स्कंध ५ वा - अध्याय १० वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


६१
परीक्षितीलागीं निवेदिती शुक । भरतवृत्तान्त पुढती ऐकें ॥१॥
सिंधु सौवीराचा ‘रहुगुण’ राजा । ज्ञानार्थ एकदां कपिलाश्रमीं - ॥२॥
जातां, मार्गी इक्षुमती नदीतीरीं । शोधितां बेगारी तया देशीं ॥३॥
वाहक म्हणूनि आणिला भरत । वेठीविण मार्ग नव्हता तया ॥४॥
रासभ वृषभांसम तो सुदृढ । पाहूनि वेठीस लावियेला ॥५॥
कुरकुर कांहीं न करी भरत । वासुदेव वृत्त कथी ऐका ॥६॥

६२
न्याहाळूनि कीड मुंगी । पदार्पण करी मार्गी ॥१॥
तेणें विषम होई गति । हिसके बैसती नृपासी ॥२॥
देतां सूचना वाहक । करिती विनंती नृपास ॥३॥
राया, नूतन बेगारी । मंद चालतसे भारी ॥४॥
दोष एकाचा सकळां । बाधे कळलें नृपाळा ॥५॥
वृद्धसेवेनें तो शांत । क्षात्रतेजें परी क्रुद्ध ॥६॥
बोले भरतासी ऐका । वासुदेव कथी वृत्ता ॥७॥

६३
बंधो, एकाकी तूं वाहूनि वाहन । श्रमलासी पूर्ण बहुकाळ ॥१॥
त्यांतही तूं कृश वार्धक्यपीडित । जोडीदार तुज व्यर्थचि हे ॥२॥
ऐसा उपहास होतांही तो शांत । जाणूनियां कृत्य अविद्येचें ॥३॥
मनीं म्हणे जन्म होवो हा अंत्यजि । देहाहंभावासी नको स्पर्श ॥४॥
गति परी त्याची पालटली नाहीं । तदा क्रोध येई नृपाळासी ॥५॥
जिवंत कीं मेला आहेसी रे म्हणे । येसील ताडनें शुद्धीवरी ॥६॥
वासुदेव म्हणे सत्तांध पाहूनि । बोलला हांसूनि भरत ऐका ॥७॥

६४
राया, वदलासी तेंचि सत्य असे । भार न आम्हांतें भासे कांहीं ॥१॥
देहासी न माझा लवही संबंध । जाणतों न मार्ग जवळी दूरी ॥२॥
पुष्टता देहाची हे पांचभौतिक । अभिमानें विकार क्रोधादि ते ॥३॥
जन्म-मरणादि राया, सकलांसी । धनी-सेवकाची भाषा व्यर्थ ॥४॥
सेव्य-सेवकता शाश्वत ती नसे । राज्यलाभ मातें घडतां काय ॥५॥
तैसाचि सेवक होशील तूं जरी । वागसील तरी केंवी सांगें ॥६॥
ब्रह्मभावमग्न, जडमूढासम । वागे त्या शासन काय करी ॥७॥
अथवा उन्मत्त मूढचि मी जाणें । परिणाम शासनें काय व्हावा ॥८॥
वासुदेव म्हणे ज्ञात्याची ती वाणी । नृपाळ ऐकूनि चकित झाला ॥९॥

६५
शास्त्रपूत स्वानुभवपूर्ण वाणी । ऐकतां, त्यागूनि अहंकार ॥१॥
उतरुनि खालीं वंदिले चरण । नम्रभावें कोण ऐसें पुशी ॥२॥
यज्ञोपवीतें या त्रैवार्णिक कोणी । दत्तासम कोणी अवधूत कीं ॥३॥
देश कुलही तें निवेदावें मातें । त्रैलोक्यीं विप्रांचें भय मज ॥४॥
कपिलदर्शना जातसें मी तेचि । सांगा भेटलांती काय तुम्हीं ॥५॥
गूढभाषा, गुप्त वेषधारी तुम्ही । मूढ अज्ञानी मी काय जाणें ॥६॥
योगियांचे मार्ग संसारसक्तासी । केले उमगती पुण्यवंता ॥७॥
वासुदेव म्हणे रहुगुण ऐसी । नम्रत्वें मुनींची कांस धरी ॥८॥

६६
मुने, युद्धादिक कर्मे होती श्रम । वाहककार्य न श्रमाविणें ॥१॥
सत्यत्व न कांहीं व्यवहारप्रति । म्हणतां तें मजसी दिसे सत्य ॥२॥
असत्यापासूनि कार्ये होती सत्य । केंवी त्या असत्य समजूं तरी ॥३॥
जलसंचयादि कार्ये तीं प्रत्यक्ष । दिसतां असत्य केंवी घट ॥४॥
यास्तव व्यवहार सत्यचि हा वाटे । तापवी पात्रातें अग्निसंग ॥५॥
पात्रस्थ उदकें सिद्ध तो ओदन । इंद्रियें तैं प्राण पुढती मन ॥६॥
याचि क्रमें सुखी दु:खी होऊनियां । गोंविताती जीवा संसारांत ॥७॥
वासुदेव म्हणे रहुगुण ऐसी । शंका मानसींची स्पष्ट करी ॥८॥

६७
अनित्यचि जरी सेव्य-सेवकादि । कर्तव्य तयांसी करणें प्राप्त ॥१॥
प्रजारक्षणार्थ ईश्वरें नृपासी । योजिलें तो शासी दुर्जनांतें ॥२॥
दुर्जनत्व तेणें यद्यपि न नष्ट । धर्मे पापयुक्त होई नृप ॥३॥
अवमानें क्रोध यद्यप न तुम्हां । परी मुने, क्षमा करा मज ॥४॥
घडलाचि नाहीं अवमानदोष । म्हणतां नसे मज समाधान ॥५॥
ज्ञात्याच्या अवमानें शिवाचाही नाश । होईल पातक थोर ऐसें ॥६॥
वासुदेव म्हणे व्यवहार सत्य । तोंवरीचि पाप-पुण्य लोकीं ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 06, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP