स्कंध ५ वा - अध्याय ८ वा
सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य
४५
आचरितां ऐसा शुद्ध भक्तियोग । एकदां प्रसंग घडला एक ॥१॥
गंडकीच्या तीरीं प्रणवजपासी । बैसतां हरिणीसी पाही एका ॥२॥
तृषाक्रांत वेगें प्राशी ते उदक । येई इतुक्यांत सिंहध्वनि ॥३॥
स्वभावें हरिणी त्यांत सिंहध्वनि । करी दचकूनि उड्डाणातें ॥४॥
भयविव्हला ते नव्हती भानावरी । कावरी बावरी होत असे ॥५॥
उदरस्थ गर्भ पडला जळांत । झाला गर्भपात महा भयें ॥६॥
कळप तियेसी त्यागूनि पळाला । प्राण अंतीं गेला पळतां वनीं ॥७॥
वासुदेव म्हणे भयग्रस्त जीव । पावतो अपाय ऐशापरी ॥८॥
४६
निराधार तें पाडस । पडलें पाहतां जळांत ॥१॥
पीळ पडूनि हृदयासी । उचली पोरक्या पोरासी ॥२॥
भरत दीनजनत्राता । रक्षी हरिणबालका ॥३॥
ममता जडली तयाची । चारापाणी करी त्यासी ॥४॥
प्रेमें करी संरक्षण । चुंबी तया गोंजारुन ॥५॥
खाजवूनि देई मोद । सेवेंत त्या होई दंग ॥६॥
हळुहळु संध्या स्नान । सुटले सर्वही नियम ॥७॥
रात्रंदिन तोचि ध्यास । सांभाळी त्या पाडसास ॥८॥
वासुदेव म्हणे दया । ऐसा पाश होई जीवा ॥९॥
४७
रात्रंदिन चित्तीं प्रसंग तो चिंती । म्हणे कालगति कठिण असे ॥१॥
आंचवलें आप्तजनांसी क्षणांत । हाय हें पाडस करील काय ॥२॥
आतां आईबाप बंधु तया मीचि । आधार न यासी अन्य कोणी ॥३॥
भरंवसा याचा आतां मीचि एक । लालनचि प्राप्त करणें याचें ॥४॥
शरणागतासी अभय न देतां । पाप येई माथां न घडो ऐसें ॥५॥
साधुजन श्रेष्ठ त्यागूनियां स्वार्थ । रक्षिती दीनांस अत्यानंदें ॥६॥
वासुदेव म्हणे जीव मोहमग्न । अक्री समर्थन अज्ञानाचें ॥७॥
४८
जडली आसक्ति ऐसी विलक्षण । विरह न क्षण एक रुचे ॥१॥
खान, पान, निद्रा, सकलही कर्मी । चिंती ध्यानीं मनीं पाडसातें ॥२॥
दर्भ, कंदमुळें, उदकार्थ जाई । पाडसातें नेई वनी तदा ॥३॥
एकाकी ठेवितां वनीं आश्रमांत । चिंती वृकादिक पीडितील ॥४॥
चोहींकडे मृग पाहतां चांचल्यें । चित्त कळवळे नृपाळाचें ॥५॥
स्कंधावरी अंतीं तयाप्रति घेई । अपूर्वचि होई सौख्य तदा ॥६॥
वासुदेव म्हणे संध्यावंदनादि । करितांही त्यासी मृगस्मृति ॥७॥
४९
हरिण स्वभावें एकदां । रमलें काननीं चरतां ॥१॥
दृष्टीआड झाले झणीं । घाबरला नृप मनीं ॥२॥
कृपण जेंवी धनास्तव । खेद पावे तैसा राव ॥३॥
शोध घेई उत्कंठेनें । म्लान वदन - नयनें ॥४॥
अंतीं होई केविलवाणा । निंदी स्वयेंचि आपणां ॥५॥
म्हणे दुष्ट मी पातकी । झालों विश्वासघातकी ॥६॥
स्वयेंचि तें मजकडे । काय येईल बापुडें ॥७॥
वत्सा देवावीण आतां । नसे आधार कोणाचा ॥८॥
वासुदेव म्हणे चिंता । व्यर्थ नाडिते मनुजा ॥९॥
५०
हाय हाय देव अस्तासी चालला । अद्यापि न आला हरिणबाळ ॥१॥
खातसे कीं तया न कळे हिंस्त्र पशु । वृत्त त्याचें पुसूं कोणा आतां ॥२॥
दीन मृगाची त्या ठेवचि ही असे । देवा, पाडस तें भेटो मज ॥३॥
आठवती मज क्रीडा त्या अपूर्व । अंतरींचे भाव कळती तया ॥४॥
लटिकाचि जरी लावितां समाधि । ढुश्श्या मजलागीं प्रेमें देई ॥५॥
होमद्रव्यें कदा करी अस्ताव्यस्त । दटावितां शांत बैसे भयें ॥६॥
ऐशापरी राव करी बहु खेद । अवलोकी तोंच पादचिन्हें ॥७॥
वासुदेव म्हणे सहस्त्र उपायें । गांजी माया पाहें योग्यातेंही ॥८॥
५१
गहिंवरुनियां राव म्हणे धन्य । जाहली हे जाण भूमि आजी ॥१॥
चिन्हें हीं पाहूनि पाडसाची आशा । देश हा यज्ञाचा तेंवी ज्ञात ॥२॥
इतुक्यांत नभीं चंद्र तया दिसे । म्हणे शावकातें आधार हा ॥३॥
पाहूनि तेथींच्या हरिणासी राव । प्रगटले भाव चित्तीं बहु ॥४॥
यापरी व्याकुळ जाहला भरत । पातलें पाडस भाग्यें त्याच्या ॥५॥
मानूनियां भाग्य हर्षला तैं राजा । न कळे दैवाचा खेळ कोणा ॥६॥
पुत्र, दारा, राज्य, त्यागूनि जो आला । मोहांत पडला हरिणाच्या तो ॥७॥
वासुदेव म्हणे विघ्नें सत्कर्मासी । जाणूनियां चित्तीं दक्ष व्हावें ॥८॥
५२
विसरला राव जप योगाभ्यास । हरिणशावक ध्यानीं मनीं ॥१॥
प्राक्तन कर्मचि ओढवलें वाटे । पाउल काळाचें जवळी आलें ॥२॥
बिळासन्निध जैं मुषकाच्या सर्प । तैसी घेई झेंप क्रूर काल ॥३॥
मरणकाळ तो जाणूनि नृपाळ । जाहला व्याकुळ अंतरांत ॥४॥
काय या मृगाचें होईल ही चिंता । मृगाच्याही चित्ता दु:ख वाटे ॥५॥
ऐशा स्थितीमाजी नृपाळाचा प्राण । देहासी सोडून निघूनि गेला ॥६॥
हरिणचिंतनें हरिणाचा जन्म । लाभला स्मरण पूर्वीचें त्या ॥७॥
वासुदेव म्हणे पापपुण्य ऐसें । पहा केंवी येतें फळाप्रति ॥८॥
५३
पूर्वस्मरणें त्या खेद । म्हणे जाहलों मी मूढ ॥१॥
सर्वव्यापी ईश्वरासी । ध्यात होतों सदा चित्तीं ॥२॥
राज्यवैभवाचा त्याग । करुनि गेलों काननांत ॥३॥
अंतीं मृगशावकाची । चित्तीं जडली आसक्ति ॥४॥
आठवूनि पूर्ववृत्त । गेला सोडूनि मातेस ॥५॥
पूर्व आश्रमांत आला । मरणासी सिद्ध झाला ॥६॥
एकाकीचि विचरे वनीं । शुष्कपर्णांतें भक्षूनि ॥७॥
ऐसें संपतां प्राक्तन । बैसे तीर्थांत जाऊन ॥८॥
वासुदेव म्हणे ऐसा । करी त्याग मृगदेहाचा ॥९॥
N/A
References : N/A
Last Updated : November 06, 2019
TOP