स्कंध ५ वा - अध्याय २ रा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य



प्रियव्रतपुत्र नृपाळ अग्नीध । जंबुद्वीपराज्य करुं लागे ॥१॥
अपत्यासम तो वागवी प्रजेसी । पितृलोकप्राप्ति इच्छी मनीं ॥२॥
यास्तव पुत्रार्थ करी बहु तप । मंदरगुहेंत वास करी ॥३॥
‘पूर्वचित्ति’ नामें अप्सरेसी ब्रह्मा । नृपाच्या संगमा धाडीतसे ॥४॥
आश्रमासन्निध उपवनीं आली । नुपुरांचा करी झणत्कार ॥५॥
दृष्टि तिजवरी जाई नृपाळाची । संचार भोंवती करी रंभा ॥६॥
देवांतेंही जिचा मोह अनावर । पाहूनि सुंदर रुप तिचें ॥७॥
वासुदेव म्हणे मोहित नृपाळ । बोलला मधुर शब्दें तिज ॥८॥

१०
अहो मुनीश्वरा, कोण तुम्हीं कथा । कासया वनींचा धरिला पंथ ॥१॥
मूर्तिमंत ईशमायाचि भाससी । दिव्य चापें दोन सज्ज न जीं ॥२॥
कमलासमान कोमल हे बाण । अग्रें बहु तीक्ष्ण दंडहीन ॥३॥
इच्छितां कोणासी सांगाजी वेधावें । मज संरक्षावें कृपावंता ॥४॥
भ्रमर हे शिष्य गाती सामगीत । जाहले हे धुंद गलित पुष्पीं ॥५॥
सारिकांचा ध्वनि निनादे चरणीं । परी रुप वनीं न दिसे त्याचें ॥६॥
कदम्बकुसुमांसम हें नितम्बीं । शोभतसे अग्निवलय दिव्य ॥७॥
वासुदेव म्हणे कोठें तें वल्कल । बोलला नृपाळ अप्सरेसी ॥८॥

११
सुकोमल शृंगीं ठेवियेलें काय । कृश कटी भार वाही केंवी ॥१॥
आरक्त सुगंधी पंकिल हीं शृंगें । आश्रम त्या गंधें भरुनि गेला ॥२॥
मित्रा, तव स्थान दाखवीं मजसी । वास्तव्य ज्या लोकीं ऐशा नरा ॥३॥
अपूर्व शरीर, भाषण मधुर । तेजस्वी अधर मंदहास्य्स ॥४॥
हृदयंगम हे विलास जयांचे । इच्छितों तयांचें स्थान रम्य ॥५॥
चर्वण जयाचें करिसी तो दिव्य । पदार्थ अपूर्व वाटे मज ॥६॥
वासुदेव म्हणे यापरी नृपाळ । वर्णन अपूर्व करी ऐका ॥७॥

१२
विष्णूसमचि हे दीप्ति । कर्णी मकर-कुंडलांची ॥१॥
मुख सरोवरासम । नेत्र तेथें मत्स्ययुग्म ॥२॥
तीरावरी द्विजपंक्ति । तेंवी दंत विराजती ॥३॥
कमलगंधलुब्ध भृंग । तेथ, तेथ हे कुंतल ॥४॥
दिव्य उत्क्षिप्त कंदुक । करी चंचल तुझें लक्ष ॥६॥
स्पर्शलंपट पवन । करी वस्त्राचें हरण ॥७॥
तपोभंगकारी रुप । पावलासी केंवी सांग ॥८॥
वासुदेव म्हणे राव । कथी ऐका पुढती काय ॥९॥

१३
मित्रा, त्वां एथेंचि आचरावें तप । वाटे ब्रह्मा मज पावला कीं ॥१॥
तेणेंचि तुजसी धाडिलें या स्थानीं । आसक्त मी मनीं तुझ्याठायीं ॥२॥
सोडणार नाहीं क्षणही तुजसी । मज मोहिलेंसी ऐशापरी ॥३॥
इच्छिसील तेथें येईन सुखानें । आचरीन प्रेमें वदसील तें ॥४॥
सख्यांनींही तव साह्य व्हावें मज । इच्छितों मनांत हेंचि आतां ॥५॥
शुक म्हणे राया, नृपाळ चतुर । भाषणें अंतर मोही तिचें ॥६॥
वासुदेव म्हणे अप्सरा त्या स्थळीं । संगमीं रंगली बहुकाळ ॥७॥

१४
आग्नीध्र-अप्सरासंगमें त्या ठाईं । प्रतिवर्षी होई पुत्र तयां ॥१॥
ऐसे पुत्र नऊ जाहले तयांसी । ऐका नामें त्यांचीं यथाक्रम ॥२॥
नाभि, किंपुरुष, हरिवर्ष तेंवी । इलावृत्त, पाहीं रम्यक तो ॥३॥
हिरण्मय, कुरु, तैसाचि भद्राश्च । केतुमाल, अंत्य पुत्र तयां ॥४॥
नृपाळाजवळी ठेवूनि ते पुत्र । अप्सरा स्वर्गांत निघूनि गेली ॥५॥
पुत्रनामें जंबुद्वीप विभागूनि । देतसे वांटूनि राव तयां ॥६॥
वासुदेव म्हणे अप्सरेच्या लोकीं । जावया यज्ञादि करी राव ॥७॥

१५
विषयवासना होती त्या अद्यापि । अप्सरेच्या लोकीं अंतीं जाई ॥८॥
पितर आनंदें वसताती जेथें । गेला त्या लोकांतें पुण्यकर्मे ॥२॥
पुढती पुत्रांनीं मेरुच्या कन्यांसी । कांतात्त्वें सविधि स्वीकारिलें ॥३॥
मेरुदेवी, प्रतिरुपा, उग्रदंष्ट्री । लता, रम्या, तैसी शाम्या, नारी ॥४॥
भद्रा तेंवी देववीति तयां नामें । वासुदेव प्रेमें पुढती गाई ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 06, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP