स्कंध ५ वा - अध्याय ४ था
सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य
२०
मेरुदेवीच्या उदरीं । जन्म पावला श्रीहरी ॥१॥
त्याच्या हस्तपादादिकीं । चिन्हें वज्र अंकुशादि ॥२॥
चंद्रकलेसम वृद्धि - । पावतां, त्या समता शांति ॥३॥
वैराग्यही तें ऐश्वर्य । प्रभाव हे दृग्गोचर ॥४॥
श्रेष्ठत्वें त्या ‘ऋषभ’ नांव । हर्षे ठेवीतसे राव ॥५॥
लोकोत्तर रुप त्याचें । उपजे मत्सर इंद्रातें ॥६॥
पाडितां तो अवर्षण । योगबळेंचि पर्जन्य ॥७॥
नाभिराजाचा आनंद । सामावे न तो नभांत ॥८॥
अत्यानंदें कंठ दाटे । मुखीं शब्दही नुमटे ॥९॥
बाळा, वत्सा, म्हणे राव । देवा, कथी वासुदेव ॥१०॥
२१
अनुरक्त प्रजा जाणूनि पुढती । राज्यभार अर्पी तयाप्रति ॥१॥
कांतेसवें जाई स्वयें बदरीवनीं । तप आचरुनि मुक्त झाला ॥२॥
निर्मळता त्याची वर्णवेल कैसी । प्रत्यक्ष हरीचि पुत्र ज्याचा ॥३॥
वासुदेव म्हणे भक्तराज ऐसा । जगीं लाभे कैसा वारंवार ॥४॥
२२
राया, कर्मभूमी मानी स्वदेशास । गुरुगृहीं वास प्रथम केला ॥१॥
अध्ययन होतां गुरु तयाप्रति । गृहस्थाश्रमाची आज्ञा देती ॥२॥
तया निष्कामासी नव्हती कांहीं इच्छा । उद्धार जगाचा करणें हेतु ॥३॥
देवेंद्र त्या अर्पी स्वकन्या ‘जयंती’ । शतपुत्र होती तयांलागीं ॥४॥
‘भरत’ त्यां माजी होता महायोगी । भारतवर्ष ही संज्ञा तेणें ॥५॥
कुशावर्तादिक बंधु त्या पाठचे । ‘कवि’ ‘हरि’ ज्ञाते पुत्र नऊ ॥६॥
भागवतधर्म निवेदिला त्यांनीं । इतर यज्ञकर्मी निरत सदा ॥७॥
वासुदेव म्हणे ऋषभचरित । परम पवित्र पुढती ऐका ॥८॥
२३
पूर्णब्रह्म अनासक्तचित्त । परी धर्मनिष्ठ, लोकांस्तव ॥१॥
सुलभ निश्चित धर्मपंथ जनीं । दाखवावा मनीं हेंचि इच्छा ॥२॥
मूर्तिमंत दया, शांति, समभाव । विप्रांप्रति देव मानीतसे ॥३॥
सर्वज्ञही परी वेदांचें रहस्य । पुसूनि विप्रांस आचरी तो ॥४॥
सर्वदा संतृप्त सर्व प्रजा त्याची । न्य़ूनता कोणासी नव्हती कांहीं ॥५॥
ब्रह्मावर्ती ऋषिसभेंत एकदां । पुत्रमिषें बोधा सकलां करी ॥६॥
वासुदेव म्हणे ऋषभाचा बोध । ऐकूनि आनंद पावो जन ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : November 06, 2019
TOP