स्कंध ५ वा - अध्याय ११ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


N/A६८
जडभरत ते ऐकूनियां वाणी । निर्भय तो मनीं वदला स्पष्ट ॥१॥
अज्ञ ज्या विषयीं तेथ मूढासम । पूर्वपक्ष जाण करिसी राया ॥२॥
तात्त्विकाविषयीं लौकिक व्यवहार । कदाही न थोर उच्चारिती ॥३॥
वैदिकही काम्यकर्मे गौण होती । म्हणसील प्रवृत्ति ज्ञात्यातेंही ॥४॥
तरी त्या ज्ञात्यासी पात्रता न जाण । अनुभवज्ञान नसे तया ॥५॥
कर्मजन्यसौख्य स्वप्नासम त्याज्य । कळे न जयास ज्ञानी त तो ॥६॥
उपनिषदेंही व्यर्थचि तयासी । कथी भरतोक्ति वासुदेव ॥७॥

६९
सात्त्विक राजस तामस विकार । तोंवरीचि नर कर्मे करी ॥१॥
प्रथम वासना पुढती आसक्ति । सत्त्वादिकां शक्ति पुढती येई ॥२॥
कामक्रोधादिकां तेणें चढे बळ । इंद्रियसमूह भूतांसवें ॥३॥
होऊनियां मन, चालक तें होई । भिन्न भिन्न घेई जन्म ऐसे ॥४॥
जोंवरी हें मन तोंवरीचि द्वंद्वे । बंधन जाणावें तोंवरीचि ॥५॥
विषयासक्त तें पाडी संसारांत । विषयविमुक्त होतां मोक्ष ॥६॥
घृतयुक्त दीप कज्जल प्रसवे । संपतां तें पावे शुद्धरुपा ॥७॥

७०
ज्ञानकर्मेद्रियें अभिमान तेंवी । अहंकारवृत्ति द्वादश या ॥१॥
पंचकर्मे, पंचभूतें तैं शरीर । ममत्वासी मूळ अभिमानचि ॥२॥
अहंकार तो मी, माझें हा अभिमान । मनानेचि जाण खेळ सर्व ॥३॥
अहंकारासवें देहामाजी जीव । विश्रांति सदैव घेत असे ॥४॥
वृत्ति या, विषय, स्वभाव, संस्कार । कर्म, कालें पक्व होऊनियां ॥५॥
कोटयवधि रुपें करिती धारण । वृत्तियुक्त मन तोचि जीव ॥६॥
वृत्तीसवें जागृत्स्वप्नादीचें ज्ञान । जीवाप्रति जाण नृपश्रेष्ठा ॥७॥
वासुदेव म्हणे हाचि त्वं पदार्थ । आतां तत्पदार्थ कथिती मुनि ॥८॥

७१
सर्वव्यापी जगच्चालक अव्यय । ईश स्वयमेव तत्पदार्थ ॥१॥
सविकार मन जोंवरी न शांत । तोंवरी अनंत जन्म घेणें ॥।२॥
त्रिविध तापांचे पिकवूनि मळे । मन स्वयें मळे निजदोषानें ॥३॥
यास्तव सावध होऊनि मनाचा । नाश करीं राजा, दक्षपणें ॥४॥
तस्कर हा बळें चोरील आत्म्यासी । शस्त्र एक यासी सेवारुप ॥५॥
गुरु-ईशसेवा शस्त्रें याचा नाश । वासुदेव बोध मुनिंचा ऐके ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 06, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP