर्भांतचि सूक्ष्मरुपें भगवान । करीं संरक्षण, सभोंवतीं - ॥४॥
पाहूनि, तयातें कोण ऐसें वाटे । संरक्षूनि मातें गुप्त होई ॥५॥
सुदैवें सुवेळीं जन्मला बालक । नाम ‘विष्णुरात’ ठेविलें त्या ॥६॥
वासुदेव म्हणे बहु दानधर्म । करुनियां धर्म संतोषला ॥७॥
८१
धर्मप्रश्ने विप्र कथिती जातक । प्रजासंरक्षक बालक हा ॥१॥
मनुपुत्र इक्ष्वाकूचि हा प्रजेसी । रामचि विप्रांसी, दाता शिवि ॥२॥
यज्ञकर्ता जेंवी दुष्यंताचा पुत्र । धनुर्धारी वीर पार्थचि कीं ॥३॥
अग्नि, सागर तैं हिमाचल बलि । बाळ क्षमाशाली भूमीसम ॥४॥
प्रजाहितदक्ष प्रजेचा पालक । निग्रहकारक कलीप्रति ॥५॥
अंती मृत्युवृत्त ऐकूनियां ज्ञान । शुकोक्त लाभून मुक्ति पावे ॥६॥
वासुदेव म्हणे कथूनियां ऐसें । विप्र स्वस्थळातें निघूनि जाती ॥७॥
८२
सूत म्हणे ऐका बाळपणीं बाळ । परीक्षी सकळ जनांप्रती ॥१॥
संरक्षिले जेणें कोठें तो दिसे कीं । नांव ‘परीक्षिती’ पडले तेणें ॥२॥
असो, ज्ञातिवधपापें धर्मराज । सज्जला यज्ञार्थ नाइलाजें ॥३॥
हिमगिरींतूनि मरुत्ताचें धन । आणूनियां तीन यज्ञ करी ॥४॥
ऐसें ईश्वरासी करुनि संतुष्ट । कृष्णाज्ञेनें राज्य करी धर्म ॥५॥
पांडवांच्या प्रेमें श्रीकृष्ण त्या स्थानीं । राहियेला कांहीं मास प्रेमें ॥६॥
वासुदेव म्हणे पुढती श्रीकृष्ण । अर्जुना घेऊन स्वगृहीं गेला ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : November 01, 2019
TOP